Click "Follow" Button below To Follow this Blog

२६/०३/२०२६

Article about Ashok Kharat , Nashik

बुवा तिथे मूर्ख बाया 

'शंभर मूर्ख असले तर एका शहाण्याचे पोट भरते' अशी एक म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय खरात प्रकरणात आपल्याला आलेला दिसला. आपल्या देशात अनेक थोर संत, अध्यात्मिक गुरु होऊन गेले आहेत. स्वामी विवेकानंद, संत कबीर, संत ज्ञानेश्वर, रामदास स्वामी, एकनाथ महाराज, संत तुकाराम, नामदेव महाराज. किती नावे घेऊ? मग तरीही अशा भोंदू बाबांच्या नादी लोक का लागतात?

    खरे तर बुवा तिथे बाया हे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे गाजलेले विनोदी नाटक. वास्तविक पाहता केवळ आचार्य अत्रे लिहिले तरी चालले असते पण 'जेन झी' पिढीतील युवकांना गुगल, किंवा 'chat gpt' वर आचार्य अत्रे कोण ? असा  शोध घेण्याचे काम न पडावे म्हणून मी आधीच पुर्ण नांव लिहून टाकले. 'जेन झी' पिढी ही वाचनापासून दूर झालेली पिढी असल्याने या पिढीतील तरुण ब्लॉग वा वृत्तपत्रातील लेख वाचत असावेत की नाही ही सुद्धा एक शंकाच आहे. "लेकीन अपना तो काम है लिखना" असा विचार करून लिहायला सुरुवात केली. अत्रेंनी जरी बुवा तिथे बाया असे म्हटले असले तरी मी त्यात अत्रेंचा सन्मान राखून बुवा तिथे मूर्ख बाया असा बदल केला आहे. 

    बुवा तिथे बाया हे नाटक आठवण्याचे निमित्त ठरले ते नाशिकच्या अशोक खरात या भोंदू बाबाचे प्रकरण उघडकीस आल्यावर. खरातला अटक केल्यावर या नाटकाचे प्रकर्षाने स्मरण झाले. हे नाटक मी काही पाहिलेले नाही. परंतू सुविख्यात लेखक, नाटककार असलेल्या अत्रे यांनी लिहिलेले असल्याने ते माहित होते. इतक्या वर्षांपुर्वी अत्रेंनी हा विषय मांडला हे तेंव्हा धाडसाचे काम होते. कारण त्या काळी अंधश्रद्धा ही आजच्या पेक्षा जास्तच होती. पण अत्रे इंग्लंड मधून शिकून आले होते, विद्वान होते, वक्ता दशसहस्त्रेशू होते. त्यांचा बुवाबाजीवर मुळीच विश्वास नव्हता म्हणून त्यांनी लोकांच्या देवभोळेपणाचा काही लोक कसा फायदा घेतात हे या नाटकात मांडले आहे. असाच फायदा  चतुर, लबाड खरातने घेतला. आता खरात चतुर म्हणा किंवा लोक, बायका हे भोळे किंवा अंधश्रद्धाळू म्हणा. खरातचे अनेक किस्से अनेक चित्रफिती मग समोर यायला लागल्या. त्याचे ते कवडीमोल असलेले चिंचोके लोकांना लाखात विकणे, नाग बोलावणे, बायकांना अपत्य होण्यासाठी मंतरलेले त्याचे मुत्र मिश्रीत पाणी देणे, पुरुषांना आणखी कोणतेतरी पाणी देणे असे त्याचे एक ना अनेक किस्से अजूनही पुढे येतच आहे. खरातने बायकांचे शोषण केले असे म्हटले जात आहे पण काही चित्रफितीत महिलांचा त्याला काही विरोध होताना दिसत नाही. 

    या महिला अशा बाबा लोकांच्या आहारी कशाच काय जातात ?  या बुवांमध्ये बायकांना असे काय दिसते ? त्या त्यांच्याकडे इतक्या आकृष्ट का होतात ? ते म्हणतील तसे या बायका कशा काय करतात ? हा खरे तर संशोधनाचा विषयच आहे. सगळ्याच बायका बुवांच्या आहारी जातात असे मी म्हणत नाही किंवा अत्रेंनाही तसे अभिप्रेत नसेल पण बुवांच्या मागे बायका जास्त जातांना दिसतात हे कोणी नाकारू शकत नाही. ब-याच वर्षांपूर्वी मी वाचलेल्या एका लेखात याच प्रकारचा उहापोह केला होता. तेंव्हा त्या लेखकाने ज्या बायका एकाकी झालेल्या असतात. विवाह उपरांत काही कालावाधी नंतर पती कडून दुर्लक्षिल्या गेल्या असतात त्या बायका अशा भोंदू बाबांकडे आकर्षिल्या जातात आणि मग फसवल्या जातात त्यानंतर पश्चातापाने दग्ध होऊन अश्रू ढाळतात. असे मत त्या लेखकाने मांडले होते.

    नैराश्यग्रस्त लोक सुद्धा अशा भोंदू बाबांच्या नादी लागतात. आपल्याला काही तरी मानसिक बळ मिळेल, बाबा आपली सगळी संकटे दूर करतील असे त्यांना वाटत असते. परंतू एकदा का अशा बाबाचे बिंग फुटले की मग ते भानावर येतात. आपल्या देशात अशा अनेक भोंदू बाबा, महाराज यांच्यावर कारवाया होऊन, काहींना तर अटक झालेली पाहुनही आपले भारतीय लोक , इतकेच काय तर राजकारणी, मंत्री, एवढेच काय तर महिलांसाठी कार्य करणा-या महिला आयोगाच्या अध्यक्षा असे लोक या भोंदू लोकांच्या आहारी जातात हे पाहून खंत वाटते. 'शंभर मूर्ख असले तर एका शहाण्याचे पोट भरते' अशी एक म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय खरात प्रकरणात आपल्याला आलेला दिसला.

     आपल्या देशात महाराज, भोंदू बाबा व राजकीय लोकांचे संबंध असल्याची खरातसारखी अनेक उदाहरणे यापुर्वीही घडली आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचेवेळी धीरेंद्र ब्रह्मचारी या तांत्रिकाची मोठी वट होती, चाळीसगाव परिसरात जिल्हा परिषदेत भ्रष्टाचार करणारा धर्मभास्कर वाघ याचेही प्रकरण खुप गाजले होते. राजकारणात त्यानेही दबदबा निर्माण केला होता. राम रहीम, आसाराम बापू ही उदाहरणे तर ताजीच आहे. बरेच वेळा हे भोंदू बाबा अंधश्रद्धाळू राजकीय लोकांना हेरून मग त्यांनाच हाताशी धरून आपले बस्तान बसवत असतात. 

   अत्रेंनी जरी बुवा तिथे बाया असे म्हटले असले तरी आज भारतीय नारी सुज्ञ, सुशिक्षित झालेली आहे. अनेक चांगल्या महिला चांगले कार्य करीत आहे त्यांना खऱ्या-खोट्याची चांगली जाण आलेली आहे त्यामुळे अशा बुवा लोकांच्या नादी काही मूर्ख महिला लागतात म्हणून बुवा तिथे बाया म्हणण्याऐवजी बुवा तिथे मूर्ख बाया असा म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल.

     आपल्या देशात अनेक थोर संत, अध्यात्मिक गुरु लोक होऊन गेले आहेत. स्वामी विवेकानंद, संत कबीर, संत ज्ञानेश्वर, रामदास स्वामी, एकनाथ महाराज, संत तुकाराम, नामदेव महाराज किती नावे घेऊ? एवढे सारे संत आजही आपल्या सोबत ग्रंथरूपाने अस्तित्वात आहे. 

माझी काया आणि वाणी।गेली म्हणाल अंतः करणी।

परी मी आहे जगजीवनी।निरंतर। 

आत्माराम दासबोध।माझे स्वरूप स्वतःसिद्ध। 

असता न करावा हो खेद।भक्तजनी ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

असे रामदास स्वामींनी तर म्हटले आहे. मग आपल्याला वैफल्यग्रस्त , नैराश्यग्रस्त असे वाटत असल्यास आपण या अशा थोर संतांच्या वचनांचा त्यांच्या ग्रंथांचा आधार का घेऊ नये ? त्यांच्या ग्रंथांचा आधार घेतल्यास, त्यांना शरण गेल्यास आपल्याला या खरात सारख्या भोंदू बाबांचे खरे रूप समजण्यास जराही वेळ लागणार नाही.   


०५/०३/२०२६

Article about iran , some memories and agitation in India

 इराण, इराणी आणि इराणी चहा .

इराण मधून पारशी लोक आले ते इथलेच झाले, इथल्या संस्कृतीत मिसळून गेले, इथल्या मोठा विकासास हातभार लावला त्याप्रमाणे या देशात झालेल्या इतरांनीही त्याचे अनुकरण करायला नको का ?

इराणवर अमेरिका आणि इजरायलने हल्ले केल्यानंतर इराण बाबत त्वरीत उहापोह सुरु झाला. आजकाल मिडीया सोशल मिडीयावर इतकी भाऊगर्दी झाली आहे की विचारता सोय नाही. सर्वच विषयांवर एका पाठोपाठ एक असे लिखाण, मथळे येतं राहतात. इराणवरील आक्रमणाबाबत सुद्धा तसेच झाले. इराण, पर्शिया, तेलसाठे वेगवेगळ्या प्रकारचे मिसाईल, युद्धात सामील देशांकडे असलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, इराणनी लपवून ठेवलेली युद्ध सामग्री सगळे-सगळे मिडीया व सोशल मिडीयावर धडाधड येऊन धडकले. म्हटले आता या अशा इराणी भाऊगर्दीत आपण काय लिहावे ? आणि बस इराणी शब्द डोक्यात आला आणि देवा शपथ खरे सांगतो खोटे सांगणार नाही या उक्ती प्रमाणे सर्वात पहिले आठवली ती अरुणा इराणी आता तुम्ही म्हणालं अरुणा इराणी मध्ये असे काय आठवण्यासारखे ? तर अगदी बरोबर आहे, पण बऱ्याच सिनेमात ती दिसली आणि इराण विषयावरून आठवली. तशी ती काही एकदमच वाईटही होती असेही नाही. सहनायिकेच्या भूमिका चांगली करायची बिचारी. आता मनुष्याला कोणत्या वेळी नेमकी कोणती गोष्ट आठवेल याच्यावर काही नियंत्रण नसते त्यामुळे इराण विषयाने इराण, इराणी असे शब्द आठवल्यावर पहिले अरुणा इराणी, 

मग त्यानंतर आठवला तो बोमन इराणी. बोमन इराणीचा चित्रपटात प्रवेश तसा त्याच्या वयाच्या उशिरानेच झाला परंतु त्याने अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवला. त्याही पूर्वी हिंदी सिनेमांमध्ये हनी इराणी आणि डेझी इराणी अशा दोन बालकलाकार होत्या. हनी आणि डेझी या दोघी एकच होत्या की वेगवेगळ्या ? हा आणखी अधिकचा शोध लावण्याच्या भानगडीत मी काही पडलो नाही परंतु कुठेतरी हनी इराणी ही सुप्रसिद्ध चित्रपट कथा लेखक जावेद अख्तर यांची पत्नी असल्याचे वाचले होते तसेच तिने काही चित्रपटांच्या कथा सुद्धा लिहिल्या होत्या हेही आठवले. आणि हो एवढेच काय तर मानेक इराणी सुद्धा आठवला. 

याचे नांव मानेक होते की माणिक हे सुद्धा हाडाचे सिने अभ्यासकच सांगू शकतील. पण इराणी म्हटल्यावर मानेक हेच त्याचे नांव असावे कारण माणिक हा मराठी शब्द. तर हा मानेक इराणी म्हणजे कोण ? हा अनेकांना प्रश्न पडला असेल पण बऱ्याच वाचकांना बिल्ला म्हटल्यावर नक्कीच तो नक्कीच आठवेल याची मला खात्री वाटते. गाजलेल्या हिरो सिनेमात व्हिलनचा असिस्टंट दाखवलेला बिल्ला याचे खरे नाव मानेक इराणी होते पण हिरो सिनेमामुळे सर्व लोक त्याला बिल्ला म्हणूनच ओळखू लागले. तर असे हे इराण वरून पडलेल्या इराणी नावा संबंधीचे पुराण.

     दुसरी आठवलेली गोष्ट म्हणजे भारतीयांचे आवडते पेय अर्थात चहाची. इराणी आणि चहा या योगाची. आपला भारत देश म्हणजे इतर अनेक देशातील नागरिकांचा आश्रयदाता. इतका आश्रयदाता की पिढ्यांपिढ्या पासून येथे राहत असलेल्या मूळ भारतीय नागरिकांना आता त्याचा त्रास व्हायला लागला. तसेच पूर्वाश्रमीच्या पर्शिया मधून म्हणजेच आताच्या इराण मधून इराणचे मूळ रहिवासी असलेले जे पारशी लोक होते त्यांना मुस्लिमांनी निष्कासित केल्यावर या लोकांनी आवो जावो घर तुम्हारा असे असलेल्या आपल्या भारतात आश्रय घेतला. पण हे पारशी लोक इतर घुसखोरांसारखे नव्हते हे इथे राहिले आणि यांनी या देशाच्या विकासात सुद्धा हातभार लावला. भारतात त्यांना इराणी म्हणून ओळखले जाऊ लागले. या इराणी लोकांनी मग भारतातील काही शहरांमध्ये निरनिराळे  व्यवसाय सुरू केले त्यातच एक व्यवसाय होता चहाचा, इराणी चहा. विशेषतः मुंबईत स्थायिक झालेल्या इराण्यांनी त्यांच्याकडच्या  पद्धतीचा चहा त्यांच्या हॉटेल मधून ग्राहकांना देणे सुरू केले. हा इराणी चहा खूप लोकप्रिय झाला. आजही काही इराणी चहाची दुकाने मोठ्या शहरांमध्ये टिकून आहेत. हा चहा लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे. चहाची पत्ती "दम' अर्थात मंद आचेवर पाण्यामध्ये बराच वेळ उकळून नंतर त्यात आटवलेले दूध, साखर मिसळायचे आणि मग तो चहा प्यायचा. या पद्धतीचा चहा लोकांना आवडला. या चहा सोबत इराणी चहावाले बन मस्का सुद्धा देत असत. यांची चहाची दुकाने सुद्धा त्यांची संस्कृती दाखवत असत.

   इराण वरील हल्ल्यामुळे तत्संबंधीत अनेक बाबी आठवल्या असल्या तरी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अयातुल्ला खामनेई या इराणच्या अध्यक्षाला अमेरिका व इजरायलने ठार केल्यावर आणि विशेष म्हणजे काही मुस्लिम देश अमेरिकेच्या बाजूने असल्यावरही खामनेई प्रति उफाळून आलेले भारतातील  मुस्लिमांचे प्रेम. हजारो किलोमीटर दूर असलेला माणूस आपल्या भारतातील लोकांचा रहबर कसा असू शकतो ? इथले अनुदान, इथल्या सुविधा, इथल्या योजना यांचा लाभ घ्यायचा आणि रहबर मात्र अन्य कुणी ! आमचा बाप मेला असे ते कसे म्हणू शकतात ? त्याच्याविषयी प्रेम दाखवणाऱ्या त्या छाती पिटून विलाप करणा-या महिलांना त्या देशात पाठवले तर त्यांच्या लक्षात येईल की तिथे महिलांची काय स्थिती आहे. आपल्या देशाप्रमाणे तेथील महिलांना मोकळीक किंवा हक्क आहेत का ?

     या इराण पुराणा वरून शेवटी हेच म्हणावेसे वाटते की ज्याप्रमाणे अनेक वर्षांपूर्वी येथे इराण मधून पारशी लोक आले ते इथलेच झाले, इथल्या संस्कृतीत मिसळून गेले, इथल्या मोठा विकासास हातभार लावला त्याप्रमाणे या देशात आलेल्या इतरांनीही त्याचे अनुकरण करायला नको का ? त्यांच्यापासून काही बोध घ्यायला नको का ?

विनय वि. वरणगांवकर©

खामगांव

9403256736