३१/०७/२०१८

Mohd Rafi was renowned singer of Hindi film industry, article elaborate about him (originally written on 31 July 2014)


तुम मुझे युं भुला ना पाओगे

            हिंदी चित्रपटसृष्टीमुळे भारतातील अनेक कलाकारांचे सुप्त गुण प्रकट झाले व ते कलाकार सर्वांच्या गळ्यातील ताईत बनले. म्हणजेच आताच्या भाषेत सेलिब्रेटीझाले.अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, लता मंगेशकर, नौशाद, सैन्यातून येऊन संगीतकार बनलेला मदन मोहन, पोलिस इन्स्पेक्टरची नोकरी सोडून स्टार झालेला डायलॉग किंग स्टाईलबाज राजकुमार, बस कंडक्टरचा नायक झालेला नवीन पिढीचा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता रजनीकांत. याच मालिकेत मोडला जातो सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी. लहानपणी रफीच्या गावात एक फकीर येत असे. त्याच्या मागे-मागे फिरून रफी सुद्धा त्याच्यासारखे गाणे गाऊ  लागला. एक दिवस रफी त्या फकीराच्या मागे-मागे गावाच्या बाहेर गेला व बराच काळ पर्यन्त परत आलाच नाही. घरी, गावात सर्वाना चिंता वाटू लागली परंतू रफी नंतर परत आला. परत आला तो आवाजात एक मधाळ गोडवा घेउन. या घटनेनंतर तो फकीर सुद्धा पुन्हा गावात फिरकला नाही. मोठ्या भावाच्या केश कर्तनालयात बसून गाणी म्हणणा-या रफीतील गायन कौशल्य मोठ्या भावानी अचूक हेरले व त्याला घेऊन मुंबईची वाट धरली. अतिशय नम्र, “डाऊन टू अर्थअशा या गायकाने 1950 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल ठेवले.सुरुवातीला सैगलच्या आवाजाचा मोठा प्रभाव रफीवर होता. परंतू हळू-हळू त्याने स्वतंत्र शैली निर्माण केली व अल्पावधीतच तो लोकप्रिय झाला. सुरुवातीला एन.दत्ता, नौशाद इ. संगीतकारांबरोबर बैजू बावरा मधील मन तडपत हरी दर्शन को आज”, “ओ दुनिया के रखवालेसारखी अनेक यशस्वी गाणी त्याने दिली. त्यानंतर शंकर-जयकिशन सोबत तर शेकडो हिट गाणी रफीने गायली. शंकर-जयकिशन व रफी हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. 1960 च्या दशकात शंकर-जयकिशनची रफीने राजेंद्रकुमार किंवा शम्मी कपूर यांच्यासाठी गायलेली रफीच्या मधाळ आवाजातील कितीतरी गाणी रसिक आजही गुणगुणतात, ऐकतात. युट्युब वरील त्याच्या गाण्यांच्या व्ह्यूवरुन लाईकवरुन हे सहज लक्षात येईल. जसे दिवाना हुवा बादल”, “ रुखसे जरा नकाब उठावो” , “दिन ढल जायइ गाणी. राजेन्द्र्कुमारचे “बहारो फुल बरसाओतर आजही नवरदेव हनुमंताचे दर्शन घेऊन कार्यालयात आला की बँडवाले वाजवताना दिसतात. रफीच्या अफाट लोकप्रियतेचे  व यशाचे गमक हे सुद्धा होते की सर्वांसोबत त्याची वागणूक अतिशय नम्रतेची असे. त्याच्या चांगुलपणामुळे गायकाच्या रॉयल्टी प्रकरणाहून लता व रफी वाद झाला होता त्यावेळी संगीतकारांनी युगल गीतांसाठी रफी सोबत लताऐवजी शारदा सारख्या सामान्य गायीकेकडून गाणी गाऊन घेणे रास्त समजले होते. शेवटी लताजींना सामंजस्याने वाद मिटवावा लागला होता असा किस्सा सांगितला जातो. रफीने 1950-60 च्या दशकात देव आनंद, दिलीपकुमार, राजेंद्रकुमार, शम्मी कपूर, शशी कपूरधर्मेंद्रमनोजकुमार, विश्वजीत, जॉय मुखर्जी या सर्व नायकांच्या यशात रफीच्या आवाजाचा सुद्धा मोठा वाटा आहे. नंतरच्या पिढीत सुद्धा राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, जितेंद्र, ऋषी कपूर, नवीन निश्चल यांच्यासाठी सुद्धा रफीने अनेक श्रवणीय गाणी गायली. राजेश खन्ना व किशोरकुमार यांच्या सर्वोत्तम कारकीर्दीच्यावेळी सुद्धा तेरी बिंदिया रेहे अभिमान मधील तसेच क्या हुवा तेरा वादा अशी हिट गाणी गाऊन रसिकांना आपल्या आवाजातील गोडव्याने रफीने मंत्रमुग्ध केलेच होते. रफीने इतर भाषांत सुद्धा गाणी म्हटली आहेत. रफीने 12 मराठी गीते गायली आहेत. यातील हा छंद जीवाला लावी पिसे” , “प्रभू तू दयाळूअशी काही गाणी आहेत. दयाळू या शब्दातील ळूरफीने किती लिलया गायला आहे. कारण मुस्लीम लोकांना हा शब्द उच्चारणे सहसा कठीण असते. मराठी गीतांत सुद्धा रफी हिंदी इतकाच खुलुन गायला आहे. आजच्या इंटरनेटच्या जमान्यात सुद्धा फेसबुकवर मो. रफी फॅन क्लबच्या माध्यमातून अनेक रफी चाहते रफीची सुश्राव्य गीते पोस्ट करीत असतात. अनेकदा रफी किशोर मध्ये श्रेष्ठ कोण अशी चर्चा केली जाते. तेंव्हा शरारत चित्रपटात “अजीब दास्तान है तेरी ऐ जिंदगी “या गीतासाठी किशोरकुमारसाठी रफीच्या आवाजाचा वापर करण्यात आला होता. किशोरसाठी रफीने आवाज दीलेली इतरही काही गाणी आहेत, यातच रफीचे श्रेष्ठत्व सिद्ध होत नाही का? 31 जुलै 1980 रोजी मो.रफी या महान गायकाचे निधन झाले रफी नंतर सुरेश वाडकर, अन्वर, मो. अजीज, शब्बीरकुमार या प्रती रफींना पाचारण करण्यात आले परंतू त्यांना रफीच्या आवाजाची उंची काही  गाठता आली नाही. उलट या प्रतीरफी गायकांचा आवाज ऐकल्यावर रफीची व त्याने शम्मी कपूरसाठी गायलेल्या तुम मुझे युं भुला ना पाओगेया गाण्याची आवर्जून आठवण येते. खरोखरच रसिक श्रोते रफीला व त्याने गायलेल्या गाण्यांना कदापीही विसरू शकणार नाहीत. 

२७/०७/२०१८

Article on the occasion of "Gurupaurnima" and about Maharshee Vyas


...व्यास विशाल बुद्धे

आज आषाढ पौर्णिमा, गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. हा दिवस महर्षी व्यास यांचा जन्मदिन मानला जातो व आज त्यांचे आज पूजन केले जाते. या पौर्णिमेस व्यास पौर्णिमा सुद्धा म्हटले जाते.हा दिवस हिंदू , बौद्ध, जैन तसेच शीख हे सर्वच लोक साजरा करत असतात. नेपा मध्ये सुद्धा या दिवसाला मोठे महत्व दिले आहे. गुरुपौर्णिमेला नेपा मध्ये राष्ट्रीय सुट्टी दिली जाते. भारतात अनंत काळापासून गुरूंना मोठे आदराचे स्थान आहे. गुरु म्हणजे ते की जे अध्यात्मिक किंवा क्रमिक विषयांचे ज्ञानदान आपल्या शिष्यांना विना मोबदला किंवा उपजीविकेस पुरेल इतका अल्प मोबदला घेऊन करीत असत. ज्ञानदानाचा मोबदला घेणे म्हणजे पाप समजले जात असे. म्हणून प्राचीन काळातील गुरु, पूर्वीचे शिक्षक हे सर्वसामान्य जीवन व्यतीत करीत असत. आजतर शिक्षणक्षेत्र म्हणजे प्रॉफीट मेकिंग बिझनेसझाले आहे. सद्यस्थितीत तर अत्यल्प मोबदला घेऊन शिकवणे, विना मोबदला शिकवणे परीसासारखे दुर्मिळ झाली आहे.जास्त फी म्हणजे जास्त चांगले शिक्षणअशी पालकांची सुद्धा भावना झाली आहे.सांदिपनी-कृष्ण,द्रोणाचार्य-अर्जुन,धौम्य-आरुणी,रामकृष्ण-विवेकानंद, समर्थ रामदास-शिवाजी महाराज अशी फार मोठी गुरु शिष्य परंपरा लाभलेल्या आपल्या देशात दुर्दैवाने आता असे दाखले क्वचितच आढळतात. एखादाच सचिन तेंडूलकर रमाकांत आचरेकरांसारख्या आपल्या गुरुंबद्दल जाहीरपणे आदर,निष्ठा,प्रेम,आपुलकी अशा भावना व्यक्त करतांना दिसतो. बरेच प्रसंगी पंतप्रधान मोदीं सुद्धा लक्ष्मणराव इनामदार उपाख्य वकील या त्यांच्या गुरुंबद्दल आपुलकी, प्रेम, सन्मान व्यक्त करतांना दिसून येतात. वरील सर्व गुरुंनी केवळ त्यांच्या शिष्यांना मोबदला घेऊन शिकवले असे नाही तर त्यांना जीवनाचा मार्ग दाखवला,
त्यांच्या सुख-दुखा:त सुद्धा सहभागी झाले, त्यांची , त्यांच्या भविष्याची, त्यांच्या कुटुंबियांची चिंता वाहीली. दुर्दैवाने असे आता आढळत नाही. बदललेल्या शिक्षण पद्धतीत, शिक्षण क्षेत्रात जुन्या संकल्पनांना सुद्धा स्थान नाही. ज्या व्यासांचे स्मरण आजच्या दिनी केले जाते त्या व्यासांची महत्ता , थोरपण , ज्ञान आज नाकारले जाते. बरेच कार्यक्रम प्रसंगी महानुभाव विराजमान होतात त्या स्थानाला  “व्यासपीठम्हणण्याऐवजी आजकाल मंचक असा शब्द वापरला जातो. व्यासपीठाला इतर कोणताही शब्द का वापराना परंतू निदान मंच तर म्हणा ! इंग्रजी अतिशय बोकाळल्यामुळे मंचक या शब्दाचा अर्थ पलंग असा होतो हे सुद्धा ते  ध्यानात घेत नाही. तुम्ही एकवेळ व्यासपीठ नका म्हणू परंतू मंचक न म्हणता निदान मंच तरी म्हणा. मंचक शब्दाने किती चुकीचा अर्थ होतो हे सुज्ञांच्या लक्षात आलेच असेल. व्यासपीठ शब्दप्रयोग कररणा-यांचा कदाचित व्यासांप्रती काही विशिष्ट पूर्वग्रहदूषित दृष्टीकोण असावा.कदाचित त्यात जात-पात येत असावी. परंतू त्यांनी हे जाणावे की महर्षी व्यास हे काही कुणी उच्चवर्णीय नव्हते महर्षी पाराशर व एका मासेमा-याची कन्या मत्स्यगंधा अर्थात सत्यवती हे व्यासांचे माता-पिता. म्हणजे व्यास हे वर्णसंकरातून जन्म झालेले होते. त्यांची माता ही सर्वसामान्य व तत्कालीन निम्न जातीतील स्त्री होती. तरीही ते ज्ञानी, वेद पारंगत होते म्हणूनच त्यांना वेदव्यास सुद्धा म्हणतात. या भारतात नेहमीच ज्ञानी लोकांना पूजनीय मानले जात आले आहे. त्यामुळे व्यास मुनींच्या नावाचा उगीचच तिटकारा न करता त्यांचा इत्यंभूत अभ्यास करावा , त्यांच्या ज्ञानाचा सन्मान करावा, आपला संकुचित दुष्टीकोन बाजूस सारावा व “ओम नामोस्तुते व्यास विशाल बुद्धे” म्हणून व्यासांसारखे विशाल बुद्धीचे होण्याचा संकल्प आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिनी करावा हीच सदीच्छा.

२४/०७/२०१८

People expecting various things from Government, article on this issue with the help of famous Saint Kabeer's 'Doha'


मांगन मरण समान है  (1) 
     संत कबीराने अनेक उत्तोमोत्तम दोहे लिहिले आहेत त्यापैकी एका दोहयात संत कबीर म्हणतात की कुणाला काही मागणे म्हणजे एक प्रकारचे मरणच होय. परंतू आजकाल वाचायला कुणाला वेळ आहे. त्यातच कबीर म्हणजे फारच दूरचे झाले. त्यात पुन्हा संतांना जात-पात पाहून वाटून घेतले गेले आहे. कबीरच्या या दोहयाची आठवण होण्याचे कारण म्हणजे भारतात सर्वच नागरीकांना सध्या सरकारकडे सतत काही ना काही याचना करण्याची अतिशय वाईट सवय लागली आहे. याची प्रचीती आपणास वेळोवेळी येतच असते. मागण्याची ही सवय आता इतकी जडली आही की, या मागण्या करतांना अनेकदा बाल-गोपालांना सोबतघेऊन केल्या जातात. म्हणजे त्यांना सुद्धा आपसूकच याचना करण्याचे बाळकडू पाजले जात आहे.ते सुद्धा पुढे जाऊन याचकच बनण्याची शक्यता अधिक वाटते. अनेक संघटना त्यांच्या-त्यांच्या मागण्या पुढे रेटतच असतात. ठीक आहे तुम्ही मागण्या करा परंतू तुमच्या मागण्यांमुळे इतर समाज बांधवांवर काही परीणाम होतो आहे का ? मागणी देशहीताची आहे का ? असा विचार संघटना करतांना दिसत नाही. स्वहीत जोपासण्यात सर्व इतके मश्गूल झाले आहेत की देशहीताशी कुणाला काही देणे-घेणे नाही.कुण्यातरी सत्तेपासून वंचीत असलेल्या राजकीय पक्षांनी ह्यांची माथी भडकवून दिली की हे रस्त्यावर गाड्या, टायर पेटवणे व तोडफोडी सुरू करतात. जनतेच्या मागण्या पूर्ण करता-करता सरकारच्या नाकी नऊ आले आहे व भविष्यात या सवयीने देश आर्थिक संकटात जाणार आहे. तुम्ही तुमच्या मागण्या संवैधानीक पद्धतीने का नाही रेटत बुवा? सरकारी मालमत्ता खुशाल नष्ट करणे,त्यांना हानी पोहोचवणे,स्वजातीच्या किंवा वैयक्तीक मागण्या रेटण्यासाठी रस्त्यावर अन्नपदार्थ नासाडी करणे,ते रस्त्यावर फेकणे हे अनुचित नव्हे का? विविध मागण्यांसाठी निघणारे  मोर्चे, आंदोलने एवढ्या मोठ्या प्रमाणात इतर देशांत खचितच होत असावेत.सरकारी नोक-यांसाठी एवढी धाव का असते ? येनकेन प्रकारेण सरकारी सेवेत चिकटले,सरकारचे जावाई झाले की गंगेत घोडे न्हाले, त्या सरकारी सेवेतून स्वकुटुंबाचा उदरनिर्वाह झाला की समाजाचे देशाचे काहीही होवो अशीच स्थिती काही अपवाद वगळता दिसून येते.काहीच उदाहरणे अशी असतात की बिकट स्थितीतून सुद्धा चांगली शेती फुलवतात, उत्पन्नाचे उच्चांक गाठतात किंवा इमाने-इतबारे सरकारी नोकरी करतात.राजकीय पक्षांच्या नादी लागून मागण्या करून, आंदोलने करून  वेळोवेळी जनतेस वेठीस धरणे योग्य नव्हे. परंतू हे सांगणे सुद्धा मोठे कठीण झाले आहे. कबीराने जरी कुणाला मागणे चांगले नसते असे सांगितले असले तरी मागण्या करणे अगदीच अनुचित आहेत असेही म्हणता येणार नाही अनेकदा सरकारला जाणीव करून देणे सुद्धा जरूरी आहे. बाळ रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही असेही म्हटले जाते म्हणतात म्हणून नेहमी आपल्याच मागण्यांसाठी रडतच राहणे,जनतेस वेठीस धरणे, एकीकडे महात्मा गांधींचे नाव घेणे आणि दुसरीकडे हिंसा करणे हे कितपत योग्य आहे? परंतू लक्षात कोण घेतो ? नुकतीच पंढरपूर वारी झाली ज्ञानेश्वर माऊलींनी “जो जे वांछिल तो ते लाहो” असे पसायदान मागीतले होते. त्याप्रमाणे सर्वांना त्यांचे ईप्सित फळ प्राप्त होवो परंतू त्यासाठी इतरांना कष्ट देऊन नव्हे. तसेच सतत मागण्या व त्यासाठी जनतेला कष्ट होतील अशी आंदोलने करू नयेत कारण बरेचदा ज्याच्याकडे मागणी केली जाते त्याच्या कडून न्यायालयीन प्रणाली व प्रक्रीया यांमुळे ती मागणी पूर्ण करणे किचकट होत असते हे समजून घेणे सुद्धा जरूरी असते.“जो जे वांछिल तो ते लाहो” हे तर आहेच परंतू प्रत्येकाने मागण्या करतांना कबीराचा दोहा मात्र जरूर लक्षात ठेवावा
“मांग मरण समान है, मत मांगो कोई भीख
मांगनसे मरना भला यह सद्गुरू की सीख”

१९/०७/२०१८

They are making biopics on criminals and forgetting real heros like Batukeshwar Dutt


देशद्रोही दत्तचा उदोउदो, देशभक्त दत्त मात्र उपेक्षित
भारताला स्वातंत्र्यप्राप्ती झाली. परंतू काही वर्षातच सर्व चित्र बदलले. हिन्दी चित्रपट जोरात झळकू लागले त्यांचीच चर्चा होऊ लागली व देशभक्तीची लाट झपाटयाने ओसरली इतकी की ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता , क्रांतिकार्यात भाग घेतला होता ते अडगळीस जाऊन पडले. त्यांची तीव्र उपेक्षा झाली , त्यांचे विस्मरण झाले. कुणालाही हयात असलेल्या ,प्रत्यक्ष ‘इन्कलाब’ करणा-या  क्रांतीवीरांकडे बघण्याची सुद्धा फुरसत नव्हती. स्वातंत्र्योत्तर काळात निदान काही वर्षे तरी उत्तम दर्जाचे चित्रपट होते परंतू नंतर देमार, गुन्हेगारी उदात्तीकरणाचे, उत्तान दृश्ये असणारे चित्रपट निघू लागले. हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे त्याच पठडीतला आणखी एक चित्रपट ‘संजू’ नुकताच प्रदर्शित झालेला. दत्त आडनांव असलेल्या टुकार,देशद्रोही अभिनेत्याच्या(?) जीवनांवर आधारीत असलेला हा चित्रपट. हा जरी देशद्रोही असला तरी याच्या ‘दत्त’ या आडनावावरून एका देशप्रेमी ‘दत्त’ आडनाव असलेल्या उपेक्षित क्रांतिकारकाची आठवण झाली. पहिला देशद्रोही तर दुसरा कट्टर देशप्रेमी, पहिला चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला तर दुसरा सर्वसामान्य. पहिल्याने व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन, तीन लग्नांपूर्वी अनेक स्त्रिया उपभोगून, आपल्याच भारतवासियांना मारण्यासाठी आणलेली शस्त्रे घरात लपवून नाना त-हेची दुष्कृत्ये केली. तर दुस-याने ऐन तारुण्यात लग्नादी इच्छा बाजूला सारून देश स्वतंत्र करण्याचा ध्यास घेऊन भारतीयांना स्वतंत्रता मिळवून देण्यासाठी इंग्रजांविरूद्ध लढण्यासाठी बॉम्ब बनवण्याचे शास्त्र शिकले, असेंब्लीत बॉम्ब फेकले व अंदमानात कारावास भोगला,राजकीय कैद्यांना मिळणा-या हीन दर्जाच्या वागणुकी विरोधात उपोषण
केले ,सुटल्यानंतर ‘चले जांव’ चळवळीत सह्भागी झाला.यातील पाहिल्याचे नांव वाचकांना त्वरीत आठवले असेल परंतू दुस-याचे नांव मात्र कदाचित काहींनाच आठवले असेल.या दोहोंपैकी पहिला म्हणजे अनेक बुद्धीभ्रष्ट भारतीयांचा लाडका,त्यांच्या दृष्टीने भोळा संजू बाबा म्हणजेच संजय दत्त तर दुसरा म्हणजे महान क्रांतीकारी बटुकेश्वर दत्त. उद्या 20 जुलै रोजी बटुकेश्वर दत्तचा स्मृती दिन आहे.किती जणांना ठाऊक आहे? किती शाळांत व इतर ठिकाणी त्याला अभिवादन केले जाणार ? असे प्रश्न विचारल्यास 130 करोड जनतेच्या या देशात बोटावर मोजता येतील एवढे लोक निघतील.स्वतंत्रता मिळाल्यावर अनेक नेत्यांनी सत्तेचे फळे उपभोगली,काही वर्षातच संरक्षण खात्यात घोटाळे केले.बटुकेश्वरला काय मिळाले? उपजिविका करण्यासाठी या इंग्रजांना घाबरवणा-या महान क्रांतीकारकास कधी सिगारेटच्या कंपनीचा एजंट बनावे लागले तर कधी टूरिस्ट गाईड. बटुकेश्वरला टी.बी. झाला होता त्याला सरकारी दवाखान्यात भरती केले होते परंतू त्याच्याकडे कुणीही फिरकले नाही. त्याच्या एका मित्राने “क्या दत्त जैसे क्रांतीकारी को भारत मे जन्म लेना चाहिये?” असा एक लिहिल्यावर गुलजारीलाल नंदा व इतर काहींनी एक हजार रुपयांची मदत केली. 17 ला बटुकेश्वर दत्त कोमात गेला व 20 जुलै 1965 रोजी त्याने प्राण सोडले. भगतसिंग , सुखदेव व राजगुरू यांच्यावर जेथे अंतिम संस्कार झाले त्याच्या शेजारीच माझ्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्याची त्याची अंतिम इच्छा होती, ती पूर्ण करण्यात आली.बटूकेश्वरच्या हयातीत तर त्याची उपेक्षा झालीच परंतू आपण त्याच्या मृत्यूनंतरही त्याची उपेक्षा करीत आहोत. आमचेच लोक भारताच्या भावी आधारस्तंभ असणा-या आमच्याच तरुणांसाठी बटुकेश्वर दत्तचा चित्रपट तर सोडा साधा माहितीपटही न काढता डॉन दाऊद, सनी लिओनि व देशद्रोही,सजा भोगून आलेल्या संजय दत्त यांचे biopic दाखवतो हीच आपल्या देशाची शोकांतिका आहे.

ता.क. – आज 19 जुलै रोजी मंगल पांडे जयंती आहे

०५/०७/२०१८

We are making biopics of criminals, They made biopic on Indian mathematician S.Ramanujan


बॉलीवूडचा ‘संजू’ हॉलीवूडचा ‘रामानुजन’  

भारतीय चित्रपटसृष्टी म्हणजे आम्हा भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य घटक. दिवस सुरु होताच आमचे फिल्मी
गाणे गुणगुणणे,ऐकणे सुरु होते त्यानंतर बाजार, कार्यालये इ ठिकाणी गाणी किंवा फिल्मी गप्पा होत असतात,दिवसाचा शेवट सुद्धा चित्रपट वाहनी किंवा गाण्यांची वाहिनी पाहून होतो. गृहिणी, हॉटेलवाले, वाहन चालक यांचे सुद्धा त्यांचे कामकाज करीत असतांना गाणी ऐकणे किंवा गुणगुणणे सुरु असते. इतका चित्रपटसृष्टीचा आपल्यावर प्रभाव आहे. 1970 च्या दशकापासून भारतीय चित्रपटांनी कूस बदलली. रोमँटीक चित्रपट जाऊन अन्याया विरूद्ध पेटून उठणारा किंवा अन्यायामुळे गुन्हेगार बनलेला नायक अशा आशयांचे चित्रपट निघू लागले.त्यातूनच मग गुन्हेगारांचे हळूवारपणे Glorification अर्थात उदात्तीकरण सुरु झाले.सत्तरच्या दशकातील हाजी मस्तानच्या जीवनाशी साधर्म्य असणारा अमिताभचा दिवार, नंतर कमल हसनचा नायकन त्याचेच हिंदी रूप असलेला विनोद खन्नाचा दयावान, अनिल कपूरचा बेताज
बादशहा.आता-आताचे वास्तव, कंपनी, वन्स अपॉन टाईम इन मुंबई, मराठीत मन्या सुर्वे अशा कितीतरी चित्रपटातून गुन्हेगारांचे उदात्तीकरण झाले आहे.भारतीय चित्रपटसृष्टीला गुन्हेगारी क्षेत्रातून होणारा वित्तपुरवठा हे त्याचे एक कारण आहे. परंतू अशा चित्रपटांचा  समाजावर चांगला परिणाम होत नसून विपरीत परिणाम होत असतो. नेमके त्यातून वाईट घेतले जाते. हा सर्व उहापोह यासाठी की, इकडे आपले निर्माते गुन्हेगार, देशद्रोही यांच्यावर चित्रपट बनवत असतांना तिकडे विदेशी निर्मात्यांनी मात्र आपल्या भारतीय गणितीतज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचावर चित्रपट बनवला होता. तो मात्र फार चर्चिल्या गेला नाही, ना मिडीयाने या चित्रपटावर प्रकाश टाकला. रामानुजन यांच्या वरील हा चित्रपट सर्वप्रथम 2015 मध्ये टोरँटो येथील चित्रपट महोत्सवात दाखवला गेला होता,त्यानंतर इंग्लंड व अमेरिकेत. व नंतर जगभर प्रदर्शित झाला.सुनील दत्त व नर्गिस या माजी मंत्री व खासदार,समाजसेवी व अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेल्या दाम्पत्याच्या कुपुत्र ठरलेल्या देशद्रोही,शिक्षा भोगून आलेल्या व्यसनाधीनतेमुळे यमसदनाच्या दरवाजातून वडीलांच्या कृपेने परत आलेल्या संजय दत्त उर्फ संजूबाबाच्या जीवनावरील संजू हा चित्रपट उत्पन्नाचे उच्चांक प्रस्थापित करीत असतांना “द मॅन हू नो इन्फिनिटी” या रामानुजनच्या चित्रपटाला थीएटर सुद्धा मिळाले नव्हते. जिथे कुठे हा झळकला तिथे प्रेक्षक नाही. विद्यार्थ्यांसाठी त्याचे शो सुद्धा झाले नाहीत. संजू चित्रपटा विरोधात समाज माध्यमांवर कुणी टीकेचे पोस्ट केल्या तर त्यावर आपल्या देशातील तथाकथित अति बुद्धिमान लोक संजू कडे केवळ चित्रपट म्हणून पहावे, रणवीरचा अभिनय पहावा, संजूने जे केले ते इतर तरुण करणार नाही असे बोलून त्यांच्या अकलेचे तारे तोडत आहेत. काय म्हणावे भारतीयांच्या अभिरुचीला? एकीकडे देशप्रेमी लोकमान्य टिळक, सावरकर, रामानुजन, स्वामी विवेकानंद यांच्यावरील चित्रपट चालत नाही तर दुसरीकडे देशद्रोही संजय दत्तच्या जीवनावर आधारीत संजूवर दर्शकांच्या उडया पडत आहे.तो उत्पन्नाचे उच्चांक प्रस्थापित करीत आहे. लोक मुंबईमध्ये झालेले ते बॉम्बस्फोटच विसरले तर याच देशद्रोही संजूबाबाने अंडरवर्ल्डच्या नादि लागून घरात लपवलेली शस्त्रे यांच्या काय लक्षात असतील. संजूच्या सततच्या दुष्कृत्यांमुळे त्याच्या बापाला कसे उंबरे झिजवावे लागले होते हे सुद्धा लोक विसरले.तुकडोजी महाराज म्हणाले होते,”मला तुमच्या देशातील तरुणांच्या ओठावरील गाणी सांगा मी तुमच्या देशाचे भविष्य सांगतो” आज आपण तरुणांना काय देत आहोत? असले देशद्रोह्यांना उदात्त करणारे चित्रपट? विधू विनोद चोप्रा,राजकुमार हिरानी तुम्हाला चित्रपट बनवायला हा संजूबाबाच काय सापडला ? या भारतभूमीत अनेक नामवंत, देशप्रेमी वैज्ञानिक, समाज सेवक होऊन गेले यांपैकी एकाच्या जीवनावर बनवाना एखादा चित्रपट, देशासाठी. परंतू ते तुम्हाला जमणार नाही कारण त्यासाठी पैसा कोण लावणार? तुम्हाला काय फायदा होणार? काय पहावे काय नाही हा वैयक्तिक मुद्दा असला, संजू सारख्या चित्रपटांना आपण जरी रोखू नाही शकलो तरी पालकांनो आपल्या पाल्यांना संजय दत्तची वास्तविकता सांगू शकतो व त्यांना यु ट्यूबवर रामानुजन, विवेकानंद यांसारखे चित्रपट दाखवू शकतो.

Article about superstition of diverting or stopping rain


"आनंद मेला" आणि पाऊस

     जरी या भारतात अनेक विचारवंत, संशोधक, गार्गी, मैत्रेयी सारख्या विदुषी, चरक, सुश्रुत सारखे शल्यचिकित्सक, वैद्यकीय निपुण होऊन गेले असले तरी पाश्चिमात्य देश पूर्वी भारताला साप, गारुडी तसेच साधू व फकीरांचा देश म्हणून ओळखत. कालपरत्वे भारताने प्रगती केली. विज्ञान, तंत्रज्ञानाने भारत परिपूर्ण झाला. परदेशी उपग्रह येथून प्रक्षेपित होऊ लागले, महासंगणक निर्माण झाला, अनेक संगणक अभियंते विदेशात गेले, देशात निर्मिती वाढली. हे सारे होऊनही अनेक जुन्या संकल्पना, चालीरीती प्रसंगी अंधश्रद्धा यांचा पगडा येथील जनमानसावर मोठ्या प्रमाणात कायम असल्याचे अधून-मधून प्रकट होतांनाची प्रचीती येत असते. अशीची एक समजूत आहे पाऊस थांबवण्याची किंवा वळवण्याची. शहरात आनंद मेला अर्थात लहान मुलांसाठी आकाश पाळणा, मेरी गो राउंड व तत्सम खेळणे, मौत का कुंवा सारख्या कसरतींचे खेळ व विविध दुकाने असलेला एक फिरता उपक्रम आला की गावात पाऊस पडत नाही, ते लोक पाऊस थांबवतात अशी चर्चा ज्या-ज्या शहरांत पावसाळ्यात हा आनंद मेला जातो त्या-त्या शहरांत होतांना दिसून येते. काही शहरांत तर याच कारणामुळे आनंद मेल्यास पालिकेने महसूल, मनोरंजन कर मिळत असूनही परवानगी नाकारल्याचे ऐकिवात आहे. परंतू नैसर्गिक शक्तींना खरेच कोणी आटोक्यात आणू शकतो का? व आणू शकत असेल तर मग विदर्भात उन्हाळ्यात प्रचंड तापमान असते तर अशी शक्ती असणारे उन का नाही वळवू शकत? किंवा तापमान का कमी करून नाही दाखवू शकत? असा प्रश्न पडतो. पाऊस वळवला जाऊ शकतो या बाजूने बोलाणारे नेहमी मेंढपाळ लोकांचे उदाहरण देतांना दिसतात. हे लोक मेंढीच्या अंगावर गार किंवा पाऊस पडू देत नाही म्हणे ! परंतू अनेकवेळा गारपिटीत शेळ्या मेंढ्या दगावल्याचे व त्यांना नुकसान सुद्धा भरपाई भेटल्याचे दाखले आहेत. नैसर्गिक शक्तींना रोखण्याची, त्यांना वळते करण्याची शक्ती खरोखरच असेल तर हे लोक या शक्तीचा उपयोग नक्षलवादी, दहशतवादी, समाजकंटकांच्या विरोधात का नाही करत? गेल्या काही वर्षांपासून आमच्या खामगांव शहरांत हा आनंद मेला पावसाळ्याच्या ऐन सुरुवातीला दाखल होतो. तो दाखल झाला की व पाऊस थांबतो त्यामुळे ते लोकच पाऊस वळवतात अशा चर्चा होत असतात. हे खरे आहे की नाही म्हणून विविध लोकांची मते घेण्याचे ठरवले व त्या अनुषंगाने अनेक शिक्षक, सुशिक्षित, जेष्ठ नागरिक यांच्याशी चर्चा केली असता संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. कुणी पाऊस वळवणे ही एक खुळचट संकल्पना आहे, थोतांड आहे, अंधश्रद्धा आहे असे म्हटले. एक परदेश गमन करून आलेले जेष्ठ नागरिक म्हणाले की विदेशात सुद्धा असे उपक्रम असतात परंतू तेथे पाऊस वळवण्याबाबत कधी काही ऐकले नाही. एकाने पाऊस पडण्यासाठी झाडे लावावीत, पर्यावरण जतन करावे असे मत व्यक्त केले, कुणी दोन्ही बाजूंकडून बोलले. एका जेष्ठ नागरिकाने अशा शक्ती आहेत परंतू त्यांचा उपयोग करणा-याचा भविष्यकाळ कठीण असतो, त्याला विविध यातना होतात, शारीरिक भोग भोगावे लागतात, त्याचे मरण सुखाने होत नाही असे कथन केले. एकाने याच समजुतीमुळे आनंद मेल्याला आता गर्दी कमी असते हे सांगितले. अशा त-हेची नाना प्रकारची मते समोर आली. अनेक पौराणिक कथांतून नैसर्गिक शक्तींना आव्हान देण्याच्या कथा, दंतकथा सांगितलेल्या आहेत. त्यांना जर खरे मानले तर त्या काळातील लोकांमध्ये सत्व होते तसे सत्व सांप्रत काळात शिल्लक उरले आहे का, की जेणे करून नैसर्गिक घटनांवर नियंत्रण मिळवले जाईल? तर यांस नकारच मिळेल. तरीही जर पाऊस वळवणारे लोक आहेत तर मग पाऊस पाडणारे सुद्धा निश्चितच असतील. मग हे लोक पाऊस का नाही पाडत? असाही प्रश्न पडतो. खुळचट कल्पना सोडून पावसासाठी नागरीकांनी परिसरात झाडे लावण्याचा व जगवण्याचा निश्चय करावा, परिसरातील टेकड्या हिरव्यागार कराव्यात.