२५/०७/२०१९

Article about social club works in Khamgaon

शहरासाठी “सिंहाचा” वाटा
         खामगांव शहर हे बुलडाणा जिल्ह्यातील मोठे शहर आहे. या शहरास मोठा सांस्कृतिक, आध्यात्मिक वारसा लाभला आहे. पाचलेगांवकर महाराजांनी केलेला हिंदू संघटन यज्ञ ,त्यास वि. दा. सावरकर उपस्थित होते. मराठी साहित्य संम्मेलन येथे झाली आहेत, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे पदस्पर्श या भूमीला लाभले आहे. राष्ट्रीय शाळेत गेले की खामगांवी आलेल्या अनेक थोर नेत्यांची नांवे संस्थेच्या प्रवेशव्दारीच दिसून येतात. संस्थेत भेट देणा-या प्रत्येकाची नजर तो फलक खिळवून ठेवतो. स्वतंत्रता आंदोलनात सुद्धा येथील डॉ एकबोटे, डॉ पारसनीस, श्री झुनझुनवाला यांनी व त्यांच्या समवेत अनेक अन्य सहका-यांनी सहभाग नोंदवला. स्वातंत्रोत्तर काळात शहराने आपला हा सांस्कृतिक वारसा जपला, सामाजिक भान जपले. शहर हळू-हळू विस्तारले. अनेक शैक्षणिक, सामाजिक संस्था उदयास आल्या. रोटरी क्लब , लायन्स क्लब स्थापन झाले. या क्लबने अनेक कार्यक्रमांचा वसा हाती घेतला. अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जाऊ लागले. कुठल्याही प्रकारच्या विकासात सरकारची जशी महत्वपूर्ण भूमिका असते तशीच ती सामाजिक संस्थांची सुद्धा असते. यानुसारच खामगांवात हे दोन्ही क्लब कार्यरत आहेत. यंदा जनुना तलाव आटला त्याची सफाई व गाळ काढण्याचे कार्य रोटरीने जन सहभागातून तडीस नेले.तलावातील गाळ कित्येक शेतक-यांच्या कामात आला. पावसाळ्यापूर्वी लायन्स क्लबने नाल्याची सफाई करून ठेवली व त्यातील निघालेल्या कच-याची योग्य विल्हेवाट लावली. फरशी नाल्याला पूर गेला परंतू क्लबने नुकत्याच केलेल्या सफाईमुळे कुठे पाणी साचल्याचे , नाल्याच्या लगतच्या घरात पाणी जाण्याचे , भिंत पडणे यांसारखी वृत्ते आली नाहीत.दोन्ही क्लबने
शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण केले. केवळ वृक्षारोपणच नव्हे तर त्यास वृक्ष संरक्षक लावले व त्या वृक्षांच्या संगोपनाकडे सुद्धा क्लबचे लक्ष असते हे मी स्वत: अनुभवले आहे. या दोन्ही क्लबने शहरासाठी हाती घेतलेल्या या वस्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळते आहे, विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा सामाजिक जाणीव निर्माण होते आहे. आंतराष्ट्रीय स्तरावर कार्य करणा-या या दोन्ही क्लबच्या खामगावच्या शाखांची दखल नक्कीच घेतली जाईल. यंदा चांगला पाउस झाला तर जनुना तलावाचा जलसाठा नक्कीच वाढेल. त्यानंतर खामगांव नगर परिषदेने या पाण्याचा वापर कसा करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रोटरी,लायन्स या दोन्ही क्लब सोबतच शहरातील तरुणाई , मुक्तांगण तसेच इतरही सामाजिक संस्था त्यांच्या-त्यांच्या परीने सामाजिक भान जपत आहेत. सर्वांचा नामोल्लेख करणे येथे शंक्य नाही. येथे जरी तो झाला नाही तरी खामगांवकर जनतेच्या मनात मात्र त्यांचे नांव राहील. स्वयंस्फुर्तीने एकत्र येऊन निर्माण झालेल्या शंभो-शंभो गृपने सुद्धा जनुना तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लावले. आपण ज्या शहरात राहतो ते शहर चांगले असावे, स्वच्छ असावे यासाठी नागरिकांमध्ये जी भावना रुजायला हवी ती रोटरी व लायन्स क्लब रुजवत आहे. भविष्यात हे शहर जलयुक्त, वृक्षसमृद्ध, हिरवेगार झाले तर यात Lions Share अर्थात सिंहाचा वाटा हा निश्चितच या सामाजिक संस्थांचा राहील.

२२/०७/२०१९

Article on the occasion of Lokmanya Tilak 163rd Birth Anniversary

असंतोषाची "लोकमान्य"ता  
23 जुलै म्हणजे टिळकांची 163 वी जयंती. टिळक म्हटले की स्मरण होते ते “भारतीय असंतोषाचे”. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते मी मिळवणारच” असे इंग्रजांना ठणकावून सांगणा-या  टिळकांनी इंग्रजांविरुद्ध यल्गार पुकारला. रत्नागिरीतील “चिखली” गावात गंगाधरराव टिळक यांच्या घरी केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक हे “कमळ” उमलले. कोकणातून पुण्यात आल्यावर टिळकांनी बी. ए. केले व नंतर एल.एल.बी. केले. परंतू साधा सरळ पेशा हवा म्हणून टिळकांनी वकीली करण्याऐवजी शिक्षकी पेशा पत्करला. पुढे पत्रकारिता केली. “आपले राष्ट्र म्हणजे एक परिवार आहे व या परिवारासाठी कार्य करायला हवे केवळ स्वत:च्याच परिवारासाठी नव्हे” असे त्यांचे मत होते. राष्ट्रासाठी कार्य व्हावे, आधुनिक शिक्षण भारतीय विद्यार्थ्यांना मिळावे या विचारातून त्यांनी त्यांच्या समविचारी मित्रांना घेऊन न्यू इंग्लिश हायस्कूल ,डेक्कन एज्युकेशन सोसायटी व त्या अंतर्गत फर्गसन कॉलेज सुरु केले. ज्यातून अनेक प्रज्ञावंत निर्माण झाले व होत आहेत. लोक एकत्रित व्हावे, स्वातंत्र्याची भावना वृद्धिंगत व्हावी म्हणून सार्वजनिक गणशोत्सव, शिवजयंती असे उत्सव टिळकांनी सुरु केले. प्रखर बुद्धिमान असलेल्या टिळकांनी “गीता रहस्य”,“ओरायन” सारखे ग्रंथ लिहिले. गोपाळ गणेश आगरकर व टिळक यांचे “प्रथम स्वातंत्र्य की प्रथम समाज सुधारणा” यावर मतभेद होते तरीही त्यांची पक्की मैत्री होती. टिळकांच्या जहाल विचारातून प्रेरित होऊन चाफेकर बंधू पेटून उठले व त्यांनी रँडची हत्या केली. टिळकांना तरुणांना क्रांती मार्गाकडे वळवण्याच्या आरोपाखाली कारावास भोगावा लागला व पुढे प्रफुल्लचंद चाकी व खुदिराम बोस यांनी किंग्जफोर्ड या न्यायाधीशावर बॉम्ब फेकला आणि त्या प्रकरणात टिळकांनी या दोघांची बाजू आपल्या वृत्तपत्रातून मांडली म्हणून मंडालेचा कारावास झाला. या नंतर टिळक परत आले त्यांना मधुमेहाची व्याधी जडली होती. परंतू तरीही ते पुनश्च भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये सक्रीय झाले. “लाल-बाल-पाल” ही जहालमतवादी त्रयी जनमानसांत लोकप्रिय होती. टिळकांनी पक्ष संगठन, पक्ष बांधणी सुरु केली . होमरूल लीग चळवळ, स्वदेशी चळवळ सुरु केली. टिळक खेडो-पाडी हिंडले ,शेतक-यांना स्वराज्यासाठी एकत्र करणे सुरु केले. ते रशियन राज्यक्रांती ने प्रभावीत झालेले होते. भारतातून इंग्रजांना त्वरीत हाकलायचे असेल तर काँग्रेसने जनमानसात आपला प्रभाव वाढवायला हवा, लोकांना प्रखर राष्ट्रवादी बनवायला हवे असा त्यांचा आग्रह होता. होमरूल लीगच्या अंतर्गत त्यांनी हजारो लोकांना एकत्रित आणले. भारताला मराठा साम्राज्या सारखे बनवायचे आहे का? यावर जेथे सर्वांना समान न्याय असेल असे राष्ट्र आम्हाला उभे करायचे आहे असे त्यांचे उत्तर होते. हिंदीला राष्ट्रभाषा बनवावी अशी संकल्पना टिळकांनीच सर्वप्रथम मांडली होती. तत्कालीन काळात टिळकांनी घेतलेल्या काही भूमिकेंवरून आजही त्यांच्यावर टीका होते. परंतू त्या भूमिकांमुळे टिळकांनी पुकारलेला स्वराज्याचा लढा, लोकांचे एकत्रीकरण, यांचे महत्व अजिबात कमी होत नाही. कारण अनेक नेत्यांच्या अनेक भूमिका ह्या आता अतर्क्य वाटतात. परंतू “चांगले तेवढे घ्यावे जे पटत नसेल ते त्यागावे” या पद्धतीचे अनुसरण करायला हवे. आज भारतात नवीन प्रश्न आहेत , आधुनिक प्रगत भारतात जातीयवाद नवीन स्वरुपात वाकुल्या दाखवतच आहे. इंग्रजांविरुद्ध असंतोष पेटवणा-या , सर्वसामान्यांना एकत्र आणणा-या टिळकांसारख्या नेतृत्वाची कमतरता सर्वच पक्षात जाणवत आहे. टिळक प्रखर देशभक्त होते, कणखर होते , बुद्धीमान होते, मुलाच्या मृत्यूची बातमी आल्यावर " नैनं छिंदन्ती शस्त्राणी ..." हा गीतेचा संदेश जाणून असणा-या आणि म्हणूनच "गीतारहस्य" द्वारे गीतेवर भाष्य करू शकणा-या टिळक मुलाच्या निधनाचे वृत्त ऐकूनही स्थितप्रज्ञ होते , ते उत्तरले "लेख संपला की येतो". अशी कर्तव्यतत्परता , आत्मा , मृत्यू हे सर्व जाणून असणा-या टिळकांसारख्या व्यक्ती जवळच असू शकते. टिळक लोकमान्य होते अफाट लोकप्रिय होते 1920 मध्ये त्यांच्या मृत्यू नंतर मुंबईला गिरगावी येथे मोठा जनसागर उसळला होता. एकीकडे विराट सागर तर दुसरीकडे अफाट जनसागर असे दृश्य होते. जोरात पाऊस असल्याने छत्री , जे मिळेल ते घेऊन आपल्या असंतोषाचे जनक असूनही  लोकमान्य झालेल्या नेत्याच्या दर्शनासाठी लोक आले होते. मेघांतून कोसळणा-या जलधारा जणू सांगत होत्या की केवळ भारतीय जनच नव्हे तर निसर्ग , निसर्ग नियंता सुद्धा दु:खी झाला आहे. 

Article on the occasion of Lokmanya Tilak Birth 163rd Anniversary

काँग्रेसला हवे “लोकमान्य” नेतृत्व
     23 जुलै म्हणजे टिळकांची 163 वी जयंती. टिळक म्हटले की स्मरण होते ते “भारतीय असंतोषाचे जनक”. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते मी मिळवणारच” असे इंग्रजांना ठणकावून सांगणा-या  टिळकांनी इंग्रजांविरुद्ध यल्गार पुकारला. रत्नागिरीतील “चिखली” गावात गंगाधरराव टिळक यांच्या घरी केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक हे “कमळ” उमलले. कोकणातून पुण्यात आल्यावर टिळकांनी बी. ए. केले व नंतर एल.एल.बी. केले. परंतू साधा सरळ पेशा हवा म्हणून टिळकांनी वकीली करण्या ऐवजी शिक्षकी पेशा पत्करला. पुढे पत्रकारिता केली. “आपले राष्ट्र म्हणजे एक परिवार आहे व या परिवारासाठी कार्य करायला हवे केवळ स्वत:च्याच परिवारासाठी नव्हे” असे त्यांचे मत होते. राष्ट्रासाठी कार्य व्हावे, आधुनिक शिक्षण भारतीय विद्यार्थ्यांना मिळावे या विचारातून त्यांनी त्यांच्या समविचारी मित्रांना घेऊन न्यू इंग्लिश हायस्कूल ,डेक्कन एज्युकेशन सोसायटी व त्या अंतर्गत फर्गसन कॉलेज सुरु केले. ज्यातून अनेक प्रज्ञावंत निर्माण झाले व होत आहेत. लोक एकत्रित व्हावे, स्वातंत्र्याची भावना वृद्धिंगत व्हावी म्हणून सार्वजनिक गणशोत्सव, शिवजयंती असे उत्सव टिळकांनी सुरु केले. प्रखर बुद्धिमान असलेल्या टिळकांनी “गीता रहस्य”,“ओरायन” सारखे ग्रंथ लिहिले. गोपाळ गणेश आगरकर व टिळक यांचे “प्रथम स्वातंत्र्य की प्रथम समाज सुधारणा” यावर मतभेद होते तरीही त्यांची पक्की मैत्री होती. टिळकांच्या जहाल विचारातून प्रेरित होऊन चाफेकर बंधू पेटून उठले व त्यांनी रँडची हत्या केली. टिळकांना तरुणांना क्रांती मार्गाकडे वळवण्याच्या आरोपाखाली कारावास भोगावा लागला व पुढे प्रफुल्लचंद चाकी व खुदिराम बोस यांनी किंग्जफोर्ड या न्यायाधीशावर बॉम्ब फेकला आणि त्या प्रकरणात टिळकांनी या दोघांची बाजू आपल्या वृत्तपत्रातून मांडली म्हणून मंडालेचा कारावास झाला. या नंतर टिळक परत आले त्यांना मधुमेहाची व्याधी जडली होती. परंतू तरीही ते पुनश्च भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये सक्रीय झाले. “लाल-बाल-पाल” ही जहालमतवादी त्रयी जनमानसांत लोकप्रिय होती. टिळकांनी पक्ष संगठन, पक्ष बांधणी सुरु केली . होमरूल लीग चळवळ, स्वदेशी चळवळ सुरु केली. टिळक खेडो-पाडी हिंडले ,शेतक-यांना स्वराज्यासाठी एकत्र करणे सुरु केले. ते रशियन राज्यक्रांती ने प्रभावीत झालेले होते. भारतातून इंग्रजांना त्वरीत हाकलायचे असेल तर काँग्रेसने जनमानसात आपला प्रभाव वाढवायला हवा, लोकांना प्रखर राष्ट्रवादी बनवायला हवे असा त्यांचा आग्रह होता. होमरूल लीगच्या अंतर्गत त्यांनी हजारो लोकांना एकत्रित आणले. भारताला मराठा साम्राज्या सारखे बनवायचे आहे का? यावर जेथे सर्वांना समान न्याय असेल असे राष्ट्र आम्हाला उभे करायचे आहे असे त्यांचे उत्तर होते. हिंदीला राष्ट्रभाषा बनवावी अशी संकल्पना टिळकांनीच सर्वप्रथम मांडली होती. तत्कालीन काळात टिळकांनी घेतलेल्या भूमिकेंवरून आजही त्यांच्यावर टीका होते. परंतू त्या भूमिकांमुळे टिळकांनी पुकारलेला स्वराज्याचा लढा, लोकांचे एकत्रीकरण, यांचे महत्व अजिबात कमी होत नाही. कारण अनेक नेत्यांच्या अनेक भूमिका ह्या आता अतर्क्य वाटतात. परंतू “चांगले तेवढे घ्यावे जे पटत नसेल ते त्यागावे” या पद्धतीचे अनुसरण करायला हवे. आजच्या काँग्रेस पक्षाची स्थिती पाहिली तर कणखर नेतृत्वाच्या अभावापोटी पक्ष दिशाहीन झालेला आहे. या पक्षाला पूर्वस्थितीत आणायचे असेल तर ज्याप्रमाणे ब्रिटीशकालीन भारतात टिळकांनी जनसामान्यांचे संगठन केले. पक्षाला उभारी दिली. लोकांना एकत्र आणून ते “लोकमान्य” झाले. त्याचप्रमाणे सद्यस्थितीनुसार जर काँग्रेसने घराणेशाही बाजूला सारून पक्षातील सर्वमान्य,कणखर,देशहितैषी,टिळकांसारखे लोकमान्य असे नेतृत्व शोधून,असे नेतृत्व पुढे आणले तर कदाचित काँग्रेसला पुनश्च उभारी मिळू शकेल. काँग्रेसने जर असे केले तर सद्यस्थितीत लोकशाहीत आवश्यक असलेला विरोधी पक्ष आपले स्थान निर्माण करू शकेल.

१८/०७/२०१९

Article on Kulbhushan Jadhav ICJ verdict and Lashkar chief Hafiz Saeed arrested in Pakistan

कुलभूषण फाशी स्थागिती , व हाफिज ला अटक 
काल भारतवासियांना दोन सुखदायक अशी वृत्ते मिळाली. पहिले वृत्त होते दहशतवाद्यांचा म्होरक्या हाफिज सईद ला झालेली अटक आणि दुसरे वृत्त म्हणजे कुलभूषण जाधवला पाकीस्तानने दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर आंतरराष्ट्रीय  न्यायालयाने दिलेली स्थगिती. ही दोन्ही वृत्ते जेंव्हा माध्यमांवर झळकली तेंव्हा नागरिकांनी आनंद व्यक्त करणे सुरु केले. लाखो व्टीट झाले , लोकांचे व्हॉटस अॅप स्टेट्स बदलले. जल्लोष झाला. यातील हाफिज सईदला झालेली अटक हा पाकिस्तानचा केवळ एक दिखावा असू शकतो. नरेंद्र मोदी सरकारने पहिल्या वेळेस निवडून आल्या नंतर दहशतवादा विरोधात रणशिंग फुंकले होते. त्यामुळे जगात दहशतवादा विरोधात एक वातावरण निर्माण झाले. पाकीस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढला त्यामुळेच मुंबईवरील हल्ल्याच्या या सूत्रधारास पाकिस्तानने अटक केली व त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. त्यामुळे त्याला आर्थिक मदतीसाठी दहशतवादा विरोधात ठोस पाऊल उचलणे गरजेचे झाले होते. अखेर आंतरराष्ट्रीय दबावामुळे व आर्थिक संकटामुळे का होईना आता हाफिज गजाआड झाला आहे. परंतू भविष्यात पुन्हा पाकिस्तान मधून दहशतवादाला खतपाणी मिळणारच नाही याची काही शाश्वती नाही.
     पाकीस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधवच्या फाशीला दिलेल्या स्थगितीमुळे आणखी एक जबर हादरा मिळाला आहे. हेरगिरीच्या आरोपावरून पाकीस्तानने भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना तुरुंगात डांबून ठेवले होते व 2017 मध्ये त्यांना फाशीची शिक्षा सुद्धा सुनावली होती. यात पाकिस्तान कडून व्हिएन्ना कराराचे उल्लंघन सुद्धा झाले होते. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकेस्तानला कुलभूषण यांना दिलेल्या शिक्षेचा पुनर्विचार करण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे सरन्यायाधीश अब्दुल्कावी अहमद युसुफ यांनी दिले आहे. या प्रकरणात कुलभूषण यांची बाजू प्रख्यात कायदे तज्ञ हरीश साळवे यांनी मांडली. हरीश साळवे यांनी या खटल्याचे शुल्क केवळ एक रुपया घेतले ही एक विशेष बाब आहे. या प्रकरणात भारताच्या बाजूने 15 मते पडली. कुलभूषण यांना जेंव्हा अटक झाली होती त्याची बातमी पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तांना न देऊन व्हिएन्ना करार मोडला होता. कुलभूषण प्रकरणात पाकिस्तानच्या खोटारडेपणाचे पितळ चांगलेच उघडे पडले.पाकिस्तानने कुलभूषण हेर होते हे सिद्ध करण्यासाठी मोठा कांगावा केला परंतू शेवटी ICJ ने भारताची बाजू ग्राह्य ठरवून कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली. आपल्या भारतात रांचीच्या न्यायालयाने नुकताच समाज माध्यमांवर धार्मिक अवमान जनक भाष्य केल्याप्रकरणी रिचा भारती प्रकरणात कुराण वाटप करण्याचा आदेश दिला होता. प्रंचड टीका, जनक्षोभ यांमुळे तो त्यांनी आता मागे घेतला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा कुलभूषण यांना दिलेला न्याय पाहून , वाचून रांचीच्या न्यायालयाने सुद्धा नि:पक्ष, निर्भीड न्यायदान करण्याचा आदर्श घ्यावा. हाफिजला झालेली अटक व कुलभूषण फाशीला मिळालेली स्थगिती यांमुळे भारत जागतिक पातळीवर मजबूत होत असल्याचे सिद्ध झाले आहे. “असहिष्णुता वाढली”, “येथे राहण्यास भीती वाटते” असे म्हणणा-यांनी यातून जरा बोध घ्यावा. 

११/०७/२०१९

Article on the occasion of July, World Population day

वाढता,वाढता वाढे
      11 जुलै हा दिवस दरवर्षी विश्व लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो. युनायटेड नेशन्स ने 1989 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. 1987 च्या सुमारास जागतिक लोकसंख्या 5 अब्जाहून अधिक झाली . त्यामुळे विश्वव्यापी व संपूर्ण जगाची समस्या असलेला  लोकसंख्येचा हा भस्मासूर रोखण्यासाठी , जनतेमध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी व लोकसंख्यावाढीमुळे उपस्थित होणारे मुद्दे जसे गरीबी , लिंग समानता इ विषयांवर जनतेने गांभीर्याने घेण्यासाठी म्हणून युनो ने हा दिवस लोकसंख्या दिन म्हणून घोषित केला. जगाची लोकसंख्या प्रतिवर्षी 100 दशलक्षाने वाढत आहे. विश्व आता लोकसंख्येच्या विस्फोटाकडे वाटचाल करीत आहे. यात आशिया खंडातील अफाट लोकसंख्या असलेले चीन व भारत हे दोन देश आहेत. आपला देश तर येत्या काळात लोकसंख्येच्या बाबतीत चीनला सुद्धा मागे टाकणार आहे. भारत सरकारने या विषयाचे गांभीर्य ओळखून कुटुंबं नियोजन कार्यक्रमावर फार पूर्वी पासून भर दिला आहे. देत आहे. या कार्यक्रमामुळे काही प्रमाणात का होईना परंतू लोकसंख्या नियंत्रीत झाली आहे.   निवडणूकीत उभे राहणा-यावर सुद्धा दोन अपत्य असावेत असे बंधन घातले आहे. लोकसंख्या वाढ हा जसा जगाचा प्रश्न आहे तसाच तो भारतासाठी सुद्धा मोठा प्रश्न आहे. आपल्या देशात आता मोठ्या शहरात गेलो तर दिसणारी गर्दी , माणसांचे लोंढेच्या लोंढे , लोकलला लोंबकळणारे पुरुष स्त्रीया , विद्यार्थ्यांच्या रिक्षा, कार्यालये आदी सार्वजनिक ठिकाणी दिसणा-या भल्या मोठ्या रांगा हे सर्व भयावह चित्रण आहे. येत्या काळात या लोकसंख्येच्या गरजा कशा भागवल्या जातील. पाणी, अन्नधान्य इ सर्व गरजा भागवणे म्हणजे मोठी कसरत आहे. शेतीची जमीन दिवसेंदिवस घटत आहे. पाण्याची पातळी खालावत चालली आहे. निवासाची सोय नाही. खुराड्याप्रमाणे असणा-या घरात/ झोपड्यांत कितीतरी लोक निवास करीत आहेत. सरकारने हा प्रश्न गंभीरतेने घ्यायला हवा शिवाय नागरीकांनी सुद्धा तितकाच गंभीरतेने घेणे जरूरी आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा लोकसंख्येच्या वाढत्या समस्येवर त्यांचे विचार प्रकट केले होते. त्यांचे म्हणणे होते की “ लोकसंख्या नियंत्रण हे गरीब व महिला यांच्यासाठी वरदान ठरेल, सरकारने कुटुंब नियोजनाचे कार्यक्रम व त्यासाठी लागणारी साधने , त्यांचा वापर यांबाबतची माहीती, प्रशिक्षण जनतेला देण्याची सरकारची प्राथमिकता असावी”. सद्यस्थितीत जनतेमधील अवेयरनेस वाढला आहे. परंतू याला धार्मिकतेचीही किनार आहे. त्यामुळे सर्वच धर्मियांतील नागरीकांनी लोकसंख्येमुळे निर्माण होणा-या समस्या व धोका वेळीच ओळखायला हव्या. कोणत्या देवाला वाटेल की त्याची लेकरे दारीद्र्यात, गरीबीत खितपत पडावी. आपल्या भावी पिढीचे आयुष्य सुखकर असावे याची जाणीव सर्वच धर्मियातील लोकांनी ध्यानात घेणे गरजेचे आहे. लोकसंख्या वाढ ध्यानात घेतांना त्या वाढीत सुद्धा समतोल असावा. लोकसंख्या वाढीकडे दुर्लक्ष करणा-यांमुळे भविष्यात त्यांच्याच  संख्येत वाढ होऊन ते कदाचित इतर समुदायांना अडचणीचे किंवा धोक्याचे ठरू शकते. सर्व  धर्मियात सरकारने व त्या धर्माच्या संतांनी लोकसंख्या नियंत्रणाची जागरूकता पसरवणे अत्यंत जरूरी झाली झाले आहे. लोकसंख्या वाढ जर प्रमाणात होत असेल तरच “सबका साथ सबका विकास” करता येईल. अन्यथा विकासाची फळे चाखणारे जास्त व करदाते कमी त्यामुळे करवाढ असेही होऊ शकते. लोकसंख्येच्या या भस्मासुराला जर नष्ट करावयाचे असेल तर कुणीही मोहीनीचे रूप घेऊन येणार नाही. जागतिक समस्या असलेल्या या भस्मासुराला नष्ट करावयाचे तर सर्वांनाच पुढे यावे लागेल. कुणीही मागे राहून चालणार नाही तेंव्हाच या भस्मासुराची राख होईल. अन्यथा वाढता, वाढता वाढे करत वाढत जाणा-या या भस्मासुराचा हात आपल्या डोक्यावर पडलाच म्हणून समजा.      

०४/०७/२०१९

Article on, Rahul Gandhi says he is no longer Congress chief, urges CWC toto elect successor

मनधरणी व्यर्थ
राहुल गांधी यांनी अध्यक्षपदावर कायम राहावे अशी विनंती राजस्थानचे मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांनी केली होती.राहूलच पक्षाचे नेतृत्व करू शकतात असे त्यांनी व्टीट केले होते. त्यांची विनंती राहुल गांधी यांनी सोमवारी फेटाळून लावली. त्यानंतर कमलनाथ यांच्या नेतृत्वात काँग्रेस मुख्यमंत्र्यानी राहुल गांधी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. परंतू राहुल गांधी यांच्यावर तीळमात्रही परिणाम झाला नाही.आता काँग्रेस जन उपोषण सुद्धा करणार आहे. राहुल गांधीनी अध्यक्ष पदावर कायम राहावे यासाठी काँग्रेस पदाधिका-यांचे राजीनामा सत्र पूर्वीच सुरु झाले आहे. हे सर्व होऊनही अखेर राहुल त्यांच्या निर्णयावर कायम राहिले व त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्विकारत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा अधिकृत असा चार पानांचा राजीनामा दिला व तसे व्टीटरवर सुद्धा जाहीर केले. प्रियंका गांधी यांनी “काही लोकांकडेच धैर्य असते” असे वक्तव्य या राजीनाम्याबाबत केले आहे. ज्यावेळी राहुल यांनी अध्यक्षपदी न राहण्याची मनीषा जाहीर केली होती. त्यावेळी पासून काँग्रेस नेते त्यांची मनधरणी करीत होते. खुद्द पक्षाध्यक्ष स्वतः गांधी घराण्या बाहेरील पक्षाध्यक्ष निवडावा अशी भावना व्यक्त करतात तरीही काँग्रेस नेते राहुल यांना सोडायला तयार होत नव्हते हे त्यांचे नेत्यावरील प्रेम आहे की घराणेशाहीचे लांगूलचालन ? भिष्माने जेंव्हा हस्तिनापूरच्या गादीवर बसणार नाही अशी अशी प्रतिज्ञा केल्यावर कुरु घराण्यातील कुणीही किंवा इतर मंत्रीगणांनी भिष्मानेच गादीवर बसावे असा अट्टाहास केला नव्हता. अर्थात येथे राहुल गांधी यांची तुलना भीष्माशी करण्याचा कोणताही प्रयत्न नाही. व ती होवू सुद्धा शकत नाही. भिष्म जरी सत्तेपासून दूर राहिले तरी ते आजीवन हस्तिनापूरशी एकनिष्ठ राहिले. राहुल व त्यांच्या नेत्यांचे पाक व चीन प्रेम हे भारतीयांपासून काही लपून राहिले नाही. नेहरूंचा पणतू म्हणून त्यांना काँग्रेस अध्यक्षपद मिळाले होते परंतू त्यांच्या अध्यक्षपदावर येण्यामुळे व त्यांनी प्रियंकांना निवडणुकीची जबाबदारी सोपवल्यामुळे काहीही फरक पडला नाही. प्रियंका गांधी व इंदिरा गांधी या दोघींमधील नाकच तेवढे सारखे असल्याचे सिद्ध झाले. राहुल गांधींनी स्वत:च्या क्षमता ओळखूनच अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याबद्दल ते निश्चितच अभिनंदनास पात्र आहे. परंतू काँग्रेसवासियांना मात्र गांधी घराण्याची इतकी सवय पडली आहे की गांधी घराण्याच्या आधाराशिवाय पक्षाला मुळी उभारीच देता येणार नाही असे त्यांना अजूनही वाटते. काँग्रेस पक्षाने स्वत:ची शक्ती ओळखणे जरुरी आहे. गांधी घराण्याव्यतिरीक्त काँग्रेस मध्ये कितीतरी महान, दूरदृष्टीचे नेते होऊन गेले. परंतू त्यांचे कर्तुत्वच गांधी घराण्याने व त्यांचे लांगूलचालन करणा-या नेत्यांनी जनतेसमोर मुळी येउच दिले नाही. गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, लालबहादूर शास्त्री,सरदार पटेल, अगदी अलीकडच्या काळातील माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव व इतरही अनेक नेत्यांच्या नावांचा उल्लेख करता येईल. अशा व इतर अनेक कर्तुत्ववान नेत्यांचे कार्य केवळ गांधी घराण्याच्या उदो-उदो केल्याने झाकोळले गेले. पूर्वीही तेच होते व आताही तेच आहे. दस्तूरखुद्द  राहुल गांधींची इच्छा नसतांना त्यांनीच अध्यक्ष पदावर राहावे हा बालहट्ट काँग्रेस नेते का करीत होते ? त्यांचा स्वत:च्या कार्यक्षमतेवर काही विश्वासच उरला नाही का ? ते आत्मविश्वासहीन झाले आहेत का ? असा प्रश्न देशातील जनतेला पडला आहे. काँग्रेस नेत्यांच्या पराकोटीच्या मनधरणी नंतरही राहुल गांधीनी आता राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार सर्वात जेष्ठ नेत्याकडे आता अध्यक्षपदाची जबाबदारी येईल. ज्या कुणाकडे ती येईल त्याने आत्मविश्वासाने पक्षाची धुरा खांद्यावर घ्यावी , पक्षाला बळकट करावे.  हे न करता काँग्रेस नेते जर गांधी घराण्याचेच गुणगान करत राहतील , त्यांचीच मनधरणी करत राहतील , तर कदाचित रिमोट ने कामकाज होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. तसे केले करतील तर काँग्रेस अधिकच रसातळाला जाण्याची शक्यता आहे. परंतू गांधी घराण्याशिवाय काँग्रेसचे गाडे पुढे हाकलेच जाऊ शकत नाही अशी ठाम मानसिकता झालेल्या नेत्यांना हे कोण सांगणार ? राहुल त्यांच्या निर्णयावर कायम राहिल्याने काँग्रेस नेत्यांची राजीनामा , उपोषण याव्दारे पक्षनिष्ठतेच्या नावाने सुरु असलेली पराकोटीची मनधरणी मात्र व्यर्थ गेली आहे.