३०/०४/२०२०

Actor Rishi Kapoor passes away at 67 after a long battle with Cancer, RIP Rishi

......हम परदेसी हो गये 
आज गुरुवार लेख लिहिण्याचा 

दिवस  म्हणून कालच एक लेख लिहून 

झाला  होता. परंतू आजच्या अचानक आलेल्या बातमी मुळे धक्का बसला आणि पुनश्च लिहायला बसलो. कारण ती बातमी सुद्धा तशी होतो. ऋषी कपूरच्या निधनाची.  आज सकाळी 10 च्या सुमारास मोबाईल हाती घेतला आणि ऋषी कपूरच्या निधनाचे वृत्त दिसले. काल इरफान गेला आणि आज ऋषी.  खरे तर हे अभिनेते आपले कुणी नसतात , काही नाते नसते परंतू त्यांच्या अभिनयामुळे , त्यांनी केलेल्या मनोरंजनामुळे त्यांच्याशी एक अनामिक नाते जुळते. अनेकवेळा मग त्यांच्या चुकीच्या गोष्टींकडे सुद्धा आपण डोळेझाक करतो . ऋषीला खरे तर सिनेमात यायला काही स्ट्रगल करावा लागला नाही. अभिनय रक्तातच होता. आजोबा पृथ्वीराज,वडील राज,काका शम्मी आणि शशी.  अशा अभिनेत्यांच्याच मांदियाळीत तो वाढला. तू कितने बरस का ? विचारल्यावर 17 बरस का” असे उत्तर देणारा तारुण्यात पदार्पण करणारा ऋषी वडीलांनी निर्माण केलेल्या बॉबी या सिनेमातून हिरो म्हणून आला आणि आपल्या मेहनतीने त्याने अनेक चित्रपट केले, त्यात चांगला अभिनय केला,नृत्ये, संगीत असे चित्रपटांच्या सर्वांगाचे ज्ञान असलेला हा अभिनेता लव्हर बॉय म्हणून प्रसिद्धीस आला. त्या काळात अनेक नवीन अभिनेत्रींचे लॉचिंग ऋषी कपूर सोबतच व्हायचे. अनेक हिट चित्रपट त्याच्या नावे असली,त्याची अनेक गाणी गाजली असली तरी राजेश खन्ना या त्याच्या समकालीन अभिनेत्यासमोर त्याची कारकीर्द थोडी झाकोळली गेली. त्याच्या काळात अमिताभ, धर्मेंद्र , राजेश खन्ना , असे एकाहून एक कलाकार तेजीत असतांनाही स्वत:चा ठसा त्याने उमटवला होता. त्याने घातलेले स्वेटर , कपडे
आकर्षक असायचे राजेश खन्ना प्रमाणेच अनेक तरुणी या चॉकलेट हिरोच्या फॅन होत्या. त्याच्या पत्नीसह नितू सिंग सोबत त्याची जोडी खुप गाजली. ऋषी कपूरच्या काळात आम्ही  अगदी शाळकरी होतो 

परंतू डफली वाले डफली बजा या सरगम चित्रपटातील गाण्यात डफली ऋषीच वाजवतो आहे असे वाटत होते. डफली वाजवण्याचा जो अभिनय त्याने केला तसा इतर कुण्याही अभिनेत्याला डफली वाजवतांनाचा अभिनय कधी करता आलाच नाही. ऋषी डफली वाजवायचा तर इतर अभिनेते त्या डफली वर निव्वळ हात , बोटे फिरवायचे. तसेच दर्देदिल दर्दे जिगर” या  कर्ज  चित्रपटातील गाण्यात prelude मधील व्हायोलीन वाजवण्याचा अभिनय सुद्धा त्याने खूपच सुंदर केला होता. चेहरा है या  चांद खिला है या सागर मधील गाण्याच्या आधी वाजवलेल्या गिटारबाबत सुद्धा तेच म्हणता येईल. या  सर्वातील अभिनय करतांना त्याला विशेष कष्ट घ्यावे लागले नाही. आपल्या संगीताच्या ज्ञानामुळे त्याला ते सहज शक्य झाले. त्याच्या गाजलेल्या चित्रपटांची व गाण्यांची यादी खूप मोठी आहे. सदैव हसमुख दिसणारा हा  अभिनेता कॅन्सरने ग्रस्त होईतो कार्यरत होता. जुन्या पिढीला तर ऋषी ज्ञात आहेच परंतू नवीन पिढीतील मुले सुद्धा ऋषीला चांगले ओळखतात. काळ कोणासाठी थांबत नाही , 25 मार्चला आपण सर्व लवकरच कोरोनातून मुक्त होऊ असे व्टीट करणारा ऋषी तो दिवस बघण्यासाठी न थांबता हम तो चले परदेस हम परदेसी हो गये  म्हणून आपल्यातून निघून गेला.

२९/०४/२०२०

Article about a sweet song "Bada Natkhat Hai Re Kishan Kanhaiyaa" of 1970s hit movie Amar Prem


“बडा नटखट है”,एक वात्सल्यपूर्ण गीत 
हिंदी चित्रपटसृष्टीने एकाहून एक सरस गीते रसिकांना दिली. अवीट गोडींच्या या गाण्यांचे श्रवण नेहमीच होत असते. इंटरनेट व त्या अनुषंगाने समाज माध्यमे आल्यावर तर ज्यांना अशा गीतांची आवड आहे अशांनी गृप तयार करून अनेक जुनी श्रवणीय गीते पोस्ट करणे सुरु केले. विशेष म्हणजे जुन्या गीतांना आजही मोठ्या प्रमाणात ‘लाईक’ मिळतात. अनेक प्रकारची गीते गीतकारांनी रचली त्यात प्रेमगीतांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली व ती सर्वात जास्त ऐकली जातात. देशभक्ती गीते, अंगाई गीते,लहान मुलांसाठी त्यांच्या पालकांनी म्हटलेली गीते.अशा कितीतरी प्रकारच्या रचना गीतकारांनी केल्या. 1970 च्या दशकातील अमरप्रेम या राजेश खन्ना व शर्मिला टागोरच्या चित्रपटातील गीते सुद्धा श्रवणीय होती. 70 च्या दशकातील या चित्रपटाची माहिती व त्यातील “बडा नटखट है” या गीताच्या माहितीत तरुण वर्गास कितपत रस असेल ते ठाऊक नाही. परंतू जुन्या चित्रपटांच्या व गीतांच्या दर्दीना अमरप्रेम मधील एका गीताबाबत सांगावेसे वाटले आणि लेख लिहिण्यास आरंभ केला. अमर प्रेम म्हणजे पतीने घरातून काढून दिल्यावर काकाने वेश्यागृहात विकलेल्या पुष्पाची (शर्मिला टागोर) , वैवाहिक जीवनात सुखी नसलेल्या आनंद बाबू (राजेश खन्ना) व पुष्पाच्या शेजारी रहायला आलेल्या व सावत्र आई असलेल्या
नंदू (विनोद मेहरा) यांची कथा. लहानगा नंदू पुष्पाच्या वात्सल्यपूर्ण वागणुकीने तीच्या कडे जात असतो. तिच्याकडे जाऊन त्याला घरी मिळत नसलेले मातृप्रेम मिळत असते. शक्ती सामंत यांचा हा चित्रपट याचे कथानक सुद्धा सर्वांगसुंदर आहे. या लेखात ते कथानक सुद्धा समाविष्ट करावेसे वाटत होते परंतू लेखन मर्यादेमुळे त्याला आवर घालावा लागला. आवर्जून पहावा असा हा चित्रपट. बंगाली साहित्यावर आधारीत अनेक हिंदी चित्रपट खूप गाजले आहेत. बंगाली लेखक बिभूतीभूषण बंदोपाध्याय यांच्या कथेवर आधारीत या चित्रपटातील “कुछ तो लोग कहेंगे” ,” चिंगारी कोई भडके” ही गीते रसिकांना  आठवतातच. याच चित्रपटात लता मंगेशकर यांच्या आवाजातील  आनंद बक्षी यांचे खमाज रागातील “ बडा नटखट है रे किशन कन्हैय्या, का कारे यशोदा मैय्या” हे सुमधुर , श्रवणीय गीत आहे. आपल्या आवाजातून आईचे प्रेम लता मंगेशकर यांनी व्यक्त केले आहे तसेच पडद्यावर लहानग्या , खट्याळ नंदूच्या मागे धावत शर्मिला टागोरने केलेल्या प्रेमळ आईच्या अभिनयाला तोड नाही. नंदूला आपला मुलगाच समजत “लागे ना किसीकी नजर” , “सबका है प्यारा बन्सी बजैय्या” असे म्हणत त्याच्याशी खेळत , बागडत हे गीत ती म्हणते. गीतात रामकृष्ण परमहंस , विवेकानंद यांच्या तसबिरी सुद्धा दिसतात. जुन्या चित्रपटात थोर व्यक्तींचे फोटो हमखास दिसत. रसिक प्रेक्षक हे गीत ऐकतांना आणि पाहतांना त्याच्याशी समरस होऊन जातो. आताच्या पिढीला हे गीत कितपत आवडेल ते ठाऊक नाही. परंतू पूर्वीच्या चित्रपटात अशी वात्सल्यपूर्ण गीते असत ती कथानकाचा एक भागच असत. बालपणी जीने वात्सल्य दिले त्या गणिकेला उतरत्या वयात मोलकरीणीचे कार्य करतांना पाहून त्याच गावात पुन्हा आगमन केलेला , इंजिनियर झालेला नंदू आश्रय देतो ते पाहून संपूर्ण चित्रपटात I hate tears म्हणणा-या आनंदबाबूंच्या डोळ्यात सुद्धा अश्रू येतात. आज काल मुले, सुना आपल्या वृद्ध माता पित्यांना , सासू सास-यांना वा-यावर सोडतात. अमर प्रेम मधील नंदू मात्र त्याला बालपणी प्रेम देणा-या गणिकेस तिच्या वृद्धापकाळात आश्रय देतो. अशी हि अमर प्रेमाची बोधप्रद कथा पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा सुद्धा ओलावतात. 
     आता असे चांगल्या साहित्यावर आधारीत कथानक असलेले चित्रपट नाहीत आणि तशी गीतेही नाहीत. अगदी बालवयात आपल्या पाल्यांना दूर करून त्यांना प्ले गृप व अनेक स्पर्धांत ढकलणा-या माय-बापांनी “बडा नटखट है“ सारखी वात्सल्यपूर्ण गीते जरुर पाहावीत,ऐकावीत, प्रेम वात्सल्य असलेले, काहीतरी बोध देणारे चित्रपट पहावेत, त्याच आशयाची पुस्तके वाचावी जेणे करून आगामी 
पिढ्यामध्ये एकमेकांप्रती प्रेम आपुलकी राहील, जिव्हाळा राहील.

२८/०४/२०२०

Article about online meetings and huge use of internet in Corona Virus Lockdown

लॉक डाऊन आणि लॉग इन 
कोरोनामुळे लॉक डाऊन घोषित होऊन एक महिना झाला. लॉक डाऊन झाल्या नंतर काही दिवसांनी लोक सोशल मिडीयावर active झाले. अति active झाले असे म्हणण्यास सुद्धा हरकत नाही. सर्वकसे 24*7 लॉग इन आहेत. त्यामुळे मग कोरोना वर मेसेज पाठवणे. इतर विनोद , अनेक प्रकारचे ज्ञानामृताचे डोस यांची भर उन्हाळ्यात बरसात सुरु झाली. प्रत्यक्ष भेट होत नाही म्हणून मग ऑनलाईन भेटींच्या अॅपचा बेसुमार वापर सुरु झाला. अशा अॅप बाबत ज्यांना नवीन महिती प्राप्त झाली त्यांच्यात तर विशेष उत्साह निर्माण झाला. सरकार अशाप्रकारच्या काही अॅपमुळे वापरकर्त्याची माहिती चोरली जाऊ शकते, ती माहिती इतर कंपन्यांना विकली जाऊ शकते हे सांगत असूनही लॉक डाऊन मुळे घरात अडकलेले लोक सरकारच्या त्या आवाहनाकडे डोळेझाक करीत आहे. कोरोनामुळे हे संकट जरी ओढवले असले तरी कोणतेही संकट कायमचे नसते. हे संकट सुद्धा दूर जाणार. तद्नंतर पुनश्च सर्व सुरळीत होईलच. “अति सर्वत्र वर्ज्यते” संपर्क जरूर असावा परंतू त्यात सुद्धा अतिरेक नसावा. अतिरेकीपणे कोणतीही गोष्ट केली की त्याचाही काही ना काही परिणाम होतोच. शिवाय सध्या निव्वळ ऑनलाईन चर्चा करून त्यातून काही ना काही निष्कर्ष निघेलही परंतू त्यातून विशेष फलदायी असे काही घडण्यासाठी तूर्तास तरी तसे वातावरण नाही. सततच्या ऑनलाईन चर्चा सुद्धा कदाचित निरस वाटू लागतील. आज आपण जरी घरी असलो बाहेर जाता येत नाही त्यासाठी जरी इंटरनेट , ऑनलाईन चर्चा हा पर्याय असला तरी सततच्या या चर्चांमुळे काही दिवसांत ते सुद्धा कंटाळवाणे होणार की नाही ? याचा सुद्धा विचार करणे आवश्यक आहे. चर्चा आवश्यक असतील तेंव्हाच घ्याव्यात शिवाय त्यात सुसूत्रता असावी,त्यात ठराविक अंतर असावे. इंटरनेटमुळे सुद्धा पर्यावरणावर परिणाम होतो, एक ई-मेल पाठवल्याने सुद्धा अल्प का होईना पण प्रदूषण होते, इंटरनेटच्या भल्या मोठ्या सर्वरसाठी मोठ्या प्रमाणावर वीज लागते असे तज्ञ सांगतात परंतू हे अनेकांना ठाऊकच नाही. इंटरनेट काळाची गरज आहे हे मान्य असले तरी व त्याचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर होतांना दिसतो. कोरोना काळात हा वापर आणखी वाढला आहे.   मनुष्य हा समाजशील आहे त्याला समाजात राहणे आवडते , संपर्क आवडतो व तो त्याला लॉक डाऊन मुळे करता येत नाही. लवकरच त्याला पुन्हा समाजात सर्वत्र जाता येईलच असा सकारात्मक विचार ठेवायचा आहे. अनेक लोक त्यांच्या परिवारस वेळ देऊ शकत नव्हते ते आज लॉक डाऊनमुळे घरी आहेत. ते घरी असूनही मोबाईलवरून ऑनलाईन चर्चा आदि मध्ये व्यस्त होत असतील तर त्यांच्या परिवाराला आपला कुटुंब प्रमुख लॉक डाऊन मध्ये घरी असूनही व्यस्त आहे व त्याच्याशी संवाद होत नाही असे साहजिकच वाटण्याची संभावना आहे. तेंव्हा लॉक डाऊन काळात सतत लॉग इन न राहता परिवाराला सुद्धा वेळ द्यावा, चांगले वाचन करावे , लिखाण करावे , एखादा ऑनलाईन कोर्स करून आपले कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न करावा.

२७/०४/२०२०

Article on address to nation by RSS Chief Mohanji Bhagwat on Akshaya Tritiya 2020

डंका वाजवण्यासाठी नव्हे 130 करोड बांधवांसाठी सेवाकार्य
काल सायंकाळी सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे बौद्धिक समाज माध्यमे तसेच अनेक वाहिन्यांवरून प्रसारित झाले. सर्व जग हे व्याख्यान ऐकण्यास उत्सुक होते. जगातील सर्वात मोठे संघटन असलेला संघ , संघाची राष्ट्रविषयक भूमिका ,  विविध प्रसंगी आपत्तीच्या काळात संघाचे शिस्तीने चालणारे सेवाकार्य  यावर सर्वांचेच लक्ष असते. चिन मधून जगात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे कोविड ची वैश्विक समस्या व त्याचा भारतावर झालेला परिणाम , भारतातील टाळेबंदी या अनुषंगाने संघाच्या नागपूर महानगराने या बौद्धिक वर्गाचे आयोजन केले होते. संघाचा बौद्धिक वर्ग याप्रकारे प्रथमच समस्त जनतेने ऐकला. जेंव्हा हे बौद्धिक ऐकण्याचे तमाम जनतेला ज्ञात झाले तेंव्हा “ तरी अवधान दीजे ” असे आवाहन करण्याचे काम सुद्धा पडले नाही. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संघाचे विचार नागरीकांनी एकाग्रतेने ऐकले. अगदी सहज सोपा असा हा जाहीर बौद्धिक वर्ग होता. 130 करोड सदस्यांच्या कुटुंबाची काळजी असलेले हे बौद्धिक होते. “हम मनुष्योमे भेद नही करते , सब अपने है “ या वाक्यातून जे-जे पिडीत आहे त्या सर्वांसाठी कार्य करणे आवश्यक असल्याचे सांगून भारताच्या स्वभाव वैशीष्ट्याचे वर्णन मा. मोहनजी भागवत यांनी  केले. हे बौद्धिक सर्वानीच ऐकले आहे. तरीही त्यातील काही बाबींची पुनरोक्ती येथे करावीशी वाटते. या बौद्धीकातून संघाची विचारसरणी कशी आहे ? तसेच संघाची देशहितैषी व समस्त देशबांधवांविषयीची असलेली काळजी या बाबी जनतेच्या तसेच संघाची काहीही माहिती नसतांना जे संघावर आरोप करीत असतात , टीका करीत असतात त्यांच्या नक्कीच लक्षात आल्या असतील. “130 करोडवाला समाज” , “ जो-जो पिडीत है वो सब अपने है” , “हम मनुष्योमे भेद नही करते” ,” अपनी कीर्ती प्रसिद्धी के लिये कार्य नही करना है” , “अपना डंका डंका बजाने के लिये हम ये कार्य नही कर रहे“ , “श्रेय दुसरोको देना है” , नियमांचे पालन करणे, त्यांनी सोशल डिस्टन्सिंग ऐवजी 'फिजिकल डिस्टन्सिंग ' असा केलेला शब्दप्रयोग , या कठीण प्रसंगातही होणारी काही चांगली  कार्ये अशा अनेक बाबींवर प्रकाश टाकतांना भारताने कोरोना महामारीच्या काळात तत्परतेने सर्व उपाय योजना कार्यान्वित केल्याने व त्या उपाययोजनांची अंमलबजावणी प्रशासनातील सर्व अधिकारी  कर्मचारी यांनी अत्यंत मेहनतीने व चांगल्याप्रकारे पार पाडत असल्याचे सांगताना त्यांनी विदुरनिती मधील पुढील श्लोकाचा दाखला दिला.
षड् दोषा: पुरुषेणेह हातव्या भूतिमिच्छिता । निद्रा तन्द्रा भयं क्रोध आलस्यं दीर्घसूत्रता ॥
अर्थात
या जगात ज्यांना स्वत:ची उन्नती करायची इच्छा आहे त्यांनी झोप, तंद्री, भय, क्रोध, आळस तसेच कार्य उशिरा करणे या सहा दुर्गुणांचा त्याग केला पाहिजे.
खरेच भारत सरकार व त्या अनुषंगाने प्रशासन, वैद्यकीय क्षेत्रातील सर्व कर्मचारी,सफाई कामगार,पोलीस विभाग, गृहरक्षक दल, एन.सी.सी., एन.एस.एस. , पत्रकार , समाजसेवक हे सर्व कोरोना महामारीमुळे  देशावर आलेल्या संकटकाळात वरील सुभाषितातील भय, निद्रा , तंद्री , आळस , झोप , कार्यातील विलंब हे सर्व त्यागून तत्परतेने कार्य करीत आहेत.  
संकटग्रस्त  परीस्थितीत  देशवासियांना त्यांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी कुणाच्यातरी आधाराची ,दिलास्याची, सकारात्मक विचारांची आवश्यकता असते. कालच्या मा. मोहनजींच्या स्वदेशी , स्वच्छता , कारखाने , रोजगार , शिक्षण समाजातील शांती , ज्या ज्या देशांना गरज होती त्यांना भारताने केलेली मदत , औषध पुरवठा अशा सर्वच बाबीवर प्रकाश टाकणा-या बौद्धिकामुळे जनतेचे मनोधैर्य निश्चितच वाढले त्यांना दिलासा तर मिळालाच शिवाय संघाची सर्वसमावेशक अशी भूमिका पुन्हश्च सर्वांच्या समोर आली. 

२४/०४/२०२०

Raj Thackeray writes an open letter to Uddhav, says open wine shops, it will start getting state revenue...article about this

दे दारू .... दे दारू

   “संसार उध्वस्त करी दारू बाटलीस स्पर्श नका करू“ “नशा  करी चालकाची दशा”  अशी घोषवाक्ये लहानपणापासून एकण्यात होती काका दारूबंदी अधिकारी होते. खेड्यापाड्यात दारूमुळे अनेक संस्कार उध्वस्त होत असतात म्हणून दारूबंदी अधिकारी या नात्याने आमचे काका व त्यांची टीम खेड्यापाड्यात प्रोजेक्टर घेऊन जात व दारुचे दुष्परीणाम सांगणारे “माहितीपट” दाखवत.त्या माहितीपटांच्या शेवटी वरील आशयाची घोषवाक्ये असत.  लहानपणीच हे माहितीपट पहाण्यात आल्याने दारूचे व्यसन वाईट असते हे कळले. पुढे मोठे झाल्यावर शासनच दारूबंदी खाते चालवते व शासनाला मोठा महसूल सुद्धा दारू मुळेच मिळतो हे कळले. आता तर Lock Down च्या काळत दारू महात्म्य आवळले जात आहे. कोरोनामुळे झालेल्या Lock down मुळे तळीरामांची मोठीच अडचण झाली. सोशल माध्यमातून मग त्याला वाचा फुटली. वाईन शॉप्स थोडा वेळ तरी उघडावे असे म्हणत तळीरामांच्या मदतीस सर्वप्रथम धाऊन आला लव्हर बॉय ऋषी कपूर. तमाम मद्यप्रेमींच्या मनात ऋषी बद्दल मोठा आदर निर्माण झाला. त्यानंतर अनेक कवी, शीघ्रकवी यांनी कविता केला, लिखाण झाले. Lock down ला आज एक महिना झाला त्यामुळे कोलमडलेली अर्थव्यवस्था, औषधी दुकानात सापडलेला दारू साठा , स्वत:च्याच बार मध्ये दारू चोरी झाल्याचा बनाव, तळीरामांची(यात अनेक सेलिब्रेटी सुद्धा आहेतच)अडचण आणि सर्वात मुख्य म्हणजे दारू व्यवसायातून मिळणारा महसूल हे सर्व हेरून राजसाहेब ठाकरे यांनी राज्यसरकारला पत्र लिहून दारूची दुकाने सुरु ठेवण्याची मागणी केली आहे.दारूमुळे राज्य सरकारला 41.66 कोटी रुपयांचे अबकारी शुल्क दररोज तर महिन्याला 1250 कोटी आणि वर्षाला 15000 कोटी मिळतात. “Lock Down पुढे किती दिवस राहील ह्याचा अंदाज नाही ह्यावरून आपण किती महसूल गमावलाय आणि गमावू ह्याचा अंदाज येईल,” असं राज यांनी म्हटलं आहे. या पत्रामध्ये राज ठाकरे यांनी पोलीस, नर्सेस आदींच्या कीट, सरकारी कर्मचा-यांचे पगार, वाईन शॉप्सतून मिळणारा मोठा महसूल या बाबींवर भाष्य केले आहे. “टाळेबंदीच्या आधी दारूची दुकानं सुरूच होती म्हणून आता कुठल्याही नैतिक गुंत्यात न अडकता राज्य सरकारने निर्णय घ्यावा. मराठीत म्हण आहे ना ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचंत्याप्रमाणे राज्याला महसुलाची गरज आहे हे वास्तव स्विकारलं पाहिजे. कोरोना या विषाणूच्या आपत्तीमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. सरकारला नागरिकांचे प्राण सुद्धा वाचवायचे आहेत तसेच राज्यशकट सुद्धा हाकायचा आहे. या राज्यशकटास दारू महसुलाचा सुद्धा आधार आहे. आता राज ठाकरे यांच्या या पत्राचा परिणाम काय होतो याकडे आता पगारामुळे सरकारी कर्मचा-यांचे व सर्व मद्यप्रेमींचे लक्ष लागले आहे. जर या पत्राचा काही परिणाम झाला नाही आणि वाईन शॉप्स बंदच राहिली तर मग अनेक मद्यप्रेमींना व तळीरामांना “ दे दारू ... दे दारू “ असेच आळवत बसावे लागणार हे निश्चित. 

२३/०४/२०२०

Two Sadhus Among Three Men Lynched To Death In Palghar, 110 People Arrested in Maharashtra. Article elaborate this incident

मारून टाकण्याचा अधिकार कोणी दिला ?
बायबल मध्ये एक कथा आहे. एका व्याभिचारी स्त्रीला  शस्त्रधारी जमाव पकडतो व तिला येशू ख्रिस्तांच्या पुढ्यात आणतो. व्याभिचारी स्त्रीला दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा असल्याचे तो जमाव भगवान येशूला सांगतो. येशू यावर काय बोलतात हे त्यांना पाहायचे असते. तेंव्हा येशू उठून उभे राहतात व “ तुमच्या पैकी ज्याने कोणी एकही पाप केले नाही त्याने पहिला दगड या स्त्रीला मारावा” असे म्हणतात तेंव्हा जमाव एक-एक करून पांगतो व येशू त्या स्त्रीला पुन्हा पाप न करण्याचे सांगतात.
   पालघर जिल्ह्यात जमावाने निष्पाप साधूंना मारले या घटनेने येशूच्या कथेचे स्मरण करून दिले. बायबलच्या कथेतील त्या व्यभिचारी स्त्रीने तरी पाप केले होते. परंतू या साधूंनी असे काय महत्पाप केले की त्या जमावाने त्यांना मारून टाकावे ? 
परवा रात्री सोशल मिडीयावर पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्या अंतर्गत येणा-या गडचिंचले या गावात दोन साधू व त्यांचा वाहनचालक यांना मारण्याचा व्हिडीओ पाहिला. वृत्त खरे आहे की नाही म्हणून त्वरीत मराठी वृत्तवाहिन्या लावून पाहिल्या कुठेही या बाबतचे वृत्त नव्हते. म्हणून मग हिंदी वृत्तवाहिनी लावली असता त्यावर मात्र या घटनेचे वृत्त प्रसारित करणे सुरु होते. 16 एप्रिल ला घडलेल्या त्या घटनेचे वृत्त मराठी वाहिन्यांवर का प्रसारित झाले नाही याचे आश्चर्य वाटले. त्या साधूंना मरेतो मारण्याची ती दृश्ये पाहून सर्वच हादरून गेले , पहाणा-यांचे मन हेलावून गेले. पूर्ण घटना मात्र काही कळत नव्हती. दुस-या दिवशी इ-पेपर मध्ये घटनेचा पूर्ण वृत्तांत आला. कुण्यातरी महंताच्या अंतिम यात्रेसाठी जात असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील 70 वर्षीय महंत कल्पवृक्षगिरी महाराज,35 वर्षीय सुशीलगिरी महाराज व त्यांचा वाहनचालक निलेश तेलगडे यांची गाडी वनविभागाच्या चौकीजवळ गावक-यांनी अडवली तेंव्हा वनविभागाने त्यांना कसेबसे सोडवले परंतू पोलीस आल्यावर सुमारे 200 लोकांच्या जमावाने त्या साधूंवर, पोलिसांवर हा प्राणघातक हल्ला केला.
ते साधू जीव वाचवण्यासाठी तळमळत होते,नि:शस्त्र होते, पोलिसांची मदत घेऊ पाहत  होते परंतू मोठ्या जमावाचा प्रतिकार ते करू  शकले नाही पोलीस सुद्धा हतबल झाले. जबर  मारहाणीमुळे ते दोघे साधू व वाहनचालक असे  तिघे प्राणास मुकले. लॉक डाऊन मध्ये ते साधू निघाले, त्यांनी रीतसर परवानगी घेतली की नाही, जमाव एवढा प्रक्षुब्ध का झाला ? त्या भागातील वातावरण,पोलिसांवर सुद्धा हल्ला करणे हे सर्व तपासांती समोर येईलच. काल याच प्रकरणाचे वृत्त आपल्या रिपब्लिक वाहिनीवर देणा-या अर्णब गोस्वामी यांच्या चालत्या गाडीचा काच फोडून त्यांच्यावर हल्ला करण्याचा अज्ञात दुचाकीस्वारांनी प्रयत्न  केला. अर्णब गोस्वामी यांनी त्यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा आरोप कॉंग्रेस पक्ष व सोनिया गांधींवर केला आहे.  
वाधवानला महाबळेश्वरला जाण्याचे पत्र देणा-या, मारहाण करणारे मंत्री असलेल्या व दोन भिन्न विचारसरणीच्या पक्षांच्या कुबड्यांवर चालत असलेल्या व हिंदुत्व अजूनही सोडले नसल्याचे केविलवाणेपणे सांगणा-या मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने जरी आरोपींवर गुन्हे नोंदवले असले तरी या हत्या-यांना पुढे काय शिक्षा होते ते पहावे लागेल परंतू या घटने नंतर मेणबत्ती गँग , पुरस्कार वापसी गँग, या देशात भीती वाटते असे म्हणणारे नसिरुद्दीन शहा , सौ अमीर खान , बाटला हाउस एन्काउंटर नंतर सोनिया गांधी रडल्या असे म्हणणारे सलमान खुर्शीद हे साधूंच्या हत्याकांडानंतर अद्यापही चूप का आहेत ? हे सर्व जरी चूप असले तरी यांची चुप्पी मात्र खूप काही सांगून जाणारी आहे. कबीर म्हणतो
जिन घर साधू ना पुजीये , घर की सेवा नाही
वे घर मरघट सारिखे , भूत बसे दिनमाही
येथे साधूंना पूजा , मान तर सोडाच त्यांचा जीवच घेण्यात आला. कबीरच्या दोह्यानुसार हे लोक तर भूतापेक्षाही भयंकर आहे. “संतास रक्षितो, शत्रू निखंदतो” अशा साधू संताना, फकीरांचे रक्षण करणा-या त्यांना नेहमी अभय देणा-या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हे असे लोक ! या अशा भेकड नि:शस्त्रांवर , ते सुद्धा साधूंवर जमावाने हल्ला करणा-यांना म्हणावे हिम्मत असेल तर अतिरेक्यांवर हल्ले करा. या अशा जमावाने हल्ले करणा-यांची एवढी हिम्मत कशी होते , कोण आहे यांच्या मागे ? यांना कुणाला जीवानिशी मारून टाकण्याचा काय अधिकार ?   

१७/०४/२०२०

Article about Chanakya and a Doordarshan serial of 1990s based on him.

चाणक्य-आवर्जून पाहावी अशी मालिका
दुरदर्शनवर रामायण मालिकेचे पुनश्च प्रसारण सुरु झाले. रामायणाबाबत सर्वत्र लिखाण, चर्चा सुरु झाल्या , अनेकांनी या मालिके बाबतच्या आठवणींचे स्मरण केले. रामायणाबाबतची अशी चर्चा होणे स्वाभाविक सुद्धा आहे रामायण या महाकाव्याची जादूच तशी आहे. रामायणा सोबतच दूरदर्शनने त्यांच्या दर्शकांसाठी आणखी काही जुन्या मालिकांचे प्रक्षेपण  सुद्धा सुरु केले आहे. त्यापैकी एक मालिका म्हणजे “चाणक्य”. 1991 या वर्षी ही मालिका दूरदर्शनवर झळकली आणि चाणक्याचे बुद्धिकौशल्य , राजनीती , अखंड भारताचे स्वप्न, चंद्रगुप्त मौर्य याला दिलेली प्रेरणा आणि त्याला राजा बनवणे, अलेक्झांडर विरूद्धचे युद्ध भारतातील सर्व राज्ये आणि जनपदांनी मिळून लढावे अशी त्याने मनी बाळगलेली महत्वाकांक्षा या सर्वांमुळे ही मालिका अतिशय गाजली. आता ही मालिका दूरदर्शनवर दररोज सायंकाळी 5 वाजता पुन:प्रसारित होत आहे. सुमारे इ.स.पूर्व 375 या वर्षी जन्म झालेल्या चाणक्य उर्फ कौटिल्य उर्फ विष्णुगुप्त या एका तत्कालीन शिक्षकाने राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन देशावरील  आक्रमकांच्या विरोधात भारतातील गणराज्ये व जनपदे यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करून या राष्ट्राचा अभिमान जागृत करून “हम करे राष्ट्र आराधन” अशी राष्ट्र प्रथम मानण्याची व राष्ट्रावर प्रेम करण्याची भावना त्याच्या गुरुकुलातील विद्यार्थ्यांमध्ये जागृत केली. अलेक्झांडर उर्फ सिकंदराला जेंव्हा अंभी जाऊन मिळतो तद्नंतर  “एक राजा जसे दुस-या राजाशी वर्तणूक करतो तशी माझ्याशी करा“ असे सिकंदरला उत्तर देणा-या पोरसचे सैनिक सुद्धा एका युद्धात सिकंदरचा साथ देतात. मगधचा सतत विलासात रमणारा धनानंद सुद्धा चाणक्याचा अपमान करून त्याला मदत करण्यास नकार देतो. त्यानंतर मालव व क्षुद्रक एकत्रित येऊन सिकंदर विरोधात उभे ठाकतात परंतू मालव सैन्याशी लढताना सिकंदर जबर जख्मी होतो. थकलेले, भागलेले - युद्धमग्न
असणारे, कुटुंबांपासून दूर आलेले, खायला अन्न, नेसायला वस्त्र नसलेले अलेक्झांडरचे सैनिक आता युद्ध करण्यास तयार नसतात त्यामुळे व भारतात अलेक्झांडरला भेटलेल्या अनेक साधू, संत यांच्या जीवनशैलीने, त्यांच्या अल्पसंतोषी राहणाच्या शिकवणीने, “माणसाला मेल्यावर जागा किती लागते ?” अशा प्रश्नाने, एका साधूला काय पाहिजे असे विचारल्यावर अलेक्झांडरची सावली अंगावर पडत असलेल्या त्या साधूचे “माझ्या अंगावर फक्त उन पडू दे” असे उत्तर या सर्वांमुळे प्रभावीत होऊन आपली जग जिंकण्याची मोहीम अर्धवट सोडून आपले क्षत्रप नेमून सिकंदर परतीच्या प्रवासाला लागतो.
     अर्थशास्त्र , राजनीती असे ग्रंथ        लिहिणा-या चाणक्याची कुटनिती, राष्ट्रभक्ती, “शिक्षक कभी साधारण नही होता प्रलय और निर्माण दोनो उसके गोदमे होते है |” , “जब तक राष्ट्र अपनी विरासत अपनी संस्कृती ,मुल्योंको नही भूलता तब तक वो पराजित नही होता |” अशी शिकवण देणारा चाणक्य मात्र भारतीय जनतेला म्हणावा तितका कळलेला नाही, का जाणून कळू दिला नाही देव जाणे. 90 च्या दशकात जेंव्हा हि मालिका झळकली तेंव्हा सुद्धा डाव्यांनी या मालिकेला विरोध दर्शवला होता . परंतू चाणक्याची भूमिका साकारणारे व दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेले चंद्रप्रकाश व्दिवेदी यांनी मात्र यास दुजोरा दिला नव्हता. 180 पुस्तके वाचून त्यांच्या आधाराने , कोणतीही गोष्ट मनाने न टाकलेली हि मालिका सर्वानीच विशेषत: शिक्षक व विद्यार्थ्यांनी आवर्जून पाहवी अशी आहे. चाणक्याने दिलेली राष्ट्रप्रेमाची शिकवण, आज आपल्या देशातील जात , धर्म, राज्यांची सीमा, भाषा यांवरून भांडणा-या जनतेने व असे मुद्दे उचलून धरून आपला राजकीय स्वार्थ साधणा-यांनी “हिमालयसे लेके समुद्र पर्यंत भूमी का कण कण मेरा है और उसे अपनी गौरवशाली मातृभूमी कहनेका मुझे अधिकार है |” अर्थात समस्त भारत देश आपला आहे तसेच कोरोनासारख्या वैश्विक व आपल्या मातृभूमीवर आलेल्या राष्ट्रीय संकटाच्या प्रसंगीही राजकारण करणा-यांनी “जो जो इस राष्ट्र की एकता और उत्कर्षके मार्ग बाधा होगा उसका विनाश होगा” अशी चाणक्याची शिकवण विसरता कामा नये.

१५/०४/२०२०

Article related Corona, Covid-19 and importance of keeping Social Distance

दूरही रहना पास ना आना 
     मा. पंतप्रधानांनी काल दि. 14 एप्रिल रोजी लॉक डाऊन तीन मे पर्यंत वाढवल्याचे घोषित केले. हे सांगताना त्यांनी पुनश्च एकदा Social  Distancing चा नियम पाळण्याचे सांगितले. परंतू कालच्याच दिवशी संध्याकाळी बांद्रा , मुंबई व सुरत येथे मोठा जमाव एकत्र झाल्याचे दृश्य सर्वानी पाहिले आणि मग एकच उहापोह सुरु झाला. जो तो आपले विचार करू लागला. त्यातच आदित्य ठाकरे यांनी सुद्धा “मजुरांना घरी जाण्याची परवानगी द्यावी“ अशा आशयाचे ट्वीट केले. तत्पूर्वी विनय दुबे नामक कुण्या एका मजुरांच्या स्वयंघोषित नेत्याने व्हिडीओ व्दारे मजुरांना भडकावले. आता या विनय दुबेला पोलिसांनी अटक केली. परंतू कोरोना हा विषय गंभीर असतांना, संपर्कातून हा पसरत असतांना शिवाय ‘मातोश्री’ या ठाकरे कुटुंबीयांच्या निवासस्थानाजवळील चहावाला हा सुद्धा कोरोना बाधित झालेला असतांनाही आदित्य ठाकरे यांनी असे कसे ट्वीट केले याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. कोरोना जगभरात धुमाकूळ घालत असतांना आपले राज्यकर्ते , नेते असे कसे काय वागू शकतात ? कोरोनाला आळा घालण्यासाठी अद्यापही “Chain Breaking” हा एकमेव उपाय असतांनाही आदित्य ठाकरे यांचे केंद्र सरकार वर दोषारोपण करीत मजुरांना गावी जावू देण्याची विंनती करणे, विनय दुबेसारख्या भडकाऊ भाषणे देणा-यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. देष सध्या बिकट परिस्थितीतून जात आहे. अशा प्रसंगी सर्वपक्षीयांनी राजकारण , आरोप प्रत्यारोप करणे सोडून एकत्र येणे आवश्यक आहे. माध्यमांनी सुद्धा आपण कोणत्या बातम्या दाखवतो याचे भान राखणे आवश्यक आहे. आपले डॉक्टर्स , पोलीस , प्रशासन , सफाई कामगार हे सर्व जीव धोक्यात घालून रात्रंदिवस राबत आहेत. बांद्र्याची गर्दी कशी जमा होते ? सुरतला एवढा मोठा जन समुदाय कसा रस्त्यावर येतो ? यामागे कोण आहे? विनय दुबेंसारखे जे तथाकथित नेते आहे त्यांना हुडकून काढणे गरजेचे आहे. या लोकांना एकत्र आणण्यासाठी अफवा पसरवणारे कोण आहेत? यांना अफवा पसरवून भारताच्या कोरोना विरोधी लढयाला छेद द्यायचा आहे. भारताने  जनतेसाठी , कोरोना पासून बचाव करण्यासाठी ज्या जलदगतीने कार्य केले , निर्णय घेतले त्या गतीने इतर कोणत्याही देशाने तसे कार्य केले नाही. परंतू याचे श्रेय कुणाला मिळू नये , स्वत:ची राजकीय कारकीर्द फळाला यावी म्हणून या दुबेंसारख्या भडकावणा-या , अफवा पसरवणा-या नेत्यांना जेरेबंद करणे आवश्यक आहे. जनतेने सुद्धा कोणावरही विश्वास न ठेवता शासनाकडून अधिकृतरित्या जी माहिती येते त्यावरच विश्वास ठेवावा. काही सुशिक्षित लोक सुद्धा Social Distancing चे नियम पाळत नाहीत , मुले सर्रास क्रिकेट खेळतात, स्वत: पंतप्रधान मास्क घालून राहिले परंतू काही अतिहुशार मास्क न घालता सर्वत्र वावरतात. यांना कोरोनाचे गांभीर्य कळले असूनही हे स्वत:ला व स्वत:च्या परिवाराला धोक्यात घालत आहेत. जनतेने “कूछ नही होता” , “ काही नाही होत न बे “ असा फाजील आत्मविश्वास सोडून “दूरही रहना पास ना आना” हे पक्के ध्यानात घेणे गरजेचे आहे. हे जर ध्यानात घेतले तरच आपला बचाव होईल व कोरोना हरेल  

१३/०४/२०२०

Actress Lalita Pawar remembered again by Ramayan Serial Manthara role

“मंथरा”च्या निमित्ताने ललिता पवारांचे स्मरण 
1987 मध्ये दूरदर्शनवर झळकलेल्या व तुफान लोकप्रियता मिळवणा-या चित्रपटसृष्टीतील दिग्गज, आंखे , आरजू , चरस , बगावत यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांचे निर्माता दिग्दर्शक रामानंद सागर यांची रामायण ही मालिका सध्या पुन:प्रक्षेपित होत आहे व त्यामुळे चर्चेत आली आहे. त्यासोबतच पुन्हा एकदा चर्चेत आले त्यातील कलाकार. प्रभू रामचंद्रांची भूमिका साकारणारा अरुण गोविल, सीतेची भूमिका साकारणारी दीपिका , रावण–अरविंद त्रिवेदी. या अनेक कलाकारंची चर्चा सध्या होत आहे. समाज माध्यमांवर त्यांची चित्रे, व्हिडीओ, मुलाखती झळकत आहेत. यातील अनेक कलावंत आता हयात नाहीत.रामायणात भूमिका साकारणा-या  कलाकारांच्या गर्दीत काही मराठी कलाकार सुद्धा होते जयश्री गडकर-कौसल्या, बाळ धुरी- दशरथ, संजय जोग-भरत आणि मंथरा- ललिता पवार.

“पुनी पुनी कितनी हि सुने सुनाये ,
जीय की प्यास बुझात ना बुझाये”

अर्थात कितीही वेळा सांगा अथवा ऐका परंतू तरीही अंतरात्म्याची तहान काही मिटत नाही अशा रामायण या वाल्मिकी रचित ग्रंथात सर्वात प्रथम कळ फिरवणारी स्त्री म्हणजे ‘मंथरा’. महाराणी कैकयी सोबत बालपणापासून असलेली ही दासी. कैकयीच्या विवाहोपरांत अयोध्येत येते व आपल्या राणीच्या पुत्रासाठी, भरतासाठी रामाला वनवासात धाडण्याचा वर कैकयीला दशरथाला मागण्यास सांगते आणि पुढे सर्व रामायण घडते. नवीन पिढी आता रामायण मालिका पहात आहे त्यांना सुद्धा ललिता पवार यांनी वठवलेली मंथरेची भूमिका नक्कीच आवडली असले परंतू मंथरा साकारणा-या ललिता पवार यांच्याविषयी मात्र त्यांना माहिती नसेल. रामायण मालिकेच्या कलाकारांच्या निवडीच्या वेळी मंथरेच्या भूमिकेसाठी रामानंद सागर यांनी डोळे लावून ललिता पवार या प्रख्यात अभिनेत्रीची निवड केली असेल हे मात्र निश्चित. कारण क्ज्जास , खाष्ट , कुटील अशा भूमिका करण्यात ललिता पवार यांना तोड नव्हती. रामाला वनवासात पाठवतांना कावेबाज स्त्रीचा अभिनय उत्कृष्ट करणा-या ललिता पवार यांनी राम वनवासातून आल्यावर पश्चाताप दग्ध झालेली मंथरा सुद्धा त्याच ताकदीने साकारली आहे. रामानंद सागर क्लॅपर बॉय पासून कारकीर्द सुरु करणारे लेखक, दिग्दर्शक. त्यांच्याच समकालीन म्हणजे 1944 पासून अभिनेत्री म्हणून कारकीर्द सुरु करणा-
या ललिता पवार. रामशास्त्री या पहिल्याच चित्रपटात आनंदीबाई ही नकारात्मक भूमिका त्यांनी वठवली होती. पुढे त्यांना तशाच भूमिका त्यांना मिळत गेल्या. त्याचे कारणही तसेच आहे एका चित्रपटात शूटिंग दरम्यान सह कलावंतानी मारलेल्या थप्पडीने त्यांचा डोळा दुखावला व कायमचा अधू झाला त्यामुळे त्या क्ज्जास सासू , खलनायिका , नकारात्मक अशा भूमिका साकार करू लागल्या व त्या भूमिका त्यांनी यशस्वीपणे वठवल्या. जंगली मधील कधीही न हसणारी  आई , “दादी अम्मा दादी अम्मा मान जावो” असे नातवंड विनवणी करूनही लवकर राग न सोडणारी घराना चित्रपटातील आजी तसेच अनाडी, श्री 420, नसीब मधली मिसेस गोम्स, आनंद मधली प्रेमळ नर्स अशा वात्सल्यपूर्ण स्त्रीच्या भूमिका सुद्धा ललिता पवार यांनी त्याच ताकदीने साकारल्या. परंतू स्त्री नकारात्मक भूमिकेत दाखवायची असल्यास निर्माता, दिग्दर्शक प्रथम ललिता पवार यांच्याच नावाला प्राधान्य देत असत. त्यामुळेच रामानंद सागर यांनी त्यांना रामायण मालिकेत मंथरेची भूमिका दिली.1961 च्या संपूर्ण रामायण या चित्रपटात सुद्धा ललिता पवार यांनी मंथरेची भूमिका वठवली होती. बालकलाकार,नायिका, सहाय्यक अभिनेत्री अशा भूमिका साकारणा-या ललिता पवार यांची चित्रपट कारकीर्द मोठी आहे. रामायण मालिके नंतर मात्र त्यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. वृद्धापकाळ सुद्धा आला त्यातच कर्करोगाने ग्रासले. जीवनाच्या अखेरच्या काळात त्या पुण्याला होत्या. 1998 मध्ये त्या वारल्या तेंव्हा त्याचे वृत्त उशिरा कळले. अनेक दिग्गजांनी त्यांच्या समवेत काम केले होते परंतू असे म्हणतात की त्यांच्या अंतिम यात्रेत चित्रपट सृष्टीतील कुणीही नव्हते. आज 18 एप्रिल हा ललिता पवार यांचा जन्मदिवस शिवाय रामायण मालिका पाहतांना त्यांनी साकारलेल्या मंथराच्या भूमिकेमुळे त्यांचे स्मरण झाले त्यासाठी हा लेखन प्रपंच. 

१०/०४/२०२०

Article about behavior of leaders

शूssss बोलू नका बरं, मार बसेल ! 


पूर्वी लहान मुले ऐकत नसले,  किंवा  काही हट्ट करीत असले तर त्यांना बागुलबुवा किंवा बुवा किंवा पकडणारे लोक यांची भीती दाख-वली जात असे. आता सोशल मिडीयावर पोष्ट करणा-यांना सुद्धा पोष्ट करण्याआधी आप्तस्वकीय, “काही पोष्ट करू नको बाबा मार बसेल“ अशी सूचना करू लागतील. कारण आपल्या भारतातील अनेक लोकप्रतिनिधींच्या रागाचा पारा  खूप लवकर चढतो. उठ-सुठ संविधान, अहिंसा, थोर नेते,  समाजसुधारक यांची नावे घेणा-या या नेत्यांना त्यांच्या विरुद्ध कुणी थोडे जरी बोलले किंवा लिहिले की संताप अनावर होतो. रागाच्या भरात मग हे त्यांची वक्तव्ये , त्यांनी नियुक्त झाल्यावर घेतलेल्या शपथा वगैरे सर्व विसरतात आणि त्यांना अशोभनीय अशी कृत्ये करतात. अनेकदा अशी प्रकरणे देशात व आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्रात घडल्याचे जनतेने अनुभवले आहे. जनतेला मारठोक , अधिका-यांना , कर्मचा-यांना मारणे अशी कृत्ये` कितीतरीवेळा घडल्याची उदाहरणे देता येतील. लोकशाही,संविधान हे शब्द वारंवार उच्चारायचे आणि त्याच्या अगदी उलट वागायचे अशी यांची त-हा असते. मारहाणीसारखे कृत्य करतांना हे वेळ-काळ सुद्धा पाहत नाही. आपला देश,` आपले राज्य कोणत्या परिस्थितीत असते आणि आपण काय कृत्ये करतो , काय वक्तव्ये करतो याचा जराही विचार हि मंडळी करीत नाही. अर्थात सर्वच लोकप्रतिनिधी असे असतात असे नाही. यातील काहीच लोक असे असतात. परंतू यांच्या अशा वागण्याने सर्वच लोकप्रतिनिधी बदनाम होत असतात. निवडणुकीच्या वेळी गोड-गोड बोलायचे , आपली मतांची बँक सांभाळण्यासाठी लांगूलचालन करायचे, त्यासाठी कोणत्याही स्तराला जायचे हे योग्य नव्हे. नेत्याच्या विरोधात कुणी काही टिपण्णी करीत असेल तर त्यातून त्या नेत्याने काहीतरी शिकायला पाहिजे, आत्मपरीक्षण करायला पाहिजे. परंतू तसे न करता हे नेते विरोधात पोष्ट करणारा अमुक -अमुक संघटनेचा होता, अमुक-अमुक पक्षाचा होता असा जावाईशोध लावण्याचा व जनतेची दिशाभूल करण्याची  व  वोटबँक सांभाळण्याची सोय करीत असतात. सोशल माध्यमांवर कितीतरी लोक व्यक्त होत असतात त्याकडे नेत्यांनी लक्ष न देता आपल्या कामकाजाकडे लक्ष दिले पाहिजे. मागील काही वर्षात महाराष्ट्राने असे काही नेते अनुभवले आहे की ज्यांच्यावर काही नेटीझन्सनी सोशल मिडीयावर अतिशय हीन पातळीची टीका, टिप्पणी असणा-या पोष्ट केल्या होत्या. परंतू त्या नेत्याने त्यावर व्यक्त होणे टाळून आपल्या कामकाजावर लक्ष दिले. पदावर असतांना मोगलाई प्रमाणे मारठोक करणे हे कितपत योग्य आहे ? लोकप्रतिनिधींनी त्यांच्या वागणूकीचे अवलोकन करणे अत्यंत जरुरी आहे. येन केन प्रकारेण सत्ता मिळवायची , सत्ताकेंद्रीत राजकारण करायचे , सत्ता मिळाल्यावर युं करू , त्युं करू अशा बाता मारायच्या , संविधान , लोकशाही , अहिंसा , समाजसुधारकांचे दाखले द्यायचे आणि जरा कुणी काही बोलले की वरील सर्व बाबींच्या अगदी विरोधी प्रदर्शन करायचे. आज-कालच्या नवीन पिढीतील लोकप्रतिनिधींना राग फार लवकर येतो. कोणी काही बोलले,लिहिले की हे पूर्वीच्या राजकारण्यांप्रमाणे संयमित, संतुलित न राहता क्रोधाने पेटून उठतात. म्हणून शूsss काही बोलू नका विरोधात पोष्ट करू नका मार बसेल बरं ! अशी जाणीवच तर हे लोकप्रतिनिधी करून देत नाहीत ना असे वाटते. तसेच सोशल मिडीयावर व इतरत्र कुठेही लेखन , पोष्ट करणा-यांनी सुद्धा कुणाच्याही बाबतीत 
हीन दर्जाचे, जातीवाचक , देहयष्टीवाचक, वैयक्तिक जीवनाबाबत लेखन न करण्याचा नियम सुद्धा पाळणे जरुरी आहे.

०७/०४/२०२०

Streets seen deserted due to lock down in epidemic of Corona virus, Covid-19

सुनी हो गयी शहर की गलीया

या जगात केंव्हा काय होईल काही सांगता येत नाही. आता काही  महिन्यांपूर्वी जगाचे रहाट गाडगे सुरळीत सुरु होते. व्यवहार , बाजारपेठा , नोकरी धंदे , शाळा , महाविद्यालये सर्व व्यवस्थित होते अगदीच काही रामराज्य होते असे नाही परंतू सर्वत्र खुशाली होती. परंतू विपरीत बुद्धीच्या चिन्यांनी जगाच्या खुशालीत मीठ कालवले. चिन्यांच्या उपद्व्यापामुळे वुहान शहरात निर्मित कोरोना विषाणूने सत्यानाश केला. हा विषाणू जगात पसरला, अनेक लोक मृत्युमुखी पडले , अनेकांची शांती भंग झाली , कित्येक बेचैन झाले , कित्येक जिथे आहे तिथेच अडकून पडले , कित्येक विस्थापित झाले. या विषाणूवर काहीही एक इलाज आजपावेतो तरी नाही म्हणून अवघ्या विश्वात चिंतेचे सावट आहे. यावर एकच उपाय सध्या मानवाच्या हात आहे. तो म्हणजे Social Distance ठेवण्याचा. संसर्गातून हा विषाणू पसरतो म्हणून भारतात गेल्या 24 मार्च पासून 21 दिवसांचे Lock Down केले गेले. सर्वत्र शांतता पसरली. दुकाने बंद , व्यापर उदीम बंद, शाळा , महाविद्यालये बंद , अर्थव्यवस्था ठप्प पडली. सर्वत्र शुकशुकाट झाला. काही तुरळक अपवाद वगळता लोक हा बंद हे Lock Down पाळत आहे. काही ठिकाणी दैनंदिन व्यवहारासाठी खुला वेळ दिला जातो त्यावेळी अनेक लोक Social Distance ठेवतांना दिसत नाही. हे योग्य नाही, आपण सर्वानी आपल्याच हितासाठी हे Social Distancing पाळणे अत्यंत आवश्यक आहे. तरीही संचारबंदीमुळे शहरे निशब्द झाली आहेत. या स्तब्द शहरांत पसरलेल्या शांततेने वन्यजीव शहरात दाखल झाले, ही शहरे हे, रस्ते हे पूर्वी या त्यांचेच तर हक्काचे स्थान होते. परंतू विकासाच्या मागे लागलेल्या मानवाने त्यांचे स्थान हिरावून घेतले. प्रदूषणाच्या पातळीत घट झाली. जालंदर मधून हिमालयाच्या रांगा सुस्पष्ट दिसू लागल्या. कोरोनाच्या संकटाने झालेल्या या Lock Down  मुळे प्रदूषणात घट , स्वच्छ हवा ,परिवारासह सुसंवाद स्थापित झाला अशा काही सकारात्मक बाबी जरी झाल्या असल्या तरी मानव हा समाजशील प्राणी आहे. समाज हा मानवाला एकटेपणा पासून
वाचवण्यासाठीच निर्माण झाला आहे. कोरोनाच्या संकटामुळे मानव आज घरात अडकून पडला आहे. सोशल मिडीया व्यतिरिक्त त्याला समाजात कुठे जाता येत नाही. दिलेल्या वेळात त्याचे समाजात जाणे झाले तरी मनात संशय घेऊन तो जात आहे , कार्यालयात गेला तर हातावर रोगाणूरोधक , विषाणूरोधक (Sanitizer) टाकून स्वागत होते. विषाणू आपल्या शरीरावर येऊ नये या चिंतेखाली जो-तो वावरतो आहे. का आली अशी वेळ या जगतावर ? तर याचे एकमेव कारण म्हणजे मानवी हव्यास इतरांपेक्षा मी श्रेष्ठ, इतरांवर अधिकार,सत्ता गाजवणे या अशा मानवी वृत्तीतून चिन मध्ये हा विषाणू तयार झाला व त्याने अवघ्या विश्वास शांत केले, थांबवले. जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी शहरात जावे तर टपरीवर चहाचे घोट घेत असलेलेले मित्र दिसत नाही, पान ठेल्यावर राजकारण, क्रिकेट, आंतरराष्ट्रीय प्रश्न यांसारख्या मुद्द्यांवर खडाजंगी नाही, विद्यार्थ्यांचे घोळके नाही, खेळांची मैदाने रिकामी, नाटके, परिसंवाद, सभा ,भाषणे ,उत्सव सारे-सारे बंद झाले. लॉक डाऊन केल्यावर दोन-तीन दिवसाने प्रशासनाने सांगितलेल्या वेळेत दुध आणण्यासाठी म्हणून हमरस्त्याने जात होतो, त्यावेळी रस्त्यावर मी एकटाच होतो, एकही गाडी नाही,कर्णकर्कश्श हॉर्न नाही, उन्हाळा असूनही रसवंत्यांच्या मोटारीला लावलेल्या घुंगरांचा आवाज नाही अगदी नीरव शांतता होती. मला सर्व अतिशय भयाण वाटले, खिन्नता वाटली. सर्वत्र असलेली ती स्मशान शांतता, लहानपणापासून ज्या रस्त्यांवर फिरलो त्या नेहमीच्या परिचित अशा वर्दळीच्या रस्त्याला मी प्रथमच असे पाहत होतो.सर्वत्र सुने-सुने झालेले ते वातावरण त्या सुन्या झालेल्या “शहर की गलीया” हे व सर्व विश्वच कोरोना विषाणूच्या संकटातून धडा घेऊन मानवी वर्दळीने पुनश्च उल्हासित होईल, उभारी घेईल व चिनसारख्या उचापती देशांना यातून सद्बुद्धी सुचेल अशी ईश्वराकडे करुणा भाकत मी घरी परतलो.