गोविंदराम सेक्सेरीया मार्गाचे भाग्य उजळले
मा. बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा त्यांच्या भाषणात गडकरींच्या कामाचा वेग पाहून हे आमचे गडकरी नसून रोडकरी आहे असे प्रशंसोद्गार काढले होते. गडकरींच्या कामाचा वेग पाहून माजी पंतप्रधान अटलजींनी सुद्धा त्यांची पाठ थोपटली होती.
खामगावातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा यास सेठ गोविंदराम सेक्सेरीया मार्ग असे नाव होते.अशा नावाची एक जुनाट, पुसटशी पाटी सुद्धा होती. ही पाटी मी स्वतः पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ एका जुन्या पद्धतीच्या भक्कम लोखंडी खांबावर लावलेली पाहिली आहे. (आता इथे न.प.ची दुकाने आहेत) परंतु काळाच्या ओघात पशुवैद्यकीय दवाखान्याच्या जवळील ती पाटी व पाटी लावलेला तो नक्षीदार कलाकुसर असलेला खांब दोन्ही नुतनीकरणाच्या वेळी नामशेष झाले व या रस्त्याला गोविंदराम सेक्सेरिया हे जे नांव होते ते खामगावकरांच्या स्मृतीतून कायमचे पुसले गेले. 1994 ते 1997 या कालावधीत स्थानिक गो.से. महाविद्यालयात शिकत होतो त्यावेळी आम्ही सर्व मित्र कॉलेजमध्ये सायकलने जात असू क्वचित प्रसंगी वाहन नेत असू. क्वचित यासाठी की तेव्हा मध्यमवर्गीयांच्या घरी एक वाहन असे. वडिलांना काम नसले त्या दिवशी व तेही हट्ट केल्यावर मुलांना वाहन चालवायला मिळत असे. मात्र त्या काळातही काही मित्र गाड्यांवर नियमित येणारे असे होते. रस्ता दोन पदरी होता. त्याहीपूर्वी म्हणजे 1960 च्या दशकात हा सिंगल रोड होता आणि कापसाने भरलेल्या असंख्य बैलगाड्या कॉटन सिटी खामगाव मध्ये येत असत असे अनेक जुने जाणते ज्येष्ठ नागरिक सांगतात. त्याही काळात मुले "अकेला हु मै" असे देवानंद प्रमाणे तर मुली "मै चली मै चली" असे सायकलवर गुणगुणत कॉलेजमध्ये जात असत. अगदी पंधरा-वीस वर्षांपूर्वी खामगाव बस स्थानक ते गो.से. महाविद्यालय या रस्त्यावर अतिशय कमी गर्दी असे कारण वाहने कमी होती. अनेक व्यापारी संकुले, शैक्षणिक संस्था, बँका, शोरूम इत्यादी नव्हते, लोकसंख्या वाढली, नवीन संस्था, व्यापार उदीम वाढला. शिक्षण संस्थांच्या बसेस आल्या. सर्वच विद्यार्थ्यांजवळ गाड्या आल्या आणि मग हा रस्ता प्रचंड वर्दळीचा झाला. मग शाळा ऑफिसेसच्या वेळेस प्रचंड गर्दी या रोडवर व्हायला लागली. अनेक लोकांना या गर्दीमुळे क्षती पोहोचली. शहरवासी हा रस्ता रुंद होण्याची आतुरतेने वाट पाहू लागले. अगदी विद्युत महामंडळ कर्मचारी या रस्त्यावरील एखाद्या पथदिव्याचे काम करीत असतांना दिसले किंवा कोणी अतिक्रमणधारक त्याचे दुकान हटवतांना दिसला की रस्ता रुंदीकरणाचे काम तर सुरू झाले नाही असे खामगावकरांना वाटे. इतकी मोठी इच्छा हा रोड रुंद होण्याबाबत खामगावकरांच्या मनात होती. असे म्हणतात की प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ ठरलेली असते. तशी वेळ आली आज या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाचे उद्घाटन आमदार आकाशभाऊ फुंडकर यांच्या माध्यमातून नितीनजी गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री यांच्या हस्ते होत आहे. मा बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा त्यांच्या भाषणात गडकरींच्या कामाचा वेग पाहून हे आमचे गडकरी नसून रोडकरी आहे असे प्रशंसोद्गार काढले होते. PPP (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ) संकल्पना गडकरींचीच. गडकरींच्या कामाचा वेग पाहून माजी पंतप्रधान अटलजींनी सुद्धा त्यांची पाठ थोपटली होती. या रस्त्याचे काम सुद्धा वेगानेच होऊन गावातून जाणारा हा महामार्ग आता दुभाजक, पथदिवे, भुयारी मार्ग तसेच पादचारी पथ या सुविधांनी युक्त असणार आहे. वाढती लोकसंख्या, सहजगत्या उपलब्ध होणारी कर्ज सुविधा आणि त्यामुळे वाहनांची वाढलेली संख्या या सर्व बाबी लक्षात घेता रुंद रस्ते गरजेचे झाले आहेत. रस्ते या शहरांच्या नसा आहेत त्यामुळे प्रशस्त रस्ते हवेतच परंतु या रस्त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी जितकी शासनाची आहे तितकीच प्रत्येक नागरिकांची सुद्धा आहे. या प्रशस्त रस्त्यावर वेग मर्यादेचे पालन करून शिस्तीने वाहने चालवली तर अपघात टाळता येऊ शकतील आणि मग हा रस्ता "एक रास्ता है जिंदगी" या प्रमाणे रस्ता हा नवजीवन देणारा ठरू शकतो व तसाच खामगांवातून जाणारा हा रस्ता जिल्ह्यात विकास घडविणारा ठरेल.