....आणि ते दिसू लागले
गेल्या १५ ते २० दिवसांपासून म्हणा किंवा नगर
परिषद निवडणुका जाहीर झाल्यानंतर म्हणा काही ना काही चहल पहल सुरू झालेली आढळून
आली.अनेक ठिकाणी नळांसाठी रस्त्यांवर खोदलेल्या नाल्यांची डागडुजी केल्यागेली, ती
दोनच दिवसांत पुन्हा जैसे थे झाली तो भाग वेगळा. काही भागात तुंबलेल्या नाल्या
मोकळ्या केल्या गेल्या, तर काही भागात सुशिक्षितांनी रस्त्यावर, ‘ओपन स्पेस ‘
मध्ये सोडलेल्या सांडपाण्याची योग्य यवस्था करण्यात आली. वास्तविक पाहता ही सर्व रखडलेली
कामे संबंधितांच्या कार्यकाळात होणे अपेक्षित असते परंतू ही कामे केली जातात ऐन
कार्यकाळ संपुष्टात येणाच्या दिवासांत. हे म्हणजे असे झाले की ज्या प्रमाणे
एखाद्या ढप्पू विद्यार्थ्याचा अभ्यास सुरु होतो तो ऐन परीक्षा सुरू होण्याच्या दोन
दिवस अगोदर शाळा कालावधीत तो विद्यार्थी उनाडक्या करीत असतो आणि ऐनवेळी केलेल्या अभ्यासामुळे
त्याच्या याशप्राप्ततेची शाश्वती नसते. तसेच एकदा का कोणतेही पद मिळाले की बरेचेसे
लोक मोकळे होवून जातात. त्याना ज्या
कार्यासाठी ज्या जनतेने निवडले असते त्या जनतेला ते नंतर दिसत सुद्धा नाही किंवा यतकदाचित
रस्त्यात कुठे नजरा नजर झाली तर नमस्कार तर सोडाच साधे ‘स्माईल’ सुद्धा देत नाही.
अर्थात याला काही सन्मानीय अपवाद सुद्धा आहेत. परंतू ते संख्येत अतिशय अल्प.
उमेदवारीच्या काळात लोकाना भेटायचे, लक्ष असू द्या म्हणायचे, प्रणाम करायचे आणि
एकदा का पद मिळाले की मग दोन बोके आणि एक माकड यांच्या गोष्टीतील माकड जसा
हुशारीने खव्याचा वाटा खात राहते आणि बोके बिचारे तळमळतच राहतात त्याप्रमाणे ठेकेदारीतून
कसा वाटा मिळवता येईल याच्याच शोधात राहायचे आणि जनतेला तळमळतच ठेवायचे हेच वर्षानुवर्षे
सुरु आहे.कार्यकाळ संपत आला की पुन्हा थोडेफार कार्य करीत आहोत असे प्रदर्शित
करायचे. आज सर्वच छोटी शहरे बकाल झालेली आहेत खामगावात पूर्वी यशवंत टॉवर अर्थात
भारत रत्न राजीव गांधी उद्यान, नटराज गार्डन, जनुना तलाव अशी उद्याने मोठ्या
दिमाखात आपले सौंदर्य दाखवीत होती आज नटराज गार्डन वगळता उर्वरीत दोन उद्यानांची
दशा बघवत नाही. नळाचे कनेक्शन आले परंतू पाणी नाही पाण्याआधी पाणीपट॒टीचे देयक
येवून धडकले. सियाराम चौक ते लायन्स ज्ञानपीठ किंवा सावजी ले-आउट कडे जाणारा रस्ता
वर्षानुवर्षे खराबच असतो. रायगड कॉलनीतून घाटपुरीकडे जाणारा रस्ता एक ते दीड
वर्षातच पुन्हा खराब होत आहे. शहरात जवळपास वीस हून अधिक जुन्या पक्क्या
पाण्याच्या विहिरी आहेत त्या निव्वळ कचरा कुंड्या झाल्या आहेत.अशा नानाविध समस्या
आहेत परंतू निर्वाचितांचे काहीही एक लक्ष याकडे नाही. शहर आपले आहे ते सुंदर दिसले
पाहेजे, आपल्याला जनतेने त्याच कार्यासाठी प्रतिनिधित्व दिले आहे ही भावना सुद्धा
यांच्या ध्यानी मनी नसते. कार्य करीत नसतील तर परत बोलावण्याच्या अधिकार आपल्या
देशातील जनतेला नाही आहे ना म्हणून हे लोक निश्चिंत असतात. सत्ते साठी भ्रष्ट युती
करायच्या, स्वजनांना डावलून कोलांटी उड्या
मारणा-यांना पुढे आणायचे विकासभिमूख मात्र काहीही नाही.पाच वर्षातून एकदा ताई, माई
आक्का झाले पद प्राप्ती झाली की हे मोकळे आणि मग ते जनतेला पुन्हा पाच वर्षानंतर
दिसू लागतात जसे आता ते दिसू लागले आहेत.
विनय
वरणगांवकर