मोबाईलचा वापर आणि मुलांची काळजी
मोबाईलचे आगमन झाले
तेंव्हा बोलण्याचे दर आणि मोबाईलची किंमत दोन्ही मध्यमवर्गीयास परवडेल अशा
नव्हत्या. हळू हळू या क्षेत्रात क्रांती झाली. सर्व सामान्य जनते जवळ सुद्धा मोबाईल
आले. “अँन्ड्रॉइड” मोबाईल आल्यापासून तर मोबाईल धारकांचे प्रमाण फारच वाढले. घरातील
प्रत्येका जवळ मोबाईल आला. लहान मुले सुद्धा मोबाईल सराईतपणे वापरू लागली. अभिमन्यू
जसा गर्भातच चक्रव्युहात प्रवेश करणे जाणला होता तसेच आताच्या बालकांवर मोबाईलचे
गर्भसंस्कारच झाले आहेत असे म्हणायला हरकत नाही. कारण या मुलांची आई त्यांची
अपत्ये गर्भात असतांना मोबाईल हाताळत होती. या बालकांच्या मोबाईल हाताळण्याचे त्यांच्या
पालकांना फार कौतुक असते “आमचा बाब्या मोबाईल मध्ये सर्व काही करतो” अशा स्वरूपाची
वर्णने आपण ऐकतच असतो. माझ्या मते ज्या ज्या काळात जी जी “गॅजेट्स” अवतरली त्या
त्या काळातील बाल्यावस्थेतील पिढीला ती “गॅजेट्स” हाताळणे त्यांच्यापेक्षा
वडीलधा-यांपेक्षा जास्त चांगले जमत असते. उदाहरण
म्हणजे “टेप रेकॉर्डर” , “व्हिसीआर” जेंव्हा अवतरले होते तेंव्हा त्या काळातील
मुले ती हाताळणे त्वरीत शिकले होते. त्यामुळे कुणी लहान मुलगा एखादे “गॅजेट”
उत्कृष्टरित्या हाताळतो याचे फार कौतुक नसावे असे वाटते. जिथे जी उपलब्ध साधने
असतात तेथील मुले ती साधने सहजरित्या हाताळणे शिकतात म्हणजे खेड्यातील लहान मुलगा
बैलगाडी सहज हाकतो, प्रिंटींग प्रेस मधील लहान मुले ऑफसेट मशीन हाताळतात. मेडिकल
दुकानांवरील जास्त शिक्षण न झालेली मुले तेथील संगणक व त्यावरील प्रणाली सहज व जलद
गतीने हाताळतात. मोटार दुरुस्तीच्या दुकानावर काम करणारा एखादा लहान मुलगा सर्व
प्रकारच्या गाड्या चालवू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या घरातील भ्रमणध्वनी आपली मुले
सहज हाताळू शकतात त्यामुळे त्याचे फार अप्रूप किंवा कौतुक नसावे. आता मोबाईल
वापरतात म्हणजे त्यावर काय करतात? हा एक मुद्दा उपस्थित होतो. तर गेम खेळणे, व्हॉटस ऍप, फेसबुक यावर वेळ घालवणे याचेच प्रमाण अधिक असते. काही ठिकाणी तर अतिरेक असतो,
अनेकांना त्यांची मुले किती वेळ मोबाईलवर वेळ व्यतीत करतात याची माहिती नसते. मोबाईल
हे आजच्या काळातील उपयुक्त असे कम्युनिकेशन साधन” आहे परंतू त्याचे घातक परिणाम
सुद्धा मनावर आणि शरीरावर होत असतात. आपल्याला त्याचा वापर करणे अपरिहार्य झाले
आहे व सोबतच मुलांची काळजी सुद्धा घेणे आहे. जपान मध्ये मुलांनी मोबाईल पासून दूर
कसे रहावे याचे म्हणे क्लासेस घेतले जातात. सतत मोबाईल घेऊन बसल्याने वेळेचे, भुकेचे
भान रहात नाही त्यांनी शरीरावर परिणाम होतो, एकलकोंडेपणा वाढतो, सर्वांमध्ये
असूनही संवाद मात्र कमी असतो, विस्मरण सुद्धा वाढते आणि इतरही अनेक परिणाम होतात. एक
मुलगा रात्रभर संगणकावर “प्रोजेक्ट” करतो असे सांगून संगणकावर काम करीत बसे इंटरनेट
मुळे त्याला संगणकाचे व्यसनच जडले तो तहानभूक, इतर शरीरधर्म विसरून जात असे. एकदा त्याच्या पालकांनी
रात्री त्यास पाहिले तर तो खुर्चीवर बसल्या- बसल्याच झोपी गेला होता आणि त्याला
तेथेच लघुशंका झाली होती. आज तो एका मानसोपचारतज्ञाचे उपचार घेत आहे. पालक बंधुंनो तुम्ही खुशाल तुमच्या मुलाला मोबाईल वापरण्यास
द्या परंतू त्याच्या मोबाईल वापरण्यावर काही बंधने घाला. लक्ष ठेवा. आज-कालच्या
मुलांमध्ये सहनशीलता कमी असते त्यामुळे मुल बिथरणार नाही याची सुद्धा काळजी घ्या.
त्याला एखादा खेळ किंवा संगीत शिकवा. मोबाईलमुळे काय परिणाम होतात हे सांगणारी अनेक
संकेतस्थळे इंटरनेट वर उपलब्ध आहे त्याचे अवलोकन करा. आपला पाल्य “टेक्नो सॅव्ही”
असावा असे सर्वांनाच वाटते पण तो “टेक्नो सॅव्ही” होण्याऐवजी “टेक्नो एडीक्ट” तर होत नाही आहे ना याचे भान
ठेवा.