तलाक च्या निमित्ताने “निकाह” ची आठवण
गेल्या काही
महिन्यांपासून ‘तलाक’ हा विषय चर्चिल्या जात आहे. मुस्लिम समाजात ‘तलाक’ हा शब्द
तीन वेळा उच्चारल्यास पती आपल्या पत्नीस विभक्त करू शकतो, घटस्फोट देऊ शकतो.
मुस्लिम महिला आता या प्रथे विरोधात जागृत झाल्या आहेत आणि जाहीररित्या भाष्य करीत
आहेत. मुस्लिम कायद्यानुसार या पद्धतीने तलाक दिला जातो आणि ते योग्य आहे असे
मानणारे सुद्धा अनेक लोक मुस्लिम समाजात आहेत. तलाक बाबत आता खुल्या चर्चा होत
आहेत परंतू अनेक वर्षांपूर्वी हा विषय चित्रपटाद्वारे समाजा समोर आणला तो सामाजिक भान ठेवून चित्रपट
निर्माण करणा-या बी.आर.चोप्रा यांनी.चोप्रा यांच्या इतर चित्रपटांची चर्चा येथे
केल्यास या लेखाची लांबी फार मोठी होईल. बी.आर.फिल्म्सचे सर्वच चित्रपट सामाजिक
जाणीव असलेले आणि अर्थपूर्ण होते. निकाह हा सन 1982 मध्ये आलेला चित्रपट त्यापैकीच
एक. या चित्रपटात एका मुस्लीम तरुणीची तलाक मुळे होणारी व्यथा दिग्दर्शकाने मोठ्या
खुबीने चित्रित केली आहे. सलमा आगा या अभिनेत्रीने या मुस्लीम तरुणीची भूमिका
वठवली होती. "दिलके आरमाँ आसूओमे बह गये" हे गाजलेले गीत आणि रवी व गुलाम अली यांचे संगीत ही सुद्धा या चित्रपटाची वैशिष्ट्ये होती. या तरुणीचा “निकाह” एका शीघ्रकोपी आणि कामाचा फार व्याप असणा-या नबाबाशी
होतो. एका क्षणिक रागाच्या प्रसंगात “तलाक तलाक तलाक “ असे नवाब तिला म्हणतो ती
उध्वस्त होते. तिचा पुनर्विवाह होतो परंतू या नवीन पतीला तिच्या आधीच्या विवाहा
संबंधी माहिती होते आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती तिच्याशी पुनश्च एकत्र होऊ इच्छितो
हे समजते. मग काय त्या पहिल्या पतीसाठी हा दुसरा पती पुन्हा तिला तलाक देण्याच्या
तयारीत असतो. तिचा एखाद्या वस्तू प्रमाणे वापर करीत असल्याबद्दल ती दोघानाही
खडसावते आणि दुस-या पती सोबतच राहण्याचा निश्चय प्रकट करते. आज 2017 मध्ये “तलाक”
च्या बाबतीत उहापोह सुरु आहे परंतू 1982 मध्येच बी.आर.चोप्रा यांनी काळाच्या पुढे
असणारा हा चित्रपट निर्माण केला होता. त्यांनी सुरुवातीला या चित्रपटाचे नामकरण “तलाक
तलाक तलाक “ हेच ठरवले होते परंतू काही वाद किंवा विरोध होऊ नये म्हणून “निकाह” हे
नामकरण करण्यात आले. आज “तलाक” मुळे अनेक मुस्लिम भागीनींवर आकस्मिक संकट ओढवले
जाते. अनेक पुरुषांनी या प्रथेचा गैरवापर अनेकदा केला आहे. कुणी फोनवर , कुणी
मनातल्या मनात तीन वेळा तलाक म्हणून तलाक दिला आहे, चहाचा कप हातातून सटकल्याच्या
कारणाहून सुद्धा तलाक दिल्याचे उदाहरण आहे. तर एकाने चक्क कोर्टात तलाक देऊन
पोबारा केला आहे. शिया पर्सनल लों बोर्डाने तिहेरी तलाक बंदीचे समर्थन केले आहे.
आता सुप्रीम कोर्टात या बाबतच्या सुनावणीला गती मिळाली आहे.शायरा बानो, नूरजहां नियाज, आफरीन रहमान, फरहा फैज आणि इशरत जहाँ या महिलांनी तीन तलाक प्रथा बंद
करण्यासाठी याचिका दाखल केली होती.मुस्लीम पर्सनल लों बोर्डचा याला विरोध आहे. महिला मग ती कोणत्याही समाजातील असो
तिच्यावर अन्याय होऊ नये. सर्वांचे “निकाह” कायम राहोत. सुप्रीम कोर्टातील या
प्रकरणाचा काय निकाल लागतो त्याकडे मुस्लीम समाजातील तलाक पिडीत महिला
तसेच भारतातील सर्व सुजाण आणि महिला हित पाहणा-यांचे लक्ष लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा