"राम”के भक्त “रहीम”के बंदे.....
एखादी घटना घडली की
लोक त्याबाबतची भाष्ये, मते इ. आज कालच्या तंत्रसमृद्ध तसेच विविध दळण-वळण
साधनांनी परिपूर्ण असलेल्या काळात त्वरीत व्यक्त होतात. त्यामुळे
वृत्तपत्रात सदर लिहिणा-याला त्याच विषयावर लिहिणे कठीण होते किंवा लेखन पुनरावृत्ती होण्याची शक्यता असते. तसेच माध्यम समृद्धीमुळे विषय लवकर “शिळा” होत असल्याने वाचक वाचतील की नाही
याचा सुद्धा विचार लेखकाला करावा लागतो. आजचा गुरमीत राम रहीम बाबा हा तसाच एक विषय. या ढोंगी बाबावर न्यायालयाने बलात्काराबाबत 25 ऑगष्ट रोजी दोषी
ठरवले तसेच २८ रोजी त्याला १५ वर्षानंतर
१० वर्षाची शिक्षा व काही लाख रु दंड ठोठावला. १५ वर्षानंतर होणारी हि शिक्षा असल्याने
सौम्यच म्हणावी लागेल.25 ला आरोपी बाबा राम रहीमच्या समर्थकांनी म्हणा का भाडोत्री गुंडांनी म्हणा जो
हिंसाचार केला तो पहावा लागणे हे आपणा सर्व भारतीयांचे दुर्दैवच आहे. या हिंसाचारात 38 लोक ठार झाले. एखाद्या
आरोपीच्या समर्थनार्थ निघणा-या या जमावावर सुद्धा देशद्रोहाचे गुन्हे का नोंदवू
नयेत? मुळात आसाराम. रामवृक्ष, रामपाल, राधे माँ आणि आता राम रहीम सारखे बाबा
“पनपतातच” कसे ? याचे कारण सर्व पक्षातील लोकप्रतिनिधी हेच आहेत आणि त्यानंतर
भारतातील दुधखुळी जनता आहे. अक्कल गहाण ठेवून जनता यांच्या मागे इतकी वेडी कशीच
काय होते? की या वेडेपणाला लैगिकता किंवा पैस्यांची किनार आहे? बाबाच जर अश्लील
चाळे करीत असेल तर त्याचे समर्थक सुद्धा तसेच असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे बाबा लोक स्वत:चे प्रस्थ एवढे वाढवतात की राजकारणी सुद्धा मतांच्या भिक्षेसाठी यांच्या पायाशी लोळण घेतात आणि येथूनच सुरुवात होते यांच्या
स्वत:च्या समांतर सत्ता स्थापनेची. मग हजारो एकरांची जमीन यांना विनासायास मिळते, हे स्वत:च्या अग्निशमन गाड्या. स्वत:चे प्लास्टिक चलन, थिएटर , मॉल बनवतात , थिल्लर गाणी रचतात,
गातात आणि चित्रपटात सुद्धा अभिनय करतात , चित्रपट निर्माण करतात. इतर क्षेत्रात
आपले जाचक नियम अटी लादणारे शासन या बाबा लोकांवर आणि त्यांच्या आश्रमांवर का नाही
निर्बंध लादत? शासन सर्वात जास्त टपले असते पापभिरू शाळा कर्मचा-यांवर.कधी शाळा कर्मचा-यांवर शिक्षण हक्क कायदा तर कधी “अतिरिक्त” ची गदा , कधी पट पडताळणीची
भीती तर कधी संच मान्यतेची टांगती तलवार, कधी 2005 नंतर लागलेल्या कर्मचा-यांना
भीती तर कधी सेवानिवृत्त्ती वेतन मिळेल की नाही याची भीती. शिक्षण क्षेत्रातील
कर्मचारी आणि इतर सामान्य यांना कायदाच्या बडगा उगारून सतत दडपणाखाली ठेवले जाते. अशी भीती या अनैतिक कृत्ये करणा-या बाबा आणि त्यांच्या
आश्रमांना कधी दाखवली जाईल? की बाबा आणि त्यांच्या आश्रमांना कायद्याचा धाक दाखवण्याची
हिम्मत सरकारमध्ये नाही? कुणीही येतो बाबा बनतो करोडोची माया जमवतो, अवैध शस्त्रे
बाळगतो, स्वत:ची सेना काय बनवतो आणि हे सर्व होईतो शासन आणि आपली गुप्तचर यंत्रणा
काय झोपा काढ़ते? असे प्रकार घडतात तेंव्हा या नाकर्त्या राजकारण्यांना आणि शासकीय
कायदा व सुव्यवस्था राखणा-या व त्यांच्या गुप्तचर यंत्रणांना लाज वाटली पाहीजे.हे
बाबा नंतर स्वत:च्या बचावासाठी कोर्टापुढे आपल्या नपुंसकतेच्या शिखंडीला उभे करतात.निदान तेंव्हा तरी यांच्या भक्तांच्या व समर्थकांना
आपण असल्या नपुंसकाच्या मागे लागल्याचा पश्चाताप वाटला पाहीजे तर उलट हे नालायक,
नतद्रष्ट बाबा समर्थक हिंसाचार करतात. सर्जिकल स्ट्राइक , नोटाबंदी
असे ठोस निर्णय घेणा-या मोदींनी आता संपूर्ण देशातील या तथाकथीत बाबा आणि
त्यांच्या आश्रमांवर व त्यांच्या समर्थकांवर कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची
जनतेची अपेक्षा आहे. 50 वर्षांपुर्वी कवी प्रदीप यांनी “देख तेरे संसार की हालत
क्या हो गयी भगवान” या गाण्यात “ “राम”के भक्त “रहीम”के बंदे रचते आज फरेब के
फंदे” अशी ओळ लिहिली होती ती या गुरुमीत राम रहीम बाबानी खरी करून दाखवली.