‘आनंद’दायी देव
...त्याची “एनर्जी”, त्याची ती सतत कार्यमग्न राहण्याची वृत्ती, यश-अपयश याचा विचार न करता आपल्या कार्यात मग्न राहण्याची शैली, नावातील “आनंद” जीवनात सुद्धा मानण्याची “....फिक्र को धुंएमे उडाता चला गया”
अशी चिंता, तणावापासून मुक्त जीवन जगण्याची आवड, अशी जगण्याची त-हा कुठेतरी प्रेरणादायी ठरेल असे वाटले आणि लेखासाठी “देव आनंद” हाच विषय नक्की केला..
तसा तर तो सांप्रत
पिढीच्या आधीच्या पिढीचाही जन्म झाला नव्हता त्या काळातील नायक. परंतू त्याची जादू अगदी काल-परवा पर्यंत कायम
होती. त्याच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्याच्यावर प्रचंड लिखाण अनेकांनी केले आहे. आता
अजून काय लिहिणार? परंतू 26 ता. चे दिनविशेष वाचतांना 26 सप्टेंबर या दिवशी त्याचा जन्म
झाला होता हे निदर्शनास आले. त्याचे अनेक चित्रपट दूरदर्शनवर पाहण्यात आले होते
कारण त्यावेळी दुस-या वाहिन्यांचा पर्याय नव्हता. माझ्या लहानपणी टॉकिज मध्ये जुने
चित्रपट पुन्हा झळकत असत त्यामुळे काही चित्रपट टॉकिज मध्ये सुद्धा पाहिले होते. त्याचे
चित्रपट, गाणी पाहिल्याने तो आवडता नट कधी झाला कळले नाही. नातेवाईक मित्रमंडळी
यांच्यात सुद्धा अनेकजण त्याचे चाहते आहेतच. 26 सप्टे हा त्याचा जन्म दिवस होता हे
वाचनात आल्याने त्याचे काही चित्रपट आणि गाणी स्मरणात आली आणि मग त्याच्याविषयी
काहीतरी लिहिण्यास बोटे सळसळ करू लागली. सदाबहार देव विषयी लिहिले तर आपल्याला आणि
वाचकांना सुद्धा त्याची “एनर्जी”, त्याची ती सतत कार्यमग्न राहण्याची वृत्ती, यश-अपयश
याचा विचार न करता आपल्या कार्यात मग्न राहण्याची शैली, नावातील “आनंद” जीवनात
सुद्धा मानण्याची “....फिक्र को धुंएमे उडाता चला गया”
अशी चिंता, तणावापासून
मुक्त जीवन जगण्याची आवड, अशी जगण्याची त-हा कुठेतरी प्रेरणादायी ठरेल असे वाटले आणि
लेखासाठी “देव आनंद” हाच विषय नक्की केला. संगणकाच्या पडद्यावर अक्षरे त्वरीत उमटू
लागली. कीबोर्ड ची बटने “टक टक टक”,” टिक टिक टिक” करायला लागली आणि पडद्यावरील
वर्डप्रोसेसरच्या ओळी एका पाठोपाठ एक वाढू लागल्या. देव हा विषय मांडायला एक पान
पुरेसे आहे काय? 1946 पासून तर 2011 पर्यंतची कृष्ण-धवल पासून तर रंगीत पर्यंत
अशी प्रदीर्घ कारकीर्द, अनेक चित्रपट, अनेक तारका ,सुरैय्या, पत्नी कल्पना कार्तिक, समव्यवसायिक
बंधूव्दय चेतन आणि विजय, शैलेन्द्र, संगीतकार बर्मन पिता पुत्र आणि कितीतरी सहकारी ज्यांना देवविषयी लिहितांना विसरून कसे चालेल?
देवची गाणी म्हणजे तर स्वतंत्र लेखच नव्हे तर पुस्तकाचा विषय आहे. देव विषयी
बोलतांना त्याचा “गाईड” हा सिनेमा हमखास आठवतोच पाऊस पडावा म्हणून गावक-यांसाठी उपवास
धरून आपले प्राण पणाला लावणारा “बाबा“ पूर्वाश्रमीचा राजू गाईड दर्शकांच्या
डोळ्यात पाणी आणतो. देवचे जवळपास 90 टक्के चित्रपट हे “सस्पेन्स थ्रिलर” या
पठडीतले परंतू तरीही सर्वांत काही ना काही वेगळेपण. मग ते 1950 च्या दशकातील
जाल, बाजी 60 च्या दशकातील “ज्वेलथीफ” , 70 च्या दशकातील “जॉनी मेरा नाम” असो की 1990
च्या दशकातील “रिटर्न ऑफ ज्वेलथीफ” असो सर्वानी रसिकांचे भरभरून मनोरंजन केले. त्याच्यावर
क्वचितच भावूक प्रसंग किंवा प्रसंगातील गीते चित्रित झाली. “देव आनंद म्हणजे केवळ
चॉकलेट हिरो अभिनय मात्र काही नाही” असे समिक्षक म्हणत परंतू “चल री सजनी अब क्या
सोचे” या गीतात देवसाबनी दु:खी भाव किती छान प्रकट केले आहेत. गाईड, हम दोनो आणि
इतरही अनेक चित्रपटातून देवने त्याच्या अभिनयाच्या छटा सिद्ध केल्या आहेत. देव
आणि किशोर कुमार हे समीकरण जुळायच्या आधी रफी आणि देव यांची श्रवणीय व एका पेक्षा
एक सरस अशी गाणी येऊन गेली की जी आजही आवडीने ऐकली जातात. कुतुबमिनार मध्ये “दिल
का भंवर करे पुकार” असे रफीच्या आवाजात तो आपल्या हृदयाची साद घालतो, तेरे घर के
सामने मधील इंजिनियर देव आपल्या प्रेमिकेच्या शोधात रफीच्या आवाजात “तू कहॉं ये बता”
म्हणतो तेंव्हा ते पहाणे आणि ऐकणे दर्शकांना आजही सुखद वाटते, गाईड मधील “दिन ढल
जाये” मध्ये रफी आणि देव आपल्या गायनाने व अभिनयाने मंत्रमुग्ध करतात. “देखनेमे
भोला है दिल का सलोना” अशा आनंददायी देवला जाऊन 6 वर्षे झाली. फेसबुकवर हजारोची संख्या
असलेले त्याच्या चाहत्यांचे गृप आजही त्याची मोहिनी कायम असल्याचे प्रतीत करतात.