तिलोत्तमा आणि सुंदोपसुंदी
दोन गटातील अंतर्गत
वाद किंवा कलह असल्यास “सुंदोपसुंदी” हा शब्द वापरला जातो. अनेक वेळा हा शब्द
वृत्तपत्रातून वाचनात आलेला आहे. राजकीय पक्षांतील अंतर्गत वादाबाबत किंवा संयुक्त
सरकार असेल तर दोन पक्षातील वादाबाबत हा शब्द हमखास वापरला जातो. बातमी किंवा हा शब्द
असलेले वाक्य वाचले की सुंदोपसुंदीचा अर्थ सर्वांच्या लक्षात आला येतो परन्तू हा शब्द कसा उत्पन्न झाला असावा
? हे काही ठाऊक नव्हते. येशू ख्रिस्ताने
“शोधा म्हणजे सापडेल” असे म्हटले आहे. त्यामुळे “सुंदोपसुंदी” शब्दाच्या उत्पतीचा
शोध सुरुच होता. अशातच तिलोत्तमाची कथा वाचनात आली त्यात “सुंद” आणि “उपसुंद” या
असूरांबाबतचा उल्लेख होता आणि त्यावरूनच “सुंदोपसुंदी” या शब्दाची उत्पती झाली असावी हे शेवटी सापडलेच.आताच्या मराठी भाषेच्या
स्थितीनुसार “सुंदोपसुंदी” हा शब्द व त्याचा अर्थ सांगणे आवश्यक वाटले कारण
नवीन इंग्रजाळलेल्या पिढीस सुंदोपसुंदी शब्द क्वचितच माहीत असावा. त्यांना अजून “बासुंदी”
शब्द ठाऊक आहे हे तरी निदान आपले आणि मराठी भाषेचे नशीब समजावे इतकी मराठी भाषेची सद्यस्थिती
दयनीय आहे. मराठी भाषेनुसार या दोन असुर बंधूंच्या नावांची संधी केल्यास सुंद +
उपसुंद =सुंदोपसुंद अशी होईल. अशाप्रकारे “सुंदोपसुंदी” या शब्दाच्या उत्पतीचा संबध थेट महाभारता पर्यन्त जाउन पोहोचला .तशा रामायण,महाभारत व इतर पौराणिक कथा आता अनेकांना भाकडकथा वाटत असल्या तरी
त्यातून काही ना काही बोध हमखास मिळतोच.शिवाय भाषणात किंवा लेखनात दाखल्यासाठी
म्हणून तरी निश्चितच त्याचा उपयोग करता येऊ शकतो. म्हणून सुंदोपसुंद या शब्दासाठी सुंद आणि उपसुंद
हे शब्द असलेली ही पौराणिक कथा सांगणे क्रमप्राप्त आहे. महाभारतात एकाच स्त्री सोबत पाच माणसे
विवाह करतील तर कलह होइल असा सल्ला देताना नारद मुनी पांडवांना “सुंद” आणि
“उपसुंद” या असुरांची कथा सांगतात. या कथेत “सुंद” आणि “उपसुंद” हे सर्वच गोष्टी वाटून घेणारे दोघे असुर बंधू असतात. ते दोघे ब्रह्मदेवास अमरत्वाचे वरदान मागतात परन्तू तसे न करता ब्रह्मदेव
त्यांना “तुम्ही दोघेच जेंव्हा
एकमेकांना माराल तेंव्हाच तुम्ही मराल” असा वर देतात. मग काय हे दोघेही प्रचंड धुमाकुळ घालतात आणि देवांना सुद्धा
जेरीस आणतात. देव पराजित होतील अशी स्थिती येते. मग या दोघांमध्ये भांडण लावून
आपला पराजय टाळण्यासाठी ब्रह्मदेव विश्वकर्मास एका सुंदर अप्सरेचे निर्माण करण्यास
सांगतात त्यानुसार तेंव्हा अलौकीक सौंदर्यमती तिलोत्तमा ही अप्सरा अवतरते. तिलोत्तमा इतकी रूपसंपन्न असते की तिचे रूप
न्याहाळण्यासाठी इंद्राच्या शरीरावर सहस्त्र नेत्र निर्माण झाले होते अशी
आख्यायिका आहे तर इंद्राच्या शरीरावर ते नेत्र गौतम ऋषींच्या शापामुळे निर्माण
झाले असल्याची दुसरी कथा सुद्धा आहे. तिलोत्तमेने जेंव्हा भोळ्या शंकराला
आदरपूर्वक प्रदक्षिणा घातली तेंव्हा शंकराला आजू-बाजूने दोन आणि मागे एक अशी तोंडे
निर्माण झाली होती. तिलोत्तमा मग सुंद आणि उपसुंद यांच्या प्रदेशात दाखल होते
तेंव्हा एका नदीकाठी सुंद आणि उपसुंद बंधू बसलेले असतात त्यांना रूपवान तिलोत्तमा फुले तोडतांना
दृष्टीस पडते दोघेही तिच्या रूपावर मोहित होतात. दोघानांही तिच्या सोबत विवाह
करण्याची इच्छा निर्माण होते आणि याच कारणामुळे त्यांच्यात मोठा वाद उत्पन्न होतो आणि
वाद विकोपाला पोहोचतो दोघांचेही तुंबळ युद्ध होते. सुंद आणि उपसुंद असुर एकमेकांकरवी
मारले जातात हीच ती पहिली “सुंदोपसुंदी” होते आणि तिलोत्तमा देवांचा पराजय टाळते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा