देशातील समस्या निराकरणासाठी व्हावेत प्रार्थना,उपवास
ज्या प्रमाणे विविध दिशांनी
येणा-या नद्या शेवटी सागरास मिळत असतात त्याचप्रमाणे विविध धर्मातील लोकांच्या
पूजा, अर्चना, प्रार्थना, उपवास हे सर्व एकाच ईश्वराकडे पोहोचत असतात. नाना
प्रकारचे धर्म, पंथ, जाती असल्या तरी ईश्वर सर्वांचा एकच आहे असे मानले जाते. सर्वच
धर्मातील संत महात्मे,साधू यांनी हेच सांगून ठेवले आहे. ईश्वरा पर्यंत
पोहोचायचे असेल तर त्याचे मार्ग सुद्धा सर्वच धर्मात कमी अधिक प्रमाणात सारखेच आहेत. ते मार्ग
म्हणजे शुद्ध आचरण, सत्य, अहिंसा, नैतिकता, प्रार्थना, उपवास प्राणी मात्रांवर
दया, इतर धर्मियांविषयी सहिष्णूता हे होत. या सर्व गोष्टींचे ज्ञान सर्वच धर्मातील
धर्मगुरू जन सामान्यांना देत असतात. वर्षानुवर्षे हीच परंपरा सुरु आहे. काळ बदलला
विज्ञान तंत्रज्ञान आले तरी धर्मगुरू, संत, साधू, फकीर यांचे महत्व ते कायम राखून
आहेत. राजेशाहीच्या काळात धर्म हा राजकारणात ढवळाढवळ करीत नव्हता, त्यास राजाश्रय असे
, राजे तत्कालीन धर्मगुरू ,संत , संन्यासी, फकीर यांचे सल्ले घेत असत. परंतू
धर्मगुरू,संत,संन्यासीं,फकीर हे कधी सत्ता बदल करण्यासाठी प्रार्थना, उपवास
करण्यास आपल्या शिष्यांना वा सहका-यांना
किंवा जनतेला आवाहन करीत नसत. अगदी फारच हिंसक परकीय , जुलुमी राजे असतील तर अशा
प्रकारच्या प्रार्थना क्वचित प्रसंगी होतही असतील. परंतू तेंव्हा माध्यमे फोफावली
नव्हती त्यामुळे राज्यातील सर्व प्रजेला अशा प्रकारची माहिती सुद्धा होत नसे. कालपरत्वे
राजेशाही संपुष्टात आली लोकशाही आली आणि लोकशाहीत सर्वच पक्ष सत्ताप्राप्तीसाठी
धर्माचा आधार प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरित्या घेऊ लागले. लोकशाही मध्ये वोट बँक
राजकारणामुळे धर्मसंस्था व राजकीय पक्ष दोघेही आपापल्या पात्रात बरोबर तूप ओढू
लागले. परदेशातून सर्रास फंडिंग मिळवणे सुरु झाले , अनुदाने मिळू लागली. पूर्वी अकबरासारखे
राजे यात्रेकरूंवर कर लावत होते तर लोकशाहीत यात्रेकरूंना अनुदानाची खैरात वाटणे
सुरु झाले. लोकशाहीत धर्मसंस्थांना अनुकूल सत्ताधारी असतील तर सर्व सुरळीत सुरु
असते जरा कुठे देशहितासाठी काही निर्बंध आले की त्वरीत लोकशाही धोक्यात,अराजकता,राजकीय
अशांतता, धर्मनिरपेक्षता धोक्यात असल्याची भाषा बोलली जाते. ही भाषा बोलण्याची वेळ
सुद्धा नेमकी निवडणुका उंबरठ्यावर आल्या की सुरु होते. प्रार्थना, उपवासाचे आवाहन हे
जनतेच्या कल्याणासाठी, दहशतवाद थांबण्यासाठी, नक्षलवाद कमी होण्यासाठी , युद्धजन्य
स्थिती नष्ट होण्यासाठी जगात शांतता नांदण्यासाठी, आपल्या देशातीला सर्व समस्या
निराकरणासाठी केले असते तर ते जास्त संयुक्तिक वाटले असते. जगातील गरीबी, विषमता,
कुपोषण यांसारखे संकटे थांबण्यासाठी केले असते तर जनतेला असे आवाहन अधिक
परिणामकारक वाटले असते व त्यांचा धर्मसंस्थेवरचा विश्वास अधिक वाढला असता. सतत
भारतात लोकशाही धोक्यात , धर्मनिरपेक्षता धोक्यात असे बोलल्याने , तशी पत्रके
काढल्याने जागतिक पातळीवर आपल्या देशाचे नांव खराब होत असते, चुकीचा संदेश जात
असतो याची जाणीव सुद्धा बाळगली जात नाही ही खंत आहे. या देशाने वर्षानुवर्षांपासून
सर्वाना सामावून घेतले आहे. सहिष्णूता या देशाने जगाला शिकवली आहे. ईश्वराचा संदेश
देणा-यांना येथे पूजनीय मानले आहे त्यांचा तिरस्कार नाही केला किंवा त्यांना दंड
नाही केला. सर्वच धर्मगुरू, साधू , संत यांनी जनतेला योग्य दिशा दाखवावी , त्यांच्यासाठी
प्रार्थना , उपवास करावे ,जगाच्या कल्याणासाठी आवाहने करावीत, राजकीय परिस्थिती
बाबत पत्रके काढून उगीच देशाचे नांव जागतिक स्तरावर खराब होईल अशी कृती करू काढू
नये तरच जन सामान्यांचा त्यांच्या प्रती विश्वास, स्नेह वृद्धिंगत होईल. असे केले
तर नंतरची सारवासारव करणे आपसूक टाळल्या जाते व हसे होत नाही.