सरकारचे डोके ठिकाणावर
आहे का ?
होय हा सुप्रसिद्ध प्रश्न टिळकांनी इंग्रज सरकारला
आपल्या एका अग्रलेखाव्दारे विचारला होता. टिळक महाराजांचा “सरकारचे डोके ठिकाणावर आहे
का ?”हाच प्रश्न आता राजस्थान सरकारला पुनश्च विचारावा वाटत आहे कारण त्यांच्या शिक्षण
खात्याने इयत्ता 8 वी च्या संदर्भ पुस्तकात टिळकांचा “दहशतवादाचे जनक” असा उल्लेख केला
आहे. आपल्या भारतात शिक्षण क्षेत्रात काय होईल
याचा काही नेम नसतो. इतिहासाच्या क्रमिक पुस्तकात कधी एखाद्या पराक्रमी राजा अथवा
सरदारास काही ओळीतच आटोपले जाते, कधी झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पतीचे नांव
काय आहे? अशा वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या उत्तराच्या पर्यायामध्ये त्यांच्या पतीच्या
नांवाचा समावेशच नसतो, पृथ्वीराज चव्हाण,पहिला बाजीराव यांच्याबाबत अतिशय जुजबी माहिती
असते. अशी वृत्ते अधून मधून प्रसिद्ध होत असतात. दोन चार वर्षांपूर्वी “सीबीएसई”
च्या अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांबद्दल अतिशय कमी माहिती असल्याचे वृत्त आले होते.
त्यात भरीस भर म्हणून परवा वासुदेव देवनानी शिक्षण मंत्री असलेल्या राजस्थान शिक्षण खात्याने लोकमान्य टिळक यांचा “दहशतवादाचे जनक” असा उल्लेख केला आहे व त्यावर सारवासारव करणे सुरु झाले आहे. परंतू “बुंदसे
जो गयी वो हौदसे नही आती”. ज्या राष्ट्रपुरुषाने आपल्या बुद्धिमत्तेने, आपल्या
लेखणीच्या ताकदीने इंग्रजांना भंडावून सोडले होते, ज्याने केसरी व मराठा ही
वृत्तपत्रे सुरु केली होती, ज्याने मधुमेह असतांना कारावास भोगला होता व कारावासातच
“गीतारहस्य” हा ग्रंथ लिहिला होता, जो गणिताचा ज्ञानी होता,ज्याच्यामध्ये संशोधक
वृत्ती होती व त्यातूनच वेद, नक्षत्रांच्या जागांवरून वेदांचे वय ठरवणे यांवर
भाष्य करणारा “ओरायन” ग्रंथ ज्याने लिहिला होता, ज्याने “न्यू इंग्लिश स्कूल”,“डेक्कन
एज्युकेशन सोसायटी” अशा शिक्षण संस्था सुरु केल्या होत्या, सार्वजनिक शिवजयंती व गणेशोत्सव
सुरु केले होते. अशा राष्ट्रपुरुषाचा असा अपमान करणे जनतेला कदापीही सहन होणार नाही.
देवनानीजी दहशतवादी कधीही शिक्षण संस्था , वृत्तपत्रे , संशोधन , लिखाण अशी सुकृत्ये
करीत नसतात हे आपल्या खात्याच्या लक्षात कसे आले नाही? इंग्रजांनी ज्यांना “The Father of the Indian Unrest” अर्थात भारतीय असंतोषाचे जनक असा उल्लेख केला
आहे अशा टिळक महाराजांना राजस्थानच्या शिक्षण मंत्रालयाला “The Father of Terrorisam” अर्थात “दहशतवादाचे जनक” म्हणतांना
जराही शरम वाटत नाही. उलट तेथील शिक्षण मंत्री “टिळकांना इंग्रजांच्या मनात दहशत
निर्माण करायची होती असा अर्थ घ्यावा त्याला सध्याचा दहशतवाद हा शब्द अभिप्रेत
नाही” असे म्हणतात. देवनानीजी दहशतवाद
कोणत्या अर्थाने घ्यायचे हे जनतेला शिकवण्यापेक्षा आपली चूक तात्काळ दुरुस्त करा.
इंग्रजी शब्दकोशात दहशतवादाची Unlawful
use of violence especially against civilins अशी व्याख्या केली आहे. तर इंग्रजांनी
टिळकांना उद्देशून म्हटलेल्या Father of
the Indian Unrest मधील Unrest या शब्दाचा अर्थ A State of dissatisfaction असा होतो. टिळकांनी कधी violence especially against civilins म्हणजेच नागरिकांच्या विरुद्ध कोणते
कृत्य अथवा चळवळ केली नाही मग ते “दहशतवादाचे जनक” कसे? जनता तर त्यांच्या बाजूने
होती आणि म्हणूनच त्यांना “लोकमान्य” ही पदवी जनतेनेच बहाल केली होती. हे सुद्धा राजस्थान
शिक्षण मंत्रालयाला माहित नसावे याचे आश्चर्य आहे. इंग्रजांनी सुध्दा त्यांना दहशतवाद्याची उपमा दिली नाही ती तुम्ही देता आहात हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे. देवनानीजी दहशतवादी किंवा
त्यांचे जनक हे कदापीही लोकमान्य नसतात हे ध्यानात घ्या. आपल्या अभ्यास मंडळातील सदस्यांची
कानउघडणी करा, त्यांनी अक्षम्य अशी चूक केली आहे आणि त्या खात्याचे आपण प्रमुख आहात
त्यामुळे अशा घोडचूकी बाबत सारवासारव न करता ती चूक तात्काळ दुरस्त करा व झालेल्या
चुकीची क्षमा प्रकट करा तरच आपल्या खात्याचे पापक्षालन होईल. “सरकारचे डोके ठिकाणावर
आहे का? असा प्रश्न विचारणे टिळकांना भाग पडले होते आता आपण स्वतंत्र आहोत स्वकीयांचे
राज्य आहे तरी सरकारने व सरकारी यंत्रणांनी आपले डोके ठिकाणावर ठेऊन निर्णय घ्यावेत
व टिळकांचा तोच प्रश्न जनतेला पुन्हा पुन्हा विचाराण्यास भाग पाडू नये.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा