Click "Follow" Button below To Follow this Blog

२७/०९/२०१८

Water problem of Khamgaon, Maharashtra

राजकीय दुरदृष्टीहीनता व खामगांवकरांची पाणी समस्या
     खामगांव शहर एकेकाळी फरशी भागापर्यंत मर्यादित होते. फरशीच्या पलीकडे फक्त शासकीय कार्यालय व काही निवासस्थाने अशी तुरळक वस्ती होती. त्या काळात फरशी भाग व इतर जुन्या भागात जनुना तलावातून पाणी पुरवठा होत असे. काही भागात पक्क्या विहिरींतून पाणी पुरवठा केल्या जात होता. कालौघाने खामगांव शहराची लोकसंख्या वाढली ज्ञानगंगा धरणातून पाणी पुरवठा सुरु झाला. परंतू जनुना पाणी पुरवठा योजना मात्र ठप्प झाली. दुर्लक्षित झाली त्यामुळे जनुना तलाव केवळ विसर्जन तलाव झाला. जनुना व ज्ञानगंगा अशा दोन्ही पाणीपुरवठा व्यवस्था समांतर सुरु ठेवल्या असत्या तर दोन्ही जलसाठयांत संकटाच्या, पाणी टंचाईच्या काळात कदाचित जास्त पाणीसाठा शिल्लक राहिला असता. किंवा जनुना तलाव म.औ.वि. मंडळच्या पाणी पुरवठ्यासाठी वापरता आला असता. परंतू राजकीय कुरघोड्या करण्यात आपली उर्जा घालवणा-यांनी खामगांवकरांना मात्र तहानलेलेच ठेवले. दुरदुष्टी ठेवली नाही. आधीच खामगांव शहर व लगतचा परीसर म्हणजे कमी पावसाचा भाग. मोठ्या नद्या नाहीत. त्यामुळे पाण्यासाठी जुने जलस्त्रोत अर्थात विहिरींवर खामगांवकर विसंबून होते किंबहुना आजही आहेतच. खामगांव शहरात आजही चांगल्या पक्क्या पाण्याच्या विहरी आहेत त्यावर पंप बसवून  त्या-त्या भागात पाणी पुरवठा होऊ शकतो परंतू केवळ सत्तेची तहान असलेल्या राजकीय मंडळींना आणि नगर परिषद जल विभाग, मा.  मुख्याधिकारी  यांना खामगांवकर जनतेची तहान मात्र दिसत नाही. जुन्या अनेक विहिरी आता निव्वळ कचराकुंड्या झाल्या आहेत, या विहीरींकडे देशभर स्वच्छता मोहीम सुरु असतांना, गांधी जयंतीच्या 150 व्या जयंती निमित्त स्वच्छता पंधरवाडा सुरु असतांना नगर परिषद विहिरींच्या स्वच्छतेकडे मात्र साफ कानाडोळा करीत आहे. हातपंपांची दुरावस्था पहावत नाही. वर्षभर पाणी पुरेल याची पावसाळ्यातच सोय करून ठेवणारे तत्कालीन शिवराय कुठे आणि पाण्यासाठी मागणी करणा-या रयतेकडे दुर्लक्ष करणारे, पाणी पुरवठ्यासाठी काहीही एक नियोजन नसणारे सांप्रत कालीन राज्यकर्ते व त्यांचे नोकरशहा कुठे. नवीन जलवाहिन्या टाकून कित्येक वर्षे उलटली त्या तशाच पडलेल्या आहेत, नागरिकांकडून शुल्क घेऊन बसवलेले मीटरचे नळ निव्वळ अंगणातील एक छान शोभेची वस्तू बनले आहेत. पाहुणे मंडळी आली की या मीटरच्या नळाबाबत उत्सुकतेने विचारणा करतात तेंव्हा त्यांना या नळाचे पाणी अब्जावधी मीटर अंतरावर आहे त्यामुळे त्यात अजून पाणी पोहोचले नाही असे सांगितल्यावर त्या पाहुणे मंडळीची उत्सुकता सुद्धा लोप पावते. या लेखाद्वारे स्थानिक प्रशासनातील सुज्ञ मंडळींना खामगांवातील जनतेच्या पाणी समस्येची थोडीफार जरी तळमळ असेल , जनतेसाठी पक्क्या पाण्याच्या विहिरी जाणून घेण्याची तीळमात्र जरी उत्सुकता असेल तर त्यांना त्या विहिरींची यादी उपलब्ध करून देता येईल.ती तयार आहे. खामगांवकरांसाठी येता उन्हाळा मोठा कठीण असणार आहे,भयंकर असणार आहे. आधीच प्रचंड उन त्यात पाणी नाही. टँकरचे दर वाढतील, नगर परिषदचे टँकर आहेत की नाही देव जाणे? सण,उत्सव,एकमेकांवर कुरघोड्या करणे यांमध्ये अधिक मग्न असणारी नगरसेवक मंडळी स्थानिक प्रशासन यांचे या येत्या पाणी टंचाईग्रस्त भीषण उन्हाळ्याकडे लक्ष आहे की नाही कुणास ठाऊक.यंदा खामगांववासियांवर वरुण राजाची अवकृपा झाली आहे.ज्ञानगंगा धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे.जिल्हा प्रशासन, उपविभागीय कार्यालय, महसूल विभाग,मुख्याधिकारी,नगर परिषद यांनी येत्या पाणी टंचाई बाबत वेळोवेळी सभा घेणे जरुरी आहे,खामगांवची पाणी समस्या दूर कशी करता येईल?,पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा कसा काढता येईल ?,टँकर दरांवर नियंत्रण कसे ठेवता येईल?  हे विषय त्यात चर्चिल्या जाणे अपेक्षित आहे. राजकीय दुरदृष्टीने केलेल्या विकासाचे अनेक दाखले आहेत. तशीच राजकीय दुरदृष्टी ठेवल्यास व जनतेच्या प्रश्नांवर एकोप्याने कार्य केल्यास निश्चितच खामगांवची पाणी समस्या दूर होऊ शकते अन्यथा हे केवळ स्वप्नरंजनच ठरेल. 

१९/०९/२०१८

Article describes the changing way of celebrating Lord Ganesh festival in Maharashtra


बिभित्स नृत्ये व नोटांची उधळण
काल एका वृत्तवाहीनीवर यंदाच्या गणेशोत्सवातील बातमी प्रक्षेपित होत होती. बातमी होती परळीच्या वैद्यनाथ गणेशोत्सव मंडळातील नृत्याबाबतची. आता नृत्य म्हटले तर चौसस्ट कलांपैकी एक कला. भारतीय शास्त्रीय नृत्य म्हटले तर एकापेक्षा एक असे  शास्त्रीय नृत्यप्रकार आपल्या भारत देशाने जगाला दिले आहेत. कथकली, भरत नाट्यम, कुचीपुडी, आपले लोकनृत्य लावणी असे हे भारतीय नृत्यप्रकार. यांत निपूणता प्राप्त करण्यासाठी कलाकारांना कित्येक वर्षांची साधना करावी लागते. परंतू वरील पैकी एखादे नृत्याविष्कार आपल्या मंडळात सादर करण्याऐवजी परळीच्या वैद्यनाथ गणेश मंडळाने आयोजन केले ते हरीयाणातील सपना चौधरी नामक कुण्या एका स्त्रीचे ओंगळवाणे, बिभित्स नृत्य. नृत्य कसले ते तर निव्वळ शरीराचे विशिष्ट अंग प्रत्यांग हलविण्याचे हिडीस प्रदर्शनच होते. हे सर्व सुरू होते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत. नेत्यांच्या उपस्थितीत असले नृत्य प्रकार होणे ही देशातील सर्वात सुसंस्कृत म्हणवणा-या महाराष्ट्राच्या अध:पतनाचीच सुरुवात होय. नुकतेच राम कदम यांनी स्त्रीयांविषयी अनुद्गार काढण्याची जी अक्षम्य चूक केली होती तेंव्हा मुंडे महाशय तुम्ही त्यावर तीव्र आक्षेप घेतला होता. आणि आता तर तुमच्या देखत असले बिभित्स नृत्यप्रकार ते सुद्धा बुद्धीची आराध्य देवता मानल्या जाणा-या गणराया समक्ष. गणेशोत्सवात असले बिभित्स नृत्य आयोजन करते वेळी आयोजकाना काही गैर कसे वाटले नाही ? मुंबई दहीहंडीत सुद्धा असेच सिनेमातील नट-नटयांना आणून नेते त्यांच्यासह नाचले होते. परळीमध्ये गणेशोत्सवात नृत्य काय? तिकडे मुंबईत चांदिवली भागातून आमदार असलेले तसेच व माजी पालकमंत्री राहीलेले नसीम खान यांच्यावर नोटांची उधळण काय ? कार्यकर्त्यांवर प्रभाव पाडण्यासाठी , त्यांना खुश करण्यासाठी हे असले प्रकार करणे कितपत योग्य आहे? गणेशोत्सव आयोजकांनो तुमचे गणपती पहाण्यासाठी सर्वसामान्य,मध्यमवर्गीय कुटुंब आया-बहीणींसह मोठया भक्ती भावाने, तुमचे नवसाला पावणारे असे म्हणवणा-या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि तुम्ही त्यांना काय दाखवता हे असले थेरं? कलेला राजाश्रय असलाच पाहीजे परंतू त्या कला सुद्धा तितक्याच स्ंदर,निपुणतेचे,साधनेचे दर्शन करणा-या असाव्यात.तिकडे ख-या कलावंतांना मानधनासाठी,अनुदानासाठी खस्ता खाव्या लागतात, मंत्रालयाच्या वा-या कराव्या लागतात. इकडे नेते मात्र नाच गाण्यात मश्गूल, नोटा उधळण्यात मग्न असतात. एकीकडे बारबालांसाठी यांचेच नेते धडपड करीत होते आणि आता हे बारऐवजी बालांना चक्क गणपती समोर नाचवत आहेत व पैसे स्वत:च्याच आंगावर उधळून घेत आहेत. पैसे उधळणारे भानूशाली अंगावर पैसे उधळण्याची आमची परंपरा आहे व ते पैसे आम्ही दान करतो असा बिरबली युक्तीवाद करतात. अनेक थोर नेत्यांची,साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेल्या नेत्यांची परंपरा या महाराष्ट्राला लाभली आहे. कुठे गेले असे नेते ? आता निव्वळ चमकोगिरी सुरू असते. पाच वर्षात काही कामगिरी,विकास केलेला नसतो मग जनतेला खुश कसे करायचे?दाखवा मग बिभित्स नृत्य आणि उधळा पैसे. नेहमीप्रमाणेच मग नेत्यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया देतांना केलेल्या चुकीवर पांघरूण घालण्यासाठी येनकेन प्रकारे सारवासारव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. तरुणाईसाठी हा कार्यक्रम घेतल्याचे मुंडे म्हणतात. वा मुंडे साहेब चांगली वाट दाखवत आहात तरुणाईला (की वाट लावत आहात).गणेशोत्सवात हे असले कार्यक्रम साजरे करणे म्हणजे महाराष्ट्राची व लोकमान्यांनी सुरुवात केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव परंपरेची एकप्रकारची शोकांतिकाच म्हणावे लागेल. आजही काही चांगले नेते या देशात नक्कीच आहेत परंतू हे बुद्धीच्या देवा गणनायका नेहमी संविधान, देशप्रेम, माता भगीनी बाबत आदर दाखवण्याचा देखावा करणा-या आमच्या नेत्यांना व त्यांच्या प्रेरणेने कार्य करणा-या मंडळांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना सदबुद्धी दे रे बाप्पा.

१४/०९/२०१८

Views of RSS Chief Dr. Mohanji Bhagwat in World Hindu Congress 2018


विश्व हिंदू संम्मेलन आणि सरसंघचालकांचे विचार
     11 सप्टेंबर 1893 रोजी कोलंबसने अमेरीकचा शोध लावला या घटनेस 400 वर्षे पूर्ण झाली होती. या घटनेच्या स्मरणार्थ शिकागो येथील आर्ट इंस्टीट्यूटच्या कोलंबस हॉल मध्ये जॉन हेन्री या गुह्स्थाने जागतिक धर्म परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत स्वामी विवेकानंदांनी “माय अमेरिकन सिस्टर्स अँड ब्रदर्स“ अशी सुरुवात करून भारताच्या व त्या अनुषंगाने हिंदू धर्माच्या विश्वबंधुत्वाच्या विचारसरणीचा परिचय जगाला करून दिला होता. स्वामीजींच्या या भाषणाला यंदा 11 सप्टेंबर रोजी 125 वर्षे पूर्ण झाली. या अनुषंगाने दुस-या विश्व हिंदू परिषदेचे आयोजन शिकागो येथे करण्यात आले होते. जागतिक अर्थकारण, शिक्षण , राजकारण , समाजकारण ई. विविध विषयातील 200 पेक्षा अधिक तज्ञ वक्ते या सभेत उपस्थित होते. या दुस-या विश्व हिंदू संम्मेलनाचे अध्यक्ष एस.पी कोठारी महोदय होते. या संम्मेलनात सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या प्रदीर्घ भाषणात सरसंघचालकांनी हिंदू समाज या समाजाची विचारसरणी, एकता, अहंकार त्याग, आदर्शवाद, आधुनिकता अशा अनेक बाबींवर भाष्य केले. त्यांनी आपल्या व्याख्यान्यात पुढील मुद्द्यांवर भर दिला.
हिंदू धर्माची शिकवण  - हिंदू हा कधीही आक्रमक राहिला नाही , दुस-यांचा विरोध करण्याची हिंदूंची मानसिकता नाही. साध्या किटकालाही ठार मारायचे नाही तर त्यावर नियंत्रण मिळवायचे हीच हिंदू धर्माची शिकवण आहे.
ऐक्याचा अभाव  - हिंदू समाजातील ऐक्याच्या अभावाची मोठी चिंता आहे. हा समाज आजवर कधीही एकत्र येऊ शकला नाही. हिंदूंनी एकत्र येणे ही कठीण बाब झाली आहे. सध्या हिंदू धर्मातील एकतेवर पद्धतशीरपणे घाव घालणे सुरु आहे याकडे लक्ष वेधताना मोहनजी म्हणाले की जगातील सर्वच समाजाचा विचार करता अनेक प्रतिभावंत लोक हिंदू समाजात आहेत परंतू ते एकत्र मात्र येत नाहीत. हिंदू एकत्र आले तर हिंदू समाजाची भरभराट होऊ शकते. अहंकारावर नियंत्रण प्राप्त करून जगाला एकत्रित ठेवण्याचा महत्वाचा सिद्धांत आहे. हे सांगताना त्यांनी युधिष्ठीर व भगवान श्रीकृष्ण यांच्यात कधीही मतभेद न झाल्याचा दाखला दिला.  
हिंदूंची स्वभाव वैशिष्ट्ये - हिंदूंचा स्वभाव हा हे इतरांवर वर्चस्व गाजवण्याचा स्वभाव नाही परंतू हिंदूंना त्यांच्या मूळ सिद्धांताचे मात्र विस्मरण झाले आहे. तसेच आध्यात्मिकतेचा सुद्धा विसर पडत चालला आहे व त्यामुळे हिंदूंचे शोषण होत आहे. इतर लोक जरी हिंदूंचा विरोध करीत असले तरी दुं-यांचा विरोध करण्याची मानसिकता नाही. विरोध करणा-याला कुठलीही इजा न पोहचविता त्याला प्रभावित करणे हे हिंदू विचारांनी शक्य आहे.   
आधुनिकतेची कास – हिंदू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्म जरी असला तरी तो आधुनिकतेच्या विरोधात नाही व आधुनिकतेची कास धरणारा आहे.   
2500 प्रतिनिधी असलेल्या या परिषदेत डॉ. मोहनजींनी अनेक बाबींचे दाखले दिले. वरील बाबी या त्यातील प्रमुख बाबी होत्या.
या व्याख्यानास अनुसरून समस्त हिंदूंनी वरील बाबींचा विचार करणे आजच्या काळात अत्यंत महत्वाचे आहे. हिंदूंनी त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य ओळखणे जरुरी आहे, आध्यात्मिकतेचा विसर नको. ऐक्य अधिक कसे वृद्धिंगत होईल याकडे लक्ष देणे जरुरी आहे. सोशल मीडियातून होणा-या द्वेषाच्या प्रचार व प्रसार पासून नवीन पिढीला कसे दूर ठेवता येईल हे पहायला हवे तसेच त्यांना सामजिक ऐक्य, हिंदू धर्म संकल्पना व  विश्वबंधूत्वाच्या दिशेने जाण्यास प्रेरित करणे अत्यंत अत्यावश्यक आहे. तसेच सर्वच धर्मियांनी
एकवर्णं यथा दुग्धं भिन्नवर्णासु धेनुषु ।
तथैव धर्मवैचित्र्यं तत्त्वमेकं परं स्मृतम् ॥
ज्याप्रमाणे विविध रंग रूपाच्या गायी एकाच रंगाचे दूध देतात , त्याचप्रमाणे विविध धर्म, पंथ हे एकच तत्व शिकवतात हे आजच्या आधुनिक जगात आत्मसात करणे अत्यंत जरुरी नाही का ?

११/०९/२०१८

Article on the 125 years compolition of Swami Vivekanand Speech in Chikago


आत्मनो मोक्षार्थ जगद्धीताय 
अनेक हालअपेष्टा, यातना सहन करीत “योद्धा संन्यासी” , “सायक्लोनिक मंक“ स्वामी विवेकानंद हे 1893 मध्ये राजस्थानातील अलवरच्या महाराजांच्या आश्रयाने कोलंबस ने अमेरिकेच्या शोधास 11 सप्टेंबर 1893 रोजी 400 वर्षे झाली या घटनेच्या स्मरणार्थ जॉन हेन्री यांनी आयोजित केलेल्या सर्वधर्म परिषदेत उपस्थित राहण्यासाठी , भारताचे , हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करण्यासाठी  अमेरिकेस  जहाजाने जाते झाले.अमेरिकेत पोहोचल्यावर स्वामीजींच्या  लक्षात आले की आपण येथे कार्यक्रमाच्या बरेच आधी येऊन पोहोचलो आहोत. तेंव्हा त्यांना कधी रेल्वेच्या उभ्या असलेल्या मालगाडीच्या डब्यात तर कधी रस्त्यावर, उपाशी पोटी दिवस व्यतीत करावे लागले . एका अमेरिकन दाम्पत्याचे लक्ष मात्र या आकर्षक , तेज:पुंज संन्याशाने वेधून घेतले मग त्यांनी स्वामीजींना आपल्या घरी नेले व धर्मपरिषदेस उपस्थित राहण्यासाठीचे सोपस्कार करण्यात सुद्धा मदत केली. गुरु रामकृष्ण व माँँ सारदादेवी यांच्या प्रेरणेने भारतमातेचा हा सुपुत्र अमेरिकेत रवाना झाला होता. तेथे जाण्यापूर्वी रामकृष्ण समुद्रावरून चालत जात आहे व विवेकानंद त्यांच्या मागे जात आही असे काहीसे सूचित करणारे स्वप्न सुद्धा स्वामीजींना पडले होते. इतिहासात सुवर्णाक्षरांनी कायमचा लिहिल्या गेलेला तो दिवस उजाडला धर्मपरिषद  सुरु झाली. स्वामीजी एकतिसावा क्रमांकाच्या आसनावर स्थानापन्न झाले होते. एका पाठोपाठ एक क्रमांक येत गेले . आप आपल्या धर्माचे गुणगान सुरु झाले. स्वामीजींचा क्रमांक आला आणि “ माय अमेरिकन सिस्टर्स अँड ब्रदर्स “ असे शब्द ऐकताच आर्ट इंस्टीट्यूटचा तो कोलंबस हॉल प्रचंड टाळ्यांचा गडगडाट दोन मिनिटे ऐकत राहिला. कदाचित टाळ्यांचा असा प्रचंड गडगडाट तो कोलंबस हॉल प्रथमच अनुभवत असावा. तसे म्हटले तर स्वामीजींच्या या भाषणाबाबत कित्येकदा उहापोह झाला आहे , मोठे लिखाण झाले आहे परंतू तरीही या ऐतिहासिक भाषणा बाबत वाचन किंवा श्रवण कितीही वेळा झाले तरी त्याच्यात अधिकच रस निर्माण होतो ते कंटाळवाणे होत नाही. आजच्या या ऐतिहासिक दिनाचे महत्व सर्वानी जाणले पाहिजे , त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा एकेकाळी “विश्वगुरु” म्हणून ओळखल्या जाणा-या आपल्या भारतास गतवैभव प्राप्त करून देणे हे आपले कर्तव्य समजले पाहेजे.आपण आंदोलने, एकमेकांतील वाद हेवे दावे , मागण्या बाजूला सारून पुनश्च स्वामीजींच्या स्वप्नातील भारत घडवायला पाहिजे. भारताला पुनश्च “विश्वगुरु” बनवायचा वसा घ्यायला हवा. आजकाल सहिष्णूते बाबत ओरड केली जाते परंतू भारतातील सहिष्णूतेबाबत स्वामीजी म्हणतात I am proud to belong to a religion which has taught the world tolerance and universal acceptance. We believe not only in universal toleration but we accept all religion as true.”  तेंव्हा कुणी असहिष्णूता वाढत आहे असे म्हणत असेल तर ते हास्यास्पद ठरते. तसेच  आत्मनो मोक्षार्थ जगद्धीताय हे स्वामीजींचे ब्रीद होते. स्वत:च्या मोक्षासाठी जगाचे हित साधणे हेच आपल्या सर्वांचे ध्येय असावे हीच स्वामीजींची त्यांच्या ब्रीद वाक्यातून जनतेकडून अपेक्षा होती. ती पूर्णत्वास नेण्याचा आजच्या 11 सप्टेंबर या स्वामीजींच्या अमेरिकेतील भाषणाच्या 125 वर्षपुर्ती दिनी करावयास नको का ?          

०५/०९/२०१८

Article on Maharashtra MLA Ram Kadam's "abduct girl" remark


घासावा शब्द,तासावा शब्द,तोलावा शब्द , बोलण्यापूर्वी 
     भारतातील लोकप्रतिनिधींना निवडून आले की कोणती गुर्मी येते कुणास ठाऊक. जनते समोर विकासाबाबत भाष्य करायचे सोडून हे लोक दुसरेच काहीबाही बरळत असतात. गेल्या काही वर्षात तर अशा वाचाळवीर लोकप्रतिनिधींनी नाना प्रकराची अशोभनीय वक्तव्ये करून अगदी वीट आणला आहे. कधी शेतक-यांबाबत अनुद्गार तर कधी महिलांबाबत अनुच्चार, कधी कर्मचा-यांना मारहाण, तर कधी थेट पंतप्रधानांवर केलेली हलक्या पातळीची टीका. यात अनेक पक्षांच्या लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. परवा तर राम कदम या आमदार महाशयांनी कहरच केला. दहीहंडी उत्सवाच्या भाषणात बोलतांना हे महाशय म्हणाले की ,”तुम्हाला कोणती मुलगी आवडते ते सांगा, तुमच्या आई वडीलांना जर मुलगी पसंत असेल तर आम्ही तुमच्यासाठी त्या मुलीला पळवून आणू“  वा रे आमदार ! तुम्हाला काय लोकांच्या मुली पळवण्यासाठी जनतेने निवडले आहे काय ? अहो काय मोगलाई आहे काय की कुणाचीही लेकबाळ उचलून न्यावी ? ज्या शिवाजी महाराजांचे नांव घेता अहो त्यांनी त्यांच्या सरदाराने पळवून आणलेल्या  कल्याणच्या सुभेदाराच्या सूनेला मातेसमान मानून तिची सन्मानाने रवानगी केली होती. एकीकडे त्या शिवरायांचा आदर्श बाळगत असल्याच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे मुलींना पळवून आणण्याची भाषा करायची ! जाहीर  कार्यक्रमात वृत्तपत्र, वाहिन्यांचे कॅमेरे रोखलेले असतांना तुमची जिभ घसरतेच कशी? नुकतेच अटलजींचे दु:खद निधन झाले आपल्या सुसंस्कृत वाणीने,मर्यादाशीलतेने,अजातशत्रू व्यक्तीमत्वाने त्यांनी तुमच्या पक्षाला हे आजचे दिवस दाखवले आहेत. आपल्या पक्षातील आमदाराला असे बरळतांना पाहून त्यांचा आत्मा तळमळला असेल. अटलजी जर हयात असते तर सर्वप्रथम त्यांनीच तुम्हाला कानपिचक्या दिल्या असता. कर्मचा-यांनी लोकप्रतिनिधींशी कसे वागावे याची आचारसंहिता आहे परंतू लोकप्रतिनिधींचे वर्तन कसे असावे याचा काही उहापोह होतांना दिसत नाही. प्रत्यक्ष आमदार मुलींना पळवण्याची भाषा करतो आहे हे पाहून गुंडगिरीला तर आणखी उत येणारच. “मी प्रथम  महिलांबाबत सन्मानाने बोललो हे कुणी दाखवत नाही, माझे अर्धवट भाषण दाखवले जात आहे ” अशी सारवासारव राम कदम आता करीत आहे. परंतू ही सारवासारव करून आता काही फायदा नाही . धरणात लघुशंका करण्याचे भाष्य करणे अजित दादांना भोवले तसेच राम कदमांना हे महिलांच्या सन्मानास बाधा पोहोचवणारे वाक्य चांगलेच भोवणार आहे. यापूर्वीही अनेक लोकप्रतिनिधींनी कर्मचा-यांना मारहाण केली आहे,बेताल वक्तव्ये केली आहेत. यांत शशी थरूर,दिग्विजय सिंह,राहुल गांधी,एकनाथराव खडसे, रावसाहेब दानवे, अजित पवार, सोलापूरचे बनसोडे  आणखी अशी कित्येक नांवे आहेत. म्हणून  या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधीं करीता आचारसंहिता असावी व आचारसंहिता भंग करणा-यावर कठोर कारवाईची तरतूद असावी. संत रामदास,कबीर संत तुकाराम यांनी बोलण्या बाबत अनेक श्लोक ओव्या लिहिल्या आहेत. सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधींची जिभ हल्ली अधून मधून घसरत असतेच. तेंव्हा तुकोबांनी लिहिलेल्या
“घासावा शब्द, तासावा शब्द,तोलावा शब्द बोलण्यापूर्वी“
व त्या पुढील ओळींचे जरूर वाचन करीत राहावे. दहीहंडीच्या या कार्यक्रमात महिलांना पळवून आणण्याची भाषा करणा-या मर्यादा पुरुषोत्तम रामाचे नांव धारण करणा-या राम कदम यांनी मात्र मर्यादेची लक्ष्मण रेषा ओलांडून स्वत:ची नाचक्की स्वत:च केली आहे.