विश्व हिंदू संम्मेलन आणि सरसंघचालकांचे
विचार
11 सप्टेंबर 1893
रोजी कोलंबसने अमेरीकचा शोध लावला या घटनेस 400 वर्षे पूर्ण झाली होती. या
घटनेच्या स्मरणार्थ शिकागो येथील आर्ट इंस्टीट्यूटच्या कोलंबस हॉल मध्ये जॉन
हेन्री या गुह्स्थाने जागतिक धर्म परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत स्वामी
विवेकानंदांनी “माय अमेरिकन सिस्टर्स अँड ब्रदर्स“ अशी सुरुवात करून भारताच्या व
त्या अनुषंगाने हिंदू धर्माच्या विश्वबंधुत्वाच्या विचारसरणीचा परिचय जगाला करून
दिला होता. स्वामीजींच्या या भाषणाला यंदा 11 सप्टेंबर रोजी 125 वर्षे पूर्ण झाली.
या अनुषंगाने दुस-या विश्व हिंदू परिषदेचे आयोजन शिकागो येथे करण्यात आले होते.
जागतिक अर्थकारण, शिक्षण , राजकारण , समाजकारण ई. विविध विषयातील 200 पेक्षा अधिक
तज्ञ वक्ते या सभेत उपस्थित होते. या दुस-या विश्व हिंदू संम्मेलनाचे अध्यक्ष एस.पी
कोठारी महोदय होते. या संम्मेलनात सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन
केले. आपल्या प्रदीर्घ भाषणात सरसंघचालकांनी हिंदू समाज या समाजाची विचारसरणी, एकता,
अहंकार त्याग, आदर्शवाद, आधुनिकता अशा अनेक बाबींवर भाष्य केले. त्यांनी आपल्या व्याख्यान्यात
पुढील मुद्द्यांवर भर दिला.
हिंदू धर्माची शिकवण
- हिंदू हा कधीही आक्रमक राहिला नाही , दुस-यांचा विरोध
करण्याची हिंदूंची मानसिकता नाही. साध्या किटकालाही ठार मारायचे नाही तर त्यावर
नियंत्रण मिळवायचे हीच हिंदू धर्माची शिकवण आहे.
ऐक्याचा अभाव - हिंदू समाजातील
ऐक्याच्या अभावाची मोठी चिंता आहे. हा समाज आजवर कधीही एकत्र येऊ शकला नाही.
हिंदूंनी एकत्र येणे ही कठीण बाब झाली आहे. सध्या हिंदू धर्मातील एकतेवर पद्धतशीरपणे
घाव घालणे सुरु आहे याकडे लक्ष वेधताना मोहनजी म्हणाले की जगातील सर्वच समाजाचा
विचार करता अनेक प्रतिभावंत लोक हिंदू समाजात आहेत परंतू ते एकत्र मात्र येत
नाहीत. हिंदू एकत्र आले तर हिंदू समाजाची भरभराट होऊ शकते. अहंकारावर नियंत्रण प्राप्त
करून जगाला एकत्रित ठेवण्याचा महत्वाचा सिद्धांत आहे. हे सांगताना त्यांनी युधिष्ठीर
व भगवान श्रीकृष्ण यांच्यात कधीही मतभेद न झाल्याचा दाखला दिला.
हिंदूंची स्वभाव वैशिष्ट्ये
- हिंदूंचा स्वभाव हा हे इतरांवर वर्चस्व गाजवण्याचा
स्वभाव नाही परंतू हिंदूंना त्यांच्या मूळ सिद्धांताचे मात्र विस्मरण झाले आहे. तसेच
आध्यात्मिकतेचा सुद्धा विसर पडत चालला आहे व त्यामुळे हिंदूंचे शोषण होत आहे. इतर लोक
जरी हिंदूंचा विरोध करीत असले तरी दुं-यांचा विरोध करण्याची मानसिकता नाही. विरोध करणा-याला
कुठलीही इजा न पोहचविता त्याला प्रभावित करणे हे हिंदू विचारांनी शक्य आहे.
आधुनिकतेची कास – हिंदू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्म
जरी असला तरी तो आधुनिकतेच्या विरोधात नाही व आधुनिकतेची कास धरणारा आहे.
2500 प्रतिनिधी असलेल्या या परिषदेत डॉ.
मोहनजींनी अनेक बाबींचे दाखले दिले. वरील बाबी या त्यातील प्रमुख बाबी होत्या.
या व्याख्यानास
अनुसरून समस्त हिंदूंनी वरील बाबींचा विचार करणे आजच्या काळात अत्यंत महत्वाचे आहे.
हिंदूंनी त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य ओळखणे जरुरी आहे, आध्यात्मिकतेचा विसर नको. ऐक्य
अधिक कसे वृद्धिंगत होईल याकडे लक्ष देणे जरुरी आहे. सोशल मीडियातून होणा-या द्वेषाच्या
प्रचार व प्रसार पासून नवीन पिढीला कसे दूर ठेवता येईल हे पहायला हवे तसेच त्यांना
सामजिक ऐक्य, हिंदू धर्म संकल्पना व विश्वबंधूत्वाच्या
दिशेने जाण्यास प्रेरित करणे अत्यंत अत्यावश्यक आहे. तसेच सर्वच धर्मियांनी
एकवर्णं
यथा दुग्धं भिन्नवर्णासु धेनुषु ।
तथैव धर्मवैचित्र्यं तत्त्वमेकं परं स्मृतम् ॥
तथैव धर्मवैचित्र्यं तत्त्वमेकं परं स्मृतम् ॥
ज्याप्रमाणे विविध रंग रूपाच्या गायी एकाच रंगाचे दूध
देतात , त्याचप्रमाणे विविध धर्म, पंथ हे एकच तत्व शिकवतात हे आजच्या आधुनिक जगात आत्मसात
करणे अत्यंत जरुरी नाही का ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा