अभ्यास कर....आपल्याला आरक्षण नाही
चार-पाच दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर “चल उठ , अभ्यास कर आपल्याला आरक्षण नाही“ असा
एक सर्वसामान्य #Open #GeneralCategory वर्गवारीप्रती सहानुभूती, तसेच सर्वसामान्य वर्गवारीच्या विद्यार्थ्यांना वास्तवाची जाणीव
करून देणारा, व त्यांना अभ्यासाशिवाय दूसरा कोणता पर्याय नसल्याचे सूचित करून प्रेरणा देणारा संदेश झपाट्याने
पसरला. हा संदेश वाचल्यावर अनेक प्रश्नांनी डोक्यात पिंगा घालायला सुरुवात केली. संविधानाने
दिलेली समानता खरेच आहे का?,बुद्धिमान विद्यार्थ्यास जास्त गुण
मिळाले असून कमी गुण प्राप्त विद्यार्थ्यास चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळताना पाहून किंवा नोकरी मिळताना
पाहून काय वाटत असेल? आरक्षणाचा टेकू घेऊन आपल्याहून कनिष्ठ सहका-यास
बढती मिळताना पाहून कर्मचा-यास काय वाटत असेल? पात्रता नसलेले
आरक्षणाच्या कुबड्या घेऊन उभे राहणारे या देशाचे आधारस्तंभ बनू शकतील का ? सर्वसामान्य वर्गवारीच्या विद्यार्थ्यांच्या मनातील भावना काय असतील? त्यांना नकारात्मक भावनेने,न्यूनगंडाने ग्रस्त केले
असेल काय? त्यांच्या पालकांच्या मनात काय चलबिचल होत असेल असे नानाविध प्रश्न डोक्यातील विचारांचा गुंता वाढवीत
होते. मुलांसमोर जातीपातीचा उल्लेख न करणा-या आपणास हल्ली आपली लहानगी मुलेच अमुक एक
जात कोणती? अमुक एक आरक्षण कोणते? आरक्षण
म्हणजे काय? अशा प्रश्नांनी भंडावून सोडत असतात. अस्सल भारतीय
व्यक्तीस त्यांच्या या अशा प्रश्नांना सामोरे जाणे मोठे कठीण जाते.परंतू करणार काय? मतांच्या राजकारणासाठी समाजाला सदैव विभाजित ठेवणा-या राजकारण्यांना काही
मुद्दे हे असेच तेवत ठेवायचे आहेत. “अवघे विश्वची माझे घर” असा संदेश देणा-या ज्ञानोबांच्या
या महाराष्ट्रात चौथी पाचवीतील मुले “मी अमक्या जातीचा , तू ढमक्या
जातीचा” असे संवाद करतांना दिसतात. हा संदेश माध्यमांवर आल्यापासून डोक्यातच फिरतच आहे. खरेच काय
होणार आपल्या देशात सर्वसामान्य वर्गवारीचे ? सर्वसामान्य वर्गवारीस
अभ्यासा व्यतिरीक्त दूसरा कोणताही पर्याय नाही. अनेक सर्वसामान्य गरीब आहेत त्यांच्याकडे
शासनाचे लक्ष नाही. सविधानात सामाजिक,आर्थिक व राजनैतिक न्याय, दर्जाची व संधीची समानता असे म्हटले आहे. परंतू खरेच तसे आहे का ? सरकारने स्वत:च जाती भेद करू नका , आपण सर्व एक आहोत
असे म्हणत जनतेला निरनिराळ्या वर्गवारीत वाटून जातिभेद तर मिटवलाच नाही केवळ त्याचे स्वरूप बदलले आहे. या असल्या
प्रकाराने अपात्रांना पात्र करून पुढे आणल्याची फळे आगामी काळात भारताला निश्चितच भोगावी
लागतील. मोठ-मोठ्या पदव्या घेतलेल्या डॉक्टर कडून चुकीची शस्त्रक्रिया होताना दिसते.
नवीन बांधलेले पूल पडतात. कर्मचारी साधे पत्र लिहू शकत नाही. रस्ते उखडतात, शिक्षण क्षेत्राची दुरावस्था झालेली आहे. हे कशामुळे तर आरक्षणाच्या कुबड्या
लावून आपत्रांना पात्र बनवल्यामुळे. येथे कुण्या जाती, धर्मा
बाबत मुळीच आकस नाही. टीका आहे ती सरकारी यंत्रणाच जनतेला समानतेने पाहात नसल्या बाबतची.
या देशातील उच्च गुणवत्ताधारक,पात्र विद्यार्थी मग तो कोणत्याही
जाती धर्माचा असो त्याला त्याच्या जाती किंवा धर्मामुळे चांगल्या महाविद्यालयात प्रवेशीत
होता येत नसेल तर ही आपल्या देशाची मोठी शोकांतिका आहे.सत्ताधारी, विरोधी व सर्व पक्षांनी सर्वसामान्य वर्गवारीकडे होणारे दुर्लक्ष
या बाबत एकत्रीत चर्चा करणे अत्यावश्यक आहे. परंतू हे होणे कितपत शक्य आहे ? तसे होण्यास अनेक वर्षे जातील. तो पर्यन्त
सर्वसामान्य वर्गवारीच्या पालकांना मात्र त्यांच्या पाल्यांना हेच सांगावे लागेल की, “बाबू उठ अभ्यास कर आपल्याला आरक्षण नाही”