कन्फ्युजनही कन्फ्युजन है सोल्युशन पता नही
पाच राज्यातील व 2019 मधील आगामी लोकसभा निवडणुक.
त्यातच नरेंद्र मोदी यांचा न ओसरलेला करिश्मा. भाजपच्या विजयी रथाच्या वारूला कसे रोखावे ? याची सर्व विरोधी पक्षांना लागलेली चिंता व त्या चिंतेमुळे सुटलेले जिभेवरील नियंत्रण व गोंधळ जनतेला स्पष्ट दिसून येत आहे. तिकडे वाचाळवीर , पत्नीच्या आकस्मिक
मृत्यूच्या गुढाचे वलय भोवताली घेऊन फिरत असलेले शशी थरुर हे मोदींचा कुठल्यातरी
पत्रकाराने केलेला महादेवाच्या पिंडीवरील विंचू या आशयाच्या ओळी वाचून दाखवतात. हसमुख आणि
मनमेळाऊ राजकारणी , माजी मुख्यमंत्री , केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे
यांच्या काल राजकारणात आलेल्या कन्या प्रणिती शिंदे या मोदींना डेंग्यूचा डास म्हणतात. वडीलांच्या पुण्याईने राजकारणात प्रवेशित प्रणितीताईंना पंतप्रधान यांना
असे संबोधणे योग्य नाही. पंतप्रधान मोदी यांनी राजकारणात स्वकर्तुत्वावर अघाडी घेत
पंतप्रधान पदापर्यंत मजल मारली. तुम्हाला तो प्रवेश सहजासहजी मिळाला आहे याचे भान ठेवावे.
देशाचे पंतप्रधान हे सर्वांचेच असतात. त्यांना असे बोलण्याने तुमची पात्रता काय आहे
हे सुज्ञ जनांना कळत असते. थरुरांची तर मोदींबद्दल बोलण्याची पात्रताच नाही. परंतू
यांची जिभ अशी का घसरते आहे ? यांना कन्फ्युजन का होत आहे ? कारण सत्ताधा-यांवर
करण्यासाठी काही आरोपच नाहीत. ज्या काही एखाद दोन जुन्या मुद्द्यांवर गदारोळ
माजवला जात आहे त्यात सुद्धा काही दम नाही. म्हणूनच मग हा गोंधळ, हे कन्फ्युजन.
यामुळेच मग जिभ घसरते, शिव्यांची लाखोली वाहिली जाते,राहुल गांधी व्यापम
म्हणायच्या ऐवजी पनामा पेपर्स म्हणतात. काय तर म्हणे मामाजींच्या मुलाचे नांव
पनामा पेपर्स मध्ये आहे. मध्यप्रदेश मधील झाबुआ येथील प्रचारसभेत ते बोलत होते.
असे उद्गार कुणाच्या बाबतीत आहे हे स्पष्टच आहे. मामाजी म्हणजे कोण हे
मध्यप्रदेशात सर्वांनाच चांगले ठाऊक आहे. त्यामुळेच मग त्यांच्यावर मानहानीचा खटला
दाखल झाला. आपली चूक नंतर लक्षात आल्यावर मग अनेक घोटाळे झाले आहेत त्यामुळे माझे
कन्फ्युजन झाले असे ते म्हणाले. असे कन्फ्युज होऊन कसे चालेल? पंतप्रधान पदाचे
उमेदवार म्हणून तुम्ही स्वत:च स्वत:च्या नावाची घोषणा केली होती. त्याला तुमच्याच पक्षातील
अनेक जेष्ठ नेत्यांचा विरोध आहे. उघड-उघड कुणी बोलत नसले तरी जनतेला व कार्यकर्त्यांना
त्याचा अंदाज आला आहे. यत्कदाचित तुम्ही पंतप्रधान झालाच तर अनेक महत्वाच्या
मुद्द्यांना कन्फ्युजन मुळे कसे हाताळाल काही नेम नाही. अनेक घोटाळ्यांमुळे तुम्ही
कन्फ्युज होता तर देशात तर किती गंभीर समस्या आहेत. काश्मीर प्रश्न आहे, घुसखोर आहेत,
नक्षलवाद आहे अशा प्रश्नांवर एखादा कन्फ्युज्ड
माणूस कसे काय निर्णय घेईल? तुम्ही सध्या पंतप्रधानांवर गंभीर आरोप करीत आहात. या
आरोपांची सुद्धा एकदा पुनश्च खात्री करून घ्या नाही तर नंतर पुन्हा कन्फ्युज झालो
होतो असे म्हणाल. सर्व विरोधकांकडे सत्तधा-यांना कात्रीत पकडता येतील असे मुद्देच
नाहीत. त्यामुळे ज्यांची जिभ सैल सुटली आहे असे तोल सुटलेले नेते, कन्फ्युज्ड नेते
जर भविष्यात सत्तेत आले तर जनतेवर आणि देशावर काय परिस्थिती ओढवेल याचा विचार जनतेने
जरूर करावा. अनेक बाबींवर कन्फ्युजनही कन्फ्युजन असलेल्या नेत्याला नक्कीच सोल्युशन
क्या है पता नही ? असे होऊ शकते व त्यामुळे जगात पुढे येत असलेला भारत पिछाडीवर जाऊ
शकतो हे जनतेने ध्यानात घ्यावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा