वाढता,वाढता वाढे
11 जुलै हा दिवस दरवर्षी विश्व लोकसंख्या
दिवस म्हणून साजरा केला जातो. युनायटेड नेशन्स ने 1989 पासून हा दिवस साजरा
करण्यास सुरुवात केली. 1987 च्या सुमारास जागतिक लोकसंख्या 5 अब्जाहून अधिक झाली .
त्यामुळे विश्वव्यापी व संपूर्ण जगाची समस्या असलेला लोकसंख्येचा हा भस्मासूर रोखण्यासाठी ,
जनतेमध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी व लोकसंख्यावाढीमुळे उपस्थित होणारे मुद्दे
जसे गरीबी , लिंग समानता इ विषयांवर जनतेने गांभीर्याने
घेण्यासाठी म्हणून युनो ने हा दिवस लोकसंख्या दिन म्हणून घोषित केला. जगाची
लोकसंख्या प्रतिवर्षी 100 दशलक्षाने वाढत आहे. विश्व आता लोकसंख्येच्या
विस्फोटाकडे वाटचाल करीत आहे. यात आशिया खंडातील अफाट लोकसंख्या असलेले चीन व भारत
हे दोन देश आहेत. आपला देश तर येत्या काळात लोकसंख्येच्या बाबतीत चीनला सुद्धा
मागे टाकणार आहे. भारत सरकारने या विषयाचे गांभीर्य ओळखून कुटुंबं नियोजन
कार्यक्रमावर फार पूर्वी पासून भर दिला आहे. देत आहे. या कार्यक्रमामुळे काही
प्रमाणात का होईना परंतू लोकसंख्या नियंत्रीत झाली आहे. निवडणूकीत उभे राहणा-यावर सुद्धा दोन अपत्य
असावेत असे बंधन घातले आहे. लोकसंख्या वाढ हा जसा जगाचा प्रश्न आहे तसाच तो
भारतासाठी सुद्धा मोठा प्रश्न आहे. आपल्या देशात आता मोठ्या शहरात गेलो तर दिसणारी
गर्दी , माणसांचे लोंढेच्या लोंढे ,
लोकलला लोंबकळणारे पुरुष स्त्रीया , विद्यार्थ्यांच्या
रिक्षा, कार्यालये आदी सार्वजनिक ठिकाणी दिसणा-या भल्या
मोठ्या रांगा हे सर्व भयावह चित्रण आहे. येत्या काळात या लोकसंख्येच्या गरजा कशा
भागवल्या जातील. पाणी, अन्नधान्य इ सर्व गरजा भागवणे म्हणजे
मोठी कसरत आहे. शेतीची जमीन दिवसेंदिवस घटत आहे. पाण्याची पातळी खालावत चालली आहे.
निवासाची सोय नाही. खुराड्याप्रमाणे असणा-या घरात/ झोपड्यांत कितीतरी लोक निवास
करीत आहेत. सरकारने हा प्रश्न गंभीरतेने घ्यायला हवा शिवाय नागरीकांनी सुद्धा
तितकाच गंभीरतेने घेणे जरूरी आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा लोकसंख्येच्या
वाढत्या समस्येवर त्यांचे विचार प्रकट केले होते. त्यांचे म्हणणे होते की “ लोकसंख्या
नियंत्रण हे गरीब व महिला यांच्यासाठी वरदान ठरेल, सरकारने कुटुंब
नियोजनाचे कार्यक्रम व त्यासाठी लागणारी साधने , त्यांचा वापर
यांबाबतची माहीती, प्रशिक्षण जनतेला देण्याची सरकारची प्राथमिकता
असावी”. सद्यस्थितीत जनतेमधील अवेयरनेस वाढला आहे. परंतू याला धार्मिकतेचीही किनार
आहे. त्यामुळे सर्वच धर्मियांतील नागरीकांनी लोकसंख्येमुळे निर्माण होणा-या समस्या
व धोका वेळीच ओळखायला हव्या. कोणत्या देवाला वाटेल की त्याची लेकरे दारीद्र्यात, गरीबीत खितपत पडावी. आपल्या भावी पिढीचे आयुष्य सुखकर असावे याची जाणीव सर्वच
धर्मियातील लोकांनी ध्यानात घेणे गरजेचे आहे. लोकसंख्या वाढ ध्यानात घेतांना त्या वाढीत
सुद्धा समतोल असावा. लोकसंख्या वाढीकडे दुर्लक्ष करणा-यांमुळे भविष्यात त्यांच्याच
संख्येत वाढ होऊन ते कदाचित इतर समुदायांना
अडचणीचे किंवा धोक्याचे ठरू शकते. सर्व धर्मियात
सरकारने व त्या धर्माच्या संतांनी लोकसंख्या नियंत्रणाची जागरूकता पसरवणे अत्यंत जरूरी
झाली झाले आहे. लोकसंख्या वाढ जर प्रमाणात होत असेल तरच “सबका साथ सबका विकास” करता
येईल. अन्यथा विकासाची फळे चाखणारे जास्त व करदाते कमी त्यामुळे करवाढ असेही होऊ शकते.
लोकसंख्येच्या या भस्मासुराला जर नष्ट करावयाचे असेल तर कुणीही मोहीनीचे रूप घेऊन
येणार नाही. जागतिक समस्या असलेल्या या भस्मासुराला नष्ट करावयाचे तर सर्वांनाच पुढे
यावे लागेल. कुणीही मागे राहून चालणार नाही तेंव्हाच या भस्मासुराची राख होईल. अन्यथा
वाढता, वाढता वाढे करत वाढत जाणा-या या भस्मासुराचा हात आपल्या डोक्यावर पडलाच म्हणून समजा.
खरेच आहे लोकसंख्या नियंत्रित होणे गरजेचे आहे.
उत्तर द्याहटवा