रामायणातून
राजधर्म शिकणे अपेक्षित
3 मे रोजी उत्तर
रामायण संपले. दूरदर्शनने रामायण व उत्तर रामायण अशा मालिकांचे प्रासारण केले. या
मालिकांना दर्शकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 7.7 कोटी लोकांनी ही मालिका पाहून
एक उच्चांक प्रस्थापित केला. रामायण , महाभारत तसेच जैन, बौद्ध व इतर अस्सल भारतीय कथांतून अनेक बोधप्रद
अशा गोष्टी आहेत. अशा मालिका, कथांतून जनता काही ना काही बोध निश्चितच घेत असतेच. रामायण
पाहणा-या 7.7 कोटी जनतेपैकी किती राजकारणी लोकांनी हि सिरीयल पाहिली असेल देव
जाणे. परंतू या मालिकेतून रामाने कसे राज्य केले?, राजधर्माचे कसे पालन केले, राजा रामचंद्र प्रजेप्रती किती समर्पित होते, त्यांच्या राज्यात सर्वत्र कसा आनंदी - आनंद होता. आजही सुव्यवस्थित राज्य कारभाराचा दाखला द्यायचा असल्यास “रामराज्याचा”
दाखला दिला जातो. राजकारणी लोकांनी रामायणातील पुढील दोन बाबींवर अवश्य विचार करून
प्रजाहित दक्ष व दिलेल्या शब्दाप्रती वचनबद्ध राहणे याचा बोध रामायणातून घ्यायला हवा.
यातील
प्रथम बाब म्हणजे प्रजा जेंव्हा राज्याच्या महाराणी बद्दल आक्षेप घेते तेंव्हा प्रभू
राम सीतेचा त्याग करतात व देवी सिता वाल्मिकी यांच्या आश्रमात राहतात. राज्याच्या
प्रजेसाठी प्रजाहितदक्ष राम असे करतात. कारण राजासाठी प्रजा म्हणजे पाल्याप्रमाणे असते.
राम आपले स्वत:चे कौटुंबिक सुख बाजूला सारून प्रजाहित पाहतात.
दुसरी
बाब म्हणजे रघुनाथाचे अवतार कार्य पूर्णत्वाच्या समीप येते तेंव्हा त्यांना ब्रह्मदेवाचा
निरोप देण्यासाठी काल देवता येतात. ते त्यांना रामचंद्रांना संभाषणा दरम्यान कुणी येऊ नये व ते ऐकू नये असे सांगतात. तरीही कुणी आलाच तर त्याला प्राणदंड देण्याचे
ठरते. आपल्या क्रोधासाठी प्रसिध्द असलेले ऋषी दुर्वास
नेमके त्याच वेळी येतात. त्यांच्या क्रोध चांगलाच ज्ञात असलेला लक्ष्मण राघवरायांना
निरोप देण्यासाठी म्हणून काल व श्रीराम असलेल्या कक्षात जातो. लक्ष्मणाला यांमुळे
प्राणदंडाची शिक्षा मिळते. कुणाचा त्याग करणे हे त्याला देहदंड देण्यासारखेच असते
यांमुळे दशरथनंदन मग आपल्या प्रिय बंधूचा आपल्या शब्दासाठी त्याग करतात. राजाज्ञेचा स्विकार करून लक्ष्मण
शरयू नदीत जलार्पण करतो.
आजच्या राजकारणात मात्र अगदी उलट स्थिती दिसते. स्वत:च्या
आप्तांचा त्याग तर सोडा उलट त्यांना राजकारणात आणणे, विविध पदे देणे, पदे नसल्यास
कुठल्यातरी खात्यातील महत्वाच्या जागा देणे, राज्यसभा , विधान परिषद मध्ये वर्णी लावणे. एखाद्याला काही मिळालेच
नाही की मग त्याचे रुसणे व थेट दुस-या पक्षात प्रवेश करणे हे असे सुरु आहे. यातूनच एकाच परिवारातील लोकांनी , पिढ्यांनी कशी सत्ता उपभोगली हे उभ्या देशाने पाहिले आहे. घराणेशाहीतून मग लायकी नसलेल्यांनाही जनतेच्या माथी मारले जाते. कौसल्यासुताने
जनतेसाठी आपल्या प्राणप्रिय पत्नीचा त्याग केला , ज्या लक्ष्मणाने आपल्या जेष्ठ
भावासाठी वनवास स्वीकारला त्याची वनांत सेवा केली , युद्धात मदत केली त्याच प्रिय लक्ष्मणाचा आपल्या एकवचनीपणामुळे त्याग केला. परंतू रामाचे अस्तित्वच मान्य न करणा-या कलीयुगातील
राजकारण्यांना रामाचा हा राजधर्म कितपत पचनी पडेल? स्वत:चे भले करणे, स्वत:च्या
पात्रात तूप ओढणे, नातेवाईकांची वर्णी लावणे , आपला शब्द न पाळणे , प्रजाहित
बाजूला सारून स्वत:चे व परिवाराचे हित राजकारणातून कसे साधता येईल याकडे संपूर्ण
लक्ष देणे व त्यातून मग कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करणे, मोठ-मोठे बंगले
बांधणे अशी कृत्ये करणे हाच आपला धर्म आहे असे मानणा-या राजकारण्यांनी नाही
संपूर्ण निदान थोडातरी राजधर्म रामायणातून शिकावा. त्रेतायुगातील वाल्मिकींना भविष्यातील
राजकारण्यांकडून हेच अपेक्षित असेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा