वेड्यांंच्या विश्वात - भाग 1
संग्रहित चित्र |
..एक तरुण रस्त्यालगतच्या एका रुईच्या झाड़ा जवळ हात जोडून बसलेला दिसला. काही पुटपुटत होता. तोंडावरील मास्क डोळ्यावर नेत होता व पुन्हा तोंडावर घेण्याचा त्याचा चाळा सुरु होता. त्याच्या त्या हालचालींवरुन त्याचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचे जाणवत होते. मी बराच वेळपर्यंत त्याला पाहिले. तो बडबडत होता , हावभाव करीत होता,माझ्या डोक्यात असंख्य विचार मधमाशांच्या पोळ्यावर एखाद्या व्रात्य मुलाने दगड मारल्यावर मोठ्या संख्येने जशा मधमाशा घोंघावतात तसे घोंघाऊ लागले. तो माझ्या दृष्टीआड़ गेला परंतू मी तो बसलेल्या ठिकाणी बघत विचारात गर्क होऊन गेलो. वेडे , वेडेपण , त्यांच्यावरचे ईलाज, कोणी वेड का होते असे अनेक विचार मनात येत होते. काही आठवणी सुद्धा आल्या.त्यापैकीच काही आगामी लेखांत देण्याचा हा एक प्रयन्त.
काही ना काही वेडेपण हे प्रत्येकात असते आणि या वेडेपणामुळे अनेकांकडून मोठमोठी कार्ये पार पाडली जातात व जात आहेत. परंतू एखादा ध्यास मनाशी बाळगून तो पूर्ण करण्याच्या मागे वेडे झालेले वेगळे व मानसिक स्वास्थ्य बिघडून शरीर, शरीर धर्म आदींचे भान हरपून पुर्णपणे वेडे झालेले लोक ज्यांना आपण पागल म्हणतो ते वेगळे. यातील दुस-या प्रकारातील लोकांवर वैद्यकीय क्षेत्रात प्रगती होण्यापूर्वी उपचार होत नसत , तंत्र-मंत्र वगैरे क्रिया केल्या जात व त्याने अशा रुग्णांवर अधिकच गंभीर परिणाम होत असत. अशातीलच काही लोकांना मग परिवार सोडून देत असे , घरात डांबून ठेवत असे व आजही तसे होत असावे. काही यात्रांमध्ये तर अशा रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसते. मराठीतील वेडा, हिंदीतील पागल, पगला या शब्दांना इंग्रजीत Mad हा शब्द आहे ज्याचा अर्थ सर्वसामान्यपणे काम न करणारा , मनोरुग्ण असा होतो. असे नानविध विचार त्या दिवशी मनात आले कारण त्या दिवशी शाळेच्या मैदानात उभा असता एक तरुण रस्त्यालगतच्या एका रुईच्या झाड़ा जवळ हात जोडून बसलेला दिसला. काही पुटपुटत होता. तोंडावरील मास्क डोळ्यावर नेत होता व् पुन्हा तोंडावर घेण्याचा त्याचा चाळा सुरु होता. त्याच्या त्या हालचालींवरुन त्याचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचे जाणवत होते. वाढत्या कोरोनामुळे दुस-यांदा लॉकडाऊन घोषित झाले होते , त्यामुळे विद्यार्थी नसल्याने मी बराच वेळपर्यंत त्याला पाहिले. तो बडबडत होता , हावभाव करीत होता व माझ्या डोक्यात असंख्य विचार मधमाशांच्या पोळ्यावर एखाद्या व्रात्य मुलाने दगड मारल्यावर मोठ्या संख्येने जशा मधमाशा घोंघावतात तसे घोंघाऊ लागले. तो माझ्या दृष्टीआड़ गेला परंतू मी तो बसलेल्या ठिकाणी बघत विचारात गर्क होऊन गेलो. वेडे , वेडेपण , त्यांच्यावरचे ईलाज, कोणी वेड का होते असे अनेक विचार मनात येत होते. काही आठवणी सुद्धा आल्या.
खुप वर्षांपुर्वी मुंबईला गेलो होतो , जिप घेऊन. पहिला मुक्काम केला माझ्या एका आत्याकडे, ठाण्याला. मुंबईत गाडी चालवण्याचा अनुभव नसल्याने आत्या मुंबईतीलच चालक उपलब्ध करून देणार होती. माझी आत्या नर्स म्हणून ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटल मध्ये कार्यरत होती. एका रिकाम्या निवासस्थानात तिने आमची मुक्कामाची सोय केली होती. हे निवासस्थान सुद्धा आडबाजूला होते व शौचालय निवासस्थानापासून दूर होते. त्या रुग्णालयातील पागल लोकांचे आवाज ऐकू येत होते. रात्री खुप भयाण वाटले होते तिथे. पण 600 किमीचा प्रवास जिप मधून केल्याने प्रचंड थकवा होता त्यामुळे लगेच झोप लागून गेली. सकाळी आत्याच्या निवासस्थानी जातांना अनेक पागल दृष्टीस पडले. कुणाला कडक बंदोबस्तात , कुणाला बेड्या घातलेले तर कुणाला थोडीफार मोकळीक होती. त्यांच्या त्या नजरा , त्यांचा आक्रोश , त्यांचे विक्षिप्त वागणे मनाला भेदून गेले होते.
पुर्ण पागल झालेले लोक सर्वांनीच पाहिले असतात तसे ते मी सुद्धा पाहिले आहेत. त्यांनाच आणखी कित्येकांनी सुद्धा पाहिले असेल. जरी हे लोक पागल होते तरी ते त्यांच्या शहरात सर्वपरिचित होते. आजपासून आगामी लेखांत वेड्या लोकांबद्दल, त्यांच्या त-हांबद्दल लिहिणार आहे.
👉या मालिकेतील लेख हे केवळ माहितीस्तव आहे यातून कुणाच्या अथवा कुणाच्याही परिवाराच्या मानसिक स्वास्थ्याची अवहेलना करण्याचा हेतू नाही. कुणाचा अपमान करण्याचा किंवा कुणाला दुखावण्याचा उद्देश नाही हे नम्र निवेदन.
क्रमश: