Click "Follow" Button below To Follow this Blog

०३/०६/२०२१

Article on the occasion of World Bicycle Day

बालसखी सायकल...विश्व सायकल दिनाच्या निमित्ताने 



#WorldBicycleDay , सायकलला जरी मध्यंतरी चागले दिवस नव्हते तरी आता सायकलमुळे व्यायाम होतो याचे तसेच फिटनेसचे महत्व आता सर्वांनाच समजले आहे व त्यामुळे सायकलचा वाढलेला खप पाहून अनेकांना निश्चितच आनंद होत असेल

आज सकाळीच मोबाईलवर विश्व दुचाकी दिवस अर्थात World Bicycle Day चे नोटीफिकेशन आले. बाल्यावस्थेत कित्येक लहानग्यांना सर्वात प्रथम मिळते ती सायकलच. सुरुवातीला तीन चाकी व थोडे मोठे झाले की मग दुचाकी. बालपणापासून ते वृद्धापकाळा पर्यंत माणसास सोबत देते ती म्हणजे सायकल. अर्थात मोटर सायकल आल्यावर सायकल थोडी पिछाडीस गेली होती खरी परंतू आता सायकल विक्री पुनश्च वाढल्याची वृत्ते झळकली आहेत. व्यायामासाठी म्हणून का होईना अनेक लोक आता सायकल विकत घेत आहेत. सायकलचा शोध एकोणविसाव्या शतकात युरोपात लागला. तेंव्हापासून सायकल ही मानवाची सोबत करीत आहे. गरीब , मध्यमवर्गीय , श्रीमंत या सर्वांकडे आढळणारे हे सुलभ वाहन आहे. आज आपल्याला रस्त्यावर मोटर सायकल , स्कूटर , मोपेड अशी वाहने मोठ्या प्रमाणात जरी दिसत असली तरी आजही अनेक पोष्टमन , दुधवाले , फेरीवाले , विद्यार्थी , नोकरदार , कामगार ई सर्वांकडे सायकल दिसून येतेच. पुर्वी सायकल विकत घेणे सुद्धा सोपे नव्हते. सायकलची किंमत त्याकाळी सर्वांनाच परवडेल अशी नव्हती. लहान मुलांच्या सायकली सुद्धा फार कमी होत्या. सायकल चालवणे शिकायचे जरी असले तरी लहान मुलांना मोठ्याच सायकल वापराव्या लागत. त्यातही सायकल जर जेन्ट्स असेल तर “कैची” म्हणजे सायकलच्या दांड्या खालून एक पाय टाकून सायकल चालवावी लागत असे. सायकल बाबत लिहितांना खुप काही लिहिता येईल असे बरेच आहे. सायकल संबंधीत पंक्चर , गरम पंक्चर , आऊट , सारखे शब्द आजही वापरात आहेत. चेन कव्हर , ओरालिंग सारख्या काही शब्दांचा प्रयोग मात्र आता फार कमी झाला आहे. सायकल सर्वांनाच घेणे परवडत नसल्याने सायकल भाड्याने सुद्धा मिळत असे. आता अशी दुकाने फारच कमी आहेत. जेन्ट्स सायकलला लहान मुलांना बसण्यासाठी छोटे सिट किंवा बास्केट बसवत असत. हँडलवर नाव टाकले जात असे. सायकल साठी नगर पालिका नंबर देत असे. रात्री सायकल चालवणे सोपे व्हावे म्हणून त्याला डायनामो वर लागणारा लाईट सुद्धा सायकलला लावता येई. ध्वनिक्षेपक म्हणून घंटी असे. अनेक लोक आपल्या सायकली खुप चांगल्या सजवत असत. चेन पडल्यावर मोठी कसरत होत असे. हात काळे होत असत. काही व्रात्य मुले उभ्या असलेल्या एखाद्या सायकलला धक्का देत व मग सर्व सायकल पडत असत तेंव्हा आपली सायकल उचलण्यास मोठे कष्ट होत असत.

सायकलच्या कित्येक आठवणी आहेत सर्कस मधली ती एक चाकी भली मोठी सायकल , डबल कॅरी म्हणजे एक सायकल चालवतांना दुस-या हाताने दुसरी सायकल वाहून नेणे, डबल सिट , ट्रिपल सिट , डबल सिट चालवत असतांना मागच्याने दुसरी सायकल धरून ती सायकल नेणे , हिंदी चित्रपटातील सायकल आज अशा कितीतरी आठवणी सायकलच्या चाकाप्रमाणे मनात फिरू लागल्या.



हिंदी चित्रपट आठवताच , "माना जनाब ने पुकारा नही" असे सायकल हातात घेऊन नुतनच्या पाठीमागे जाणारा तर “अकेला हुं मै इस दुनिया मे “ असे दुस-या एका गीतात गाणे म्हणत जाणारा देव आनंद आठवला. “दिल मेरा एक आस का पंछी” सायकलवर गुणगुणत जाणारा राजेंद्रकुमार , शोले मध्ये “कोई हसीना जब रूठ जाती है तो” एका वाटसरूची सायकल घेऊन म्हणणारा धर्मेंद्र , “नैनो मे दर्पणहै , दर्पण मे कोई देखू जिसे सुबह शाम” असे भूपेन हजारिका यांच्या तालावर सायकलवर गीत गुणगुणत जाणारे विनोद खन्ना , सायरा बानो , “हे मैने कसम लीssss” असे मुमताज सोबत पारिवारिक जीवनाचे सुखी स्वप्न पाहात जाणारा तेरे मेरे सपने मधील देव आनंद , "पुकारता चला हुं मै" मध्ये सायकल वर जाणा-या अशा पारेख व तीच्या सख्या , “मै चली , मै चली “ असे म्हणत सायकल वर जाणारी सायराबानू , “जीवन चलने का नाम “ सतत सात दिवस सायकल चालवणारा शोर मधील मनोज कुमार अलीकडील “चांदी की सायकल सोने की सिट “ म्हणणारे गोविंदा व जुही चावला , लक्ष्याचे “चल डबल सिट जाऊ लांब लांब “ , जो जिता वही सिकंदर मधील सायकल शर्यत , 90 च्या दशकातील मैने प्यार किया मधील “माऊंटेन सायकल” या हँडलचे स्वरूप बदललेल्या सायकलचे त्या काळात सर्वांना अप्रूप वाटले होते. चित्रपट सृष्टी त्यातील ग्लॅमर , गॉसिप या विषयी अनेकांना आकर्षण हे असतेच. सायकलचा वापर पूर्वीच्या चित्रपटात मोठ्या खुबीने झालेला आहे.

आज विश्व दुचाकी दिवस. प्रत्येकाची बालसखी असलेल्या सायकल विषयी सर्वांनाच आत्मीयता आहे. वडीलांनी घेऊन दिलेली पहिली सायकल , त्या सायकल वर मारलेल्या अनेक फे-या , त्यानंतर सायकलची शाळा कॉलेज मध्ये असतांना मिळालेली साथ , मित्रा कडे जायचे असल्यास सायकल ला “टांग” मारून लगेच जाणे. अशा कित्येक आठवणी सर्वांनाच चिरस्मरणीय आहेत. सायकलला जरी मध्यंतरी चागले दिवस नव्हते तरी आता सायकलमुळे व्यायाम होतो तसेच फिटनेसचे महत्व आता सर्वांनाच समजले आहे व त्यामुळे सायकलचा वाढलेला खप पाहून अनेकांना निश्चितच आनंद होत असेल. सायकल ही सर्वांची बालसखी ही आचंद्रसूर्य मानवा सोबत राहीलच अशी आशा या जागतिक सायकल दिनी करूया.

1 टिप्पणी: