खामगांवची खाद्य संस्कृती भाग-11
अंतिम भाग
खामगांव पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या पदार्थांबाबत लिहावेसे वाटले व खामगांवची खाद्य संस्कृती ही मालिका साकारली. दर गुरुवारी एका हॉटेल बाबतचा लेख अशी सलग 11 गुरुवार ही मालिका चालली. खामगाव तसे लहान शहर या शहरात खाद्यसंस्कृती अशी ती काय असणार ? परंतु एक-एक हॉटेल व तेथील परिसरात प्रसिद्ध असलेले पदार्थ, त्या हॉटेलची वैशिष्ट्ये हे डोळ्यासमोर येऊ लागले व तेच विचार शब्दबद्ध केले.
विविध विषयांवर लिहिता=लिहिता शहरातील काही भकास वास्तू पाहिल्यावर "खामगांवची शान असलेली आताची भकास स्थाने" तदनंतर वेड्या लोकां विषयीची "वेड्यांच्या विश्वात" अशा लेखमालिका लिहिल्या. या दोन लेख मालिका लिहिल्यानंतर खामगावच्या खाद्यसंस्कृती विषयी लिहावेसे वाटले व त्यातूनच "खामगावची खाद्यसंस्कृती" ही लेखमालिका लिहिली. तसे पहिले तर लेख मालिका लिहिणे म्हणजे थोडे जिकरीचे काम अभ्यास,संशोधन करूनच लिहावे लागते, भेटींसाठी वेळ काढावा लागतो. पण लेखमालिका या वाचकांच्या पसंतीस उतरतात हे सुरुवातीच्या दोन लेख मालिकांमधून वाटले. म्हणूनच मग तिसरी लेखमालिका सुद्धा लिहिली. ब्लॉग व स्थानिक जननिनाद या सायं दैनिकातून 4 नोव्हे 2021 पासून खामगांवची खाद्य संस्कृती ही लेख मालिका प्रकाशित झाली. या सलग 11 लेखांच्या मालिकेचे आज समापन करीत आहे.
भारत देश म्हणजे विविध खाद्य पदार्थ चवीने खाणा-यांचा देश. मग खामगांव त्याला अपवाद कसे ठरेल ? यातूनच मग खामगांवातील जुन्या व प्रसिद्ध अशा उपहार गृहां बाबत व तेथील खामगांव पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या पदार्थांबाबत लिहावेसे वाटले व खामगांवची खाद्य संस्कृती ही मालिका साकारली. दर गुरुवारी एका हॉटेल बाबतचा लेख अशी सलग 11 गुरुवार ही मालिका चालली. खामगाव तसे लहान शहर या शहरात खाद्यसंस्कृती अशी ती काय असणार ? परंतु एक-एक हॉटेल व तेथील परिसरात प्रसिद्ध असलेले पदार्थ, त्या हॉटेलची वैशिष्ट्ये हे डोळ्यासमोर येऊ लागले व तेच विचार शब्दबद्ध केले व बघता बघता 11 लेख झाले. या लेखमालिकेत ज्या हॉटेल्स बद्दल लिहिले त्यातील बहुतांश हॉटेलमध्ये भेट दिली, मालकांशी संवाद साधला, फोटो घेतले तेव्हा आपल्या पूर्वजांनी स्थापन केलेल्या व आता बहरलेल्या खाद्यपदार्थ विक्रीच्या व्यवसायाची कुणीतरी घेतलेली दखल पाहून मालकांच्या चेहऱ्यावरील आनंद लपून राहिला नाही. जय भारत हॉटेल च्या मालकांनी त्यांच्या हॉटेल बद्दल लिहायचे असे सांगितल्यावर त्यांनी सर्वप्रथम प्रश्न केला "इस मे तुम्हारा क्या फायदा?" , "कुछ नही" असे मी उत्तरल्यावर ते काही क्षण स्तब्ध झाले होते. खिलोशियाचे राजेश खिलोशिया यांना त्यांच्या हॉटेलची माहिती सांगताना भरभरून आनंद झालेला दिसला. फरशी वरील गुप्ताजी यांची रबडी वर्षानुवर्षे खामगावात प्रसिद्ध आहे. त्या रबडी बद्दल प्रथमच कुणीतरी लिहीत आहे हे समजल्यावर कमी बोलणारे गुप्ताजी बोलते झाले व अनेक विषयांवर बोलले. नवीन पिढी आता असे मेहनत असलेले पदार्थ करेल की नाही अशी शंका त्यांनी व्यक्त केली. एका हॉटेलच्या वयोवृद्ध मालकाने सांगितले की आम्ही स्वतः कारागिरांसोबत पदार्थ बनवायचो पण आताची मुले मात्र कपड्यांची इस्त्री मोडू देत नाही. काहींनी माल बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल हा आता पुर्वी सारखा चांगल्या प्रतीचा नाही, भेसळ वाढली आहे असे वास्तव कथन केले. हॉटेल व्यवसायातील माहिती व नाना मते समजली. काही मित्रांनी सुद्धा काही हॉटेल्स व ढाबे यांबाबत लिहावे असे सुचवले. यात भुसावळ चौकातील निलकमल, फरशी वरील विदर्भ, मिसळसाठी प्रसिद्ध असलेले कोर्टा जवळील हॉटेल प्रदीप आदींचा समावेश होता परंतू कार्यबाहुल्यामुळे त्यांची विस्तृत माहिती मिळण्यास असमर्थ झालो, लिहू शकलो नाही. निलकमल, विदर्भ व प्रदीप सुद्धा खुप जुनी व लोकप्रिय हॉटेल्स आहेत. अनेक लोकांच्या प्रतिक्रिया या लेखमालिकेच्या निमित्ताने आल्या, अनेकांनी फोन केले , 4 नोव्हे 2021 ते 13 जाने 2022 पर्यंत जगभरातून अनेक वाचकांनी हे लेेेख इंटरनेट वरून वाचले हे नम्रतेने नमूद करावेसे वाटते. खामगाव शहरात आजमितीस अनेक हॉटेल्स आहेत. यात आता काही नवीन हॉटेल्सची सुद्धा भर पडली. या नवीन हॉटेल्स बद्दल सुद्धा आगामी काळात लिहिण्याचा मानस आहे. या लेखमालिकेत तीस-चाळीस वर्षांपेक्षाही अधिक जुन्या असलेल्या हॉटेल्स बाबत लिहिले.
भारत देश हा युगानुयुगे अन्नास देव मानत आलेला आहे. अनेक ऋषीमुनी व साधुसंतांनी अन्नाचे महत्त्व सांगितले आहे. आपण
उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म
अशी रामदास स्वामींची शिकवण अनुसरत आलेलो आहे. "वदनी कवळ" घेतांना आपण "श्रीहरीचे नाम" घेतो "जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह" हे आपण या संत शिकवणीतून शिकलो आहोत परंतु आजकाल बर्थ डे साजरे करतांना तरुणाई तोंडाला फासण्यासाठी केकची नासाडी करते, अन्नपदार्थ फेकते हे पाहून खंत वाटते अन्नाला देव मानणा-या आपल्या देशात हे काय चालले आहे याचे आश्चर्य वाटते. हॉटेलमध्ये गेल्यावर हे घेऊ की ते घेऊ या नादात खूप सार्या पदार्थांची ऑर्डर दिली जाते व त्यातील मोठा भाग हा टाकून दिला जातो.
ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम्।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना।।
ॐ सह नाववतु। सह नौ भुनक्तु।
सह वीर्यं करवावहै|तेजस्विनावधीतमस्तु। मा विद्विषावहै॥
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:॥
असा मंत्र म्हणून आपण भोजनाला सुरुवात करीत असतो तेव्हा आपल्या देशात अन्नपूर्णा देवीचा, अन्नाचा सदैव सन्मान होणे हेच उचित आहे. अन्नाची नासाडी होतांना पाहून आपल्याला आपला बळीराजा आठवला पाहिजे, दुःख व्हायला पाहिजे असे नाना विचार खाद्यसंस्कृतीवरची ही मालिका लिहितांना मनात येऊन गेले. आपल्या सर्वांचेे आठवणीनेे प्रतिक्रिया देणे , ई मेल , फोन करणे यासाठी आभार व्यक्त करण्यास शब्द अपुरे पडत आहेत.
ज्या वाचकांचे "खामगांवची खाद्य संस्कृती" या लेख मालिकेतील लेख वाचणे राहून गेले असतील किंवा ज्यांना हे लेख आपल्या आप्तेष्टांना पाठवायचे असतील या करीता या लेख मालिकेतील सर्व लेखांच्या लिंक खाली देत आहे. जेणे करून येथूनच त्यांच्या आवडीच्या लेखाच्या पानावर जाता येईल. धन्यवाद !
लेख मालिकेतील सर्व लेखांच्या लिंक
1 आज खाये दहीवडे ssssss
https://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/11/part-1-dahiwada-food-culture-of.html
2 'आनंद'दायी चकली
https://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/11/part-2-chakli-food-culture-of-khamgaon.html
3 एक अनोखा पेढा
https://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/11/part-3-pedha-food-culture-of-khamgaon.html
4 स्वादिष्ट रबडी
https://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/11/part-4-rabadi-food-culture-of-khamgaon.html
5 ले लो भाई चिवडा ले लो
https://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/12/part-5-chiwada-food-culture-of-khamgaon.html
6 जलेबी,फापडा
https://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/12/part-6-jilebi-food-culture-of-khamgaon.html
7 सुरेश कुल्फी
https://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/12/part-7-ice-candy-food-culture-of.html
8 ...51 साल पुरानी दुकान इधर है
https://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/12/part-8-51-yr-old-hotel-food-culture-of.html
9 अमृत महोत्सवी "जय भारत"
https://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/12/part-9-jay-bharat-food-culture-of.html
10 दुध है वंडरफुल
https://vinayvarangaonkar.blogspot.com/2022/01/part-10-agrawal-cold-drinks-and-dharav.html
11 एक कोन,भूमि तीचा नव्हे तर खाण्याचा
https://vinayvarangaonkar.blogspot.com/2022/01/part-11-chat-cone-food-culture-of.html