Click "Follow" Button below To Follow this Blog

१३/०१/२०२२

Part 11- Chat Cone ,Food Culture of Khamgaon

खामगांवची खाद्य संस्कृती भाग-11

एक कोन,भूमितीचा नव्हे तर खाण्याचा 

आपण सर्वानीच भूमिती या विषयाचे अध्ययन केले आहे विविध कोन आपण शिकलो , त्रिकोन , चौकोन , षटकोन इ. कोनांत मकवाना यांनी आणखी एक भर टाकली. पण, ती भर भूमितीत नसून खाद्य पदार्थात आहे. मकवाना यांनी खामगांवकरांसाठी कोणत्या कोनाची भर टाकली , हे अनेकांच्या लक्षात आले असेलच. विस्तृत माहिती वाचा....

मागील भागापासून पुढे... 

या लेखमालिकेच्या 9 व्या भागात आलेल्या जय भारत हॉटेलच्या अगदी समोर असलेले आजचे हे हॉटेल आहे. हे हॉटेल म्हणजे एक स्टॉल सारखेच आहे. अगदी छोट्या जागेत म्हणजे पान टपरीच्या आकाराच्या जागेत मालक मकवाना यांनी हे दुकान थाटले आहे. ग्राहकांना बसण्यासाठी समोर खुर्च्या व पाण्याची व्यवस्था केली आहे. बहुतांश ग्राहक तर उभ्या-उभ्याच खाऊन जातात. तसे हे हॉटेल म्हणजे खामगांवातील फार जुने असे हॉटेल नाही परंतू अल्पावधीत लोकप्रिय झालेले असे हे हॉटेल आहे. कचोरी , समोसा , भेळ , पाणी पुरी असे पदार्थ इथे उपलब्ध असतात. दिल्लीतील  चांदनी चौक , मुंबई, इंदोर येथील खाऊ गल्ली , ही ठिकाणे जशी खाद्य पदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत तसेच खामगांव शहरात महावीर चौक, अग्रसेन चौक व गांधी चौक हा परिसर म्हणजे खवय्यांंसाठी उपयुक्त परिसर आहे. गांधी चौकातच मकवाना यांचे हे स्टॉलवजा हॉटेल आहे. या दुकानात नेहमी गर्दी असते. येथील पदार्थ सुद्धा फ्रेश व स्वादिष्ट असतात. हे हॉटेल खामगांवच्या खाद्य संस्कृतीत समाविष्ट होईल इतपत जुने असे हॉटेल नाही. हे हॉटेल 20 वर्षांपूर्वी सुरु झाले असावे असा अंदाज आहे. परंतू तरीही याचा समावेश या लेखमालिकेत करावासा वाटला याचे कारण म्हणजे "मकवाना चाट" यांनी एक नवीन पदार्थ आपल्या हॉटेलव्दारे खामगांवात लाँँच केला व तो सर्वांनाच आवडला. हा पदार्थच या हॉटेलचा अंतर्भाव या मालिकेत करण्यास कारणीभूत झाला. शालेय जीवनात आपण सर्वानीच भूमिती या विषयाचे अध्ययन केले आहे विविध कोन आपण शिकलो , त्रिकोन , चौकोन , षटकोन इ. या कोनांत मकवाना चाट यांनी आणखी एक भर टाकली, अर्थात ती भर भूमितीत नसून खाद्य पदार्थात आहे. मकवाना यांनी खामगांवकरांना एक नवीन कोन खाण्यासाठी उपलब्ध करून दिला, तो कोन म्हणजे "चाट कोन". मकवाना यांचा चाट कोन अल्पावधीत लोकप्रिय झाला. आईस्क्रीमच्या कोन सारख्या आकारात तळून त्यामध्ये भेळ सारखे मिश्रण एकत्र करून हा चाट कोन सर्व्ह केला जातो. हा कोन ग्राहकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला व या चाट कोनला चांगलीच मागणी होऊ लागली. गरज ही शोधांची जननी असते असे म्हटले जाते. स्पर्धेच्या या युगात टिकून राहण्यासाठी, व्यवसायिकास ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना टिकवून ठेवण्यासाठी म्हणून विविध कल्पना राबवाव्या लागतात, शक्कल लढवावी लागते. धोपट मार्गानेच गेल्यास पिछेहाट होते. तेच-तेच पदार्थ तर सर्वत्र उपलब्ध असतात त्या पदार्थांसह काही नाविन्यपुर्ण व चवदार असा एखादा पदार्थ आपल्याकडे ठेवल्यास नक्कीच ग्राहक आकृष्ट होतील हे जाणून मकवाना यांनी चाट कोन हा पदार्थ खामगांवकरांसाठी आणला. हा पदार्थ मुळचा कुठला, त्याची रेसिपी, खामगांवात इतरही ठिकाणी तो उपलब्ध असतो का ? "ये सब जानने के बजाय मैने पहले इस चाट कोन को खाना पसंद किया था |" या चाट कोना सारखी चाट कटोरी सुद्धा असते. मकवाना चाट हे अल्पावधीत लोकप्रिय झालेले खामगांव शहरातील हॉटेल आहे. उत्कृष्ट पदार्थांसह चाट कोन येथे उपलब्ध असतो. काही वर्षांपुर्वी खामगांवात "मकवाना वेफर्स" सुद्धा मिळत होते , आताशा दिसत नाही, मिळतात की नाही किंवा कुठे मिळतात काही कल्पना नाही. मकवाना वेफर्स सुद्धा खुप स्वादिष्ट होते. 

    मकवाना या आडनावाचे मला पकवान या शब्दाशी साधर्म्य वाटले. पकवान हा शब्द हिंदीत वापरला जातो , त्याची उत्पती कशी झाली माहित नाही कारण हिंदीत खाद्य पदार्थास व्यंजन हा शब्द वापरतात. पकवान हा शब्द पक्व + अन्न = पक्वान्न (पकवान) असा तयार झाला आहे. मराठीत पक्वान्न असे म्हणतात. हिंदीत वापरला जाणारा पकवान व आजच्या हॉटेलच्या संचालकांचे आडनांव मकवाना, अशा पकवान व मकवाना या दोन्ही शब्दात चार अक्षरे सारखीच आलेली आहेत. कदाचित यामुळेच अन्नपुर्णा देवीने मकवाना यांना चांगले स्वादिष्ट पकवान बनवण्याचा आशीर्वाद दिला असावा का ? पकवान व मकवाना या शब्दातील साधर्म्य हा निव्वळ योगायोग आहे पण का कोण जाणे वरील विचार मात्र माझ्या मनात चमकून गेला. 

                                                   क्रमश:

    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा