...क्या बहिरा हुवा खुदाय ?
परवाच्या राज ठाकरे यांच्या भाषणांवरुन सध्या चांगलाच वाद पेटलाय. संत कबीर यांच्या 550 वर्षांपुर्वीच्या दोह्यात शीर्षकातील हा प्रश्न उपस्थित केला होता.या दोह्याची आठवण राज ठाकरे यांच्या भाषणामुळे झाली. राज यांचे भाषण अनेकांच्या जिव्हारी लागलेले दिसते. म्हणूनच त्यानंतर नेत्यांना रंग बदलणारा सरडा , अक्कल दाढ , वस्तरा , भोंगा , बी टिम, सी टिम अशा प्रकाराच संज्ञा आठवायला लागल्या आहेत. राज ठाकरे हे काल मशिदी वरील भोंग्यांबाबत बोलले. हनुमान चालिसा सुद्धा भोंग्यांवरून म्हटला जावा असेही भाष्य त्यांनी केले. याच मुद्द्यावरून अबु आझमी यांनी सुद्धा हिंदू उत्सवात वाजणा-या डिजेवर आक्षेप घेतला. सर्वांनाच ज्याचा-त्याचा धर्म, भाषा, संस्कृती ,देव हे प्रिय असतात, त्यांच्याविषयी अभिमान आणि भावना जोडलेल्या असतात परंतू घराबाहेर पडतांना आपल्या जाती धर्माला घरीच सोडून बाहेर निघाले पाहिजे. "देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो" या सावरकरांच्या वचनाचा विसर आता सर्वांनाच पडलेला दिसतो म्हणूनच देशाचा विकास, देशहित याबाबत बोलण्यापेक्षा आपल्या भारतात राजकारणी धर्म , जात केंद्रीतच राजकारण करतांना दिसतात. परंतू राज ठाकरे जे बोलले ते कित्येक सर्वसामान्यांच्या मनात आहेच. विविध जात,पंथ,धर्म असलेल्या या भारत वर्षात सर्वांनाच समान अधिकार, वागणूक , न्याय, ईश्वर आराधना इ. सर्वांत समानता असावी असेच राज ठाकरे यांचे म्हणणे आहे. देवाची प्रार्थना एकाची भल्या मोठ्या आवाजात तर दुस-यास मात्र ती अनुमती नाही मग कुठे गेले आपले समानतेचे तत्व ? हेच शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा आहे गुणप्रक्रिया, प्रवेश प्रक्रिया यात विद्यार्थ्यांना कुठे समानतेने पाहिले जाते ? पण असे कुणी स्पष्ट बोलले , लिहिले की मग वाद निर्माण होतो, विविध प्रतिक्रिया व्यक्त होतात, त्या प्रतिक्रियांची सुद्धा चर्चा होऊ लागते व मुख्य मुद्दा मात्र बाजूस पडतो. हे आपल्या देशात होतच आले आहे. राज ठाकरे बोलल्यानंतर नेत्यांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या त्यात ‘जानवे’ सुद्धा आलेच. एक बोलला की त्यावर प्रतिक्रिया द्यायची व मध्ये तिस-यालाच विनाकारण घुसडायचे हे सुद्धा राजकारणी हेतुपुरस्सर करीत असतात. तुलसीदास रचित हनुमान चालिसा यावर कुण्या जातीचा अधिकार नाही तो सर्वच हिंदू गेल्या कित्येक वर्षांपासून म्हणत आले आहे मग ‘जानवे’ मध्येच का आणायचे? या दशकात राजकारणात जेंव्हा नवीन पिढी येऊ लागली तेंव्हा असे वाटले होते की हे उच्चविद्याविभूषित, परदेशात शिकून आलेले तरुण विकासाभिमुख राजकारण करतील परंतू ते सुद्धा पुर्वापार चालत आलेल्या राजकारणाचीच री ओढत आहेत हे दुर्दैवी आहे. जात,पंथ, धर्म केंद्रीत राजकारण तुष्टीकरण, मतपेढीसाठी लांगूलचालन हे आपल्या देशातून कधी हद्दपार होईल देव जाणे. एकास एक न्याय व दुस-यास वेगळा असे व्हायला नको. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात लिहीलेल्या आपल्या घटनेत सुद्धा समानता हे तत्व आहे मग त्या तत्वाचे अनुसरण होतांना का दिसत नाही? प्रत्येक धर्मियांनी व त्यांच्या नेतृत्वाने यावर सखोल विचार करणे अत्यंत जरूरी आहे. आपआपले देव , धर्म यांना घरातच ठेवले पाहिजे व बाहेर आपण सर्व भारतीय असल्याची भावना रूजवली गेली पाहिजे. आपल्या देशातील सर्व धर्मियांतील संत महात्म्यांनी सुद्धा आपल्याला “जे जे भेट भूत तया जाणिजे भगवंत” अशी शिकवण दिली आहे. ईश्वरची आराधना करण्याचे मार्ग सुद्धा सांगितले आहेत. या आराधनेत दिखावा नको असेच सर्व संत महात्म्यांनी सांगितले आहे. म्हणूनच संत कबीर म्हणतात,
कांकर , पाथर जोडी के
मस्जिद देयी चुनाय |
तां चढी मुल्ला बांग देयी,
क्या बहिरा हुवा खुदाय ?
म्हणूनच सर्वांनी आपआपल्या धर्माचे आचरण करावे परंतू त्याचा त्रास आपल्याच देशबांधवांना होऊ नये याची काळजी घ्यावी व “देहा कडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो” या सावरकरांच्या विचाराचे सुद्धा स्मरण ठेवावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा