महापुरुष पुतळे, सौंदर्यीकरण फलक आणि मराठी भाषेस फाटा
शहरात इंग्रजीतील फलकांऐवजी, लव चे बदाम अर्थात "दिल" चे चिन्ह असलेल्या फलकांऐवजी मराठी भाषेत फलक लावता येणार नाही का? तसेच महापुरुषांच्या पुतळ्यांजवळ त्यांनी उद्गारलेले सुप्रसिद्ध असे त्यांचे वाक्य लावले तर ते अधिक समर्पक व प्रेरणादायी ठरणार नाही का?
काही दिवसांपूर्वी खामगांव शहरात आय लव्ह खामगांव , आय लव्ह सिल्व्हरसिटी , आय लव्ह कॉटनसिटी खामगांव. अशा आशयाचे विद्युतदिव्यांचे फलक लागले. या फलकातील लव्ह या शब्दाच्या ठिकाणी लाल बदामचा आकार जो दिल अर्थात हृदयासाठी वापरला जातो त्याचा वापर केला आहे. हा आकार सहसा प्रेमीजीवांच्या प्रेमासाठी सांकेतिक पद्धतीने केला जातो. तसे तर असे फलक आजकाल अनेक शहरात लागलेले आहेत. परंतू खामगांव शहरात हे फलक लागल्यावर विहिंपचे पालक मा. बापूसाहेब करंदीकर यांनी महापुरुषांच्या पुतळ्यांसमोर किंवा त्यांच्या नावे असलेल्या सुंदर स्थानांच्या जागी असे तरुणांच्या प्रेमाचे प्रतीक असलेले लव्हचे चिन्ह वापरण्याऐवजी त्या महापुरुषांची सुप्रसिद्ध वाक्ये लावावी जेणे करून ती वाक्ये नवीन पिढीला सुद्धा कळतील अशा आशयाचा एक लेख लिहिला होता. हा लेख कुणालाही पटेल असाच होता. याच संबधीत अनेक जेष्ठ नागरीक व तरुणांनी मला महापुरुषांच्या पुतळ्यांसमोर किंवा त्यांच्या नावे असलेल्या सुंदर स्थानांच्या जागी असे लव्ह चे चिन्ह असलेले फलक नसावेत असे फोन करून सांगितले. सर्वच स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी , क्रांतिकारकांनी पहिले प्रेम देशावर केले परंतू त्यांनी तसे प्रेम असल्याचे फलक नाही लावले तर आपल्या कृतीतून त्यांनी त्यांचे मातृभूमीवर किती प्रेम आहे हे सिद्ध करून दाखवले. आपला देश, आपले शहर हे सर्वांनाच प्रिय असते म्हणूनच ब्रिटनमध्ये गेलेल्या स्वा. सावरकरांना आपल्या मातृभूमीची आठवण येऊन
"नभी नक्षत्रे बहुत एक परि प्यारा, मज भरतभूमीचा तारा" , प्रासाद इथे भव्य परि मज भारी आईची झोपडी प्यारी"
असे काव्य त्यांना स्फुरले. केवळ जागोजागी इंग्रजीतील शहरांवरील प्रेमाचे फलक लावल्याने शहारावरचे प्रेम वाढेल का? त्या फलकाजवळ जाऊन सेल्फी काढणारे तरुण व प्रशासन शहरावरील प्रेमापोटी एखादी स्वच्छता मोहीम , पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतील का? शहर सुंदर दिसावे त्यासाठी सौंदर्यीकरण स्थाने , आकर्षक वाहतूक बेटे असावीत , विद्युत रोषणाई असावी. आय लव्ह खामगांव सारख्या फलकांना सुद्धा अगदीच विरोध नाही परंतू ते फलक महापुरुषांच्या फुतळ्याजवळ नसावेत. तिथे महापुरुषांची सुप्रसिद्ध वाक्येच असणे जास्त समर्पक आहे. शिवाय आपल्याला आपल्या भाषेचा काही अभिमानच उरला नाही, इंग्रजी शाळांना विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे तर मराठी शाळा बंद पडत आहे, दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्या म्हणून आग्रह आणि इकडे सरकारच शहरांमध्ये आय लव्ह व त्यापुढे शहरांचे नांव असलेले इंग्रजीतील फलक लावते याला काय म्हणावे? महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात आय लव्ह खामगांव प्रमाणे असलेल्या इंग्रजी फलकांऐवजी मराठी भाषेत फलक का लावले जात नाही ? त्या त्याबाबत कोणी काही मागणीही करत नाही किंवा आणि आजपावेेेतो कुणी केलीही नाही. एरवी मराठी मराठी करणारे राजकीय पक्ष व संघटना सुद्धा याबाबतीत मूग गिळून बसले आहेत. शहरावर प्रेम असल्याचे फलक इंग्रजीत लावण्याऐवजी मराठी सुद्धा लावता येऊ शकतात आणि तसेे काही शहरात लावलेले सुद्धा आहेत. जळगाव जिल्ह्यातील वरणगाव शहरात "आम्ही वरणगावकर" असा फलक लावला आहे. याप्रमाणे इतरही शहरात इंग्रजीतील फलकांऐवजी, लव चे चिन्ह असलेल्या फलकांऐवजी मराठी भाषेत फलक लावता येणार नाही का? तसेच महापुरुषांच्या पुतळ्यांजवळ त्यांनी उद्गारलेले सुप्रसिद्ध असे त्यांचे वाक्य लावले तर ते अधिक योग्य ठरेल व नवीन पिढीस प्रेरणादायी सुद्धा ठरेल असा विचार प्रशासनाने करायला नको का ? तसेेेच मा बापूूूसाहेब करंदीकर यांच्या लेखानुसार महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर "अहिंसा परमो धर्म" टिळकांच्या पुतळ्या समोर "स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे" असे फलक लावले असते तर ते जास्त संयुक्तिक वाटले असते व त्या महापुरुषांना ती खरी श्रद्धांजली झाली असती.