ह्रदयस्पर्शी गाण्यांचा खून
जुन्या श्रवणीय, हृदयस्पर्शी अशा गीतांचा वापर हा अंतर्वस्त्रांच्या जाहिरातीत करणे, त्यात तोकड्या कपड्यातील कलाकारांना विक्षिप्त आविर्भाव प्रकट करतांना दाखवणे म्हणजे त्या परीश्रमपूर्वक व प्रसंगानुरूप बनवलेल्या गीतांचा खूनच करणे नाही का ?
आम्ही हायस्कूल मध्ये शिकत असतांना माझ्या बहिणी संगीत शिकत असत. त्यांच्या संगीत क्लास मध्ये कुण्या विद्यार्थ्याने गायनात हरकती घेतांना चुका केल्या तर त्यांचे संगीत शिक्षक त्या विद्यार्थ्याला उद्देशून "तू गाण्याचा खून केला" असे वाक्य म्हणायचे. या वाक्याची आठवण काल झाली. परंतू आजच्या लेखात ज्या गीतासंबंधी लिहीत आहे त्या गाण्यात अथवा गायनात कुठे चूक झालेली नसून एका जुन्या श्रवणीय, हृदयस्पर्शी गीताचा वापर चुकीच्या पद्धतीने करून मूळ गाण्यात प्रेमाची जी उत्कट भावना व्यक्त झाली आहे तीला छेद देऊन त्या शब्दांचा उपयोग वेगळ्याच भावनांसाठी व्यक्त होतांना दाखवला आहे. म्हणून गाण्याचा खून हा त्या संगीत शिक्षकांचा शब्दप्रयोग लेखात व शीर्षकात करावासा वाटला.
आजकालच्या सिनेमातून क्वचितच चांगली गाणी ऐकायला मिळतात. जी जुनी चांगली गीते आहेत त्यांचे "टिन कनस्तर पीट पीट कर गला फाड कर चिल्लाना" या पठडीत नव्याने निर्माण केलेले रिमिक्स व्हर्जन्स व तशीच काहीशी नवीन गीते असे आजकालच्या गीतांचे स्वरूप असते. दुर्दैवाने गीते, चित्रपट, साहित्य, नाटके यांची उत्तमोत्तम अशी निर्मिती दिवसागणिक कमीच होत आहे. जाहिरात क्षेत्रात सुद्धा तेच. आपल्या उत्पादनाचा खप व्हावा म्हणून निर्माते जाहिराती करतात , जाहिरातीचे युगच आहे असे म्हटले जाते. जाहिरातीस काही विरोध नाही परंतू जाहिराती तयार करतांना जाहीरात निर्मात्यांच्या कल्पनाशक्तीच्या भरा-या पाहून आश्च्रर्य वाटते. लहान मुलांच्या गोळ्यांच्या जाहिरातीत एक माणूस टीव्हीवर त्या गोळ्यांची जाहिरात पाहतो व "टेम्पटेशन" होऊन टीव्हीलाच चाटतो असे दाखवले आहे. दुस-या एका चॉकलेटच्या जाहिरातीत एक वृद्ध इसम लहान मुलाला चॉकलेट न देता त्याच्या हातातून चॉकलेट हिसकावून घेतांना दाखवले आहे. तो वृद्ध म्हणजे त्या मुलाचे आजोबाच असावेत. आपल्या भारतात आजी आजोबा हे नातवंडांना दुधावरची साय समजून त्यांच्यावर स्वत:च्या मुलांपेक्षाही अधिक प्रेम करतात. काही जाहिरातीत हिंदू देवी देवता सुद्धा व्यंगात्मक पद्धतीने चित्रित केलेले दाखवले आहे. आणखी एका जाहिरातीत "Thank You यार तुने कूछ नही किया" असा संवाद आहे. "They only live who live for others" अशी शिकवण देणा-या स्वामी विवेकानंदांच्या या देशात दुस-यासाठी काहीतरी करावे, दुस-याच्या मदतीस जावे, कर्म करून योग साधावा अशी शिकवण दिली जात असतांना हे "Thank You यार तुने कूछ नही किया" म्हणजे कर्म न करणे चांगले असेच काहीसे नवीन पिढीच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे हेतुपुरस्सर आहे का असा प्रश्न पडतो. अंतर्वस्त्रांच्या जाहिराती करतांना तर जाहिरात निर्मात्यांच्या कल्पनेच्या भरा-या उत्तुंगतेच्या सीमा गाठतात. अशा या जाहिराती असतात. आता जाहिरातीत झालेल्या गाण्याच्या खूनाच्या मुद्द्यावर येऊ. परवा बातम्या पाहतांना ब्रेक मध्ये एक पुरुषांच्या अंतर्वस्त्रांची जाहिरात लागली. तसे तर अंतर्वस्त्रे म्हणजे खाजगी बाब पण त्यांच्या जाहिरातीने लिहीण्यास भाग पाडले. पुरुष अंतर्वस्त्रे एका ललनेस आकर्षित करतात हे दाखवतांना जाहिरात बनविणा-याने त्या जाहिरातीत 50 च्या दशकातील यहुदी चित्रपटाच्या एका श्रवणीय, हृदयस्पर्शी व आजही हिट असलेल्या मुकेशने गायलेल्या एका गीताचा वापर केला आहे. हे गीत म्हणजे "ये मेरा दिवानापन है या मोहोब्बत का सुरूर". अंतर्वस्त्रांच्या जाहिरातीत या गीताचा वापर म्हणजे या गीताचा खूनच म्हणता येईल. यहुदी म्हणजे माझ्या जन्माच्याही 25 वर्षे अगोदरचा सिनेमा तो पाहिला नाही परंतू जुनी सिनेगीते अमर आहेत, त्यांचा गोडवा अमीट आहे त्यामुळेच ती आजच्या पिढीला सुद्धा माहीत आहे.
"ये मेरा दिवानापन है या मोहोब्बत का सुरूर
तू न पहचाने तो ये है तेरी नजरोका कुसूर "
हे गीत कित्येकदा ऐकले आहे. प्रेमात ठोकर खाल्लेला एक यहुदी युवक आपल्या प्रेमाच्या तरल भावना या गीतातून व्यक्त करतो.
दिल को तेरीही तमन्ना, दिल को है तुझसेही प्यार
चाहे तू आये ना आये , हम करेंगे इंतजार
आपल्या प्रेमिकेला तो म्हणतो की तू ये किंवा नको येऊ मी तुझी वाट बघतच राहील. काळाच्या ओघात हे असे प्रेम नष्ट झाले. गुलाब दिला की आठवड्याभरातच ब्रेक अप पण होते. अशा या पिढीला ही गीते व त्यातील भावना, त्या गीताचा दर्जा, गीतकाराची काव्य प्रगल्भता ती काय समजणार ? आणि म्हणूनच याच पिढीतील या जाहिरात निर्मात्यांना अंतर्वस्त्रांच्या जाहिरातीसाठी या उपरोक्त गीताचा वापर करावासा वाटतो. "गाढवाला गुळाची चव काय" ही म्हण या उपरोक्त जाहिरात निर्मात्यांना तंतोतंत लागू पडते. या गीताप्रमाणे इतरही अनेक जुन्या गीतांचा वापर जाहिरातीत चुकीच्या पद्धतीने अनेक वेळा केल्या गेला आहे. मागे एका अंतर्वस्त्राच्या जाहिरातीवर सरकारने बंदी सुद्धा आणली होती. माहिती व प्रसारण खात्याने उपरोक्त जाहिरातीप्रमाणे असणा-या इतरही अनेक जाहिरातींवर बंदी आणून अशा जाहिरात निर्मात्यांच्या थोबाडीत लगावली पाहिजे. गीत गायन करतांना एकवेळेस हरकती घेतांना झालेल्या चुका क्षम्य आहे परंतू जुन्या श्रवणीय, हृदयस्पर्शी अशा गीतांचा वापर हा अंतर्वस्त्रांच्या जाहिरातीत करणे, त्यात तोकड्या कपड्यातील कलाकारांना विक्षिप्त आविर्भाव प्रकट करतांना दाखवणे म्हणजे त्या परीश्रमपूर्वक व प्रसंगानुरूप बनवलेल्या गीतांचा खूनच करणे नाही का ?
👉 जुन्या गीतांच्या चाहत्यांसाठी गाण्याची लिंक
https://www.youtube.com/watch?v=jBxDcoFVdVQ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा