Click "Follow" Button below To Follow this Blog

०२/११/२०२३

Article about hindu festival Kojagiri

 एक वो भी कोजागिरी थी

कोजागिरीचं एक संग्रहित चित्र

...मला आठवले ती चुलीवर ठेवलेली एक मोठी कढई,  त्यामध्ये एक लांब सराटा आणि चुलीमध्ये धगधगणाऱ्या ज्वाला आणि दूध घोटत असलेले माझे तिर्थरूप व त्यांची जीवश्च कंठश्च मित्र मंडळी...

मुलाला आजच्या शिक्षण पद्धतीचा अविभाज्य घटक बनलेल्या क्लासला सोडून मी घरी येत होतो. त्याचा क्लास हा गावाच्या बाहेर असल्यामुळे मला गाडीवरून येता-येता कोजागिरीचा तो पूर्ण चंद्र दृष्टीस पडला. माझी गाडी जरी सुरू होती तरी काही क्षण माझी दृष्टी त्या चंद्राकडे स्थिरावली आणि एकदम मला आठवले की अरे आज तर कोजागिरी पौर्णिमा. तोच चंद्रमा नभात, धीरे धीरे चल चांद गगन मे, खोया खोया चांद सारख्या गीतांचे स्मरण होत-होत माझे मन भूतकाळात जाऊ लागले, मला आठवले ती चुलीवर ठेवलेली एक मोठी कढई,  त्यामध्ये एक लांब सराटा, चुलीमध्ये धगधगणाऱ्या ज्वाला आणि दूध घोटत असलेले माझे तिर्थरूप व त्यांची जीवश्च कंठश्च मित्र मंडळी. माझे वडील व त्यांची मित्रमंडळी दरवर्षी सहकुटुंब कोजागिरी पौर्णिमेचे आयोजन करीत असत. त्या दिवसांच्या स्मृती दूध ऊतू गेल्यावर जसे पटकन ओसंडून वाहू लागते तशा ओसंडून आठवू लागल्या. कोजागिरीच्या दिवसाची आम्हा लहान मंडळींना मोठी प्रतीक्षा असे. कारण मनसोक्त खेळ व तदनंतर स्वादिष्ट दुग्ध प्राशन असा तो योग असे. सर्व एकत्रित झाले की, मोठी मंडळी कामे वाटून घेई. चुलीची पुजा झाल्यावर मग दूध घोटायला सुरुवात होत असे. दूध घोटण्याच्या आधी भुईमुगाच्या शेंगा भाजल्या जात. सोबतीला मिरच्या सुद्धा असत. मग भुईमुगाचे शेंगदाणे, सोबत गुळ असे हिमोग्लोबिन वर्धनास सहाय्यकारी असणारे पौष्टिक खाद्य खाण्याचा सोपस्कार होई. दुसरीकडे पुरुष मंडळी दूध घोटायला बसत. दूध घोटण्यामध्ये माझ्या वडीलांचा पुढाकार असे त्यांचे दुधात काजू, बदाम, किसमिस असा सुकामेवा टाकण्याचे प्रमाण ठरलेले असे. काजू, बदाम ते भुकटी करून दुधात टाकत. दुधात चारोळी टाकलेली मात्र त्यांना आजही आवडत नाही. दूध घोटणे सुरु झाले की, आम्ही लहान मुले खूप खेळत सुद्धा असू त्या काळामध्ये मोबाईल किंवा गाणे बजावणे या तत्सम गोष्टी नव्हत्या म्हणून एकमेकांशी संवाद चांगल्या पद्धतीने साधला जायचा. सर्वजण नाना विषयांवर चर्चा करायचे आणि एकत्रितपणाची भावना वृद्धिंगत व्हायची. कढईमध्ये चंद्राचा प्रकाश पडला व दूध आटले की मग त्या दुधाचा नैवेद्य दाखवल्यावर सर्वांना वितरण होई. एका पेल्यानंतर आपापल्या क्षमतेनुसार कोणी दोन तर कोणी तीन/ चार पेले दूध प्राशन करीत असे. दूध प्राशन करताना कोणी चित्रपटांचे संवाद, विनोद व ज्याला जी कला सादर करता येई तो ती कला सादर करत असे. ताण, तणाव मुक्त आरोग्यदायी असे ते दिवस होते. 90 च्या दशकापर्यंत माझे वडील व त्यांच्या मित्र मंडळीचा हा कोजागिरीचा उपक्रम सुरू होता. त्यानंतर मात्र का कोण जाणे पण नवीन पिढीच्या व्यस्ततेमुळे व त्या व्यस्ततेेने नित्य संपर्क होत नसल्याने ते कोजागिरी साजरी करणे बंद झालेे. त्याकाळी बालक असलेलो आम्ही सर्व तरुण झालो होतो, काहींची लग्ने सुद्धा झाली होती, भगिनींचे विवाह होऊन त्या परगांवी गेल्या होत्या. वडील मंडळींच्या नेतृत्वात कोजागिरी करणा-या आम्हाला आता नवीन मित्र मंडळी जोडल्या गेल्यामुळे कदाचित पुर्वीसारखी रुची सुद्धा येत नसावी. बरे तसे म्हटले तर जुन्यातला, बालपणीच्या त्या मैत्रीतील गोडवाही कमी झाला नव्हता पण तरीही पुढे आमची कोजागिरी मात्र बंद झाली. आजच्या धकाधकीच्या जीवनामुळे व्यस्त झालेलो आम्ही तरुण आमच्या सर्वांचे वडील जसे नित्यनेमाने भेटत तसे भेटेनासे झालो. तरीही आमच्या वडील मंडळींची कंपनी (ते त्यांच्या मित्र मंडळीच्या गृपला आजही कंपनी असे संबोधतात.) जशी कोजागिरी साजरी करत तशी कोजागिरी आम्ही पुनरुज्जीवीत करण्याचा प्रयत्न केला होता खरा परंतु त्या कोजागिरी एकत्रीकरणास आम्ही बालपणी अनुभवलेल्या कोजागिरीची सर मात्र काही येऊ शकली नाही. हल्ली कोजागिरीची प्रथा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. दूध सुद्धा पुर्वीसारखे शुद्ध राहिलेले नाही त्यामुळे कितीही घोटा त्यास काही चव येत नाही. आताच्या लहान मुलांना दूध आवडेनासे झाले आहे. भुईमुगाचा पेरा कमी झाला त्यामुळे बाजारपेठेत भुईमूग सुद्धा हल्ली अभावाने दिसतो व त्यामुळे कोजागिरीत आता फरसाण, पावभाजी व तत्सम जंक फुडचा शिरकाव झाला आहे. नवरात्र संपल्यानंतरची ही पौर्णिमा, असे म्हणतात की त्या दिवशी देवी लक्ष्मी ही सर्वत्र संचार करत असते आणि "को जागृत" असे म्हणत असते को जागृत ? अर्थात कोण जागे आहे ? आणि या दिवशी जे लोक जागी असतात त्यांना ती प्रसन्न होत असते असे हिंदू संस्कृतीत मानले जाते. आपले भारतीय सण, परंपरा, उत्सव हे अनोखे असे आहेत यानिमित्ताने आपण सारे एकत्रित येत असतो हे सर्व उत्सव, सण, परंपरा, रुढी, प्रथा या टिकल्या पाहिजेत, आपल्या नवीन पिढीला याची माहिती देणे जरुरी आहे, त्यांचे महत्व सांगणे जरुरी आहे. आज शहरात राहू लागलेल्या MNC मध्ये नोकरी करणा-या दाम्पत्त्यांना पगार गलेलट्ठ जरी असला तरी आपल्या हिंदू संस्कृतीतील उत्सव मात्र म्हणावे तसे साजरे करता येत नाही. त्यातही  वेळात वेळ काढून उत्सव साजरे करणारे काही सन्मानीय लोक आजही नक्कीच आहेत. आज भुलाबाई उत्सव अगदी बोटावर मोजता येईल एवढ्या घरातून साजरा होतो. आपले सण, उत्सव हे लुप्त झाले नाही पाहिजे ते टिकले पाहिजे व त्यासाठी थोडक्यात, छोट्या का प्रमाणात होईना पण पण आपण आपल्या घरी अंगणात किंवा गच्चीवर दूध आटवले पाहिजे व नैवेद्य दाखवून त्याचे प्राशन करायला पाहिजे. 
     एव्हाना मी घरी पोहचलो होतो, थोड्यावेळाने सुपुत्र क्लास वरून आले. सौ. ने दूध आटवण्याची तयारी केली होती, दूध चांगले आटून झाले. ते स्वादिष्ट दूध पिल्यावर तृप्तीचा ढेकर दिला. दूध प्राशन करतांना माझ्या डोळ्यासमोर ती आपल्या कुटुंब व बालगोपालांसह कोजागिरी साजरी करणारी निस्वार्थी, जीवाला जीव देणारी, एकमेकांची टर उडवणारी पण तरीही एकमेकांवर नाराज न होणारी विविध जाती, भाषा, पंथाची माझ्या वडीलांची मित्र मंडळी पुन्हा पुन्हा येत होती. वडील, मी, मुलगा व सौ. असे चौघेच कोजागिरीचे दूध पित होतो. एक वो भी दिवाली थी, एक ये भी दिवाली है असे एक जुने गीत टीव्ही वरील जुन्या गाण्यांच्या कार्यक्रमात सुरु होते. ते ऐकून मला पण एक वो भी कोजागिरी थी, एक ये भी कोजागिरी है असे वाटले व लक्ष्मी देवीस मनोमन नमन करून मी निद्रादेवीच्या स्वाधीन झालो.


४ टिप्पण्या: