चिल्ला-ए-कलां
परवाच्या एका स्थानिक वृत्तपत्रांमध्ये "चिलाई कालान" नावाच्या हवामानाबाबतच्या अंदाजाचे वृत्त वाचले. खामगावचे हवामान तज्ञ व आमचे ज्येष्ठ नागरिक मित्र श्री प्रकाशभाई पारेख हे हवामान तज्ञ असून त्यांनी केलेले हवामानाचे अनेक अंदाज हे खरे ठरलेले आहेत. प्रकाशभाई पारेख वय वर्षे 74 परंतु या वयातही त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. इंग्रजी संभाषण, हवामान अभ्यास व इतरही अनेक नवीन बाबी शिकण्यास ते नेहमी तत्पर असतात. मागच्या आठवड्यात त्यांनी 21 डिसेंबर पासून चाळीस दिवसापर्यंत खूप थंडी राहील असे भाकीत केले होते त्याचेच ते "चिलाई कालान" शीर्षक असलेले हवामानाबाबतच्या अंदाजाचे वृत्त होते. आणि खरोखरच पारेखजींच्या या भाकीताची जाणीव कालपासूनच झाली. काल म्हणजे 20 डिसेंबर पासून थंडी वाढल्याचे दिसून येत आहे. अकोला, नागपूर, अमरावती, वाशीम, यवतमाळ सर्वच जिल्हे गारठले आहेत. यवतमाळचे कालचे तापमान तर 8.5 इतके कमी होते. परंतु या शीत काळात मला मात्र जिज्ञासा लागली होती ती त्या वृत्तपत्राच्या शीर्षकात असलेल्या "चिलाई कालान" या शब्दाची. म्हणून "चिलाई कालान" चा शोध मी घेऊ लागलो. तसे तर "चिलाई कालान" वाचल्यावर थोडा अंदाज मात्र मी माझ्या मनानी काढला होता. इंग्रजी मधले "चिल" अर्थात थंड आणि संस्कृत मधले काल असा काहीतरी दोघांचे मिळून चिलाई कालान म्हणजे थंडीचा काळ असा तो शब्द असावा असे मला वाटले होते. परंतु चिलाई कालान हे आपल्या अंदाजाप्रमाणे नसून काहीतरी वेगळे असावे असेही कुठेतरी वाटत होते. म्हणून चिलाई कालानबद्दलचा शोध मी घेऊ लागलो. तेंव्हा "चिल्ला-ए-कलां" हा अति थंडीसाठी असलेला फारसी शब्द असल्याचे सापडले. तसे फारसी भाषेतील बरेचसे शब्द भारतामध्ये वापरले जातात. "जिहाले मस्कीन मुकुन बरंजीस" हे एका गाजलेल्या हिंदी चित्रपट गीतातील शब्द हे सुद्धा फारसी भाषेतील आहेत. असो ! तर चिलाई कालान हा फारसी शब्द म्हणजे अति थंडी असा होतो. दरवर्षी 21 डिसेंबर ते 29 जानेवारीपर्यंत काश्मीरमध्ये कडाक्याच्या थंडीचा काळ असतो. या 40 दिवसाच्या कडाक्याच्या थंडीला "चिल्ला-ए-कलां" असे म्हटले जाते. याच शब्दाचा अपभ्रंश पुढे चिलाई कालान असा झाला. त्याप्रमाणे काश्मीरमध्ये आता कडाक्याची थंडी आहे व त्यामुळेच आपल्या भागात सुद्धा कडाक्याची थंडी राहणार आहे. पुर्वी दिवाळीत मोठी थंडी राहात असे. दिवाळीत अभ्यंग स्नान आणि इतर विधींसाठी सकाळी लवकर उठणे सुद्धा जीवावर येत असे. त्या गारठलेल्या पहाटे बच्चे कंपनीस सुद्धा शाळा, शिकवणी आदींना जाणे नकोसे वाटते. परंतु यंदा डिसेंबर अर्ध्यावर गेला तरी थंडी नव्हती. ऋतुचक्र बदलल्याचे हल्ली नेहमीच जाणवते. पावसाळा उशीरा आला, हिवाळा सुद्धा उशिरा आला. उन्हाळा मात्र लवकर येतो. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे सारे बदल होत आहेत. आपल्या वैदर्भीयन लोकांना मात्र प्रतीक्षा असते ती "थंडी गुलाबी ,हवा ही शराबी" अशा हिवाळ्याची. विदर्भ खूप तापतो , म्हणून येथील तमाम जनतेला हा गारवा मोठा आल्हाददायी वाटतो. येथील जनतेला हिवाळा हवाहवासा वाटतो. आता 20 डिसेंबर पासून असा तो प्रतिक्षित "चिल्ला-ए-कलां" अर्थात बोचरा हिवाळा आता सुरू झाला आहे. समस्त नागरिकांनी आता या "चिल्ला-ए-कलां" चा आनंद घ्यावा, आपल्या प्रकृतीची सुद्धा काळजी घ्यावी, गरम चहाचा आस्वाद घ्यावा, उबदार कपडे जे आपल्याला कमी घालायला मिळतात त्या कपड्यांची हौस भागवून घ्यावी, पौष्टिक डिंकाच्या लाडूसारख्या हिवाळ्यातील पदार्थांचा आस्वाद घ्यावा आणि हा "चिल्ला-ए-कलां" आनंदात व्यतीत करावा.