Click "Follow" Button below To Follow this Blog

२६/०१/२०२४

Article about the celebration after Ram Mandir inauguration at Ayodhya

अनुपम्य सुख सोहळा

कणखर नेतृत्व असलेले , संख्याबळ असलेले सरकार असल्याने हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. 22 जानेवारी ही तारीख जगाच्या इतिहासात नोंदली गेली.

खरे तर तुकाराम महाराजांच्या अभंगातील अनुपम्य सुख सोहळा या ओळीचा शीर्षकात म्हणून आज दुस-यांदा वापर करीत आहे. हेच शिर्षक असलेला लेख जेंव्हा संभाजीनगर येथील रामकृष्ण मिशन मंदिराचे उद्घाटन झाले होते तेंव्हा लिहिला होता आणि आज अयोध्या राम मंदिराचे लोकार्पण झाल्यावर व समस्त भारतीयांची स्वप्नपुर्ती झाल्यावर लिहीत असलेल्या या लेखाच्या शीर्षकात सुद्धा त्याच ओळीचा वापर करावासा वाटला. कारण संपूर्ण भारतात ज्याला खरेच कशाचीही उपमा देता येऊ शकत नाही असा अनुपम्य सोहळा राम मंदिर लोकार्पण होतांना देशभर साजरा झाला. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे गेल्या पाचशे वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या, देशवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या राम मंदिराचे भव्य लोकार्पण झाले. मंदिर बनायेंगे पर तारीख नही बतायेंगे असे हिणवणाऱ्या लोकांना सुद्धा 22 जानेवारी ही लोकार्पणाची तारीख ज्ञात झाली होती. बरोबर त्याच दिवशी मुहूर्ताच्या वेळी राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. टेन्ट मध्ये राहणा-या प्रभू रामाला मंदिर मिळाले. देशभर यानिमित्ताने विपुल लिखाण, माहिती, राम मंदिराचा इतिहास, मंदिराबद्दलची माहिती लोकांनी एकमेकांना पाठवली. सगळीकडे कसा आनंदी आनंद झाला. आनंदाचे डोही आनंद तरंग असे सर्वांचे झाले व 22 जानेवारीला देशभरात मोठा उत्सव साजरा झाला सर्व लोक उत्साहात होते. राम नामाचा काय महिमा आहे हे या दिवशी सर्वांना कळून चुकले. अयोध्या, देशभरातील शहरे व ग्रामीण भाग आनंदाने, उत्साहाने, श्री रामप्रभूंवरील प्रेमाने भारावून गेले होते. खेडी शहरातील अनुपम्य सुख सोहळा असे म्हणण्याचे कारण हेच. याच खेडेगावांमधील एक गाव म्हणजे निपाणा.


बुलढाणा जिल्ह्यातील निपाणा या गावात साजरा झालेल्या 22 जानेवारी या दिवसाचे उदाहरण इथे सांगावेसे वाटते. खामगाव तालुक्यातील निपाणा या छोट्याशा गांवात नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. 22 जानेवारीला या गावातील लोकांनी ग्रामभोजन देण्याचे ठरवले होते आणि या भोजनात मिष्टांन्न म्हणून हरभऱ्याच्या डाळीचे लाडू वाटप करण्याचे ठरवले होते. त्या अनुषंगाने घरोघरी अर्धा किलो लाडू बनवून आणण्याचे सांगण्यात आले. सर्व घरी लाडू बनू लागले व  भोजनाच्या नियोजित वेळेच्या आधी जेंव्हा नागरिकांनीच बनवलेले हे लाडू जमा करण्यासाठी म्हणून आणले गेले तेव्हा हे लाडू अपेक्षेपेक्षाही अधिक जमा झालेले दिसले. प्रत्येक घरी अर्धा किलो लाडू बनवण्याचे आवाहन केले होते तरी प्रत्येक घरी एक ते दोन किलो लाडू बनवल्या गेले. गावातील 100 टक्के घरात लाडू बनवले गेले. ग्रामस्थांना एकूण दोन क्विंटल लाडू बनतील अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात मात्र पाच क्विंटल लाडू जमा झाले. या लाडूंचे भोजनासोबत प्रसाद म्हणून वितरण करण्यात आले. सर्व ग्रामस्थांनी मिळून शोभायात्रा काढली सर्व ग्रामस्थांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या, झेंडे ,पताका, दिवे लावले गेले ज्याला जे शक्य होते ते सर्व या ग्रामस्थांनी केले. निपाणा गावाजवळील भालेगांव

या गावात सुद्धा असाच उत्साह दिसून आला. निपाणा व भालेगाव या दोन खेडेगावांप्रमाणे भारतातल्या इतर सर्व खेडे, शहरांत याचप्रकारे राम मंदिर लोकार्पणाचा आनंदोत्सव साजरा झाला. 

खेडोपाडी अल्पउत्पन्न असलेली, सर्वसामान्य जनता राहत असली तरी रामावरील प्रेमापोटी, बहुप्रतिक्षित राम मंदिर निर्मितीच्या आनंदा पोटी त्यांनी हात आखडता घेतला नाही ही बाब अस्सल भारतीयत्व काय आहे हे स्पष्ट करणारी आहे. अयोध्या येथे मान्यवरांनी दिलेली भाषणे सुद्धा खूप प्रभावी होती राम नामातील ऊर्जा, भारताचे स्वत्व, राम मंदिराचा महिमा, स्थान हे सर्व सांगणारी सर्वच मान्यवरांची भाषणे दीर्घकाळपर्यंत लक्षात राहतील अशीच होती. समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे वर्णन केले त्याच "निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारु..." या शब्दांत गोविंदगिरी महाराज यांनी नरेंद्र मोदी यांचे वर्णन केले ते सुद्धा सर्वांना आवडेल व मोदींना सुद्धा शोभेल असेच होते. राम मंदिर लोकार्पणाचा आनंदोत्सव जल्लोषात साजरा होण्यासाठी सर्वांना जणू त्यांच्या हृदयातील अंतस्थ रामानेच प्रेरणा दिलेली दिसली. या उत्सवामुळे रामावर भारतीयांचे किती प्रेम, किती श्रद्धा आहे हे जगाला दिसून आले. काही लोक मंदिर, देव आदी गोष्टींना सतत नाके मुरडत असतात, हकनाक दोष देत असतात त्यांना इथे सांगावेसे वाटते की अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण प्रसंगी भारतभर सव्वा लाख कोटी रुपयांचा व्यवहार झाला. या व्यवहारात करोडो लघु व्यवसायिकांचा फायदा झाला. एकट्या दिल्लीत 40 हजार कोटींची उलाढाल झाली. विद्युत रोषणाई, पणत्या, भगवे झेंडे अशा लहान लहान वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री झाली. एका मंदिरामुळे एवढी मोठी उलाढाल होण्याची हि पहिलीच वेळ होती. राम मंदिर लोकार्पणाची दृश्ये सर्वांना पाहायला मिळावी म्हणून चौका-चौकात मोठे दृक श्राव्य माध्यम, भले मोठे पडदे लावले होते. अयोध्येला अनेक संत, महात्मे, दिग्गज, नामांकित लोक, अभिनेते, उद्योगपती, सामान्य नागरीक यांची मांदियाळीच झाली होती. एकूणच कणखर नेतृत्व असलेले, मोठे संख्याबळ असलेले सरकार असल्याने हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. 22 जानेवारी हि तारीख जगाच्या इतिहासात नोंदली गेली व अयोध्या नगरीत रामलल्लाचे आगमन, त्या प्रित्यर्थ झालेला हा सोहळा संत जसे वर्णन करतात तसाच  अनुपम्य सुख सोहळा ठरला.

०४/०१/२०२४

Article about deaths of youths due to cardiac problem

 दिलका हाल सुने दिलवाला....  


  पुर्वी लोक व्यक्त होत, आपल्या समस्या एकमेकांना सांगून त्या हलक्या करीत परंतू आता तसे नाही. दिलका हाल सुने दिलवाला असे  दिलका हाल सांगणा-या व ऐकणा-या दिलवाल्या लोकांची संख्या वृद्धिंगत झाली तर कदाचित हृदयरोग , cardiac attack सुद्धा कमी होतील असे वाटते. 

गतकाही दिवसात हृदयविकाराच्या झटक्याने काही तरुणांच्या निधनाच्या दुःखद वार्ता कानावर पडल्या. हे तरुण चांगले परिचित होते, लहानपणापासून त्यांना पाहात आलेलो आहे शिवाय त्यांच्या निधनाच्या काही दिवस आधीच शहरात त्यांचे दर्शन सुद्धा झाले होते. पण अचानक ते इहलोक सोडून गेल्याची वार्ता कानी पडल्यामुळे धक्का बसला शोक झाला. वयाच्या पन्नाशीच्या आतील हे लोक होते. हृदयविकाराला आता वयाचे सुद्धा बंधन उरले नाही. आजच्या या धकाधकीच्या व ताण- तणावाच्या जीवनांत, प्रदूषणयुक्त काळात निरनिराळे आजार, व्याधी जडत आहेत. जराही वातावरण बदलले तर मुले आजारी ! , “व्हायरल” म्हणून डॉक्टर सांगतात. जगणे कठीण गुंतागुंतीचे झाले आहे. मनुष्य आहे त्यापेक्षा अधिकच्या लालसेत, भौतिक सुखाच्या मोहात स्वत:वर ताण-तणाव ओढवून घेत आहे? ( हे सार्वत्रिक विधान आहे उपरोक्त तरुणही असेच होते या अर्थाने कृपया घेऊ नये) रुग्णांची, मानसिक रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. मधुमेह, कर्करोग, हृदयरोग रक्तदाब, यांच्या संख्येत सुद्धा झपाट्याने वाढ होत आहे. हृदयाला रक्त पुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांत रक्तरोध होत आहे. हृदयरोगी व हृद्यविकार असलेले कित्येक रुग्ण आहेत. कित्येकांना हृदयविकाराचे झटके येऊन गेले आहेत. श्रेयस तळपदे या अभिनेत्यावर नुकताच हृदयोपचार झाला. आज चांगला धडधाकट दिसणारा, नियमित दैनंदिनी पाळणारा, नियमित व कमी आहार घेणारा, व्यायाम वगैरे सर्व करणारा व ज्याने वयाची पन्नाशीही पार केलेली नसते अशा व्यक्तीच्या हृद्यविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधनाची वार्ता समाजात पसरते तेंव्हा सर्व जनांना तीव्र वेदना होते, हळहळ वाटते. का हा हृदयरोग इतका बळावला आहे? का अल्पायुषी व्यक्ती हृदयरोगाने निधन पावत आहेत? याचे उत्तर कुणी हृदयरोग तज्ञच देऊ शकेल. तुम्ही-आम्ही काही वैद्यकीय क्षेत्रातील माहिती असलेले, शरीरशास्त्राची माहिती असलेले तज्ञ नाही. परंतू तरीही आपल्या हृदयाची काळजी मात्र थोड्या बहुत प्रमाणात घेता येऊ शकते. खाणे-पिणे कसे असले पाहिजे हे आपण आहारतज्ञा कडून समजून घेऊ शकतो, व्यायामाची माहिती निष्णातांकडून मिळवू शकतो व आपल्या हृदयाची काळजी घेऊ शकतो परंतू असे करूनही हृदयविकार असलेले किंवा हृदयविकाराचे झटके आलेले व त्याने हानी झालेले लोक आपण सर्वानीच पाहिले आहेत. मग याच्यावर उपाय तो काय? तर खालील गोष्टींकडे सर्वच दुर्लक्ष करतांना दिसतात. त्या म्हणजे आपले मानसिक आरोग्य सुदृढ हवे, आपली वर्तणूक, आपण कसे वागतो आहोत? याचा सुद्धा आपण विचार करणे जरुरी असते. कुठे काही चुकते आहे का? आपल्या काही अडचणी आपण कुणाजवळ व्यक्त करतो आहे की नाही? आपल्यामागे अनेक चिंता आहेत का किंवा आपण चिंता, व्याप वाढवले आहेत का? या सर्वांची उत्तरे जर होकारार्थी असतील तर मधुमेह, रक्तदाब किंवा हृदयरोग यांसारख्या व्याधी जडण्याची शक्यता बळावते. यासाठी आपण आपल्या हृदयाची हाक ऐकली पाहिजे. मुळात आपले हृदय जर शांत असेल प्रेमळ असेल हृदयात सर्वांप्रती आपुलकी, प्रेम भावना असेल, ते निकोप असेल तर अशा “दिल”वाल्याला कदाचित झटका येणार नाही. सद्यस्थितीतील बदललेले जग, बदललेले सामाजिक व कौटुंबिक संबंध, वाढणा-या चिंता, मुलांच्या समस्या, आर्थिक परिस्थिती, आर्थिक विषमता, साधी राहणी सोडून सुख-चैन मिळवण्यासाठीची धडपड, इतरांकडे जे आहे ते मला सुद्धा हवेच अशी वाढती भावना या सर्वांचा नक्कीच आपल्या शरीरावर मुख्यत: आपल्या हृदयावर आघात होत असावा. हल्ली व्यायामाचे महत्व , योगासनांचे महत्व सर्वांना पटले आहे. सकाळ-संध्याकाळ व्यायाम करणारे लोक खूप दिसतात. परंतू “दिल को कौन संभाले?” अर्थात आपल्या मनाचे, आपल्या हृदयाचे आरोग्य कसे राखणार? लोक शरीर तंदुरुस्त ठेवत आहे परंतू मनाचे आरोग्य मात्र ढळत आहे पूर्वी लोक व्यक्त होत, आपल्या समस्या एकमेकांना सांगून त्या हलक्या करीत परंतू आता तसे नाही. कुणाला कुणासाठी वेळ नाही. जवळचे लोक दुरावत चालले आहे. अनेक लोक आतल्या आत कुढत बसतात. अनेक लोकांना गोष्टी लपवून ठेवण्याची खोड असते, अकारण भीतीपोटी ते असत्याचा आधार घेतात नंतर त्यांना ते स्मरणात ठेवावे लागते. याचा सुद्धा शरीरावर कुठेतरी परिणाम होत असतो. जाणते-अजाणतेपणी एखादी चूक घडते व नंतर त्या चुकीमुळे त्याचे मन त्याला खात असते. त्याच्या हृदयावर या बाबींचा नक्कीच परीणाम होतो व मधुमेह, रक्तदाब हृदयरोगासारख्या व्याधी त्याच्या शरीरावर हल्ला चढवतात. हल्लीच्या जीवनशैलीने मानवी हृदयात वागणूक, नाना प्रकारच्या चिंता, तणाव अनेक भावनांची गुंतागुंत झाली आहे. आपले हृदय आपल्याला आवाज देत असते की मनाची कवाडे उघडी ठेव, आनंदी वृत्तीने वाग, क्रोधाला लगाम घाल, जगाला प्रेम दे, सत्याची कास धर, पैश्याचा हव्यास टाळ, हृदयावरील भार हलका कर, जवळच्या व्यक्तींमध्ये वाढ कर, दुरावा कमी कर, कुणा जवळ तरी अगदी प्रांजळपणे व्यक्त हो, चांगले वाचन कर, मनाला आनंद शांती देणारे संगीत श्रवण कर. आपल्या ह्रदयाची ही साद, अशी “दिल की आवाज” जर आपण ऐकली व व्देष, मत्सर, ताण, रुसवे-फुगवे, मोह-माया, लोभ यांचा त्याग करण्याचा प्रयत्न केला व  दिलका हाल सुने दिलवाला असे  दिलका हाल सांगणा-या व ऐकणा-या दिलवाल्या लोकांची संख्या आपल्या सभोवती आपण वृद्धिंगत केली तर कदाचित हृदयरोग , cardiac attack सुद्धा कमी होतील असे वाटते. 
(एका जुन्या स्वलिखित लेखाची सुधारित आवृत्ती)