दिलका हाल सुने दिलवाला....
पुर्वी लोक व्यक्त होत, आपल्या समस्या एकमेकांना सांगून त्या हलक्या करीत परंतू आता तसे नाही. दिलका हाल सुने दिलवाला असे दिलका हाल सांगणा-या व ऐकणा-या दिलवाल्या लोकांची संख्या वृद्धिंगत झाली तर कदाचित हृदयरोग , cardiac attack सुद्धा कमी होतील असे वाटते.
गतकाही दिवसात हृदयविकाराच्या झटक्याने काही तरुणांच्या निधनाच्या दुःखद वार्ता कानावर पडल्या. हे तरुण चांगले परिचित होते, लहानपणापासून त्यांना पाहात आलेलो आहे शिवाय त्यांच्या निधनाच्या काही दिवस आधीच शहरात त्यांचे दर्शन सुद्धा झाले होते. पण अचानक ते इहलोक सोडून गेल्याची वार्ता कानी पडल्यामुळे धक्का बसला शोक झाला. वयाच्या पन्नाशीच्या आतील हे लोक होते. हृदयविकाराला आता वयाचे सुद्धा बंधन उरले नाही. आजच्या या धकाधकीच्या व ताण- तणावाच्या जीवनांत, प्रदूषणयुक्त काळात निरनिराळे आजार, व्याधी जडत आहेत. जराही वातावरण बदलले तर मुले आजारी ! , “व्हायरल” म्हणून डॉक्टर सांगतात. जगणे कठीण गुंतागुंतीचे झाले आहे. मनुष्य आहे त्यापेक्षा अधिकच्या लालसेत, भौतिक सुखाच्या मोहात स्वत:वर ताण-तणाव ओढवून घेत आहे? ( हे सार्वत्रिक विधान आहे उपरोक्त तरुणही असेच होते या अर्थाने कृपया घेऊ नये) रुग्णांची, मानसिक रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. मधुमेह, कर्करोग, हृदयरोग रक्तदाब, यांच्या संख्येत सुद्धा झपाट्याने वाढ होत आहे. हृदयाला रक्त पुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांत रक्तरोध होत आहे. हृदयरोगी व हृद्यविकार असलेले कित्येक रुग्ण आहेत. कित्येकांना हृदयविकाराचे झटके येऊन गेले आहेत. श्रेयस तळपदे या अभिनेत्यावर नुकताच हृदयोपचार झाला. आज चांगला धडधाकट दिसणारा, नियमित दैनंदिनी पाळणारा, नियमित व कमी आहार घेणारा, व्यायाम वगैरे सर्व करणारा व ज्याने वयाची पन्नाशीही पार केलेली नसते अशा व्यक्तीच्या हृद्यविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधनाची वार्ता समाजात पसरते तेंव्हा सर्व जनांना तीव्र वेदना होते, हळहळ वाटते. का हा हृदयरोग इतका बळावला आहे? का अल्पायुषी व्यक्ती हृदयरोगाने निधन पावत आहेत? याचे उत्तर कुणी हृदयरोग तज्ञच देऊ शकेल. तुम्ही-आम्ही काही वैद्यकीय क्षेत्रातील माहिती असलेले, शरीरशास्त्राची माहिती असलेले तज्ञ नाही. परंतू तरीही आपल्या हृदयाची काळजी मात्र थोड्या बहुत प्रमाणात घेता येऊ शकते. खाणे-पिणे कसे असले पाहिजे हे आपण आहारतज्ञा कडून समजून घेऊ शकतो, व्यायामाची माहिती निष्णातांकडून मिळवू शकतो व आपल्या हृदयाची काळजी घेऊ शकतो परंतू असे करूनही हृदयविकार असलेले किंवा हृदयविकाराचे झटके आलेले व त्याने हानी झालेले लोक आपण सर्वानीच पाहिले आहेत. मग याच्यावर उपाय तो काय? तर खालील गोष्टींकडे सर्वच दुर्लक्ष करतांना दिसतात. त्या म्हणजे आपले मानसिक आरोग्य सुदृढ हवे, आपली वर्तणूक, आपण कसे वागतो आहोत? याचा सुद्धा आपण विचार करणे जरुरी असते. कुठे काही चुकते आहे का? आपल्या काही अडचणी आपण कुणाजवळ व्यक्त करतो आहे की नाही? आपल्यामागे अनेक चिंता आहेत का किंवा आपण चिंता, व्याप वाढवले आहेत का? या सर्वांची उत्तरे जर होकारार्थी असतील तर मधुमेह, रक्तदाब किंवा हृदयरोग यांसारख्या व्याधी जडण्याची शक्यता बळावते. यासाठी आपण आपल्या हृदयाची हाक ऐकली पाहिजे. मुळात आपले हृदय जर शांत असेल प्रेमळ असेल हृदयात सर्वांप्रती आपुलकी, प्रेम भावना असेल, ते निकोप असेल तर अशा “दिल”वाल्याला कदाचित झटका येणार नाही. सद्यस्थितीतील बदललेले जग, बदललेले सामाजिक व कौटुंबिक संबंध, वाढणा-या चिंता, मुलांच्या समस्या, आर्थिक परिस्थिती, आर्थिक विषमता, साधी राहणी सोडून सुख-चैन मिळवण्यासाठीची धडपड, इतरांकडे जे आहे ते मला सुद्धा हवेच अशी वाढती भावना या सर्वांचा नक्कीच आपल्या शरीरावर मुख्यत: आपल्या हृदयावर आघात होत असावा. हल्ली व्यायामाचे महत्व , योगासनांचे महत्व सर्वांना पटले आहे. सकाळ-संध्याकाळ व्यायाम करणारे लोक खूप दिसतात. परंतू “दिल को कौन संभाले?” अर्थात आपल्या मनाचे, आपल्या हृदयाचे आरोग्य कसे राखणार? लोक शरीर तंदुरुस्त ठेवत आहे परंतू मनाचे आरोग्य मात्र ढळत आहे पूर्वी लोक व्यक्त होत, आपल्या समस्या एकमेकांना सांगून त्या हलक्या करीत परंतू आता तसे नाही. कुणाला कुणासाठी वेळ नाही. जवळचे लोक दुरावत चालले आहे. अनेक लोक आतल्या आत कुढत बसतात. अनेक लोकांना गोष्टी लपवून ठेवण्याची खोड असते, अकारण भीतीपोटी ते असत्याचा आधार घेतात नंतर त्यांना ते स्मरणात ठेवावे लागते. याचा सुद्धा शरीरावर कुठेतरी परिणाम होत असतो. जाणते-अजाणतेपणी एखादी चूक घडते व नंतर त्या चुकीमुळे त्याचे मन त्याला खात असते. त्याच्या हृदयावर या बाबींचा नक्कीच परीणाम होतो व मधुमेह, रक्तदाब हृदयरोगासारख्या व्याधी त्याच्या शरीरावर हल्ला चढवतात. हल्लीच्या जीवनशैलीने मानवी हृदयात वागणूक, नाना प्रकारच्या चिंता, तणाव अनेक भावनांची गुंतागुंत झाली आहे. आपले हृदय आपल्याला आवाज देत असते की मनाची कवाडे उघडी ठेव, आनंदी वृत्तीने वाग, क्रोधाला लगाम घाल, जगाला प्रेम दे, सत्याची कास धर, पैश्याचा हव्यास टाळ, हृदयावरील भार हलका कर, जवळच्या व्यक्तींमध्ये वाढ कर, दुरावा कमी कर, कुणा जवळ तरी अगदी प्रांजळपणे व्यक्त हो, चांगले वाचन कर, मनाला आनंद शांती देणारे संगीत श्रवण कर. आपल्या ह्रदयाची ही साद, अशी “दिल की आवाज” जर आपण ऐकली व व्देष, मत्सर, ताण, रुसवे-फुगवे, मोह-माया, लोभ यांचा त्याग करण्याचा प्रयत्न केला व दिलका हाल सुने दिलवाला असे दिलका हाल सांगणा-या व ऐकणा-या दिलवाल्या लोकांची संख्या आपल्या सभोवती आपण वृद्धिंगत केली तर कदाचित हृदयरोग , cardiac attack सुद्धा कमी होतील असे वाटते.
(एका जुन्या स्वलिखित लेखाची सुधारित आवृत्ती)
खूपच छान लिहील
उत्तर द्याहटवाSuper 💓
उत्तर द्याहटवाछान, हलकं, फुलकं!
उत्तर द्याहटवाKhup chhan
उत्तर द्याहटवा