हॅप्पी मराठी डे
या आधीचा लेख हा 17 जानेवारीला लिहिला होता परंतु त्यानंतर विविध कामांमध्ये व्यस्त झालो आणि महिनाभर काही लेखन झाले नाही. खरे तर रामदास स्वामींनी सांगितल्याप्रमाणे, "दिसामाजी काहीतरी लिहीत जावे" यानुसार लिहायला तर पाहिजे होते पण शक्य झाले नाही. आज मराठी भाषा गौरव दिन आहे असे समाज माध्यमांवर आलेल्या संदेशांमुळे लक्षात आले आणि आजच्या या मराठी भाषा गौरव दिनाच्या अनुषंगाने आजपासून आपल्या लिखाणकामाचा शिरस्ता पुनश्च नियमित करावा असे मनात आले आणि लिहायला बसलो.
अनेक थोर संतांची परंपरा लाभलेल्या, साहित्यिकांची मांदियाळी असलेल्या महाराष्ट्रामध्ये मराठीची आता या लेखाच्या शीर्षकाप्रमाणेच गत झालेली दिसते. "माझ्या मराठीची बोलू कौतुके अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन" असे ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आणि मराठी भाषेची थोरवी, या भाषेचा गोडवा सांगितला. परंतु याच ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि इतर थोर संतांच्या महाराष्ट्रात आज मराठीची दैना कशी झाली आहे हे आपण सर्व पाहतच आहोत. मराठी भाषिक महाराष्ट्रात 1990 च्या दशकापासून इंग्रजी शाळांचा सुळसुळाट सुरू झाला. थोर लहान सर्वांनाच आपल्या पाल्याला फाडफाड इंग्रजी आले पाहिजे आणि इंग्रजी भाषा बोलता आली म्हणजे तो हुशार झाला या भावने पोटी इंग्रजी शाळांमध्ये दाखला मिळवून देण्याची एक फॅशनच सुरू झाली. मराठी शाळा ओस पडू लागल्या आणि कॉन्व्हेन्ट मध्ये मात्र भरमसाठ फी आणि देणग्या देऊनही प्रवेश क्षमतेपेक्षाही जास्त प्रवेश होऊ लागले. इंग्रजी शाळातून शिकून पुढे गेलेल्यांपैकी भावी जीवनात अत्युच्च गुणवत्ताधारक असे किती निर्माण झाले हाही एक संशोधनाचा विषय आहे किंवा असे संशोधन व्हायला पाहिजे. इंग्रजी शाळांमध्ये शिकून त्या विद्यार्थ्यांनी यशाचे अत्युच्च शिखर गाठो अथवा न गाठो किंवा त्यांना इंग्रजी येवो अथवा न येवो परंतु या इंग्रजी शाळातून शिकणाऱ्या मराठी भाषिक मुलांचे मराठी मात्र पुरते बिघडले. तसेच बहुतांश इंग्रजी शाळांमध्ये हिंदी भाषिक मुले व शिक्षक वृंद आहे त्यामुळे या इंग्रजी शाळांमध्ये शिकणाऱ्या मराठी मुलांचे मराठी हे इंग्रजी आणि हिंदी मिश्रित झालेले दिसते. अनेक मराठी विद्यार्थ्यांना मराठी मधील अंक कळत नाही त्यांना अंक हे इंग्रजीत सांगावे लागतात. तसेच मराठी बोलतांना त्यांच्या बोलण्यामध्ये पन्नास टक्के तरी हिंदी व इंग्रजी शब्द असतात. उदाहरणार्थ "अगर तू गेला तर" असे हल्लीचे मुलं बोलतांना दिसतात. मराठीमध्ये "जर तू गेला तर" असे म्हणण्याऐवजी ही मुले जर च्याऐवजी अगर वापरतांना दिसतात. एक कोकणी नेता सुद्धा जर म्हणण्याऐवजी अगर असा शब्दप्रयोग करतो. तसेच आणखी एक उदाहरण ज्याप्रमाणे आपण मराठीत "असं थोडी असते" असा शब्दप्रयोग करतो तर आता अनेक मराठी मुले "असं थोडीही ना असते" हे हिंदी भाषेतल्या "ऐसे थोडीही ना रहता है" याप्रमाणे बोलतांना दिसतात. अनेक वेळा दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात, सरकारी कामकाजात मराठी भाषेचा प्रयोग व्हावा असे मुद्दे उपस्थित केले जातात परंतु प्रत्यक्षात त्यावर कारवाई होतांना मात्र दिसत नाही. शिवाय आम्ही मराठी लोक आपल्या भाषेत बोलतांना आग्रही सुद्धा नसतो. बाजारात गेलो असता आपणच दुकानदाराशी फळ विक्रेत्याशी हिंदी भाषेत बोलायला सुरुवात करतो. प्रसंगी असेही आढळते की तो फळ विक्रेता किंवा दुकानदार हा सुद्धा मराठी असतो. रिक्षा ठरवतांना किंवा बस मध्ये वाहकासोबत ही आपण हिंदीतच संवाद सुरू करतो. आपण मराठी जन इतर भाषा सहज अंगीकृत करून घेतो आणि आपली माय भाषा मराठी मात्र साफ विसरून जातो. इतर भाषिक मात्र त्यांच्याच भाषेत बोलतांना आपल्याला दिसतात. इतर भाषिकांचे भाषा प्रेम हे मराठी भाषेच्या मातृभाषा प्रेमापेक्षा नक्कीच जास्त आहे असे वाटते. आज मराठी भाषा गौरव दिन आहे. प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच 'कुसुमाग्रज' यांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी २७ फेब्रुवारीला 'मराठी राजभाषा दिवस' साजरा केला जातो. आज आपण कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी मराठी भाषेचा अधिकाधिक वापर कसा होईल ?, इंग्रजी आणि हिंदी शब्द मराठी बोलतांना कसे वगळता येतील ?, मराठी वाचन अधिक कसे करता येईल ? यावर नक्कीच विचार करायला हवा. आपल्या नवीन पिढीला वाढदिवसाची भेट देतांना एखादे मराठी पुस्तक दिले पाहिजे. आज आंतरजालावर इतर भाषांच्या तुलनेत मराठी मधील लेख व माहिती ही अत्यल्प आहे त्यामुळे मराठी भाषेत लिखाण करून, काव्य करून ते समाज माध्यमातून अधिकाधिक प्रसारित करायला हवे हेच आज सांगावेसे वाटते. अन्यथा मग "हॅप्पी मराठी डे" सारखे इंग्रजाळलेले मराठी ऐकण्याचा, बोलण्याचा, वाचनाचा नाईलाजास्तव सराव करून घ्यावा लागेल.