Click "Follow" Button below To Follow this Blog

२५/०९/२०२५

Article about death, moksha etc.

 मोक्ष मिळवून देणारा मृत्यू

रामलीलेत दशरथाची भूमिका वठवणाऱ्या अमरेश महाजन यांचा दशरथाची भूमिका करतांनाच मृत्यू झाला. अमरेश महाजन हे तसे काही देशभर ओळखले जाणारे व्यक्ती किंवा अभिनेते नव्हते. पण तरीही ईश्वरी कार्य करतांना त्यांच्या मृत्यू झाला त्यामुळे त्या विषयी लिहावेसे वाटले.

     रामायणात राजा दशरथाचा शोकावस्थेत मृत्यू झाला होता. त्याच दशरथ राजाची रामलीलेत भूमिका करणाऱ्या अमरेश महाजन यांचा काल रामलीलेत अभिनय करतांनाच मृत्यू झाला. कोणाचा मृत्यू हा केव्हा आणि कसा होईल हे कोणालाही सांगणे अशक्य आहे. मृत्यूचे वर्णन अनेक लेखकांनी व कवींनी केलेले आहे. कुणी मृत्यूला कविता म्हटले आहे तर कुणी मृत्यूला एक गाढ निद्रा असे संबोधले आहे. रामदास स्वामींनी सुद्धा

एक मरे त्याचा  दुजा शोक वाहे 

अकस्मात तोही पुढे जात आहे 

असे मृत्यूबाबत म्हटले आहे. 

जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता

 राहील कार्य काय

ही भा. रा. तांबे यांची कविता सुद्धा प्रसिद्ध आहे. मृत्यूनंतर काहीही उरत नाही. सर्व नातेवाईक, मित्रमंडळी संपत्ती इथेच सोडून मनुष्य अंतिम प्रवासाला जातो. मनुष्याचा अंत होण्याच्या सुद्धा अनेक पद्धती आहेत. कुणी अपघाती मृत्यू पावतो, तर कुणी नैसर्गिकरित्या मृत्यू पावतो. हल्ली तर ताण तणाव आणि सकस अन्न खायला मिळत नसल्याने ऐन तारुण्यात सुद्धा अनेकांचे निधन होतांना आपण बघतच आहोत. अशाच एका मृत्यूची हिमाचल प्रदेशातील चंबा या ठिकाणची ही कथा आहे. या ठिकाणच्या रामलीलेमध्ये अमरेश महाजन नामक अभिनेते गेल्या चाळीस वर्षांपासून दशरथ राजाची भूमिका वठवतात. अमरेश महाजन हे तसे काही देशभर ओळखले जाणारे व्यक्ती किंवा अभिनेते नव्हेत. ते स्थानिक पातळीवरचे अभिनेते होते परंतु तरीही त्यांच्या मृत्यू बाबत लिहावेसे वाटले कारण की त्यांचे निधन हे ईश्वरा संबंधित कार्य म्हणजेच नाट्य म्हणजेच रामलीला  सुरू असतांना झाले आणि म्हणून त्याबाबत लिहिणे महत्वाचे वाटले. चंबा येथे  यंदाची रामलीला आयोजित झाली होती. लीला सुरू झाली दशरथ राजाच्या भूमिकेतील अमरेश महाजन आपली भूमिका वाठवू लागले, संवाद म्हणू लागले. अयोध्या नगरी, प्रजा यांविषयी त्यांची संवादफेक सुरू होती. आपल्या संवादात ते एका ठिकाणी भरलेल्या दरबाराच्या दृश्यात "मैं अपनी प्रजा के लिये अपने प्राण तक न्योच्छावर कर दुंगा" हा संवाद म्हणू लागले आणि शेजारच्या पात्राच्या खांद्यावर त्यांनी आपले डोके टेकवले. थोडा वेळ सर्वत्र शांतता झाली. दर्शकांना व सहपात्रांना सुद्धा ते पुढचा संवाद म्हणतील असे वाटू लागले पण या "प्राण तक न्योच्छावर कर दुंगा" संवादा बरोबरच त्यांचे प्राण पाखरू उडून गेले होते. सुरुवातीला प्रेक्षकांना व सहकलाकारांना अमरेश महाजन हे अभिनयच करत आहे असे वाटले पण त्यांचे डोके त्या सह कलाकाराच्या खांद्यावर वाजवीपेक्षा जास्त वेळ राहिल्याने काहीतरी वेगळे होत आहे हे उपस्थितांच्या लक्षात आले. रामलीलेत प्राण तक न्योच्छावर कर दुंगा असे म्हणत असतांनाच अमरेश महाजन यांचे निधन झाले. आता वर लिहिल्याप्रमाणे अमरेश महाजन यांच्या मृत्यूबाबत लिहिणे का महत्त्वाचे वाटले ते पाहू.

     आपल्या भारतीय संस्कृतीत असे म्हटले आहे की मृत्यूच्या क्षणी व्यक्ती जर का नामस्मरणामध्ये किंवा साधन, भजन, भक्ती मध्ये रत असेल किंवा ईश्वर चिंतन करीत असेल तर त्याला मोक्ष मिळतो. म्हणूनच नामस्मरण करण्याबाबत सर्वच संतांनी सत्पुरुषांनी आपल्याला सांगितले आहे. गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा नामस्मरणाचे महात्म्य सांगितले आहे. पुराणांमध्ये अजामेळाच्या  कथेत सुद्धा अजामेळ हा त्याच्या मृत्यूच्या क्षणी त्याच्या मुलाचे "नारायण" असे नांव घेतो आणि त्याचा मृत्यू होतो. त्याच्या मुलाचे नांव नारायण म्हणजेच ईश्वराचे नांव आणि त्याच्या नामोच्चरणामुळे त्याला मुक्ती मिळते अशी कथा आहे. 

अजमेळा पापराशी तोही नेला देवा वैकुंठासी

असे संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी म्हटलेच आहे.

अमरेश महाजन हे रामलीला मध्ये गेल्या अनेक वर्षापासून दशरथ राजाची भूमिका वठवत होते. रामायणात राजा दशरथाचा पुत्र वियोगाने मृत्यू होतो आणि चंबा येथील रामलीलेत दशरथाची भूमिका वठवणाऱ्या अमरेश महाजन यांचा दशरथाची भूमिका करतांनाच मृत्यू झाला यात कुठेतरी साधर्म्य वाटले. दशरथ राजाची भूमिका वठवतानाच काल त्यांचे निधन झाले त्यामुळे अमरेश महाजन यांना सुद्धा मुक्तीच मिळाली.  अमरेश महाजन हे रामलीलेच्या निमित्ताने एकप्रकारे ईश्वरी कार्यात मग्न होते म्हणजेच त्यांचा मृत्यू हा  त्यांना मोक्ष मिळवून देणारा असा आहे. अमरेश महाजन यांच्या अशा मृत्यूमुळे मृत्यू, मुक्ती, नामस्मरण, अजामेळ याचे स्मरण झाले आणि ते वाचकांसमोर मांडावेसे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.


१८/०९/२०२५

Article on PM Modi birthday

 दे जितनी गाली देनी है...

विरोधकांनी केलेल्या कितीही शिवीगाळीमुळे त्यांचा  विकासाचा वारू अडलेला नाही. विरोधकांच्या शिवीगाळीचा त्यांच्यावर काहीही परिणाम झालेला दिसत नाही. 

काल देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस झाला. देशभरात नागरिकांनी देशाला एक नवीन वाट दाखवणाऱ्या पंतप्रधानाचा वाढदिवस आपापल्या परीने व मोठ्या उत्साहाने साजरा केला. 2014 मध्ये नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. संसदेच्या पायरीवर डोके ठेवून संसदेला नमन करून मग प्रवेश करणा-या मोदींना पाहून देश अवाक झाला. लोकशाहीला एवढा सन्मान देणारा पंतप्रधान जनता प्रथमच पाहत होती. पुढे मोदींनी त्यांच्या वेगळ्या शैलीची, नेतृत्वाची प्रचिती देशवासीयांना अनेकदा आणून दिली आहे. मग ते सफाई कामगारांचे पाय धुणे असो, संसदेत संविधानाचा सन्मान करणे असो,  अंदमानात जाऊन सावरकरांच्या कोठडीत जाऊन ध्यानावस्थेत बसणे असो, साफसफाई करणे असो, खाली पडलेला कागद उचलून खिशात ठेवणे असो अशी कित्येक उदाहरणे आहेत. सर्व उदाहरणे कधी लिहिली तर लेखाच्या ऐवजी उदाहरणांची यादी होऊन जाईल एवढे वेगळेपण मोदींनी आपल्या कारकिर्दीत जनतेला दाखवले. मोदींच्या कार्याच्या धडाक्यामुळे आणि भारत देशाला एक प्रबळ सक्षम लोकशाही देश म्हणून उभे करण्यामुळे जगभरात मोदींची प्रतिमा खुप मोठी झाली. जगभरातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीमध्ये मोदी प्रथम क्रमांकावर आलेले आहे. कित्येक देशात मोदी गेल्यावर तेथील भारतवासीयांनी केलेले उत्स्फूर्त स्वागत समारोह पाहिल्यावर देशातील जनतेला मोठे कौतुक वाटले. आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा विदेशी नागरिक व NRI एवढा सन्मान करत आहे हे जनता प्रथमच पाहत होती. मुस्लिम राष्ट्रात सुद्धा मोदींचा मोठा सन्मान झाल्याचे आपण बघितले.  मोदींनी दहशतवाद्यांमध्ये सुद्धा आपल्या भारतीय सैन्याची दहशत बसवली. मोदी सत्तेत येण्यापुर्वी आतंकवादी देशातील विविध शहरात घुसून बॉम्बस्फोट किंवा गोळीबार करत असत परंतु मोदींच्या कारकिर्दीत अशी एकही घटना घडली नाही. पुलवामा हल्ल्यानंतर केलेले सर्जिकल स्ट्राइक,  पहेलगाम नंतर राबवलेले ऑपरेशन सिंदूर यामुळे दहशतवाद्यांचे धाबे दणाणलेले आहे. त्यापूर्वीही मोदींनी म्हटलेले "घर मे घुसकर मारेंगे" या वाक्याने तर मोदींची लोकप्रियता खूपच वाढवली. 

     नुकत्याच झालेल्या भारत पाकिस्तान वरून मोदींवर टीका होत आहे हे साहजिकच आहे कारण फाळणीनंतर देशाचा एक नंबरचा शत्रू म्हणून पाकिस्तान ओळखला जातो, जनता आजही फाळणीचे आणि फाळणी नंतर झालेल्या अत्याचाराचे दुःख आजही विसरलेली नाही, त्याचे शल्य भारताला कायम राहणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर झालेली भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच अनेकांना पटली नाही परंतु टीका करणाऱ्यांनी हेही ध्यानात घ्यावे ही मोदींच्या पूर्वी अतिरेकी हल्लेही होत होते आणि भारत-पाक क्रिकेट सामने सुद्धा होत होते, अतिरेकी हल्ल्यांना प्रतिउत्तर सुद्धा दिले जात नव्हते आणि पाकिस्तान सोबत शांततेच्या हवेतील गप्पा आणि लांगुलचालन हे पण सुरू होते. मोदींच्या कारकिर्दीत मॅच जरी झाली असली तरी पाकिस्तानला जबरदस्त उत्तर पण दिले जात आहे हे जनता पाहतच आहे. भारताने दिलेल्या या प्रत्युत्तरामुळे आधीच कोलमडलेला पाकिस्तान आणखीनच थंडागार झाला आहे. एवढेच काय तर पाकिस्तानच्या मीडियामध्ये सुद्धा नरेंद्र मोदींचे झालेले कौतुक जनतेने पाहिले आहे. नुकतेच नेपाळमध्ये gen z ने केलेल्या आंदोलनाच्या वेळी सुद्धा नेपाळी जनतेने मोदींसारखा पंतप्रधान व्हावा अशी मागणी केलेली जगाने पाहिली. 

      मोदींना मिळालेल्या लोकप्रियतेमुळे आणि त्यांनी देशाला दाखवलेल्या नवीन वाटेमुळे विरोधकांचा प्रचंड जळफळाट झालेला गतकाळात आपण बघितला आहे. या जळफळाटातून त्यांनी मोदींना वाटेल त्या शिव्या कित्येकदा दिल्या आहेत. मोदींना मौत का सौदागर म्हणणे, त्यांचा बाप काढणे, चहाच्या व्यवसायावरून कमी लेखणे, पत्नी सोबत राहत नाही म्हणून टीका करणे, आणि नुकतेच त्यांच्या आई बाबतचा AI व्हिडिओ काढणे अशी मोदींना शिव्या शाप देण्याची अजूनही कित्येक उदाहरणे घडली आहेत. मोदींनी त्याबाबत कधीही ब्र सुद्धा काढला नाही. नुकतेच आसाम मध्ये त्यांनी विधान केले की मी शिवभक्त आहे सगळे विष पचवून टाकले. त्यामुळे तर विरोधकांचा जास्तच जळफळाट झाला आहे, होतो आहे. 

     यंदा अनेक व्यक्ती तसेच संघटना यांचे महोत्सवी वर्ष आहे. अहिल्याबाई होळकर 300 वी जयंती वर्ष, उमाजी नाईक यांची 234 वी जयंती, देश साजरे करीत आहे. तसेच ज्या संघाच्या मुशीतून मोदी सारखे नेतृत्व तयार झाले तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या स्थापनेची 100 वर्षे पूर्ण करीत आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षासोबतच मोदींनी सुद्धा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या सर्वांसोबतच भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहासात मैलाचा दगड ठरलेला, लोकप्रियतेचे अनेक उच्चांक मोडणारा, अनेक नेत्यांना सुद्धा आवडणारा शोले या चित्रपटाने सुद्धा पन्नास वर्षे पूर्ण केली आहे. 

     शोले चित्रपटात गब्बर सिंग जेंव्हा ठाकूरला पकडतो तेंव्हा ठाकूर त्याला अनेक शिव्या देतो. तेव्हा गब्बरच्या तोंडी एक वाक्य आहे, "दे जितनी गाली देता है". या सिनेमात गब्बर सिंग खलनायक होता परंतु मोदी तर देशाचे खरे नायक आहे. विरोधकांनी केलेल्या कितीही शिवीगाळीमुळे त्यांचा  विकासाचा वारू अडलेला नाही. विरोधकांच्या शिवीगाळीचा त्यांच्यावर काहीही परिणाम झालेला दिसत नाही. त्यामुळे "दे जितनी गाली देता है, मै हर जहर निगल डालूंगा" असाच संदेश ते विरोधकांना देत आहे.

११/०९/२०२५

Article about developing khamgaon

 दिल गार्डन गार्डन हो गया

खामगांवकरांचे हृदय बहरून येऊन त्यांची मनस्थिती दिल गार्डन गार्डन हो गया सारखी का झाली आहे ते या लेखात वाचा.

90 च्या दशकामध्ये गुलशन ग्रोवर हा खलनायक म्हणून प्रसिद्ध होता. वेगवेगळ्या सिनेमांमध्ये वेगवेगळ्या वेशभूषेत दिसणे ही गुलशन ग्रोवरची खासियत असे शिवाय त्याची आणखी एक खासियत म्हणजे त्याच्या सिनेमांमध्ये त्याच्या तोंडी एक विशिष्ट असा डायलॉग वारंवार दिलेला असे. जसे "गन्ना चुसके" , "गई भैंस पानीमे" , "बॅड मॅन" असे संवाद त्याच्या मुखी दिलेले असत.  प्रत्येक संवादामध्ये ठराविक अंतराने असे डायलॉग पालुपदासारखे तो पुन्हा पुन्हा म्हणतांना सिनेमात दिसत असे.  यातलाच एक डायलॉग म्हणजे 'दिल गार्डन गार्डन हो गया'. कुठल्यातरी एका सिनेमामध्ये त्याच्या तोंडी दिल गार्डन गार्डन हो गया असा संवाद होता त्याचा हा संवाद पुढे एवढा लोकप्रिय झाला की दिल गार्डन गार्डन हो गया असे एक गाणे सुद्धा कुण्या गीतकाराने लिहिले होते. 

      आता हे दिल गार्डन गार्डन हो गया आणि गुलशन ग्रोवर पुराण आज का बरं बुवा ? असा प्रश्न वाचकांना पडला असेल. या संवादाची आठवण होण्याचे कारण म्हणजे खामगांव शहरांमध्ये मा. ना. आकाश फुंडकर यांच्या कारकिर्दीमध्ये व नेतृत्वाखाली नगरपरिषदेने अनेक नवीन बागा निर्माण केल्या तसेच जुन्या बगीच्यांना नवीन स्वरूप दिले. सावरकर उद्यान , छकुली उद्यान यांसारखी इतरही अनेक नवीन उद्याने खामगांव शहरात निर्माण केली याशिवाय भारतरत्न राजीव गांधी उद्यान अर्थात टॉवर गार्डन याचे आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले नटराज गार्डन या जुन्या उद्यानांचे नूतनीकरण केले गेले. या उद्यानांमुळे खामगांव शहराला कसा ' फ्रेश लुक ' आला आहे. तसे तर या नवीन आणि नूतनीकरण झालेल्या उद्यानांबाबत समाज माध्यमांवर अनेक व्हिडिओ पूर्वीच प्रसिद्ध झाले आहेत. नवीन निर्माण केलेली उद्याने चांगली तर आहेच परंतु टॉवर गार्डन आणि नटराज गार्डन यांची अवस्था फार खराब झाली होती नटराज गार्डन पेक्षाही टॉवर गार्डन अधिकच खराब झाले होते त्या उद्यानाकडे पाहवले सुद्धा जात नव्हते इतकी त्याची दुर्दशा झाली होती परंतु ऑगस्ट 2025 मध्ये या दोन्ही उद्यानांचे लोकार्पण झाले आणि खामगांवकर नागरिकांना एक सुखद धक्का मिळाला. आज जर का आपण टॉवर गार्डन आणि नटराज गार्डन मध्ये गेलो तर आपल्याला अतिशय आल्हाददायक, नयनरम्य शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असूनही प्राणवायूने परिपूर्ण असे वातावरण मिळते. शिवाय जागोजागी योग्य ती शिल्पे, भिंतींवरती सुंदर चित्रे, व्यायामासाठी जागा आणि साधने, फिरण्यासाठी जागा आणि साधने, लहान मुलांसाठी खेळणी, समाजाला, कुटुंबाला ज्यांच्या मार्गदर्शनाची, सल्ल्याची नेहमीच गरज असते अशा ज्येष्ठ  नागरिकांना बसण्यासाठी बाक, लॉन इत्यादी अनेक सुविधा या दोन्ही गार्डनमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामुळे आता सकाळी फिरणाऱ्यांची गर्दी आपल्याला या उद्यानांमध्ये दिसून येते. नटराज गार्डनच्या दुरावस्थेमुळे येथील भव्य नटराजाची मुर्ती सुद्धा उदास वाटत होती परंतु आज या नटराजाची मुद्रा कशी छान फुललेली दिसून येत आहे. त्याच्या समोरील पूर्वी जे छोटे कमळाचे टाके होते ते आता मोठे केले आहे. ही उद्याने रात्री सुद्धा खुप सुंदर दिसतात. जनुना तलावाच्या प्रवेशद्वाराप्रमाणे नटराज गार्डनचे प्रवेशद्वार जुन्या काळात बनवलेले आहे.  नूतनीकरण करतांना त्याच्या मूळ स्वरूपात काही बदल  न करता याच दरवाजाला पुनश्च चांगले स्वरूप देण्यात आले हे फार चांगले झाले कारण या प्रवेशद्वारावरील मुर्त्या या स्थानिक राष्ट्रीय शाळेतील कलाकारांनी बनवलेल्या होत्या आणि त्या आजही खूपच सुंदर दिसतात म्हणून त्या तशाच राहू देणे गरजेचे होते आणि त्या तशाच राहू दिल्यामुळे व त्यांना रंग दिल्यामुळे नटराज गार्डनचे प्रवेशद्वार आता अधिक आकर्षक दिसते. रात्रीची रोषणाई सुद्धा बघणाऱ्याला सुखद अनुभव देते.

रात्रीच्या वेळेचे नटराज गार्डन

   मध्यंतरी खामगांवला उद्याने असूनही नसल्यासारखीच होती. खामगांवकरांचा एकमेव पिकनिक स्पॉट जनुना तलाव याची सुद्धा अवस्था चांगली नव्हती. त्यामुळे खामगांवात येणाऱ्या पाहुण्यांना कुठे घेऊन जाण्यासाठी चांगले ठिकाणास नव्हते आणि खामगांवकरांना मोकळा श्वास घेता येईल असे सुद्धा कोणतेही ठिकाण खामगाव मध्ये नव्हते. सर्वत्र गर्दी आणि अतिक्रमणांचा सुळसुळाट झाला होता परंतु आज मात्र नवीन निर्माण झालेल्या उद्यानांमुळे आणि जुन्या नूतनीकरण केलेल्या उद्यानांमुळे खामगांवकर नागरिकांना मोकळी जागा उपलब्ध झाली आहे. उद्याने म्हणजे शहराची फुफ्फुसे असतात. गतकाळात खामगांव  मतदारसंघाचे तरुण नेतृत्व मा. ना. आकाशभाऊ फुंडकर, खामगांव नगरपरिषद सीओ प्रशांत शेळके, यांनी खामगांव शहराचा कायापालट करण्याचा निश्चयच घेतलेला दिसतो. त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी खामगांवात होतांना दिसत आहे. यशवंत टॉवरवर बसवलेल्या घड्याळामुळे सुद्धा खामगांवकरांना मोठा आनंद झालेला आपण पाहिला, रस्ते सुद्धा चांगले होत आहेत. एक पाण्याची समस्या तेवढी दूर होणे आवश्यक आहे. ती सुद्धा लवकरच मार्गी काढण्यात येईल असे काही वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे त्यामुळे तोही प्रश्न लवकरात संपुष्टात येईल अशी चिन्हे आहेत. 

 आज खामगांवकरांना घरी आलेल्या पाहुण्यांना दाखवण्यासाठी खामगांवतील अनेक गार्डन उपलब्ध आहे.  अशी गार्डन निर्माण झाल्यामुळे आणि एकूणच चांगले बदल होत असलेले बघतांना खामगांवकरांचे हृदय बगीच्या प्रमाणे बहरून येऊन त्यांची मनस्थिती दिल गार्डन गार्डन हो गया याप्रमाणे झाली आहे असे म्हणण्यास हरकत नाही.

०४/०९/२०२५

Article about Khamgaon ganpati festival

 आठवणी खामगांवच्या गणेशोत्सवाच्या 

आम्ही लहान असतांना माझे वडील आमच्या कुटुंबाला सायकल रिक्षा करून देत, ॲटो तर तेंव्हा तुरळकच होते. त्या रिक्षावाल्याचे नाव पठाण असे होते हा पठाण नामक मुस्लिम गृहस्थ मोजकंच बोलत असे. माझ्या वडीलांचा त्याच्यावर खूप विश्वास होता आणि आम्हाला गणपती बघण्यास कितीही उशीर झाला तरी तो काहीही चिडचिड करीत नसे.

काल मुलाने गणपती बघायला घेऊन चला म्हणून हट्ट केला आणि म्हणून त्याला घेऊन गणपती पाहण्यास गेलो. त्याला विविध गणेश मंडळांचे गणपती दाखवतांना विशेषत: वंदेमातरम मंडळाचा  रामायणातील लंका दहनाच्या प्रसंगाचा देखावा पाहतांना खामगावात पूर्वी होत असलेल्या  देखाव्यांच्या आणि येथील गणपती मंदिरांच्या अनेक स्मृती जागृत झाल्या. आम्ही गणपती पाहण्यास  राष्ट्रीय गणेश मंडळापासून सुरुवात केली. राष्ट्रीय गणेश उत्सव मंडळाची स्थापना लोकमान्य टिळकांच्या हातून झालेली आहे. खामगांव शहर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक जुने आणि मोठे शहर असल्याने राष्ट्रीय शाळेच्या स्थापनेनंतर खामगांवला अनेक थोर पुरुषांनी भेटी दिलेल्या आहे. तसेच खामगांवला अनेक वर्षापासून गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. राष्ट्रीय गणेशोत्सव मंडळ, तानाजी गणेशोत्सव मंडळ, रामदल ही गणेश मंडळे अनेक वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहेत. सामाजिक संदेश देणारे तसेच धार्मिक उद्बोधन करणारे मोठमोठे देखावे, सामाजिक उपक्रम ही खामगांवच्या गणेशोत्सव मंडळांची वैशिष्ट्ये. वरील गणेश मंडळानंतर वंदेमातरम, राणा, जय संतोषी मां, चंदनशेष, त्रिशूल, नेताजी, हनुमान, एकता, आत्मशक्ती अशी अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे खामगांवात स्थापित झाली. गणेशोत्सव म्हटला की सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते त्याचप्रमाणे खामगांव शहरात सुद्धा गणपतीचे आगमन मोठ्या थाटात होते आणि त्याच्या आगमनाची प्रतीक्षा सर्व लोक करत असतात. खामगांव शहरात लाकडी गणपती हा मानाचा गणपती म्हणून मिरवणुकीमध्ये अग्रस्थानी असतो. खामगांव शहरातील गणेशोत्सवाचा तसा भला मोठा इतिहास आहे. तसेच या उत्सवामध्ये सामाजिक सलोखा, शांतता चांगल्या पद्धतीने जपल्या गेल्याची अनेक उदाहरणे सुद्धा आहेत. राष्ट्रीय गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष श्री जगदीशजी जोशी यांनी आठवण सांगितली की, या गणेश मंडळाचे श्री तय्यबजी नामक एक मुस्लिम अध्यक्ष सुद्धा होऊन गेले आहे. अशी खामगावच्या गणेशोत्सवाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. 1980 च्या दशकात आम्ही लहान असतांना चंदनशेष गणेशोत्सव मंडळ हे आमच्या घराजवळच असल्याने आम्ही तेथील गणपती आवर्जून व अनेकदा बघत असू. हे गणेश मंडळ जेंव्हा गणेश स्थापनेच्या काही दिवस आधीपासून देखावे बनवण्याचे कार्य करीत असे तेंव्हा आम्ही पडदा बाजूला करून ते काम बघत असू. चंदनशेष मंडळाने केलेले साक्षरतेवर आधारीत गणपती उंदरांना शिकवत असल्याचा देखावा, हनुमान राक्षसिणीच्या तोंडात जाऊन कसा चटकन बाहेर येतो हे दाखवणारा देखावा, उंदरांचा देखावा, नवनाथांचा देखावा असे अनेक देखावे आजही स्मरणात आहे. या मंडळाचे तत्कालीन तरुण कार्यकर्ते तेंव्हापासून परिचित झाले. टिळक पुतळ्याजवळ मधु ऑटो जवळ दरवर्षी भूतांचा देखावा असलेला एक गणपती बसत असे. आमच्या घराजवळ आझाद गणेश मंडळ म्हणून एक गणेश मंडळ 80 च्या दशकात सुरू झाले होते तसेच पुरवार गल्लीत सुद्धा एक गणेश मंडळ होते. पुरवार गल्लीतील गणेश मंडळानी एकदा सुपारीचा गणपती बनवला होता तसेच पाण्यावर तरंगणाऱ्या दगडाचा देखावा सादर केला होता. ही गणेश मंडळे नंतर बंद झाली. अशा खामगांवच्या गणेश मंडळाच्या कित्येक आठवणी आजही आहेत काही कटू आठवणी सुद्धा आहेत परंतु त्यांचा उल्लेख न केलेलाच बरा. गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये एक पागोट्या नामक व्यक्ती दरवर्षी वेगळीच लक्षवेधक अशी वेशभूषा करून सर्वत्र फिरत असे. या पागोट्या व्यक्तीचे खरे नांव मला आजरोजी पर्यंत कळले नाही. आम्ही लहान असतांना माझे वडील आमच्या कुटुंबाला सायकल रिक्षा करून देत, ॲटो तर तेंव्हा तुरळकच होते. त्या रिक्षावाल्याचे नाव पठाण असे होते हा पठाण नामक मुस्लिम गृहस्थ मोजकंच बोलत असे. माझ्या वडीलांचा त्याच्यावर खूप विश्वास होता आणि आम्हाला गणपती बघण्यास कितीही उशीर झाला तरी तो काहीही चिडचिड करीत नसे. पठाण आता हयात आहे की नाही कुणास ठाऊक. खामगांवचा गणेशोत्सव हा राज्यभर प्रसिद्ध आहे. येथील राणा गणेश मंडळाने खामगांवचा राजा नामक गणपतीची स्थापना केलेली आहे. खामगांव हे चांदीची बाजारपेठ असल्यामुळे  या गणपतीच्या अंगावर चांदीची विविध आभूषणे आहे.  ज्याप्रमाणे इथे लाकडी गणपतीचे मंदिर आहे तसेच शिवाजी वेसकडे जातांना सुटाळपुरा भागात सुद्धा एक अत्यंत प्राचीन असे गणपती मंदिर आहे, सितला माता मंदिरात सुद्धा अनेक वर्षापासून स्थापित  केलेला गणपती आहे. बहुतांश खामगांवकरांना माहीत नसलेले गणपती मंदिर म्हणजे गर्गे यांचे मंदिर. गर्गे यांच्या घरातच त्यांच्या पूर्वजांनी स्थापन केलेला गणपती आहे, हे मंदिर म्हणजे एक घरच आहे आणि या घराच्या दिवाणखान्यात आपल्याला गणेश मूर्ती दिसते. या मंदिरात सुद्धा खूप प्रसन्न वाटते मूर्ती सुद्धा आकर्षक आहे. गणेश उत्सवाबरोबरच खामगांवातील ही गणपती मंदिरे सुद्धा प्रसिद्ध आहेत. अशा खामगांवच्या गणेशोत्सवाच्या आठवणी काल ताज्या झाल्या. यंदा खामगांवात गणपती हा विविध रूपांमध्ये दिसला. तानाजी व्यायाम मंडळाचा धनगराच्या वेषातील गणपती बर्डे प्लॉटमधील गजानन महाराजांच्या वेषातील गणपती तसेच अमरलक्ष्मी मंडळाचा शिवाजी महाराजांच्या वेषातील गणपती बघायला मिळाला. सर्व मूर्ती उत्कृष्ट होत्या परंतु आगामी काळात पूर्वीसारखेच देखावे सुद्धा या मंडळांनी करावे असे वाटते. देखाव्यातून सामाजिक उद्बोधन होते, बालगोपालांना  धार्मिक देखाव्यातून आपल्या धर्माची माहिती मिळते त्यामुळे देखावे हे असायला  पाहिजे. अशाप्रकारे गणेशोत्सव बघून आम्ही घरी परतलो. आजही गणेशोत्सवात गणपती बघायला जातांना तोच उत्साह कायम आहे आणि खामगांवच्या गणेशोत्सवाच्या आठवणी सुद्धा कायम आहेत.