Click "Follow" Button below To Follow this Blog

०४/०९/२०२५

Article about Khamgaon ganpati festival

 आठवणी खामगांवच्या गणेशोत्सवाच्या 

आम्ही लहान असतांना माझे वडील आमच्या कुटुंबाला सायकल रिक्षा करून देत, ॲटो तर तेंव्हा तुरळकच होते. त्या रिक्षावाल्याचे नाव पठाण असे होते हा पठाण नामक मुस्लिम गृहस्थ मोजकंच बोलत असे. माझ्या वडीलांचा त्याच्यावर खूप विश्वास होता आणि आम्हाला गणपती बघण्यास कितीही उशीर झाला तरी तो काहीही चिडचिड करीत नसे.

काल मुलाने गणपती बघायला घेऊन चला म्हणून हट्ट केला आणि म्हणून त्याला घेऊन गणपती पाहण्यास गेलो. त्याला विविध गणेश मंडळांचे गणपती दाखवतांना विशेषत: वंदेमातरम मंडळाचा  रामायणातील लंका दहनाच्या प्रसंगाचा देखावा पाहतांना खामगावात पूर्वी होत असलेल्या  देखाव्यांच्या येथील गणपती मंदिरांच्या अनेक स्मृती जागृत झाल्या. आम्ही गणपती पाहण्यास  राष्ट्रीय गणेश मंडळापासून सुरुवात केली. राष्ट्रीय गणेश उत्सव मंडळाची स्थापना लोकमान्य टिळकांच्या हातून झालेली आहे. खामगांव शहर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक जुने आणि मोठे शहर असल्याने राष्ट्रीय शाळेच्या स्थापनेनंतर खामगांवला अनेक थोर पुरुषांनी भेटी दिलेल्या आहे. तसेच खामगांवला अनेक वर्षापासून गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. राष्ट्रीय गणेशोत्सव मंडळ, तानाजी गणेशोत्सव मंडळ, रामदल ही गणेश मंडळे अनेक वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहेत. सामाजिक संदेश देणारे तसेच धार्मिक उद्बोधन करणारे मोठमोठे देखावे, सामाजिक उपक्रम ही खामगांवच्या गणेशोत्सव मंडळांची वैशिष्ट्ये. वरील गणेश मंडळानंतर वंदेमातरम, राणा, जय संतोषी मां, चंदनशेष, त्रिशूल, नेताजी, हनुमान, एकता, आत्मशक्ती अशी अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे खामगांवात स्थापित झाली. गणेशोत्सव म्हटला की सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते त्याचप्रमाणे खामगांव शहरात सुद्धा गणपतीचे आगमन मोठ्या थाटात होते आणि त्याच्या आगमनाची प्रतीक्षा सर्व लोक करत असतात. खामगांव शहरात लाकडी गणपती हा मानाचा गणपती म्हणून मिरवणुकीमध्ये अग्रस्थानी असतो. खामगांव शहरातील गणेशोत्सवाचा तसा भला मोठा इतिहास आहे. तसेच या उत्सवामध्ये सामाजिक सलोखा, शांतता चांगल्या पद्धतीने जपल्या गेल्याची अनेक उदाहरणे सुद्धा आहेत. राष्ट्रीय गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष श्री जगदीशजी जोशी यांनी आठवण सांगितली की, या गणेश मंडळाचे श्री तय्यबजी नामक एक मुस्लिम अध्यक्ष सुद्धा होऊन गेले आहे. अशी खामगावच्या गणेशोत्सवाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. 1980 च्या दशकात आम्ही लहान असतांना चंदनशेष गणेशोत्सव मंडळ हे आमच्या घराजवळच असल्याने आम्ही तेथील गणपती आवर्जून व अनेकदा बघत असू. हे गणेश मंडळ जेंव्हा गणेश स्थापनेच्या काही दिवस आधीपासून देखावे बनवण्याचे कार्य करीत असे तेंव्हा आम्ही पडदा बाजूला करून ते काम बघत असू. चंदनशेष मंडळाने केलेले साक्षरतेवर आधारीत गणपती उंदरांना शिकवत असल्याचा देखावा, हनुमान राक्षसिणीच्या तोंडात जाऊन कसा चटकन बाहेर येतो हे दाखवणारा देखावा, उंदरांचा देखावा, नवनाथांचा देखावा असे अनेक देखावे आजही स्मरणात आहे. या मंडळाचे तत्कालीन तरुण कार्यकर्ते तेंव्हापासून परिचित झाले. टिळक पुतळ्याजवळ मधु ऑटो जवळ दरवर्षी भूतांचा देखावा असलेला एक गणपती बसत असे. आमच्या घराजवळ आझाद गणेश मंडळ म्हणून एक गणेश मंडळ 80 च्या दशकात सुरू झाले होते तसेच पुरवार गल्लीत सुद्धा एक गणेश मंडळ होते. पुरवार गल्लीतील गणेश मंडळानी एकदा सुपारीचा गणपती बनवला होता तसेच पाण्यावर तरंगणाऱ्या दगडाचा देखावा सादर केला होता. ही गणेश मंडळे नंतर बंद झाली. अशा खामगांवच्या गणेश मंडळाच्या कित्येक आठवणी आजही आहेत काही कटू आठवणी सुद्धा आहेत परंतु त्यांचा उल्लेख न केलेलाच बरा. गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये एक पागोट्या नामक व्यक्ती दरवर्षी वेगळीच लक्षवेधक अशी वेशभूषा करून सर्वत्र फिरत असे. या पागोट्या व्यक्तीचे खरे नांव मला आजरोजी पर्यंत कळले नाही. आम्ही लहान असतांना माझे वडील आमच्या कुटुंबाला सायकल रिक्षा करून देत, ॲटो तर तेंव्हा तुरळकच होते. त्या रिक्षावाल्याचे नाव पठाण असे होते हा पठाण नामक मुस्लिम गृहस्थ मोजकंच बोलत असे. माझ्या वडीलांचा त्याच्यावर खूप विश्वास होता आणि आम्हाला गणपती बघण्यास कितीही उशीर झाला तरी तो काहीही चिडचिड करीत नसे. पठाण आता हयात आहे की नाही कुणास ठाऊक. खामगांवचा गणेशोत्सव हा राज्यभर प्रसिद्ध आहे. येथील राणा गणेश मंडळाने खामगांवचा राजा नामक गणपतीची स्थापना केलेली आहे. खामगांव हे चांदीची बाजारपेठ असल्यामुळे  या गणपतीच्या अंगावर चांदीची विविध आभूषणे आहे.  ज्याप्रमाणे इथे लाकडी गणपतीचे मंदिर आहे तसेच शिवाजी वेसकडे जातांना सुटाळपुरा भागात सुद्धा एक अत्यंत प्राचीन असे गणपती मंदिर आहे, सितला माता मंदिरात सुद्धा अनेक वर्षापासून स्थापित  केलेला गणपती आहे. बहुतांश खामगांवकरांना माहीत नसलेले गणपती मंदिर म्हणजे गर्गे यांचे मंदिर. गर्गे यांच्या घरातच त्यांच्या पूर्वजांनी स्थापन केलेला गणपती आहे, हे मंदिर म्हणजे एक घरच आहे आणि या घराच्या दिवाणखान्यात आपल्याला गणेश मूर्ती दिसते. या मंदिरात सुद्धा खूप प्रसन्न वाटते मूर्ती सुद्धा आकर्षक आहे. गणेश उत्सवाबरोबरच खामगांवातील ही गणपती मंदिरे सुद्धा प्रसिद्ध आहेत. अशा खामगांवच्या गणेशोत्सवाच्या आठवणी काल ताज्या झाल्या. यंदा खामगांवात गणपती हा विविध रूपांमध्ये दिसला. तानाजी व्यायाम मंडळाचा धनगराच्या वेषातील गणपती बर्डे प्लॉटमधील गजानन महाराजांच्या वेषातील गणपती तसेच अमरलक्ष्मी मंडळाचा शिवाजी महाराजांच्या वेषातील गणपती बघायला मिळाला. सर्व मूर्ती उत्कृष्ट होत्या परंतु आगामी काळात पूर्वीसारखेच देखावे सुद्धा या मंडळांनी करावे असे वाटते. देखाव्यातून सामाजिक उद्बोधन होते, बालगोपालांना  धार्मिक देखाव्यातून आपल्या धर्माची माहिती मिळते त्यामुळे देखावे हे असायला  पाहिजे. अशाप्रकारे गणेशोत्सव बघून आम्ही घरी परतलो. आजही गणेशोत्सवात गणपती बघायला जातांना तोच उत्साह कायम आहे आणि खामगांवच्या गणेशोत्सवाच्या आठवणी सुद्धा कायम आहेत.

४ टिप्पण्या:

  1. छान वर्णन केलं विनय सर, खामगांव पासून लांब असलेल्या आणि अनेक वर्षा पूर्वी गाव सोडलेल्यांना निश्चितच खामगांव गणेशोत्सवाची आठवण झाल्या शिवाय राहणार नाही.
    Old Is Gold
    गणपती बाप्पा मोरया

    उत्तर द्याहटवा
  2. मनजितसिंग, सालईबन

    उत्तर द्याहटवा