आसरानीची "छोटीसी बात"
देशभर दिवाळी साजरी होत असतानाच आसरानीच्या निधनाची दुःखद बातमी येऊन टपकली. लहानपणापासून पाहत असलेल्या अनेक सिनेमांमध्ये विनोदी कलाकार म्हणून आसरानी हा दिसायचाच. जुन्या जमान्यातील मेहमूद, राजेंद्रनाथ, आय.एस. जोहर, मोहन चोटी या विनोदी कलाकारांचे युग संपुष्टात येत असताना आसरानीचा चित्रपटांमध्ये प्रवेश झाला. आसरानी हा सपोर्टिंग कलाकार त्यामुळे त्याचा पाहिलेला पहिला चित्रपट निश्चितच आठवत नाही पण बहुदा शोलेच असावा. आसरानीच्या निधनानंतर बहुतांश जणांना त्याने बेसुमार गाजलेल्या शोले सिनेमात केलेल्या जेलरच्याच भूमिकेच स्मरण झालं. ती भूमिका होती सुद्धा तशीच आसरानीला साजेशी. हिटलरसारख्या मेकअप मध्ये शोलेत फक्त काही रीळांची असलेली जेलरची भूमिका अगदी उत्कृष्ट वठवली होती. शोलेतील अगदी छोट्या छोट्या भूमिका सुद्धा रसिकांच्या आजही लक्षात आहे. आसरानीची शोलेतील भूमिका ही निर्विवादपणे चांगली आहे, त्याने त्या भूमिकेत प्राण ओतले आहे तरी मला मात्र आसरानीच्या निधनाची वृत्ते वाचतांना आसरानीच्या विविध भूमिका आठवू लागल्या. त्यातल्या त्यात सर्वात प्रथम मला आठवली ती छोटीसी बात या बासू चॅटर्जी निर्देशित सिनेमात आसरानीने साकारलेली नागेश शास्त्रीची भूमिका आणि नंतर मग अभिमान सिनेमातील अमिताभच्या सेक्रेटरीची भूमिका, ऋषिकेश मुखर्जी यांच्या बावर्ची सिनेमातील संगीतप्रेमी तरुणाची भूमिका आणि अगदी अलीकडच्या काळातील धमाल सिनेमातील पारशी बापाची भूमिका, मालामाल विकली मधील हत्तीवाल्याची रितेश देशमुखच्या गरीब बापाची भूमिका. पण त्यातही मला स्वतःला आवडलेली म्हणजे नागेश शास्त्रीची भूमिका. बासू चॅटर्जी यांचे सिनेमे म्हणजे ऋषिकेश मुखर्जी यांच्याप्रमाणे साधे सरळ मध्यमवर्गीय सामान्य माणसाचे जीवन दर्शविणारे सिनेमे असायचे यातीलच एक छोटीसी बात हा सिनेमा. अशोककुमार, अमोल पालेकर, विद्या सिन्हा आणि आसरानी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा. या सिनेमामध्ये नागेश शास्त्री बनलेल्या आसरानी आणि अरुण नांव असलेल्या अमोल पालेकर या दोघांनाही चित्रपटात प्रभा बनलेली विद्या सिन्हा ही नायिका आवडत असते परंतु अमोल पालेकर हा सुरुवातीला आत्मविश्वासहीन असा तरुण दाखवलेला आहे तर त्यासोबत प्रभा हीच्या कार्यालयात नोकरीला असलेला नागेश शास्त्री हा अतिशय कॉन्फिडंट, चतुर थोडक्यात एखाद्या तरुणीला सहज आकर्षित करू शकेल असा बेधडक युवक दाखवलेला आहे. त्याच्या तुलनेत अमोल पालेकर हा म्हणजे अगदीच लाजाळू, श्यामळू असा तरुण दाखवला आहे. आसरानीने नागेशच्या भूमिकेत चांगले रंग भरलेले या सिनेमात आपल्याला दिसतात. त्याने नागेशची भूमिका उत्कृष्टरित्या वठवली आहे. नागेश टेबल-टेनिसपटू असतो, चांगला बोलघेवडा असतो शिवाय त्याच्याकडे स्कूटर सुद्धा असते. या प्रभाला स्वतःकडे आकर्षित करून घेता येतील अशा बाबी त्याच्याकडे असतात व त्याला सुद्धा या बाबींचा प्रभाला पटवण्यासाठी चांगला उपयोग होईल याचा विश्वास असतो असे या सिनेमात दाखवले आहे. आसरानीने नागेशची ही भूमिका त्याच्या अंगभूत अभिनयाने सुरेख वठवली आहे. नागेशच्या भूमिकेतील आसरानीचा अस्सल अभिनय दर्शकांना दिसतो. चित्रपटात लव्ह गुरु बनलेल्या अशोककुमार कडून चित्रपटात अरुण बनलेला अमोल पालेकर हा प्रभाला स्वतःकडे आकर्षित करून घेण्यासंबंधी मार्गदर्शन प्राप्त करून येतो आणि त्यानंतर मग अंगी बळावलेल्या आत्मविश्वासाने प्रभाला प्राप्त करण्याच्या दोघांच्या चढाओढीत नागेशला मागे टाकतो आणि मग नागेशची होणारी फजिती, गंमत, त्रागा हे सर्व आसरानीने अतिशय सुंदर साकारले आहे. "ये दिन क्या आये" या गाण्यात दर्शकांना ते दिसते. अमोल पालेकर त्याला अगदी frustrate करून टाकतो. नागेशच्या त्या frustration चा अभिनय आसरानीच करु जाणे.
छोटीसी बात हा तसा मध्यमवर्गीय प्रेक्षकाला आकर्षित करणारा असा लो बजेट सिनेमा. यात सर्वांनी आपापल्या भूमिका उत्कृष्टरित्या वठवल्या आहे, यात अमिताभ बच्चन धर्मेंद्र-हेमा मालिनी यांनी सुद्धा पाहुण्या कलाकाराच्या भूमिका साकारल्या आहे परंतु नागेश शास्त्री या आसरानीच्या पात्रामुळे या चित्रपटात खरी गंमत येते. त्यामुळे छोटीशी बात हा जसा अशोककुमार, अमोल पालेकर आणि विद्या सिन्हा यांचा सिनेमा आहे तेवढाच तो आसरानीचा सुद्धा आहे.
नुकतेच महाभारत या गाजलेल्या मालिकेत कर्णाची भूमिका साकारणाऱ्या पंकज धीरचे निधन झाले, अभिनेत्री संध्याचे निधन झाले आणि काल सतीश शहा या आणखी एका चांगल्या विनोदी अभिनेत्याचे निधन झाले. रसिकांना त्यांचे दुःख क्षणभर का होईना विसरायला लावणाऱ्या अशा या सर्व गुणी कलाकारांना विनम्र श्रद्धांजली. या गुणी कलाकारांपैकीच एक म्हणजे आसरानी सुद्धा होता त्याचेही परवा निधन झाले म्हणूनच आसरानी यांची ही एक छोटीसी बात.

Mala kadar khan aani aarati he combination khup aavadale aaj doghe hi nahit pan tyanchi kala nehami lokana hasavun detil aani he lok far durmil astat
उत्तर द्याहटवा