Click "Follow" Button below To Follow this Blog

१५/०१/२०२६

Article about new changes in NEET PG exam marks

 नीट पण कशाला घेता ?


सरकारला जर वैद्यकीय महाविद्यालयात जागा वाढवायच्या असतील तर त्या खुशाल वाढवाव्यात परंतू तेथे प्रवेशांसाठी नीट मधील गुणांची पात्रता इतकीही कमी करू नये की जेणे करून  भारतातील भविष्यातील आरोग्य व्यवस्था ही मोडकळीस येईल.

     नीट पीजी परीक्षांमध्ये आता वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी नीट या पात्रता परीक्षेत मिळणाऱ्या गुणांची पर्सेंटाईलची जी अट होती, जे निकष होते म्हणजेच  जो कट ऑफ असतो त्यामध्ये आता मोठा बदल करण्यात आला आहे.  काही वर्गवारीसाठी शून्य पर्सेंटाईल वर म्हणजेच  -40 गुण असलेल्या विद्यार्थ्यास सुद्धा आता प्रवेश मिळणार आहे. असेच निकषांचे बदल इतर वर्गवारीसाठी सुद्धा करण्यात आले आहे परंतु इतर वर्गवारीस मात्र 7  पर्सेंटाईल पेक्षा अधिक गुण मिळवावे लागणार आहे. भरपूर उपलब्ध जागा हे कारण या बदलांसाठी दाखवण्यात आले आहे. 

     शिक्षण क्षेत्रात निव्वळ प्रयोगांचा भडीमार लावलेला आहे वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच इतर शैक्षणिक संस्था यात व्यवसाय पाहून अनेक दिग्गजांनी उड्या घेतलेल्या आहे. यातील व्यवसाय पाहूनच या क्षेत्रासाठी लागणारे वह्या, पुस्तके आदी शैक्षणिक साहित्य यांच्या किमतीत सुद्धा मोठी भरमसाठ वाढ झाली आहे व दरवर्षी होत आहे. शाळा, कॉलेज, खाजगी कोचिंग क्लासेस यांचे शिक्षण शुल्क हे गगनाला भिडले आहे. सामान्य माणसाला त्याच्या मुलाला डॉक्टर किंवा इंजिनिअर बनवणे आज अशक्य झालेले आहे. आणि जरी त्याला बनवायचे असले तरी त्याला पैशांसाठी खूप आटापिटा करावा लागतो. असे चित्र सध्या भारतभर दिसत आहे. 

     नीट बद्दल बोलायचे झाल्यास वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर येणारा विद्यार्थी हा इतरांच्या आरोग्याची काळजी घेणारा, वैद्यकीय सेवा देणारा असा डॉक्टर म्हणून काम करणारा होणार असतो. मनुष्याच्या शरीरात काय घडते आहे, काय नाही ? याचे अचूक निदान त्याला करायचे असते. त्यामुळे त्याला मनुष्य शरीरशास्त्राचा, विविध आजारांचा सूक्ष्म असा अभ्यास करणे जरुरी असते शिवाय त्यात निष्णात बनायचे असते तरच तो रुग्णाची योग्य पद्धतीने तपासणी व रोगाचे निदान करू शकणारा असा तज्ञ डॉक्टर होऊ शकतो. शून्य टक्के पर्सेंटाईल मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला वैद्यकीय क्षेत्रात जबरदस्तीने आणून भविष्यात रुग्णाच्या जिवाशी खेळणारा डॉक्टर बनवण्यात सरकारला कोणते उद्दिष्ट साध्य करायचे आहे ? हा प्रश्न जनतेला नक्कीच पडणार आहे. स्पेशालिस्ट म्हणून रुग्ण एखाद्या डॉक्टरकडे गेल्यावर खरोखर तो डॉक्टर स्पेशालिस्ट झालेला असा असेल का ? त्याची डॉक्टर बनण्याची पात्रता नसतानाही त्याला फक्त जागा भरपूर आहे म्हणून जबरदस्तीने डॉक्टर बनवण्यात काय अर्थ ? 

     वैद्यकीय व्यवसायात डॉक्टरांचे अनेक प्रताप आपल्याला वाचनात येत असतात. कधी पोटात कैची विसरणे तर कधी कापूस विसरणे कधी ज्या ठिकाणचे ऑपरेशन करायचे त्या ठिकाणाऐवजी भलतेच ऑपरेशन करणे, दुखणारा दात काढण्याऐवजी न दुखणारा दात काढणे तर कधी मृत व्यक्तीला दवाखान्यात दाखल ठेवून पेशंटकडून बिल उकळणे असे अनेक किस्से, अनेक घटना वाचनात येतच असतात. आता असे मायनस मध्ये गुण मिळवणारे विद्यार्थी डॉक्टर बनणार तर मग अशा किस्स्यांमध्ये आणखीनच मोठी वाढ होण्याची संभावना आहे.

      वरील अनुषंगाने येथे हे नमूद करावेसे वाटते की, सरकारला जर वैद्यकीय महाविद्यालयात जागा वाढवायच्या असतील तर त्या खुशाल वाढवाव्यात परंतू तेथे प्रवेशांसाठी नीट मधील गुणांची पात्रता इतकीही कमी करू नये की जेणे करून  भारतातील भविष्यातील आरोग्य व्यवस्था ही मोडकळीस येईल.  आज quality अर्थात गुणवत्तेचा जमाना आहे. लोक जास्त पैसे मोजायला तयार आहे परंतु त्यांना मग तशा सुविधा, त्या सुविधा देणारे तसे तज्ञ व निष्णात लोक सुद्धा पाहिजे असतात. आरोग्य यंत्रणेकडे मात्र अशा लोकांची वानवा होईल आणि ही वानवा केंद्र सरकारच्या या नीट पीजीच्या पात्रतेच्या गुणांच्या शिथिलतेमुळे निर्माण होणार आहे.

     भारतात वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे तर इतरही क्षेत्रात विनाकारण कमी गुण मिळणारे व उच्च गुणवत्ताधारक यांना एकाच रांगेत आणण्याचा प्रयत्न केला जातो. गुणांचे निकष एवढेच कमी करायचे असतील तर कशालाच ती नीट परीक्षा ठेवता ? सर्वांनाच वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश खुले करून टाका ना ! असेच येथे म्हणावेसे वाटते.

1 टिप्पणी:

  1. Vinay ji every where Government wants bachelor of everything master of none means they are just focusing to display their performance with any way so in future we will see doctors and engineers giving giving home door service

    उत्तर द्याहटवा