स्मरण कल्पतरू दिवसाचे
आज इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला दिवस, म्हणजेच एक जानेवारी 2026. या दिवशी जगभर लोक नवीन वर्षाचे स्वागत करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. हा जरी इंग्रजी वर्षाचा प्रारंभ होणारा दिवस असला तरी भारतामध्ये सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अतिउत्साहात म्हटले तरी वावगे होणार नाही. परंतु या दिवसाचे आणखी एक महत्त्व आहे ते म्हणजे याच दिवशी 1886 रोजी एक महत्त्वपूर्ण अशी अध्यात्मिक घटना काशीपूर (कोसीपोर) उद्यानामध्ये घडली होती. काशीपूर उद्यान हे कोलकात्या जवळ आहे आणि याचे महत्त्व म्हणजे स्वामी विवेकानंद यांचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस यांनी याच उद्यानात त्यांच्याभोवती उपस्थित शिष्यांना शिष्य तसेच भक्तमंडळीला आशीर्वाद दिले होते. रामकृष्ण परमहंस हे गायन, भजन करता-करता समाधीमध्ये लीन होऊन जात असत. त्यांची ती भावावस्था पाहूनच स्वामी विवेकानंद यांच्याकडे आकृष्ट झाले होते आणि उच्चविद्याविभूषित असूनही त्यांनी अल्पशिक्षित अशा रामकृष्ण परमहंस यांना गुरु मानले होते. रामकृष्ण परमहंस यांच्या तशा अनेक कथा प्रचलित आहे. ते राणी रासमणी स्थापित काली मंदिरात पुजारी होते. कालीमातेचे निश्चिम भक्त होते. ईश्वर हा सर्वांमध्येच असतो असे त्यांचे म्हणणे असे. ते पूजा करता-करता पूजेत एवढे तल्लीन होऊन जात असत की पूजा करता-करता देवाशी बोलत असत आणि तर कित्येकदा देवीऐवजी स्वतःच्याच डोक्यावर फुल वाहत असत. इतके त्यांची तल्लीनता असे. केशवचंद्रसेन, ईश्वरचंद विद्यासागर, मास्टर महाशय असे सर्व ज्ञानी, उच्चविद्याविभूषित मंडळी त्यांना मान देत असत, त्यांचा आदर करत असत.
एक दिवस म्हणजेच एक जानेवारी 1886 रोजी श्री रामकृष्ण परमहंस काशीपूर उद्यानात आपल्या शिष्यांसमवेत बसले होते काहीतरी भजन, कीर्तन, प्रवचन सुरू होते. त्याच दरम्यान सर्व उपस्थित शिष्यांना त्यांनी त्यांच्या इच्छा पूर्ण होतील असा आशीर्वाद दिला त्यामुळे त्यांच्या शिष्यांमध्ये आध्यात्मिक चेतना जागृत झाली आणि त्यांना मुक्तीचा मार्ग मिळाला. ज्याप्रमाणे कल्पतरू खाली बसल्यावर व कोणतीही इच्छा प्रगट केल्यावर तो कल्पतरू, तो वृक्ष ती इच्छा पूर्ण करतो असे म्हटले जाते त्याचप्रमाणे भक्तांची आध्यात्मिक चेतना जागृतीची आणि मुक्तीची जी इच्छा होती ती रामकृष्ण परमहंस यांनी पूर्ण केली म्हणून या दिवसाला कल्पतरू दिवस असे म्हटले जाते. हा दिवस रामकृष्ण मठ, रामकृष्ण मिशन तसेच विवेकानंद केंद्रांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
या दिनी उपरोक्त ठिकाणी विशेष पूजा, वैदिक मंत्रोच्चार, भजन प्रवचन तसेच रामकृष्ण कथामृताचे पठण केले जाते. याशिवाय याच दिवशी भक्त एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात आणि रामकृष्ण परमहंस यांनी दिलेल्या संदेशाचे स्मरण करतात.
हा दिवस आध्यात्मिक चेतना जागृतीचा, नवीन वर्ष हे आध्यात्मिक वर्ष व्हावे अशी इच्छा प्रगट करणारा असावा म्हणून अशा पद्धतीने हा दिवस साजरा केला जातो.
आज इंग्रजी वर्षारंभ आहे. 31 डिसेंबर पासून बहुतांश लोक हे विविध पद्धतीने पार्ट्यांचे आयोजन करीत असतात, एन्जॉयमेंट चे वेध त्यांना लागलेले असतात. असते तर इंग्रजी नवीन वर्ष पण त्याचा उत्साह, ते साजरे करण्याचा जोम, हा इंग्रजांपेक्षा आपल्या भारतीयांमध्येच जास्त दिसून असतो. अशा या दिवशी म्हणजेच 1 जाने 1886 ला रामकृष्ण परमहंस यांनी काशीपूर उद्यानात भक्तांची अध्यात्मिक चेतना जागृत केली होती , तेथे उपस्थित सर्वांनाच मुक्ती मिळवून दिली होती. आज एक जानेवारी रोजी या घटनेचे स्मरण व्हावे म्हणून हा लेख लिहावासा वाटला.
इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छांसह सर्वांना रामकृष्ण परमहंस, माँ सारदा, स्वामी विवेकानंद यांचे आशीर्वाद प्राप्त व्हावे हीच सदिच्छा.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा