Click "Follow" Button below To Follow this Blog

२१/०५/२०२६

Article about NEET paper leak and old movie Tere Mere Sapne

  नीट परीक्षा घोटाळा आणि  तेरे मेरे सपने 




 नीट परीक्षा घोटाळा, पेपरफुट प्रकरणाने  तेरे मेरे सपने या वैद्यकीय पेशास समर्पित चित्रपटाचे स्मरण झाले. भारतातील गरीब रुग्णांना सहाय्य करणारे या चित्रपटातील डॉ आनंद सारखे अनेक डॉक्टर या देशात तयार व्हावेत , त्यांना शासनाचे,जनतेचे सहकार्य मिळावे,पुरेशा वैद्यकीय सुविधा मिळाव्यात,त्या अभावी कुणी तडफडून मरू नये हेच या देशातील जनतेचे अर्थात तुमचे आमचे तेरे मेरे सपने नाहीत का ?

     नीट परीक्षा 2026 पेपर फूट आणि घोटाळा  प्रकरण सध्या सर्वत्र गाजत आहे. काही नामांकित अशा क्लासेस चे संचालक तसेच मोठ्या महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच अनेक मध्यस्थी लोकांवर कारवाई सुरू झाली आहे. यापूर्वीही नीट परीक्षा घोटाळा हा बोगस विद्यार्थी परीक्षेला बसवण्याच्या संदर्भात उघडकीस आला होता परंतु ते प्रकरण दाबले गेले. लाखो रुपये फी घेऊन आणि पेपर मिळवून देण्याचे पुन्हा लाखो रुपये घेऊन डॉक्टर बनवून देणाऱ्या गब्बर क्लासेसवाल्यांच्या माध्यमातून डॉक्टर बनणारे विद्यार्थी पेशंटचे काय भले करणार ? पेशंटला काय बरे करणार ? लाखो रुपये खर्च केल्यावर पहिले तर ते लाखो रुपये कसे काय वसूल होतील ? यामागे हे डॉक्टर लोक धावतील किंबहुना धावतही आहे हे कोणीही कोणीही सांगेल (काही सन्माननीय अपवाद अवश्य आहेत.) आजकाल सर्व विद्यार्थी केवळ डॉक्टर आणि इंजिनियर याच क्षेत्राकडे धाव घेत आहे. पालकांनाही कसेही करून मारून - मुटकून आपल्या पाल्याला डॉक्टरच करायचे आहे मग त्याची इच्छा बौद्धिक पातळी असो वा नसो. यासाठी प्रसंगी त्याला विदेशात सुद्धा पाठवले जाते. डॉक्टर बना इंजिनियर बना, जरूर बना परंतु जी शपथ तुम्ही डॉक्टर बनवण्याच्या वेळी घेता ती शपथ ध्यानात ठेवा, चांगल्या मार्गाने आणि सेवेसाठी डॉक्टर बना अशा वाम मार्गाने बनत असाल तर त्यापेक्षा न बनलेले बरे.

नीट परीक्षा पेपर फुटी घोटाळा या विचारात असतांनाच जुन्या एका चित्रपटाची बातमी वाचनात आली. 13 मे रोजी या चित्रपटाच्या प्रदर्शनास 55 वर्षे झाली. हा चित्रपट म्हणजे नवकेतनचा “तेरे मेरे सपने”. हा चित्रपट म्हणजे एका डॉक्टरचीच कहाणी आहे. म्हणून याच विषयावर लिहिण्याचे नक्की केले शिवाय नुकताच जागतिक रुग्ण सेविका दिन सुद्धा झाला म्हणून मग लिहू लागलो. तेरे मेरे सपने माझ्या जन्माच्याही आधी प्रदर्शित झालेला सिनेमा आहे परंतू जुन्या चित्रपटांची , गाण्यांची, सुमधुर संगीताची आवड असल्याने मी लिहिता झालो. खुप वर्षांपूर्वी एका कडक उन्हाळ्यातील दुपारी मी हा चित्रपट दुरदर्शनवर पाहिला होता. यातील कर्णसुखद अशा संगीताने व गीतांनी विदर्भातील रणरणत्या उन्हाळ्यातील त्या दुपारी मला सुखद गारवा मिळाला होता. एस.डी. बर्मन यांनी स्वरबद्ध केलीली एकापेक्षा एक अशी नीरज यांची अवीट मधुर गीते आज 2026 मध्येही तितकीच ताजी आहेत जितकी 1971 मध्ये होती. एका तरुण कन्येस अनुरूप असा जोडीदार मिळाल्यावर, अनुरागामुळे तीच्यात तिलाच जाणवलेला बदल व्यक्त करणारे “जैसे राधाने माला जपी श्यामकी”, नवीन जोडप्याच्या आजीवन सोबत राहण्याची भावना व्यक्त करणारे “हे मैने कसम ली”, नवपरिणीत जोडप्याच्या जीवनवेलीवर जेंव्हा एक फुल उमलणार असते तेंव्हा त्यांच्या मनातील विचार मांडणारे “जीवन की बगीयाँ महकेगी” अशा कवी गोपालदास नीरज या देव आनंदचेच “फाईंड” असलेल्या सुमधुर रचना रसिकांना कर्णतृप्तीचा आनंद देतात. पण सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्वांबरोबर चित्रपटात वैद्यकीय व्यवसाय कशासाठी करावा ? हा संदेश हा चित्रपट देतो. 

 डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रास समर्पित असा हा विजय आनंद या प्रथितयश दिग्दर्शकाचा सिनेमा आहे. डॉक्टर झाल्यावर ग्रामीण भागात जाऊन तेथील गरीब रुग्णांना सेवा देण्याचे आदर्शवादी डॉ आनंद कुमार (देव आनंद) ठरवतो ( असे ध्येय प्रत्यक्ष जीवनात लाखोतून एखादा वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थी ठरवत असावा.) त्याच्या या निर्णयावर समाजाची प्रतिक्रिया , टोमणे हे अगदी मार्मिकपणे दाखवणारा हा सिनेमा आहे. एका कोळशाच्या खाणीलगतच्या गावात हा डॉक्टर सेवा देण्यास जातो. याच गावात डॉ प्रसाद हे 35 वर्षांपूर्वीच आलेले असतात त्यांच्याकडे डॉ. आनंद रुजू होतो. डॉ आनंदच्याही 35 वर्षे आधी या गावात आलेल्या डॉक्टरला परिस्थितीत काही विशेष बदल झालेला आहे असे वाटत नसल्याचे ते व्यक्त करतात. पुढे निशा (मुमताज) ही आनंदच्या जीवनात येते , अनेक रुग्ण, अपु-या वैद्यकीय व्यवस्था हे सर्व चित्र पाहून तो व्यथीत होतो, खेडेगावात रुग्णसेवेसाठी आलेल्या या डॉक्टरला त्याच्या पत्नीच्या अपघातास जबाबदार असलेला आरोपी जेंव्हा लाच देऊन सुटतो त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे  पुन्हा शहराकडे जावे लागते. या कथेत इतरही अनेक वळणे आहेत. पण सेवा म्हणून वैद्यकीय व्यवसायाकडे पाहण्याचा मुख्य संदेश देणारा हा सिनेमा आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनास काल 55 वर्षे पुर्ण झाली. हा चित्रपट ए. जे. क्रॉनीन यांच्या “सिटाडेल” या कथेवर आधारीत आहे. 

55 वर्षापुर्वीच्या अपु-या वैद्यकीय सुविधा , ग्रामीण रुग्णांचे होणारे हाल यावर भाष्य करणारा हा चित्रपट होता. चित्रपटात वैद्यकीय सुविधांची परिस्थिती 35 वर्षांपासून बदलेली नाही असा संवाद आहे. म्हणजे ती 35 व चित्रपट प्रदर्शित होऊन झालेली 55 अशा 90 वर्षांपासून आपण तिथेच आहोत का ? पैशांसाठी रुग्णांची अडवणूक, पिळवणूक करणाऱ्या डॉक्टरांच्या आणि रुग्णालयांच्या कित्येक बातम्या रोज येत असतात .

म्हणूनच तेरे मेरे सपने या वैद्यकीय पेशास समर्पित चित्रपटाचे स्मरण झाले. भारतातील गरीब रुग्णांना सहाय्य करणा-या या चित्रपटातील डॉ आनंद सारखे अनेक डॉक्टर या देशात तयार व्हावेत.  सुमार्गाने व्हावे घोटाळे करून नव्हे,  पेपर फोडून नव्हे. डॉक्टर बनले पाहिजे तर ते सेवेसाठी, आपल्या देशाला वैद्यकीय क्षेत्रात पुढे नेण्यासाठी, ग्रामीण आदिवासी भागात जाऊन तेथील रुग्णांना तपासण्यासाठी. घोटाळे, फुटलेले पेपर देऊन मग पास होऊन  डॉक्टर बनणारे लोक काय कामाचे ? 

या देशात बुद्धिमान, सुमार्गाने पास होणारे  सेवाभावी असे डॉक्टर बनावे त्यांना शासनाचे व जनतेचे सहकार्य मिळावे, पुरेशा वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, त्या अभावी कुणी तडफडून मरू नये हेच या देशातील जनतेचे अर्थात तुमचे आमचे म्हणजेच तेरे मेरे सपने नाहीत का ?

(2021 मध्ये प्रकाशित झालेल्या लेखाची दुसरी आवृत्ती)

✍️ विनय विवरणगावकर©

खामगाव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा