Click "Follow" Button below To Follow this Blog

०२/११/२०२६

Article avbout my Lt. father Vijay D. Varangaonkar

 “सखा” त्वमेव.

विजय द. वरणगांवकर

...लहान असतांना दादा कार्यालयात जाण्यास निघाले की मी मोठ्याने रडत असे मग ते परत फिरून मला एखादी चक्कर मारून ऑफिसला जात. आता ते कधीही परत फिरून न येणाऱ्या अंतिम प्रवासाला निघून गेले. त्या दिवशी त्यांच्या फोटोकडे पाहिल्यावर ओठांवर गाणे आले... 

ओ जानेवाले हो सके तो लौटके आना

आज दादांना जाऊन बरोबर एक महिना झाला. दादांविषयी लिहिण्यासाठी म्हणून कित्येक गोष्टी, आठवणी मनात घोळत होत्या पण त्या लिहिण्याचा योग आज आला. प्रत्येकाला आपल्या जन्मदात्यांविषयी नितांत आदर, प्रेम, जिव्हाळा असतोच. तो आम्हाला म्हणजे मी व माझ्या तीन बहिणींना कसा नसणार ? बरोबर एक महिन्यापूर्वी दादांनी इहलोकीची यात्रा संपवली. त्यांच्या जाण्याच्या काही दिवस आधी त्यांची प्रकृती ढासळायला लागली होती. तीस सप्टेंबर 2026 ची सकाळ आम्हा वरणगांवकर परिवारास तसेच दादांच्या अफाट मित्र मंडळीस, लोकसंग्रहास शोकसागरात बुडवून गेली. माझा भाऊ डॉक्टरांना घेऊन आला आणि डॉक्टरांनी दादा गेल्याचे  सांगितले. 2022 मध्ये त्यांना पार्किन्सन असल्याचे निदान झाले. बाहेर व घरात तोल जाऊन अनेकदा पडल्याने त्याचं स्कूटर चालवणे, बाहेर जाणे बंद झाले, मग ते घरीच असत. त्या दिवशी त्यांचे दुखणे कायमचे बंद झाले.  पार्किन्सन होऊनही ते शोक करीत बसले नव्हते. त्यांना अकोल्याला कारने तपासणी साठी नेतांना ते जुनी गाणी ऐकत, एखाद्या हॉटेलवर आम्ही चहा नाश्ता करीत असू. डॉक्टर सोबत सुद्धा त्यांच्या चांगल्या गप्पा होत असत. त्यांची, माझी मित्रमंडळी, नातेवाईक घरी आले की ते सर्वांना हसवत. त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर खुप चांगला होता. साधे, निस्वार्थी, Happy Go Lucky असे जीवन व्यतित करणारे, परिवारासाठी देह कष्टविलेले, माणसांनी केवळ स्वतःसाठीच जगू नये असे आम्हाला सांगणारे, जीवनात अनेक कठीण प्रसंगांचा सामना करणारे दादा आता स्तब्ध झाले होते. आयुष्यभर नेहमी दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या दादांनी त्यांच्या निधनाच्या आठ वर्षे आधीच देहदानाचा संकल्प करून त्यांच्या समाजोपयोगी विचारांना अंतिम क्षणापर्यंत जपले. कर्मकांड, मरणोपरांत विधी यांवर त्यांचा विश्वास नव्हता. "हा देह म्हणजे माती आहे बेटा, माणूस गेला की सर्व खल्लास, आत्मा कुडीतून गेला की मग या देहाचे तुम्ही काहीही करा, काही फरक पडत नाही." असे ते मला कित्येकदा सांगत. 2018 मध्ये “वैद्यकीय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मृतदेह कमी पडतात” अशी बातमी त्यांच्या वाचनात आल्याने देहदान करण्याचे त्यांनी व माझ्या काकांनी ठरवले होते. आम्ही आयुष्यभर त्यांच्या म्हणण्यानुसार चाललो म्हणून आमचे काका व वडील या दोघांचाही देहदानाचा संकल्प ईश्वराने आमच्या करवी पूर्णत्वास नेला. दादा गेले तेंव्हापासून डोळ्यासमोर त्यांच्यासह व्यतीत केलेले क्षण, त्यांची कार्यपद्धती अजूनही तरळत आहेत. 
      आमचे दादा म्हणजे परवानाधारक शिकारी वैद्य नानासाहेब वरणगांवकर यांचे सर्वात धाकटे चिरंजीव. आई वडीलांना न जाणे कोणता असा Sixth sense असतो, त्यांनी दादांना “सखा” हे टोपण नांव दिले आणि खरोखर सखा हे नांव त्यांना अगदी बरोबर लागू पडले. माझ्या वडिलांनी म्हणजेच विजय दत्तात्रय वरणगांवकरांनी मोठा लोकसंग्रह करून, जिवाभावाचे मित्र जोडून त्यांचे सखा हे नांव सार्थ केले. दादांचे एक मित्र प्रा.विनायकराव जोशी यांनी त्यांचे नांव विजयसखा असावे व त्यातून कागदोपत्री विजय व घरी सखा अशी विभक्त नांवे झाली असावीत असा निष्कर्ष काढला. विजयसखा, विजय म्हणजे अर्जुन आणि सखा म्हणजे कृष्ण असे ते म्हणतात.
         हा लेख थोडा दिर्घ होत आहे कारण आठवणीच तेवढ्या आहे. परंतू तरीही त्यातील अत्यंत निवडक बाबी इथे लिहित आहे.
     1966 मध्ये महसूल विभागात क्लर्क म्हणून रुजू झाल्यावर दादांनी स्टाफ सोबत, अधिकाऱ्यांसोबत घनिष्ट संबंध प्रस्थापित केले. महसूल विभागातील सर्व executive पदे त्यांनी उपभोगली. EDI (Entertainment Duty Inspector), FSI ( Food Supply Inspector) , IO (Inspecting Officer), NT (Naib Tahsildar) आणि तहसिलदार. IO या पदावर तर ते सात वर्ष होते. पण तत्कालीन राजकीय हस्तक्षेपाने, मर्जीतील अधिकारी आणल्याने त्यांची बदली झाली. यावेळी तमाम  केरोसिन हॉकर्स , स्वस्त धान्य दुकानदार त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. मलईदार खाते, टेबल मिळाल्यावर, "ते नको, मला ते जमणार नाही" अशी विनंती त्यांनी साश्रू नयनांनी E.G.Patil साहेबांना केली होती. "अनितीने मिळणाऱ्या पैशापेक्षा नीतीने मिळवलेले दुःख श्रेष्ठ असते" या उक्तीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. सरकारी पैसा मोठा danger असतो असे ते म्हणत. नोकरीच्या निमित्ताने त्यांचे सतत दौरे सुरू असत. थोरले बाजीराव ज्याप्रमाणे सतत घोड्यावर असत तसे आमचे दादा सतत स्कूटरवर असत. माझी आई अनेकदा "घेतली स्कूटर की पळाले" असे गमतीने म्हणत असे. विविध पदांवर काम करूनही त्यांनी ना पद डोक्यात जाऊ दिले, ना कधी अहंकार बाळगला. काही काळ तहसिलदार पदावर असूनही ते जीप न घेता स्कूटरवरच निघत. आम्ही मुलांनी काही म्हटले की म्हणत बेटा हे सर्व चार दिवसांचे असते. 
     दादांना चित्रपट, गाणी आवडत. शोले, हम दोनो, तेरे घर के सामने, मेरे महबूब, राजकुमार, आरजू हे त्यांचे आवडते चित्रपट आणि "मैं जिंदगी का साथ निभाता चला गया" हे सर्वात आवडीचे गीत. शोलेच्या प्रभावामुळे त्यांनी त्यांच्या स्कूटरचे नामकरण धन्नो केले होते. दादा स्वच्छता, टापटीप आणि वक्तशीरपणाचे भोक्ते होते. "काम कसे काटकोन चौकोनात झाले पाहिजे, म्हणजे व्यवस्थित झाले पाहिजे" असे ते म्हणत. 
 दुस-याच्या मदतीस धाऊन जाण्याच्या वृत्तीने आणि निस्वार्थीपणाने त्यांनी मोठा लोकसंग्रह प्राप्त केला. गरीब परिस्थितीतून उभे राहून त्यांनी स्वत: सोबत दुस-याचाही कसा उत्कर्ष होईल हे पाहिले. अनेकांना नोकरी मिळवून देण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. त्यामुळे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख हे तर त्यांचे मित्र होतेच शिवाय मारवाडी, गुजराथी, जैन इ समुदायात सुद्धा त्यांना अनेक स्नेहीजन होते. याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे खामगांवच्या सायकल वाले राठी परिवाराच्या एका लग्न पत्रिकेत मामा म्हणून त्यांचे नांव छापले होते. म्हणूनच त्यांचे सखा हे नांव त्यांना शोभत असे. बुलढाणा खामगांव अप-डाऊन करतांना त्यांच्या दिलखुलास स्वभावाने ते सर्व प्रवाश्यांना हसवत असत. त्यामुळे शेगांव-जामनेर गाडीला कितीही गर्दी असली तरी त्यांना जागा मिळत असे. जैन कंडक्टर काका त्यांचे मित्र झाले होते. त्यापूर्वी खामगांव-मलकापूर अप-डाऊन प्रवास करतांना सय्यद साजिद सैय्यद रशीद काका ड्रायव्हर हे त्यांचे पक्के मित्र झाले होते. नात्यातील व मानलेल्या अशा बहिणीकडून ओवाळून घेण्यासाठी भाऊबीज व राखी पौर्णिमेला ते आवर्जून  जात. ज्या भावाच्या पाठीशी बहिणींच्या सदिच्छा, आशीर्वाद असतात त्यांच्या मागे संकटे लागत नसतात, अरिष्ट त्यांच्यापासून लांब पळतात. दादांचे तसेच झाले. संकटे, कठीण प्रसंग आले पण दादा त्यातून सही सलामत बाहेर निघाले.
      दादांना इस्त्रीचे कपडे घालायला आवडत, अत्तर आवडे, जेवणात त्यांना कधी काही आवडले नाही असे आम्ही कधीच पाहिले नाही. सर्व पदार्थ ते आवडीने खात. त्यांना पोषक पदार्थ, फळे, दूध, दुग्धजन्य पदार्थ, तूप, शिरा हे आवडत असत. अशा पदार्थांना ते माल म्हणत. ते स्वतः उत्कृष्ट स्वयंपाक बनवत असत. त्यांच्या हातची मिरच्यांची भाजी अत्युत्कृष्ट असे. त्यांच्या हातचे पराटे तर एक नंबर होत असत. मित्र मंडळीच्या गृपला ते कंपनी म्हणत. दरवर्षी आमच्या कंपनीची कोजागिरी आणि मिरचीच्या भाजीची पार्टी ते पुढाकार घेऊन आयोजित करत. 
दादांची कोजागिरी. सोबत डी.एन.महाजन काका


     व्यायाम, कामे करण्यास त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. लहानपणापासून अगदी आता-आता पर्यंत आम्ही त्यांना व्यायाम करतांना पाहिले आहे. 

 ते फुलबाहीचा शर्ट घालून त्याच्या बाह्या कोपरापर्यंत फोल्ड करत असत, फोल्ड केलेल्या बाह्या, पूर्ण केस मागे वळवलेल्या भांगाची ठेवणं असलेले आमचे दादा एखाद्या जुन्या हिरो प्रमाणे Handsome दिसत. त्यांच्या व्यतिमत्वाचा प्रभाव पडत असे. स्वभाव एकदम साधा, विनोदी, जिंदादील, कशाची हाव नाही , "जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया" असे एकदम निर्मोही, निस्वार्थी. दुसऱ्याच्या घरच्या तूप-रोटी पेक्षा आपल्या घरची मिठ-भाकरी बरी असे ते नेहमी म्हणत.
     दादांची उभी हयात खामगांवात गेली. नोकरीच्या सुरुवातीला ते बुलढाणा, चिखली, मेहकर, मलकापूर या ठिकाणी काही काळ कार्यरत होते. तर नोकरीच्या उत्तरार्धात काही वर्ष बुलढाणा इथे होते तसेच काही काळ शेगांव नगर परिषद सी. ओ. होते. स्वस्त धान्य दुकानदार खामगांव तालुका, शेगांव नगर परिषद कर्मचारी, इतर सर्व सहकारी , त्यांचे मित्र, चाहते यांनी त्यांच्याबाबत सोशल मिडीयावर लिहिलेल्या शोक संदेशांवरून तसेच मला भेटायला आलेल्या स्नेहिजन यांच्या बोलण्यावरून, आप्तस्वकीयांनी केलेल्या दूरध्वनी वरून त्यांची कार्यप्रणाली व लोकांचे त्यांच्यावर किती प्रेम होते हे आम्हाला अधिक चांगल्या प्रकारे दिसून आले. या लोकांनी सुद्धा आम्हाला त्यांच्या अनेक आठवणी व त्यांनी केलेल्या मदतीच्या गोष्टी सांगितल्या ज्या आम्हाला पण ठाऊक नव्हत्या.
    आजोबा परवानाधारक शिकारी असल्याने अनेकदा जंगलात जात. वन्यप्राणी पाळण्यास तेंव्हा बंदी नसल्याने घरी मोर, हरीण व अस्वल पाळले होते. दादा सुद्धा आजोबांसोबत  अनेकदा जंगलात जाऊन आलेले त्यामुळे त्यांच्याही अंगी धाडस होतेच. याच धाडसाने त्यांनी अनेक कठीण प्रसंगातून मार्ग काढले. 1980 च्या दशकात जेव्हा जास्त गाड्या नव्हत्या, वर्दळ नव्हती तेव्हा कित्येकदा बुलढाणा - खामगांव बोथ्याच्या जंगलातून ते रात्री स्कूटरने एकटेच येत असत. दादा म्हणजे "धटाशी धट, खटनटाशी खटनट" या रामदास स्वामींनी सांगितलेल्या उक्ती प्रमाणे वागत. सज्जनांशी जेवढे मृदू तेवढेच दुर्जनांशी कठोर. आम्हा मुलांना सुद्धा ते कोणालाही न घाबरण्याचा नेहमी उपदेश करीत असत.
      माझी आई, आम्ही भावंडे, पुतणे, भाचे, नातू, जावई सर्वांकडे ते जातीने लक्ष देत. कुणाच्या अडचणीच्या प्रसंगी ते धाऊन जात. ते लोकांवर संपूर्ण विश्वास टाकून काम करत. गावातील अनेक लोक त्यांचा सल्ला घेऊन काम करीत. अनेकांची कामे दादांनी आपपरभाव न ठेवता चुटकीसरशी केली. सर्वांशी त्यांची सारखी वागणूक असे,  जातीभेदाचा कुठेही लवलेश नसे. 
   दादा Panctual, सुयोग्य आहार आणि फळफळावळे  खाणारे, निर्व्यसनी. खामगांव नगर परिषदेच्या हद्दीत ते हॉटेलिंग करत नसत आणि ही त्यांची प्रतिज्ञा खामगांवातील अनेकांना माहीत होती. रोजचा दिनक्रम एकदम पक्का त्यामुळे ते वयाची शंभरी गाठतील असे आम्हाला वाटे परंतू आयुष्यभर इतरांच्या भल्यासाठी जगलेले दादा एकदिवस मला "आता सर्व झाले आता देवानी नेले पाहिजे" असे म्हणाले तेव्हा काळजात एकदम धस्स झाले पण तरीही त्यांना चित्रपट आवडत असल्याने "हम सब तो रंगमंच की कटपुतलीया है..." हा आनंद सिनेमातील संवाद म्हणून दाखवला त्यावर ते हसून बरोबर आहे असे म्हणाले होते. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे पार्थिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे सुपूर्द केले. त्यांच्या निधनाची बातमी अनेकांना उशिरा कळली त्यामुळे अनेक लोक नंतर भेटीला येऊन गेले, अजूनही येत आहेत. 
कॉलेज मित्र डावी कडून जीवन मिहानी काका, पॉल काका,दादा आणि सुभाष बोबडे काका.

     सर्वांना मदत करणारे दादा, कॉलेज, एन. सी. सी. मधील सोबत्यांना हवेहवेसे वाटणारे मित्र असलेले दादा, गणपती विसर्जन मिरवणुकीत मानाच्या लाकडी गणपती मंडळात नगारा वाजवणारे दादा, लहानपणी आम्हाला, आमच्या मुलांना काही आजार झाला की आमच्या उशाशी बसून हनुमान चालीसा म्हणणारे दादा, सायकल रिक्षात आम्हाला फिरायला नेल्यावर रस्त्यात चढ आला की रिक्षावाल्याला मागून धक्का देणारे दादा, गरीब मुलांना दिवाळीत फटाके देणारे दादा, घरच्या कामगारांना ते दरवर्षी increment देत. आम्ही त्यांना म्हणत असू की त्या कामगारांनी मागितले नाही तर कशाला देता त्यावर "आपल्याला कसे increment मिळाले की आनंद होतो मग त्यांना नको का ?" असे म्हणणारे दादा. अशा कित्येक आठवणी दादा मागे ठेऊन गेले. ज्येष्ठ मंडळी मला सांगतात आणि मला पण पुसटसे आठवते, मी लहान असतांना दादा कार्यालयात जाण्यास निघाले की मोठ्याने रडत असे मग ते परत फिरून मला एखादी चक्कर मारून ऑफिसला जात. आता ते कधीही परत फिरून न येणाऱ्या अंतिम प्रवासाला निघून गेले. त्या दिवशी त्यांच्या फोटोकडे पाहिल्यावर ओठांवर गाणे आले...
बचपन के तेरे मीत तेरे संग के सहारे  
ढूंढेंगे तुझे गली गली सभी गम के मारे
 पूछेगी हर निगाह कल तेरा ठिकाना 
ओ जानेवाले हो सके तो लौटके आना 
गाणे म्हणता म्हणता अश्रूपात झाला, ते पाहून सौ आणि ज्येष्ठ भगिनीचे डोळे सुद्धा पाणवले.
अगदी अलीकडचे स्नेहमिलन. डावी कडून दादा, महाजन काका, अशोक झुनझुनवाला काका, विलास सकळकले काका, बापू काका पाटील, रामदास नरवाडे काका.

      "त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव" हे ईश्वराला उद्देशून म्हटले आहे. माता-पिता हे आपले ईश्वरच असतात आमचे दादा सुद्धा आमचे माता, पिता, बंधू आणि "सखा" होते. डॉ. अभय चांदे यांनी सांत्वनपर बोलतांना अत्यंत कमी परंतू मार्मिक शब्दात "ते सर्वांचेच मित्र होते" असे म्हटले. खरेच दादा आमचेच नाही तर सर्वांचेच सखा होते. 
     दादा तुमच्या अनेक आठवणी आहेत, किती लिहू ? तुमचे, आईचे आशीर्वाद पाठीशी आहेतच, पुढेही राहतील. तुमचे कार्यमग्नता, बहुगुणीपणा, लोकसेवा, सकारात्मक दृष्टिकोन, दिलखुलासपणा, निस्वार्थीपणा इ . अनेक गुण आम्हा सर्वांमध्ये उतरोत व सदैव प्रेरणा देवोत.   

दे दे के ये आवाज कोई हर घडी बुलाये 
फिर जाये जो उस पार कभी लौटके ना आये
                   है भेद ये कैसा कोई कुछ तो बताना 
                 ओ जानेवाले हो सके तो लौटके आना 
ये घाट, ये बाट कहीं भूल ना जाना

घराला आपले नांव दिलेले पाहतांना सखा वरणगांवकर नातू वेद सह