Click "Follow" Button below To Follow this Blog

२४/०९/२०२६

Article describing word commotion and cacophony regarding sound polution.

 कमोशन आणि ककॉफनी चे दिवस


डीजेला विरोध करणाऱ्या, सर्वच धर्माच्या लोकांनी उत्सव साजरे करतांना इतरांना त्रास होईल अशा प्रकारे उत्सव साजरा करू नये म्हणणाऱ्या विद्यानंद बापट यांचा विषय ताजा आहे आणि हा विषय सुरू असतांनाच इयत्ता दहावीच्या इंग्रजी विषयातील एका पाठातील कमोशन आणि ककॉफनी हे शब्द माझ्या वाचनात आले. 

आता कमोशन ( commotion ) आणि ककॉफनी ( cacophony ) या इंग्रजी शब्दांची ही काय नवीन भानगड ? असा प्रश्न वाचकांना नक्कीच पडला असेल.  तसा प्रश्न पडणे स्वाभाविक सुद्धा आहे कारण इंग्रजी ही काही आपली भाषा नाही आणि हे शब्द कोणाला माहित नसतील तर त्यांचे त्यामुळे काही अडतही नाही. इंग्रजी विषयाचे चांगले ज्ञान असणाऱ्या वाचकांना मात्र या शब्दांबाबत प्रश्न पडण्याचे काही कारण नाही. त्यांना शीर्षक वाचल्या क्षणीच अर्थ लागला असेल आणि लेखाचा विषय सुद्धा ध्यानात आला असेल. गत महिन्यामध्ये

घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्।

येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत्॥

मडके फोडावे, कपडे फाडावे, हवे तर गाढवावर बसून फिरावे, पण येन केन प्रकारेण - कसल्याही मार्गाने प्रसिद्ध व्हावे. 

     असा या सुभाषिताचा अर्थ होतो. हे सुभाषित म्हणत डीजेला विरोध करणारे, वरील सुभाषिताप्रमाणे सवंग प्रसिद्धी  मिळवण्याची इच्छा नसणारे विद्यानंद बापट हे चांगलेच प्रसिद्धीच्या झोतात आले आणि तार्किकदृष्ट्या त्यांचे म्हणणे अनेकांना पटले. सर्वच धर्माच्या लोकांनी उत्सव साजरे करताना इतरांना त्रास होईल अशा प्रकारे उत्सव साजरा करू नये, डीजे वाजवू नये असे बापट यांचे म्हणणे आहे. अद्यापही बापट यांचा विषय ताजा आहे आणि हा विषय सुरू असतानाच माझ्या वाचनात महाराष्ट्र राज्याच्या इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमाच्या इंग्रजी विषयातील An Encounter of a Special Kind हा पाठ आला. एका माकडाच्या पिल्लाला म्हाळ्या (माकडांच्या टोळीचा प्रमुख नर माकड) पासून वाचवणाऱ्या एका मुलाची गोष्ट या पाठात सांगितलेली आहे. शीर्षकातील कमोशन आणि ककॉफनी हे शब्द या धड्यात वाचनात आले. या शब्दातील कमोशन चा अर्थ आवाज, गोंधळ, हुल्लडबाजी असा होतो  ककॉफनी शब्दाचा अर्थ भला मोठा आवाज, गोंगाट कर्णकर्कश्श आवाज असा होतो. कमोशन आणि ककॉफनी या शब्दांनी माझे विशेष लक्ष वेधले कारण डीजेचा आवाज हा सुद्धा प्रचंड मोठा असा आवाज असतो, कर्णकर्कश्श आवाज असतो, कुणी कर्णबधिर होईल असा तो आवाज असतो आणि त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी घातली आहे तर महाराष्ट्रात पुणे येथील विद्यानंद बापट यांनी डीजे विरोधाचा मुद्दा लावून धरला आहे. परंतु याबाबत डीजे व्यावसायिक, गणेश मंडळे, राजकीय लोक हे कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. म्हणून इथे गणपती बाप्पालाच पुढील प्रार्थना करावीसी वाटली.

     गणपती बाप्पा तू उद्या जाणार आहे. गणपती बाप्पा तुझे कान मोठे आहे या मोठ्या कानांमुळे तुला लांबवरचे ऐकू येते पण तुझ्या मिरवणुकीतील डीजेमुळे तू सुद्धा त्रस्त होत असशील. तुझ्या भक्तांचे कान तर छोटे आहेत ते डीजेचा मोठा आवाज सहन करणार नाही असे आहे. उद्या तुझी मिरवणूक निघेल, तुझे विसर्जन अनेकांच्या मनाला चटका लावून जाणारे असते परंतु याच विसर्जनाच्या दिवशी प्रचंड कोलाहल असतो, डीजेचा आवाज असतो. बाप्पा आधीच तर शहरात किती गोंगाट असतो. कुठे गाड्या, कुठे जेसीबी, कुठे हॉर्न  कुठे भोंगे आणि त्यातच आता भरीस भर म्हणून ही आलेली डीजेची  नसती ब्याद. देवा हा आवाज थांबवण्याची बुध्दी तू लवकरात लवकर सर्वांना प्रदान कर अशी तुला विनवणी. कारण या आवाजामुळे अनेकांचे जीव गेले आहेत तर कित्येकांना बहिरेपणा आला आहे. ध्वनि प्रदूषण करणाऱ्यांना चांगली बुद्धी झाली तरच हे बंद होऊ शकते त्यांना जर नाहक सल्ला वगैरे दिला तर ते कुणाचे ऐकत नाही हे बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून दिसून आले. सामान्यांच्या मनातील या प्रार्थनेशिवाय इतर कोणतंही पर्याय दिसत नाही. असो!

     श्रावण महिन्यापासून आपले सण समारंभ सुरू होतात आणि कावड यात्रेपासून डीजेचा गोंगाट सुरू होतो. हा आवाज गणपती मिरवणुकांमध्ये उच्चांक गाठतो आणि त्यानंतर  नवरात्रीच्या मिरवणुकीपर्यंत हा डीजे धुमाकूळ घालत असतो. इतर वेळी महापुरुषांच्या जयंत्या, लग्न समारंभ, वाढदिवस, नेत्यांच्या रॅल्या यामध्ये सुद्धा या डीजेचा धुमाकूळ सुरूच असतो. परंतु गणपतीमध्ये अतिउत्साह असल्यामुळे डीजेचा आवाज हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो. अशाप्रकारे 365 दिवसांपैकी मोजकेच दिवसच हे शांततापूर्ण (अर्थात डीजे विरहित असतात इतर ध्वनी प्रदूषण मात्र असतेच.) असतात अन्यथा उर्वरित सर्व दिवस हे निव्वळ कमोशन आणि ककॉफनी चे च दिवस असतात.

१७/०९/२०२६

Artical written for marathi weekly Vivek on the occasion of Ganpati Festival 2026

लाकडामंदी कोरलाय भक्तीभाव.

खामगांवच्या लाकडी गणपती बद्दल विविध जाती धर्माच्या सर्व खामगांवकरांना प्रचंड आत्मीयता आहे. खामगांवातील गरीब, श्रीमंत सर्वांचा लाकडी गणपती आधार आहे. त्याच्या मंदिरात सर्वजण रमतात.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव शहर म्हणजे कापसासाठी प्रसिद्ध असे शहर, कापसाची मोठी बाजारपेठ येथे होती. देशभरातील कापसाचा भाव खामगांवातून ठरायचा असे जुने जाणकार लोक सांगत असतात, सिल्वरसिटी ही तशी  खामगांवची अलीकडची प्रसिद्धी. पण ज्याप्रमाणे येथे चांदीच्या कलात्मक वस्तू बनतात त्याचप्रमाणे येथे उत्कृष्ट शिल्पकलेचे सुद्धा दर्शन घडते. येथील नटराज गार्डन आणि जनुना तलाव  उद्यानातील आकर्षक शिल्पे, राष्ट्रीय शाळेतील लक्षवेधक शिल्पे याची साक्ष देतात. अशा कलेची जोपासना करणाऱ्या गावातील ग्रामदैवत लाकडी गणपती सुद्धा काष्ठशिल्पाचा जबरदस्त नमुना आहे. हा मानाचा लाकडी गणपती पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. साधारणत: एकशे तीस वर्षांपूर्वी त्याची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. तेंव्हापासून आजपर्यंत येथील गणेशोत्सव व वर्षभरातील कार्यक्रमांना भाविकांची मोठी गर्दी असते. महाराष्ट्राच्या विविध भागातील भाविकांसोबत मध्यप्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड येथील भाविकही या गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. अतिशय रेखीव व तेवढीच देखणी असलेली ही गणेश मूर्ती  लाकडातून साकारण्यात आली आहे.  सहा फूट उंच ही गणेश मूर्ती काष्ठशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. लाकडी गणपतीचे मुकुट त्याचे कान, सोंडेवरील नक्षीकाम आणि मूषकराज हे  चांदीने मढवण्यात आले आहे. त्यामुळे मुर्तीच्या देखणेपणात आणखी भर पडली आहे. संपूर्ण लाकडापासून तयार केलेली अशी गणेशाची मूर्ती महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात क्वचितच आढळेल. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी दुरूनच या गणेशाचे दर्शन घडते. पाहता क्षणीच ही मूर्ती मनात घर करते. मंदिर परिसरातील वातावरण अतिशय आनंदी आणि मनाला शांती देणारे आहे गणेशोत्सव काळात मूर्तिच्या चेहऱ्यावरील भाव बदलत असतात अशीही काही भाविकांची श्रद्धा आहे. हा गणपती कसा तयार झाला याच्या दोन आख्यायिका सांगितल्या जातात. 

     काहींच्या मते एकशे तीस वर्षांपूर्वी खामगांव शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या बोर्डी नदीला (आताच्या फरशी नाल्याला ) मोठा पूर आला होता. त्या पुरात लाकडाचा एक मोठा ओंडका वाहत आला. तो फरशी जवळ अडकला. तेंव्हा गावकऱ्यांना तो ओंडका गणपतीच्या आकाराचा असल्याचा जाणवला. तो पाण्यातून बाहेर काढला असता हुबेहूब गणपतीच असल्याचे आढळल्याने गावकऱ्यांनी या गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. 

     दुसऱ्या आख्यायिकेनुसार खामगांवातील फरशी भागातील अय्याची कोठी भागात दक्षिणेकडून आलेले आचारी राहत होते. त्याकाळी गॅस आदी उपकरणे नसल्याने स्वयंपाक हा चुलीवर होत असे त्यामुळे हे आचारी लोक मोठमोठी लाकडे आणत असत, त्यातील काही लाकडांमध्ये त्यांना गणपतीचे अवयव भासले व तशा लाकडांपासून त्यांनी हा सुरेख गणपती तयार करून घेतला आणि अय्याची कोठी भागातच त्याची प्रतिष्ठापना केली. 

     नंतरच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत त्याला मानाचे स्थान देण्यात आले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत लाकडी गणपती पहिल्या क्रमांकावर असतो पण त्याचे विसर्जन केले जात नाही त्या दिवशी केवळ हलविला जातो. ठरलेल्या मार्गावरून शोभायात्रा फिरल्यानंतर हा गणपती परत मंदिरात आणण्यात येतो. खामगांवातील गणेशोत्सव अतिशय शांततेत कसा पार पडेल आणि अन्य गणेश मंडळांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेत लाकडी गणपती निर्धारित वेळेतच फरशीवर आणण्यात येतो सर्व गणेश मंडळाच्या मिरवणुकीचे नेतृत्व याच गणपतीकडे असल्याने ते निर्विघ्न आणि वेळेत पार पडण्याची काळजी लाकडी गणेश मंडळ घेते. एरवी मिरवणुकीत जल्लोष असतो "गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या" असा जयघोष होतो, उत्सवाचा अतिरेक मात्र केला जात नाही. शिस्तीत, जल्लोष आणि शांततेत उत्सव साजरा करण्याची प्रेरणा कार्यकर्त्यांना मिळते. या गणपतीची विसर्जनाची प्रतीकात्मक मिरवणूक ही पुर्वी बैलगाडीत निघत असे आता मात्र काही अंतरापर्यंत गाडी बैल ओढतात व नंतर मात्र सुशोभित ट्रॅक्टर मधून गणपतीला नेले जाते. 

लाकडी गणपती मिरवणुकीचा जुना फोटो. गणपतीच्या उजव्या बाजूला विजय दत्तात्रय वरणगांवकर

     लाकडी गणपती बाबत एक कटू व विसरली जाणार नाही अशी आठवण सुद्धा आहे जी इथे सांगितल्या वाचून राहवत नाही. ती आठवण म्हणजे, 1956 मधील दंग्यात गणपतीस इजा पोहचली होती. त्या काळात झालेला हा भीषण दंगा होता. ज्याचे वृत्त BBC रेडिओ ने दिले होते. अल्पावधीतच लाकडी गणपतीस जिथे क्षती पोहचली होती तो भाग पुनर्निर्मित केला गेला. असे जुन्या पिढीतील जाणकार लोकांकडून ऐकले आहे. 

      स्वातंत्र्यानंतर खामगांवकरांनी या गणपतीकडे विशेष लक्ष दिले. त्यावेळी खामगांवातील व्यापारी मंडळी विशेषतः अडत व्यापाऱ्यांनी या मंदिरासाठी पुढाकार घेतला. त्यावेळच्या विश्वस्त मंडळात जयनारायण नंदलाल, माताशरण दुबे, दत्तात्रय उर्फ वैद्य नानासाहेब वरणगांवकर, एकनाथ जयराम,  गंगाधरराव पिवळटकर, भिकाजी निंबाजी आणि त्र्यंबकलाल पूरवार यांनी काम पाहिले.  1995 मध्ये धर्मदाय आयुक्त यांनी आर. बी. अग्रवाल व त्यांच्या सहकाऱ्यांना या मंदिराचे व्यवस्थापन सोपवले. सध्या या लाकडी गणपती मंदिर संस्थेचे अध्यक्ष सुरज अग्रवाल हे असून शेखर पुरोहित, अधिवक्ता धनंजय भेरडे, अमित गोयनका, संजय झुनझुनवाला असे पदाधिकारी व इतर सदस्य निष्ठेने कार्य करीत आहे.

 सुरुवातीला छोट्या जागेत असलेल्या या मंदिराचा 1997 या वर्षी पहिला जिर्णोद्धार करण्यात आला. पण तरीही वाढती लोकसंख्या आणि मंदिराचा वाढता कारभार पाहून ही जागा सुद्धा कमी पडत होती म्हणून गतवर्षी म्हणजे 20/08/2025 रोजी मंदिराचा पुन्हा विस्तार करण्यात आला यासाठी मंदिराच्या आजूबाजूच्या जागा काही मंडळींनी दान केल्या त्यात गिरजापुरे कुटुंबीयांचा यांचा मोठा वाटा आहे. आता मंदिर हे अधिक प्रशस्त व नजरेत भरेल असे झाले आहे. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त भाविकांना सामावून घेणारी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. 

लाकडी गणपती मंदिराच्या आधुनिक स्वरूप

     मंदिर परिसर चिंचोळा असला तरी भाविकांना कमीत कमी त्रास होतो दर्शनाच्या वेळी शिस्त पाळली जाते. रांगेतील भाविक अन्य भाविकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतात. गणेशोत्सव काळात दहाही दिवस भाविकांची गर्दी असते. दर महिन्यात संकष्टी चतुर्थीला सुद्धा मोठी गर्दी असते.    खामगांवकरांचे आराध्य दैवत असलेल्या लाकडी गणपतीशी भाविकांच्या भावना जुळल्या आहेत. दरवर्षी गणेशोत्सव काळात बाहेरगांवी नोकरी व्यवसाय निमित्त गेलेले नागरिक लाकडी गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात.

लाकडी गणपती खामगांवाचा सामाजिक सहभाग :-

१. अन्नदान -

लाकडी गणपती मंदिर संस्थान खामगावात अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रमात सामाजिक उपक्रम राबवत आले आहे. 1980-90 च्या दशकात भाविकांना प्रसाद वितरण तसेच अन्नकुटाचे आयोजन करण्यात येत असे चतुर्थीच्या दिवशीचा प्रसाद हा काही भक्त स्वतःच्या घरी बनवून भाविकांना वितरित करत असत. गणेशोत्सवात जनतेसाठी अन्नकुटाचे आयोजन सुद्धा अनेक वेळा झाले आहे. 

२. पर्यावरण जन जागृती

लाकडी गणपती संस्थानचा गणेशोत्सव अधिकाधिक निसर्गप्रेमी व स्मरणात राहणारा असावा म्हणून या मंडळाचे काम सुरू असते. एरवी  गणेशोत्सव म्हटला की दरवर्षी पीओपी, ध्वनी प्रदूषण जलप्रदूषण असे विषय चर्चेत येतात परंतु खामगांवच्या या मानाच्या लाकडी गणपती मंडळाने मिरवणुकीत साधेपणाचा अंगीकार करून ध्वनी प्रदूषणास आळा घालण्यास हातभार लावला आहे. संस्थान पर्यावरण रक्षणाचे कार्य अनेक सुद्धा अनेक वर्षापासून करत आले आहे. कोणत्याही  प्रकारच्या प्रदूषणाला मोठा हातभार लागणार नाही यासाठी व्यवस्थापन काळजी घेते. शहरातील इको फ्रेंडली गणेश उत्सवालाही प्रोत्साहन देते. 

३. आरोग्य शिबिरे-

   याशिवाय या लाकडी गणेश मंदिराचे विश्वस्त विविध सामाजिक कार्याला हातभार लावतात. समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्याबरोबरच आरोग्य सेवेसाठी मंदिर व्यवस्थापन शिबिरांचे आयोजन करत असते. खऱ्या गरजूंना उपचारासाठी मदतही दिली जाते. 

४. रक्तदान शिबिरे-

   दरवर्षी गणेश जयंतीच्या अनुषंगाने रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित केले जाते गतवर्षी यात 117 युवकांनी रक्तदान केले होते. विशेष म्हणजे रक्तदात्यांचा सन्मान सुद्धा विश्वस्त मंडळ करत असते.

 ५. संस्कृती जतन-

आपली भारतीय संस्कृती परंपरा जतन व्हावी म्हणून तसेच संस्कृत लोक नवीन पिढीतील विद्यार्थ्यांना यावे म्हणून धार्मिक पुस्तकांची व श्लोकांची पुस्तके किशोरवयीन विद्यार्थ्यांना व तरुणांना मोफत वितरित केली जातात. आज पर्यंत शेकडो अथर्वशीर्ष पुस्तकाचे वितरण या गणपती संस्थांनी केले आहे.

 आगामी काळात भाविकांना अधिकाधिक सेवा पुरवण्यासोबतच येणाऱ्या मिळकतीतून मोठे सामाजिक कार्य उभे करण्याचा मानस येथील व्यवस्थापन मंडळाने केला आहे.

खामगांवच्या लाकडी गणपती बद्दल विविध जाती धर्माच्या सर्व खामगांवकरांना प्रचंड आत्मीयता आहे. खामगांवातील गरीब श्रीमंत सर्वांचा लाकडी गणपती आधार आहे. त्याच्या मंदिरात सर्वजण रमतात म्हणून शेवटी असे म्हणावेसे वाटते की,

लाकडामंदि कोरलाय भक्ती भाव 

रमती इथे रंका संगती राव. 

- समाप्त -

👉 हाच लेख ७ सप्टे  २०२६ च्या साप्ताहिक विवेक मध्ये प्रकाशित झाला आहे. साप्ताहिक विवेकची  लिंक👇 https://www.evivek.com/Encyc/2026/9/9/article-on-lakdi-ganpati-temple-khamgaon.html

✍️ विनय वि. वरणगांवकर© 

9403256736

खामगांव

०३/०९/२०२६

Article about a lady who ran for her daughter

..आणि रमाबाई धावल्या 


आपल्या लेकरांसाठी घेतलेले कष्ट, झेललेली अनेक संकटे याबाबतच्या कित्येक गोष्टी आपल्या ऐकिवात आहेत परंतु रमाबाई रणवरे यांनी एक माता आपल्या लेकरांसाठी काय करू शकते हे  आपल्याला प्रत्यक्ष दाखवून दिले आहे.  

काल रमाबाई रणवरे नावाच्या एका स्त्रीचे प्रेरणादायी असे वृत्त वाचले आणि डोळ्यासमोर काही उल्लेखनीय अशा रमाबाई नावाच्या स्त्रिया  येऊन उभ्या राहिल्या. का नाही उभ्या राहणार ? रमा हे नावच तसे आहे, लक्ष्मीचे. खरे तर रमाबाई नावाच्या अनेक कर्तृत्ववान नावाच्या स्त्रिया असतील आणि होऊनही गेल्या असतील पण माझ्या डोळ्यासमोर मात्र तीन रमाबाई आल्या. त्यात सर्वप्रथम माधवराव पेशव्यांच्या सहचरणी, माधवरावांच्या आजारपणात त्यांची सुश्रुषा करणाऱ्या, त्यांच्या मरणोपरांत सती जाणाऱ्या, थेऊर गणपती येथे चित्त लावणाऱ्या आणि तिथेच त्यांची समाधी असणाऱ्या रमाबाई पेशवे या आठवल्या. नंतर आठवल्या थोर समाजसेविका, हिंदू लेडी सोशल क्लब आणि सेवासदन सोसायटीची स्थापना करणाऱ्या, पतीच्या प्रेरणेने स्वतः शिक्षण घेऊन 1886 मध्ये मुलींसाठी पहिले उच्च विद्यालय स्थापन करणाऱ्या रमाबाई रानडे. त्याचप्रमाणे आणखी एक अशा रमाबाई डोळ्यासमोर आल्या की ज्यांच्याबाबत, "त्यांच्या आत्मत्यागामुळे माझे विदेशातील शिक्षण पुर्ण झाले." असे   डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते त्या त्यांच्या पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर. अशा मुख्यत्वे करून तीन रमाबाई माझ्या डोळ्यासमोर आल्या त्याला निमित्त घडले ते वर उल्लेखलेले मी वाचलेले रमाबाई रणवरे यांचे प्रेरणादायी वृत्त.  

     रमाबाई रणवरे अंबाजोगाई, जि. बीड येथील अतिशय सर्वसामान्य स्थितीत जीवन जगणारी , लोकांच्या घरी स्वयंपाक करून आपल्या दोन मुलींचा सांभाळ करणारी , पतीचे निधन झालेले अशी 47 वर्षाची स्त्री. दुसऱ्यांच्या घरी काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या भारतातील कुटुंबीयांच्या परिस्थितीबद्दल जास्त विशद करण्याची काही आवश्यकता नाही आपण सर्वच असे कुटुंबीय, असे लोक जवळून पाहत असतो. त्याच प्रकारात मोडणाऱ्या या रमाबाई रणवरे. पतीचे अपघाती निधन झाल्यावर दोन मुलींचा सांभाळ करण्यासाठी रमाबाई कंबर कसून कष्ट करू लागल्या. बरेच प्रसंगी सरकारच्या अनेक फुकटछाप प्रकारच्या योजनांमुळे समाजात असे बोलले जाते की आता गरीब कोणी राहिले नाही. परंतु वास्तविक पाहता अनेक योजना घरी आल्या असल्या तरी कित्येकांना त्या योजनांचा लाभ घेता येत नाही आणि त्यामुळे त्यांची परिस्थिती ही बिकटच असते. काही प्रसंगी लाभ घेऊनही परिस्थिती ही बेताचीच राहते. अशाच एका गरीब कुटुंबातील या रमाबाई रणवरे. परिस्थिती कशीही का असो ना मुलींचे शिक्षण मात्र करायचेच असा दृढनिश्चय त्यांनी केला. अशातच त्यांच्या वाचनात एक जाहिरात आली ही जाहिरात होती अमृत दौडची अर्थात अंबाजोगाई येथील एका मॅरेथॉन स्पर्धेची. आयोजकांनी प्रथम विजेत्यास तीन हजार रुपये बक्षीस ठेवले होते. रमाबाईंनी त्या स्पर्धेत भाग घेण्याचे ठरवले. त्यांच्या मोठ्या मुलीने सुद्धा त्यांच्यासोबत त्या स्पर्धेत भाग घेतला. मॅरेथॉन स्पर्धेसाठी सर्व स्पर्धक तयारीनिशी आले होते. धावण्यासाठी लागणारे कपडे चांगले बूट आदी परिधान करून आले होते. रमाबाई मात्र साध्या साडीमध्ये धावायला लागल्या. त्यांच्या पायात चप्पल होती. थोड्या वेळाने त्यांना चपलीचा अडसर वाटला तर त्यांनी चप्पल सुद्धा काढून टाकली आणि त्या पळायला लागल्या, आपल्या लेकींच्या शिक्षणासाठी त्यांनी वेग पकडला आणि बघता-बघता सर्व धावपटूंना मागे टाकून त्यांनी शर्यतीची अंतिम रेषा पार पाडली आणि प्रथम क्रमांक पटकावला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या लेकींच्या शिक्षणासाठी रमाबाई धावल्या त्यातील मोठी लेक ही याच शर्यतीत दुसऱ्या स्थानावर राहिली. आईने आपल्या लेकरांसाठी घेतलेले कष्ट, झेललेली अनेक संकटे याबाबतच्या कित्येक गोष्टी आपल्या ऐकिवात आहेत. परंतु रमाबाई रणवरे यांनी एक माता आपल्या लेकरांसाठी काय करू शकते हे  आपल्याला प्रत्यक्ष दाखवून दिले आहे.  मित्रांनो रमाबाई रणवरे यांची ही गोष्ट सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल अशीच आहे.  कदाचित एखाद्याला स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाची रक्कम तीन हजार ही अल्प अशी रक्कम वाटेल परंतु रमाबाईंसाठी आणि त्यांच्या लेकींसाठी मात्र हे तीन हजार रुपये म्हणजे एक मोठी रक्कम आहे. 

आपल्या भारतात आपण अशी अनेक उदाहरणे पाहिली आहेत की ज्यात छोट्या-छोट्या रकमांच्या घेण्या-देण्यावरून वाद होऊन खून पडले आहे. छोट्या-छोट्या रकमांच्या चोऱ्या सुद्धा झाल्या आहेत. छोट्या रकमांचा भ्रष्टाचार किंवा अपहार सुद्धा झाला आहे. परंतु आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि लेकींच्या शिक्षणासाठी धन मिळावे म्हणून बक्षिसाची रक्कम छोटी का असेना म्हणून रमाबाई रणवरे या मॅरेथॉन स्पर्धेत धावल्या आणि केवळ धावल्याच नाही तर प्रथम क्रमांक सुद्धा पटकावला. शासनाकडून मोफत पैशांची आशा बाळगणाऱ्या त्या मोफत पैशांसाठी प्रसंगी खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या अशा तमाम बंधू आणि भगिनींनी,  अनुदाने  लाटणाऱ्यांनी रमाबाई रणवरे यांचा आदर्श घ्यावा.

"कार्येषु दासी, करणेषु मन्त्री, रूपे च लक्ष्मी, क्षमया धरित्री।"
अर्थात स्त्री ही कामात तत्पर, निर्णयात सल्लागार (मंत्री), रूपात लक्ष्मी आणि सहनशीलतेत पृथ्वीसारखी असते. आधुनिक संदर्भात तिची हीच अष्टपैलू क्षमता तिच्या धडाडीचे रूप घेते.
वरील सुभाषित रमाबाई रणवरे यांच्यासाठी अगदी समर्पक ठरते. रमाबाई रणवरे यांच्या या धडाडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ता. क. - हिंदू संस्कृतीमधील हे स्त्रियांबाबतचे सुभाषित कुणाचा संपर्क असल्यास त्यांनी राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचवावे ही विनंती.