Click "Follow" Button below To Follow this Blog

१६/०५/२०१९

Article in memory of Ice Candy , its hawker and related things


आईस्कांडी
आईssssस्कांडी वाला” अशी आरोळी ऐकली की, स्कूटरचे चाक असलेली तीन डब्बे असलेली एक लाकडाची छोटीशी रंगीत लोटगाडी घेऊन आलेल्या त्या फेरीवाल्या जवळ 10,20,50 पैसे घेऊन मुले गोळा होत असत. एक चपटी लाकडी काडी किंवा बांबूच्या छोट्या कामटी पासून बनवलेली काडी असलेल्या छोट्या बर्फाला रंग दिलेली आईस कांडी मुलांना मिळत असे. लाल ,पिवळ्या हिरव्या रंगाची ती कुल्फी असे. लाकडी झाकण उघडून त्यातून तो कुल्फीवाला कुल्फी काढी व मुलांच्या हाती सोपवी.50 पैस्यांची आईस कांडी घेणा-या मुलाचा मोठा मान असे. 10, 20 पैसे वाले त्याच्याकडे व त्याच्या आईस कांडी कडे कुतूहलाने पहात. “आईस कांडी” खरे तर दोन इंग्रजी शब्द यातील “आईस” जसा आहे तसाच राहिला “कँडी” चे मात्र कांडी झाले व हे शब्द उच्चारतांना दोन्ही जोडून “आईस्कांडी” असे उच्चारण सर्व करीत असत. उन्हाळ्यात आईस कांडी मिळणे हिच मोठी गोष्ट होती. ती मिळाली की लहान मुले खुश. “आईस कांडी खाऊ नको रे त्यात अळ्या असतात“ अशी एक अफवा अधूम मधून पसरत असे . कदाचित ज्यांना ती मिळत नसे ते ती अफवा हळूवार पसरवून देत अशी शंका आज मनात येते. खरोखर त्यात अळ्या असत का नाही देव जाणे परंतू आईssssस्कांडी वाल्याची विक्री मात्र चांगली होत असे. हळू-हळू बदल झाला मोठी आईस कांडी, मटका कुल्फी  ह्या काळाच्या ओघात लुप्त झाल्या. कदाचित ग्रामीण भागात त्या मिळतही असतील परंतू शहरातून त्या गेल्या व मलई कुल्फी आली. विविध कंपन्यांचे नाना फ्लेवरचे आईस्क्रीम आले. फॅमिली पॅक आले. कुटुंबातील लोक आपल्या
आपल्या आवडीचे फ्लेवर चाखू लागले.आईssssस्कांडी वाला” ही गल्लोगल्ली ऐकू येणारी आरोळी मात्र ऐकू येईनाशी झाली. आता अमूल , दिनशॉ, वाडीलाल , नॅचरल अशा कितीतरी कंपन्यांचे

आईस्क्रीम शहरात व खोडोपाडी सुद्धा उपलब्ध होत आहे. नाना प्रकारची सरबते मिळत आहेत. यांच्या सर्वांच्या भाउगर्दीत ऊसाचा रस आजही तग धरून आहे आईस कांडी मात्र आपला बचाव करू शकली नाही. लोकांची आवड आता झपाट्याने बदलत आहे. जाहिराती, ब्रँड यांना लोक भुलत आहेत परंतू जे साधे आहे, चांगले आहे, ज्याची जाहिरात नाही त्याला आता खराब समजले जात आहे. ज्या आईस कांडीत पूर्वी अळ्या आहे अशी अफवा अधून मधून पसरत असे व त्या कारणास्तव प्रसंगी ती नाकारली सुद्धा जात असे. आज आकर्षक वेष्टनात गुंडाळलेल्या अनेक आईस्क्रीमवर ”यात वनस्पती तेलाचा वापर केला आहे” अशी स्पष्ट सूचना दिली असते. अनेक ठिकाणी अन्न व औषधी प्रशासनाने जास्त प्रमाणात “डालडा” असलेल्या आईस्क्रीम केंद्रांवर धाडी टाकल्या आहेत. आकर्षक म्हणून आपण काय खात आहोत याचे भान ग्राहकाने ठेवणे जरुरी आहे. आज जनतेजवळ पैसा चांगला खुळखुळतो आहे. क्रयशक्ती वाढली आहे. परंतू आपण काय खातो याकडे बारकाईने लक्ष देण्याची नितांत गरज आहे. कालच नागपूरला वडा सांबारच्या थाळीत चक्क पाल निघाली. आपल्या व आपल्या मुलांच्या प्रकृतीला जपा. योग्य ते निवडा. पूर्वी 10,20,50 पैस्यांची आईस कांडी घेणारे आज बक्कळ कमावत आहेत परंतू आज दिसायला जरी चांगले असले , महागडे असल्रे तरी आजच्या अन्नात ,खाद्य पदार्थात भेसळ मात्र जास्त आहे. आईस्क्रीम म्हणून चक्क डालडा पोटात जातो आहे. साधा बर्फ व रंग यांचा वापर करून बनवलेली ती आईस्कांडी आजच्या भेसळयुक्त , डालडायुक्त आईस्क्रीम पेक्षा निश्चितच कितीतरी पटीने चांगली होती. परवा महागडा चोकोबार घेतांना सहज आईस्कांडी, आईssssस्कांडी वाला, त्याची गाडी हे सर्व चित्र डोळ्यासमोर तराळले. चाखत तर तो ब्रँडेड चोकोबार होतो परंतू तोंडात मात्र चव घोळत होती त्याच 10,20,50 पैस्यांच्या आईस्कांडीची. 

०४/०५/२०१९

Birthday Bumps Ends Birthday Boy's Life . article about how this bumping on birthday is dangerous

“बर्थ डे बंप” एक जीवघेणा प्रकार  
तरुण म्हटले की नाविन्य. परंतू या नाविन्यात काही चांगले तर काही वाईट असते. असेच एक वाईट काल ऐकावयास मिळाले. वृत्त होते एका तरुणाच्या दू:खद निधनाचे ते सुद्धा त्याच्या वाढदिवसाच्याच दिवशी. तरुणांचा देश म्हणून आपला देश सध्या जगात मिरवतो आहे. परंतू हा तरुण कसा आहे ? त्याची समाजातील वागणूक काशी आहे? त्याला सामाजिक भान आहे का? याचाही विचार व्हावयास हवा. अर्थात सर्वच तरुण हे भरकटलेले आहे असे सुद्धा नाही अनेक चांगले, सामाजिक जाणीव असलेले, स्वत:च्या करीअर संबंची जागरूक असलेले अनेक तरुण आहेत.परंतू तरीही तरुणांना बालपणीपासूनच योग्य/अयोग्य काय? आपल्या सण साजरे करण्याच्या पद्धती कशा आहेत ? याचे ज्ञान आता अभावानेच दिले जाते असे दिसून येते. वाढदिवस साजरे करणे हे गत काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढले आहे. केक कापणे, मेणबत्त्या विझवणे  येथपर्यंत ठीक आहे परंतू पुढे यात त्या केक वरील क्रीम एकमेकांच्या तोंडाला फासण्याचे नवीन नाटक निघाले. त्याहीपुढे आता “बर्थ डे बंप” ही एक नवीन टूम निघाली. या नवीन जीवघेण्या प्रथेत ज्याचा वाढदिवस असतो त्याला आमंत्रित मित्र मंडळींनी लाथा, बुक्के मारून बुकलून काढायचे असते. म्हणजे पार्टी टर द्या वरतून मार पण खाऊन घ्या हे असले नसते थेर सुरु झाले आहे. याच जीवघेण्या नसत्या कुप्रथेतून परवा एका तरुणाच्या वाढदिवसालाच त्याच्या मित्रांनी त्याला चांगलेच "बंप" मारले. नाजूक जागी मुष्टीचा प्रहार झाल्याने त्याच्यावर वाढदिवसाच्याच दिवशी यमसदनास जाण्याची वेळ आली. ही वेळ सुद्धा आणली त्याच्या मित्र म्हणवल्या जाणा-यांनी. वाढदिवस असल्याने पार्टी उकळणे, फुकटची मिळते म्हणून यथेच्छ दारू ढोसणे, त्यानंतर बुद्धी भ्रष्ट झाली की मग असले प्रताप घडतात. पालकांनी आपल्या प्रिय पाल्यांकडे आपल्या “बिझी शेड्यूल” मधून थोडा वेळ काढून लहानपणी, किशोरवयात आवर्जून लक्ष देणे, त्यांना चांगल्या शब्दात , प्रसंगी काही दाखले देऊन त्यांना योग्य/अयोग्यतेची जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक आहे. कारण “The Best Investment for your kids is giving your time to them” ही आहे. जर त्यांच्यासाठी वेळ काढला तर कदाचित फरक पडू शकतो. आज हे "बर्थ डे बंप " आहे. उद्या अजून काही तरी नवीन, कदाचित आणखी भयंकर व जीवावर बेतणारा प्रकार निघेल त्यामुळे पालक, तरुण, समाजबांधव सर्वांनीच वेळेवर जागरूक होणे जरूरी आहे. अन्यथा आपली तरुणाई वाहवत जाईल , हकनाक बळी जातील. वृक्ष लाऊन, छोटा मोठा एखादी सामाजिक मदत करून , एखादे सत्कृत्य करून , वह्या पुस्तके वाटून जर आपला वाढदिवस साजरा केला तर एक आत्मिक समाधान , चिरकाल टिकणारा आनंद मिळेल. तरुणांनो तुमचे वाढदिवस जरुर साजरे करा , आनंद लुटा परंतू हे असले "बर्थ डे बंप" सारखे असुरी आनंदाचे प्रकार मात्र टाळा.

०२/०५/२०१९

Naxal attack in Gadchiroli leaves 15 security personnel dead... article related to this news


नक्षल्यांचा कायमचा बिमोड करा                       
     काल गडचिरोली जंगलात भुसुरुंग लाऊन सीआरपीएफ जवानांची गाडी नक्षल्यांनी उडवली. 15 जवान शहीद झाले. किती जवान आपण गमावत आहोत. या नक्षल्यांचा कायमचा बंदोबस्त नाही का करता येणार ? आता गेल्या महीन्यात छत्तीसगड मध्ये सुद्धा याच पद्धतीने भाजपा आमदाराची गाडी उडवण्यात आली. या नक्षल्यांं जवळ ही स्फोटके , अत्याधुनिक शस्त्रास्त्रे येतात तरी कशी? आपल्या सुरक्षा यंत्रणा , गुप्तचर यंत्रणा यांना याचा सुगावा कसा लागत नाही ? सुगावा असल्यास त्या शस्त्र पुरवठादारांवर कारवाई करण्यास कुणी अटकाव अथवा दबाव आणते आहे का ? या सर्व बाबी स्पष्ट होणे जरूरी आहे. नक्षल्यांना शस्त्रे, स्फोटके या कामात मदत करणारे हुडकून काढणे जरूरी आहे. ते सापडले की त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची नितांत गरज आहे. यासाठी प्रसंगी कायद्यात बदल करणे जरूरी असल्यास तसे करावे परंतू आपल्या जवानांचा हकनाक बळी जाता कामा नये.आपले जवान हे नक्षल्यांंपासून संरक्षण करण्यासाठी तैनातीवर जात असतात. ते नक्षल्यांवर प्रतिकारात्मक हल्ले करतात. नक्षली मात्र थेट हल्ले करतात. गतवर्षी 40 नक्षल्यांचा बंदोबस्त करण्यात आला होता. यंदा गडचिरोली भागात चांगले मतदान सुद्धा झाले. यामुळे कदाचित कालचा हा हल्ला झाला असण्याचा कयास आहे. आपले काही तथाकथीत बुद्धीवादी, पत्रकार, वृत्तपत्रे जवान शहीद झाल्यावर मूग गिळून गप्प असतात मात्र नक्षली मारल्या गेले की यांना “धक्कादायक” वाटते.मानवाधिकाराची आठवण येते.  दिग्विजयसिंग सारखे अतिरेक्यांना सन्मानाने संबोधणारे नेते "निवडणूकीत नक्षलवाद्यांची मदत घेऊ" अशी विधाने सर्रास करणारे नेते आपल्या देशात आहेत ही आपल्या देशाची शोकांतिका आहे. “नक्षलबारी” या पश्चिम बंगाल मधील एका खेड्याच्या नावावरून "नक्षल" व त्यावरून "नक्षलवाद" हा शब्द रुढ झाला. 1969 मधे माओवाद भारतात आला. चीन मधला नेता माओ त्याच्या विचारांची भारतात आज खरच गरज आहे का ? 60 च्या दशकात असेलही असे आपण गृहीत धरू. परंतू आता आहे का ? आपल्या देशात सुद्धा अनेक थोर नेते होऊन गेले परंतू त्यांच्या विचारांचे इतर देशात कुणी अनुसरण करते का ? मग आपण इतरांचे विचार दुस-याची हत्या करण्या इतपत का आत्मसात करावे? माओचे विचार आजच्या घडीला उपयुक्त आहेत का ?  त्याचे विचार अनुसरून आपण आपल्याच देशातील सरकारी यंत्रणे विरुद्ध यलगार पुकारून कुटुंबे उध्वस्त करणे हे योग्य आहे का? तुमच्या काही मागण्या असतील त्या आपल्याच देशातील नेत्यांच्या अहिंसा,सत्याग्रह यांसारख्या आंदोलनांद्वारे नाही का पूर्ण करता येणार ? यांवर विचार व्हावा तसेच ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या म्हणण्यानुसार प. बंगाल , छत्तीसगड , महाराष्ट्र , ओरीसा , बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश या भागात पसरलेल्या या नक्षली चळवळीवर एकाच वेळी हल्ला करून त्यांना जेरीस आपणायला हवे.  
सरकारने नक्षली व त्यांना पाठबळ देणारे शहरी नक्षली समर्थक या प्रश्नावर प्राथमिक तत्वावर लक्ष घालून त्यांचा बंदोबस्त करणे अत्यंत जरूरी आहे. अजून किती जवान आपण गमावणार ? किती कुटुंबे उध्वस्त होऊ देणार ?     

२९/०४/२०१९

Political parties showing videos in their election rallies its remind a bio scope , a entertainment device to bring images of one's favorite movie, stars. Peppered with music from the Talkies in the decades of 1960s to 90s.


देखो,देखो,देखो बायोस्कोप देखो
    यंदाच्या निवडणूकीत राज ठाकरे यांनी त्यांच्या सभांमध्ये व्हीडीओ व्दारे पुरावे दाखवणे सुरू केले. यात त्यांनी मुख्यात: भाजपा ला त्यातही पंतप्रधान मोदी व अमित शहा यांना लक्ष्य केले. भाजपा ने दिलेली जुनी आश्वासने, डिजीटल गांव , भाजपाने केलेल्या व्हीडीओ जाहीरातीत काम करणारे व्यक्ती यांचा या पुराव्यांत त्यांनी समावेश केला. कुणाला निवडून द्या हे सांगण्यापेक्षा त्यांनी कुणाला निवडून नका देऊ हे ते सांगत होते. या राजकीय युद्धात राज ठाकरे सारखी “मुलुख मैदानी तोफ” चा वापर चांगला करता येईल हे जाणत्या राजाने बरोबर हेरून त्यांना सोबत घेऊन गनिमीकावा सुरू केल्या गेला. राज यांनी “लाव रे व्हीडीओ” असा नारा देऊन या व्हीडीओ हल्लाने भाजपा व शिवसेना यांच्यावर सुलतान ढवाच केला. आता या हल्ल्याला प्रत्युत्तर ते कसे द्यायचे या विचाराअंती मग “लोहा लोहे को काटता है”  याप्रमाणे भाजपा व शिवसेना यांनी या व्हीडीओ हल्ल्यास प्रती व्हीडीओ हल्ला हाच मार्ग निवडला. या दोन्ही पक्षांनी सुद्धा प्रचार सभांत व्हीडीओ दाखवणे सुरू केले उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथे राहुल गांधी यांचा जुना व्हीडीओ दाखवला आशीष शेलार यांनी सुद्धा व्हीडीओ दाखवला. निवडणूक प्रचार धुमाळीत राजकीय पक्षांचे हे असे व्हीडीओ दाखवणे जोरात सुरू आहे. पूर्वी दूरदर्शन वगैरे नसताना एक माणूस एक भला मोठा त्याला उभे करण्यासाठी तिपाई असलेला एक मोठा डब्बा घेऊन यायचा. त्याला “बायोस्कोप”वाला असे म्हणत. या “बायोस्कोप”वाल्या जवळील त्या मोठ्या डब्ब्याला आजूबाजूने तीन-चार असे अल्युमिनीयमचे छोटे साखळी असलेल्या
झाकणाचे डब्बे लावलेले असायचे व त्यातून लहान मुलांनी पहायचे व तो बायोस्कोपवाला वरुन एक कळ फिरवत रहायचा व डब्ब्यातून मुलांना वेगवेगळी चित्रे दिसायची. सोबत एखादे गाणे वाजायचे. 10- 20 पैस्यात हा “शो” असायचा. शो झाला की बायोस्कोपवाला डब्बा उचलून दुसा-या भागात निघून जायचा.महाराष्ट्रातील राजकारणात सुरू असलेलेले हे व्हीडीओ हल्ले पाहून काळाच्या ओघात लुप्त झालेल्या या बायोस्कोपवाल्याची आठवण झाली. त्याच्या या व्यवसायातून त्याला पैसे मिळायचे व मुलांची करमणूक व्हायची. महाराष्ट्रातील या व्हीडीओ हल्ल्यातून जनतेचे मनोरंजन ही होते व बिदागी सुद्धा मिळतच असावी कारण तशी चित्रफीत सुद्धा नुकतीच झळकून गेली. राजकीय नेत्यांचे हे त्या बायोस्कोपवाल्या प्रमाणे व्हीडीओ दाखवत फिरणे कितपत यशस्वी ठरते हे आता 23 मे रोजीच कळेल. बायोस्कोपवाला निदान कुटुंबाचा चरीतार्थ चालवण्यासाठी हा व्याप करीत असे तर  राजकीय पक्ष मात्र देशहीताच्या  नांवाखाली  स्वत:ची पोळी शेकण्यासाठी हे व्हीडीओ तंत्रज्ञान  वापरत आहे. दुस-याचे उणे देणे असलेलेले व्हीडीओ दाखवण्यापेक्षा स्वत: काय केले याचे व्हीडीओ दाखवा ना ! जनता हुशार आहे त्या बायोस्कोपवाल्या जवळ मुले जशी मनोरंजनासाठी येत व निघून जात तसेच जनता तुमचे व्हीडीओ निव्वळ एक करमणूक म्हणून बघेल का ? आपली करमणूक करून घेऊन बटन मात्र विचारपूर्वक दाबेल का किंवा त्यांनी बटन विचारपूर्वक दाबले असेल का ? याचा निकाल   आता लवकरच कळेल. जर जनतेने तुमच्या व्हीडीओ ला नाकारले तर त्या बायोस्कोपवाल्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा तुमचा व्हीडिओचा डब्बा उचलून जावे लागेल.

२५/०४/२०१९

A tourist and his guide were jointly fined 51,000 for allegedly pelting stones at a sleeping tiger in Ranthambore. Article elaborate on this


सोते हुये शेर को जगाया नही करते  
     सध्या निवडणूकींच्या धामधुमीत वाघ, सिंह यांचा प्रतिकात्मक उपयोग होतो आहे. त्यामुळे शेर को जगाया नही करते म्हटल्यावर त्याचा अर्थ कदाचित सद्यस्थितीतील राजकारणाशी आहे असे वाचकांना वाटू शकते परंतू “सोते हुये शेर को जगाया नही करते” हिंदीतील या म्हणीची  प्रचिती काल खरोखरच आली . राजस्थान येथील रणथंबोर अभयारण्यात काल काही पर्यटक गाईडसह वनभ्रमंती करावयास चालले होते. पिलीघाट या गेट जवळ एक वाघ दुपारच्या उन्हापासून विसावा मिळावा म्हणून छान वामकुक्षी घेत पहुडला होता. गाईडला पर्यटकांना वाघ दाखवण्याची अति उत्सुकता असते मग प्रसंगी त्यामुळे त्या प्राण्याला त्रास झाला तरी यांना त्याचे काही घेणे देणे नसते. या वाघाची
सुद्धा झोपमोड केल्या गेली.दुपारची वामकुक्षी सर्वांना प्रिय असते. काही लोक भ्रमणध्वनी बंद करून निद्रानंद घेतात. तर काहींंनी 4 वाजेपर्यन्त उठवू नका असे सेवकाला सांगून ठेवलेले असते. पुणेकरांची याबाबतीत नेहमीच खिल्ली उडवली जाते. यंदाच्या लोकसभा निवडणूकीत पुण्यात 40 टक्केच मतदान झाले. याचेही कारण कदाचित दुपारची ही वामकुक्षी हेच असावे. आता मानवाचा निद्राभंग झाला तर तो काही तरी करू शकतो. परंतू जंगली हिंस्त्र पशूचे काय ? त्याची निद्रा जवळ जाऊन भंग करण्याची हिम्मत कोण करेल ? समझा कुणी केलीच तर त्याचा दंड तो काय वसूल करेल हे स्पष्ट्च आहे. त्याची निद्रा भंग केल्याचा दंड तो त्या निद्राभंग करणा-याला चिरनिद्रा देऊनच वसूल करेल. तसाच राष्ट्रीय उद्यानातील छान झोपलेल्या या वाघाचा निद्रा भंग करण्याचा दंड गाईड व पर्यटक यांना सुद्धा चांगलाच महागात पडला. निद्रा भंग केलेला हा वाघ दूर अंतरावर होता व त्या गाईडने जिप्सीतून खाली उतरून  दगड मारून त्याला उठवले होते. आता त्या वाघाने तर त्याला काही दंड केला नाही. परंतू दगड मारण्याची ही कृती थर्मल इमेज कॅमे-यात कैद झाली. वाघाला झोपेतून उठवण्याचा दंड त्या गाईडला व पर्यटकास झाला. दंड थोडा-थोडका नव्हे तर तब्बल 51000 रुपयाचा दंड त्यांना ठोठावण्यात आला शिवाय तातडीने उद्यान सोडण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले. दिवसभाराचे त्यांचे बुकींग सुद्धा रद्द झाले. गाईडच्या प्रवेशावर सुद्धा बंदी घालण्यात आली. कोणत्याही प्राण्याला विनाकारण त्रास देऊच नये. त्यातल्या त्यात हिंस्त्र पशूस तर मुळीच देऊ नये. परंतू आजकाल हुल्लडबाजी , गोंधळ करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. जंगले , अभयारण्ये येथे सुद्धा धिंगाणा घालण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले.“सोते हुये शेर को जगाया नही करते” ही म्हण वाघ व सिंहाच्या हिंस्त्रपणामुळेच पडली आहे परंतू आता थर्मल इमेज कॅमेरे , सी सी टीव्ही कॅमेरे असे तंत्रज्ञान सुद्धा आले आहे यांमुळे सुद्धा तुमची कोणतीही कृती उघड होऊ शकते आणि म्हणूनच “सोते हुये शेर को जगाया नही करते” अन्यथा तो नाहीतर सरकार दोनपैकी कुणी ना कुणी निश्चितच दंड करेल.