Click "Follow" Button below To Follow this Blog

०४/०५/२०१९

Birthday Bumps Ends Birthday Boy's Life . article about how this bumping on birthday is dangerous

“बर्थ डे बंप” एक जीवघेणा प्रकार  
तरुण म्हटले की नाविन्य. परंतू या नाविन्यात काही चांगले तर काही वाईट असते. असेच एक वाईट काल ऐकावयास मिळाले. वृत्त होते एका तरुणाच्या दू:खद निधनाचे ते सुद्धा त्याच्या वाढदिवसाच्याच दिवशी. तरुणांचा देश म्हणून आपला देश सध्या जगात मिरवतो आहे. परंतू हा तरुण कसा आहे ? त्याची समाजातील वागणूक काशी आहे? त्याला सामाजिक भान आहे का? याचाही विचार व्हावयास हवा. अर्थात सर्वच तरुण हे भरकटलेले आहे असे सुद्धा नाही अनेक चांगले, सामाजिक जाणीव असलेले, स्वत:च्या करीअर संबंची जागरूक असलेले अनेक तरुण आहेत.परंतू तरीही तरुणांना बालपणीपासूनच योग्य/अयोग्य काय? आपल्या सण साजरे करण्याच्या पद्धती कशा आहेत ? याचे ज्ञान आता अभावानेच दिले जाते असे दिसून येते. वाढदिवस साजरे करणे हे गत काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढले आहे. केक कापणे, मेणबत्त्या विझवणे  येथपर्यंत ठीक आहे परंतू पुढे यात त्या केक वरील क्रीम एकमेकांच्या तोंडाला फासण्याचे नवीन नाटक निघाले. त्याहीपुढे आता “बर्थ डे बंप” ही एक नवीन टूम निघाली. या नवीन जीवघेण्या प्रथेत ज्याचा वाढदिवस असतो त्याला आमंत्रित मित्र मंडळींनी लाथा, बुक्के मारून बुकलून काढायचे असते. म्हणजे पार्टी टर द्या वरतून मार पण खाऊन घ्या हे असले नसते थेर सुरु झाले आहे. याच जीवघेण्या नसत्या कुप्रथेतून परवा एका तरुणाच्या वाढदिवसालाच त्याच्या मित्रांनी त्याला चांगलेच "बंप" मारले. नाजूक जागी मुष्टीचा प्रहार झाल्याने त्याच्यावर वाढदिवसाच्याच दिवशी यमसदनास जाण्याची वेळ आली. ही वेळ सुद्धा आणली त्याच्या मित्र म्हणवल्या जाणा-यांनी. वाढदिवस असल्याने पार्टी उकळणे, फुकटची मिळते म्हणून यथेच्छ दारू ढोसणे, त्यानंतर बुद्धी भ्रष्ट झाली की मग असले प्रताप घडतात. पालकांनी आपल्या प्रिय पाल्यांकडे आपल्या “बिझी शेड्यूल” मधून थोडा वेळ काढून लहानपणी, किशोरवयात आवर्जून लक्ष देणे, त्यांना चांगल्या शब्दात , प्रसंगी काही दाखले देऊन त्यांना योग्य/अयोग्यतेची जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक आहे. कारण “The Best Investment for your kids is giving your time to them” ही आहे. जर त्यांच्यासाठी वेळ काढला तर कदाचित फरक पडू शकतो. आज हे "बर्थ डे बंप " आहे. उद्या अजून काही तरी नवीन, कदाचित आणखी भयंकर व जीवावर बेतणारा प्रकार निघेल त्यामुळे पालक, तरुण, समाजबांधव सर्वांनीच वेळेवर जागरूक होणे जरूरी आहे. अन्यथा आपली तरुणाई वाहवत जाईल , हकनाक बळी जातील. वृक्ष लाऊन, छोटा मोठा एखादी सामाजिक मदत करून , एखादे सत्कृत्य करून , वह्या पुस्तके वाटून जर आपला वाढदिवस साजरा केला तर एक आत्मिक समाधान , चिरकाल टिकणारा आनंद मिळेल. तरुणांनो तुमचे वाढदिवस जरुर साजरे करा , आनंद लुटा परंतू हे असले "बर्थ डे बंप" सारखे असुरी आनंदाचे प्रकार मात्र टाळा.

२ टिप्पण्या:

  1. आपण परदेशी पध्दतीने वाढदिवस साजरा करतो हि पध्दत चुक आहे. तरुणांना मार्गदर्शन केले पाहिजे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपले म्हणणे बरोबर आहे साहेब
      प्रतिक्रिये बाबत धन्यवाद

      हटवा