२८/१२/२०१७

Article on days spent in less money but lot of joys

साडीचा ड्रेस आणि अल्टर पँट
     मुलगा शाळेत जाऊ लागला की बालवाडी ते अकरावी-बारावी पर्यंत हाफ पँट घालत असे. मुलगा शर्ट व हाफ पँट तर मुली फ्रॉक नाही तर परकर-पोलके. मुलींच्या पंजाबी ड्रेसने तेंव्हा पंजाब सोडून नुकतेच महाराष्ट्रात पाऊल टाकले होते तो हा काळ. तेंव्हा गावात बोटावर मोजता येतील इतकेच धनिक असत. बाकी सर्व मध्यम वर्गीय आणि गरीब. अप्पर मिडल क्लास वगैरे काही भानगड नव्हती. एखादीच बुलेट दिसे. काही एजदि आणि काही राजदूत , काही लुना तर दोन-चार चारचाक्या. बाकी सर्व सायकल. घरी कुणीतरी एकच कमावता त्यामुळे पगार झाला की दैनंदिन गरजा भागवता–भागवता महिना अखेर कधी येत असे कळायचे नाही. कुणी काही मागीतले तर पुन्हा पगारापर्यंत वाट पहावी लागे. पण तरीही तक्रारी कमी आणि आनंद जास्त. थोड्यात गोडी अशीच सर्वांची विचारधारा.
“साई इतना दिजीये ज्यामे कुटुंब समाय, मै भी भुका ना रहू , साधू न भुका जाये”
अशा कबीराच्या वृत्तीने सर्व गुण्या गोविंदाने राहात. “एक नूर आदमी आणि दस नूर कपडा” अशी आतासारखी वेळ तेंव्हा नव्हती. दसरा, दिवाळी नवीन कपडे घेतले, तेही थोडे वाढत्या अंगाचे की वर्षभर घोर नाही. मुलांनाही तसेच सांगीतले जात असे त्यामुळे मुलेही वर्षभर कपडे मागत नसत. मुलींना बरेचदा आईच्या साडीचा ड्रेस शिवून मिळत असे. मुलगा थोडा मोठा झाला व त्याने जर का फुल पँटसाठी हट्ट धरला तर त्याच्या हट्टापाई त्याला फुल पँट मिळत असे. परंतू कोणती? तर ती बापाच्या जुन्या पँटची नवीन केलेली फुल पँट. ही असायची प्रत्येक मुलाची पहिली फुल पँट. जुन्या पँटला दुरुस्त करून ही तयार केलेली असल्याने “अल्टर पँट” असे म्हणत. आता अल्टर म्हणजे रिपेअर किंवा दुरुस्त हे त्या वयात काही समजत नसे. आई बापाने अल्टर पँट करून देऊ म्हटले की फुल पँट मिळण्याच्या खुशीत अल्टर काय भानगड आहे?, त्याचा काय अर्थ आहे ? या रिकाम्या गोष्टी कोण करणार. फुल पँट मिळते आहे ना मग मुले त्यातच खुश. अल्टर केलेली ही फुल पँट टेलरने कितीही चांगली करण्याचा प्रयत्न केला तरी थोडी वेगळीच दिसत असे शिवाय बापाची फॅशन जुनी असल्याने ही ओल्ड फॅशन असे. नवीन फुल पँटपेक्षा हिचा “लुक” थोडा वेगळाच दिसे. इतर हाफ पँटधारी मुले विचारत अरे ! ही कशी फुल पँट रे तुझी ?” त्याला अल्टर पँट आहे सांगीतले की अर्थ वगैरे काही कळत नसल्याने तो ही आपला खूप काही समजले अशा आविर्भावात “हो का?” असे म्हणून गप्प राहात असे. आता तर तसा जमाना राहिला नाही पैसा चांगलाच खूळखुळु लागला आहे.काही घरी “डबल इंजिन” अर्थात पती-पत्नी दोघेही कमावते व एक किंवा दोन बच्चे. त्यामुळे जे मुलांना पाहिजे ते मिळते.याने मुलांना सुद्धा वस्तूची किंमत राहिली नाही.वस्तू टिकवून ठेवण्याची त्यांची वृत्ती राहिली नाही. जेंव्हा पाहिजे तेंव्हा कपडे व सर्व काही मिळत आहे.ते मिळू नाही असेही म्हणणे नाही.परंतू मुलांना वस्तूंची आणि पैशाची कदर राहिली नाही.आताच्या 40 च्या पुढच्या वयातील अनेकांचे असे नव्हते पिशवीचे दप्तर, कडीचा डब्बा ,सेकंड हँड सायकल वापरणा-या आणि पाणी पुरी व भेळची पार्टी हीच मोठी पार्टी समजणा-या तेंव्हाच्या मुलांना घरची परिस्थिती, वस्तू टिकवणे, पैशाची किंमत या सर्वांचे बाळकडू मिळत गेले. अशीच शिकवण तत्कालिन धनिक मुलांना सुद्धा असे. त्यामुळेच साडीचा ड्रेस घालणा-या मुलींना आणि अल्टर केलेली पँट घालणा-या या तत्कालीन मुलांना जे आहे त्यात भागवणे पूर्वीही शक्य असे आणि आजही त्यांना ते सहज शक्य होते.आई-वडील दोधेही वर्किंग असल्याने व आजी-आजोबा गावी असल्याने पाळणा घरात राहिलेल्या किंवा आयाच्या ‘देखरेखीत’ वाढलेल्या व वस्तू,कपडे थोडेही खराब झाले की मग फेक बाहेर म्हणणा-या, मोठा वेळ टीव्ही समोर व्यतीत करणा-या, मोबाईल, हॉटेलिंग, मल्टीप्लेक्स यांचे बाळकडू मिळत असलेल्या पुढील पिढीला हे जमेल की नाही सांगता येत नाही.साडीचा ड्रेस आणि अल्टर पँट सोबतच वस्तूंचा पुनर्वापर व पैशाची किमंत हे सुद्धा कालबाह्य झाले.

१९/१२/२०१७

Article on recent election won by BJP in Gujrath and Himachal

जनतेला सुद्धा “विकासाचे वेड” 
गुजराथ व हिमाचल प्रदेश या राज्यांच्या निवडणुकांपूर्वी माध्यमांवर “विकास वेडा झालाय“ या आशयाचे अनेक संदेश सतत फिरत होते. नरेंद्र मोदी यांच्यावर व त्यांच्या भारत विकासाच्या स्वप्नावर विडंबनात्मक असे हे संदेशांमुळे तसेच हार्दिक, जिग्नेश व अल्पेश ठाकोर यांच्या झंझावातामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून भाजपा ने टीकवून ठेवलेली सत्ता पुन्हा त्यांच्याच हातात राहते की नाही असे सर्वाना वाटत होते. शिवाय अमित शाह व नरेंद्र मोदी यांची ही “होम पिच” या ठिकाणी हार म्हणजे 2019 मध्ये केंद्रात कॉंग्रेस येणार असे कयास बांधले जात होते. दोन्ही पक्षांकडून मोठ्या प्रमाणात प्रचार झाला. यंदाच्या या निवडणूकीच्या आधी गुजराथमध्ये याआधी मुख्यमंत्री बदल करावा लागला होता.तसेच यावेळी पाटीदार समाज आरक्षणाचा मुद्दा होता, विकासासाठी काळ्या पैस्यास अटकाव व्हावा म्हणून केंद सरकारने केलेल्या नोटबंदी व सर्व देशात एकच कर प्रणाली असावी म्हणून लागू केलेल्या  जी एस टी यांचे सावट होते. व्यापारी वर्ग जी एस टी मुळे नाराज होता. मोदींनी लक्षणीय प्रमाणात सभा घेतल्या. “सी प्लेन” सुद्धा घेऊन गेले. तसेच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा कॉंग्रेसची सत्ता आणण्यासाठी व कॉंग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. यापूर्वी कुणीही कॉंग्रेस नेता जितक्या प्रमाणात मंदिरात गेला नसेल तितक्या मोठ्या प्रमाणात राहुल मंदिरात गेले, देवदर्शन घेतले.त्यांच्या शिलेदारांनी ते जनेऊधारी , शिवभक्त असल्याचा दावा केला. याचा उलटा परिणाम झाला त्यांच्या अतिप्रमाणात मंदिरात जाण्यामुळे मतदारांना हे सर्व केवळ आणि फक्त केवळ मते मिळवण्यासाठी आहे हे सहज उमगले. पाटीदार समजाचे नेतृत्व करणा-या हार्दीकच्या काही चित्रफिती झळकल्या. हार्दिक आणि कॉंग्रेस यांचे कुठे खटके सुद्धा उडाले. राहुल गांधी यांच्या खेरीज कॉंग्रेस मधील इतर नेते प्रचारात कमी आढळून आले. अहमद पटेल व राहुल गांधी यांचे सुद्धा जमत नसल्याच्या चर्चा झाल्या. गुजराथच्या पाटीदार समाजातील मोठा वर्ग भाजपा सोबत आहे तसेच मुस्लीम समाजातील लोक सुद्धा आहेत. तीन तलाक कायद्यामुळे मुस्लीम महिला वर्ग सुद्धा काही प्रमाणात का होईना भाजपाकडे आकृष्ट झाला आहे. अशा या पार्श्वभूमीवर सर्व देशाचे लक्ष लागलेली ही निवडणूक शेवटी पार पडली. 18 डिसे रोजी मतमोजणी सुरु झाली सुरुवातीला कॉंग्रेस पुढे असल्याने त्यांच्या तंबूत जल्लोष सुरु झाला शेअर बाजार मात्र गडगडू लागला नंतर भाजपाने आघाडी घेतली व ९९ जागा मिळवून गुजराथचा गड राखला. तसेच कॉंग्रेसने सुद्धा 80 जागा जिंकून दाखवून ते काही अगदीच मागे नाही हे दाखवून दिले.यात हार्दिक जिग्नेश व अल्पेश यांचा मोलाचा वाटा आहे. तिकडे हिमाचल मध्ये सुद्धा भाजपाने विजय मिळवला. मोदींनी विकासाच्या तसेच भावनिक मुद्द्यांवर या निवडणुका जिंकून दाखवल्या ख-या परंतू 2019 मध्ये मात्र विकासाचा मुद्दा कसे काम करेल हे पहावे लागेल. खरी परीक्षा तेंव्हा आहे. या दोन राज्यातील विजयाने जनतेला आता खरेच विकास हवा आहे, देशात बदल हवा आहे असेच चित्र सध्या तरी दिसत आहे, आणि त्यामुळेच जनतेने विकास वेडा झाला नाही तर जनतेला सुद्धा विकासाचे वेड आहे हेच सिद्ध करून दाखवले आहे.

जाता जाता .... 80 जागांमुळे हार्दिक व्यतिरीक्त इव्हीएम मध्ये खराबी किंवा इव्हीएम हॅक झाल्याचे कुणी सुतोवाच अदयाप तरी केलेले नाही  

०६/१२/२०१७

Article focus on way of collecting fund on the occasion of Indian National Flag Day 7 December

  सशस्त्र सेना झेंडा दिवस आणि सारेच निरस          
          आज 7 डिसेंबर सशस्त्र सेना झेंडा दिवस. मला चांगले आठवते वर्ग पाच मध्ये असतांना एका रुपयात सैनिकांसाठी एक तिकीट घ्यावे लागते असे प्रथमच समजले. सरांनी ते दिले मी ते माझ्या कंपासात चिकटवले त्यानंतर दरवर्षी एक-एक तिकीट घेत गेलो. कंपासपेटी तीच. आतासारखे प्रत्येक वर्षी नवीन असा प्रकार नव्हता. पुढे त्या तिकिटांवर “सशस्त्र सेना झेंडा दिवस“ असे जे लिहिले असते त्याचा बोध झाला. भारत स्वतंत्र झाल्यावर सैन्य, सैन्यातील जीवित हानी होणा-यांचे पुनर्वसन, सैनिक कल्याणासाठी व सैन्यातून निवृत्त झालेल्यांसाठी पैसा हवा होता. हा निधी “झेंडा दिवस” साजरा करून उभा करू शकतो असा प्रस्ताव एका समितीने सरकार समोर  ठेवला. म्हणून मग 7 डीसेंबर  1949 हा झेंडा दिवस देशभर साजरा होऊ लागला आणि हे महत्वपूर्ण तिकीट आपल्या सैनिक कल्याण निधीसाठी  म्हणून घ्यायचे असते हे कळले.घरच्या मंडळीनी सुद्धा ते तिकीट घेत जा असे सांगितल्यामुळे वर्ग 10 पर्यंत आम्हा अनेक मुलांच्या कंपासपेटीत वर्ग 5 ते 10 पर्यंत अशी 6 तिकिटे गोळा झाली होती. सैनिकांसाठी आपण सुद्धा खारीचा वाटा उचलल्याचा आनंद होत असे.नंतर महाविद्यालयीन जीवनात मात्र हे तिकीट मिळणे बंद झाले. सैनिकांसाठी म्हणून लहान मुले जरी आनंदाने ही तिकिटे घेत असली तरी ज्या-ज्या कार्यालयात व त्यांच्याशी संलग्न शाळा वा तत्सम विभागात ही तिकीटे वाटप केली जातात त्या-त्या ठिकाणी या तिकीट वाटपाचे कार्य मात्र मोठ्या निरस भावनेने केले जाते. प्रत्येक कर्मचा-यास सक्तीने काही तिकिटे घेण्यास सांगितली जातात तो मग ती तिकीटे कुणाला देशभक्तीच्या हेतूने पुढे वाटप करो अथवा न करो. अधिका-यांची सक्ती असल्याने कर्मचारी ती तिकीटे घेतो मात्र सक्ती असल्याने त्याच्या मनात ती तिकीटे घेताना जी देशप्रेमाची भावना असावयास हवी ती येत नाही. मारून-मुटकून एखादे कार्य करावे लागते तसे त्याचे होते. खरे म्हटले तर एखाद्याची तिकीट वाटपाची जेवढी क्षमता असते तेवढी तिकिटे त्याच्या जवळ देणे जास्त योग्य आहे. तसेच केवळ शालेय विद्यार्थ्यांना ही तिकीटे न देता जनतेस सुद्धा ही तिकिटे सार्वजनिक ठिकाणी समारंभपूर्वक दिल्यास कदाचित आपल्या सैनिकांसाठी जास्त निधी गोळा होईल.परंतू असे न करता हे कार्य सक्तीने करावयास लावले जाते आणि मग त्यात उदासिनता येते. हे देशकार्य आहे ही जाणीव राहात नाही. कर्मचारी जी तिकीटे घेतो ती बहुतांशवेळा त्याच्या जवळच राहतात आणि मग ज्या उद्देशाने हे कार्य सुरु केले आहे तो उद्देश पूर्ण होत नाही. सैनिक शहीद झाले की मेणबत्त्या लावायच्या, अश्रू ढाळायचे, राखी पौर्णिमेच्या वेळेस राख्या पाठवायच्या आणि निधी गोळा करतेवेळी निरस भावनेने ते कार्य करायचे हे कितपत योग्य आहे? गेली कित्येक वर्षे या तिकीटाची किंमत एक रुपयाच आहे. जे सैनिक देशासाठी सिमेवर उन, वारा, थंडी, पावसात तैनात असतात त्यांच्यासाठी एक रुपया देतांनाचे काम हे आनंदाने होणे गरजेचे नाही का? परंतू आपली Sysytemच शासनस्तरावर अशी कार्यपद्धती राबवते की देशहिताचे,समाजहिताचे कार्य करतेवेळी कर्मचा-यांच्या मनात नीरस भाव असतात. हे उचित नव्हे. सैनिक निधी, शहीद पोलीस निधी यासाठी स्वयंस्फूर्तीने मदत होतांना क्वचितच दिसून येते. सर्व शासनच करेल याची वाट न बघता सैनिक निधी गोळा करण्याच्या कार्यात सहभागी सर्वांनीच आनंद आणि उत्साहाने ते कार्य केले पाहिजे. तसेच या निधी गोळा करण्याच्या प्रक्रियेत सर्वदूर सकारात्मक बदल करणे गरजेचे आहे.        

२९/११/२०१७

Condition of Teachers Training organised by School Education Department of Maharashtra

शिक्षक प्रशिक्षणांचे नियोजन
महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभाग हा शिक्षणातील नवीन बदल, अभ्यासक्रम, तंत्रज्ञान, शिक्षणाचा दर्जा सुधारणे, शालेय बाबतीतीलच स्काउट सारखे अन्य विषय या बाबतीतचे अनेक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करीत असतो. अशी प्रशिक्षणे आयोजित करणे जरूरीच आहे. निश्चितच अशा प्रशिक्षणांमुळे अनेक सकारात्मक बदल हमखास होतात. परंतू अशी प्रशिक्षणे आयोजित करतांना अनेक बाबी दुर्लक्षित केल्या जातात. महाराष्ट्रात अनेक लहान शाळा आहेत या शाळांत विभागाकडून मंजूर शिक्षकांची संख्या कमी असते. कारण ते तुकडी व विद्यार्थी संख्येवर आधारीत आहे. प्रशिक्षणे आयोजित करतांना हा महत्वाचा पहिला मुद्दा लक्षातच घेतला जात नाही. कमी शिक्षक संख्या असलेल्या शाळेतून एक किंवा दोन शिक्षकांना प्रशिक्षणा करीता बोलावणे येते नेमके त्याचवेळी उर्वरीत शिक्षकापैकी कुणावर काही आपातकालीन परीस्थिती म्हणा किंवा काही प्रकृती संबंधीत परीस्थिती किंवा तत्सम असे काही उदभवले व त्याला शाळेतून सुटी घेण्याचे काम पडले तर शाळा आणि विद्यार्थ्याचे कसे होणार ? कमी शिक्षक असलेल्या शाळांना प्रशिक्षण असले की विद्यादानाचे कार्य करण्यात नेहमी व्यत्यय येतो. दूसरा मुद्दा असा आहे की कित्येक वेळा असेही होते की एका प्रशिक्षणाच्या वेळेसच नेमके दुसरेही प्रशिक्षण आयोजित होते. म्हणजे मग काही शिक्षक एकीकडे तर काही दुसरीकडे प्रशिक्षणास. शाळेचे नियोजन शाळेवाले पहात बसतील. तिसरा मुद्दा म्हणजे या प्रशिक्षणावेळी प्रशिक्षकाचे प्रशिक्षण देते वेळचे कंट्रोल. प्रशिक्षणावेळी प्रशिक्षणार्थी हे समवयस्क असल्याने म्हणावे तसे नियंत्रण नसते. तसेच इतरही अनेक मुद्दे आहेत संबंधितांच्या लक्षात आलेच असतील. लेखात पूर्वी म्हटल्याप्रमाणे प्रशिक्षणे ही जरुर असावीत परंतू त्यात योजनाबद्धता असावी. तारखा Overlap होणे टाळले पाहीजे. त्यासाठी प्रशिक्षणे आयोजित करणा-यांच्या विभागांमध्ये ताळमेळ असावा. प्रशिक्षणे झाल्यावर त्या प्रशिक्षणाबाबत एखादी प्रश्नावली किंवा प्रश्नमंजूषा ठराविक कालावधी नंतर घ्यावी जेणे करून आयोजित केलेल्या प्रशिक्षणाचा प्रषिक्षणार्थ्याना फायदा झाला की नाही किंवा प्रशिक्षणातील मुद्दे  त्यांच्या स्मरणात आहेत की नाही हे सुद्धा कळू शकेल. अन्यथा निव्वळ प्रशिक्षणे आयोजित होत राहतात व त्याचा फायदा किंवा यशस्वीतता ज्ञात होत नाही.तसेच आजच्या तंत्रसमृद्ध जगतात जी प्रशिक्षणे इंटरनेटच्या माध्यमातून घेता येऊ शकत असतील ती त्याप्रकारे आयोजित करावी. अनेक खाजगी संस्था Video Conferencing, Webcast या माध्यमातून त्यांच्या शाखा अथवा कर्मचा-यांशी संपर्क करीत असतात. शिवाय याच माध्यमातून घेतलेल्या त्यांच्या प्रशिक्षणांचा फायदा सुद्धा त्यांना होत आहे आणि त्यांच्या काही योजनांची अंमलबजावणी सुद्धा यशस्वीरित्या होत आहे. मग तंत्रज्ञानाचा असा वापर शिक्षण विभागात नाही का केला जाऊ शकत? अनेक शिक्षक आज तंत्रस्नेही आहेत त्यांना सुद्धा यात सहभागी करावे. आता या सर्व उपरोक्त बाबी “सरकारी काम अन तीन महीने थांब” अशी म्हण ज्याच्या साठी वापरली जाते त्या सरकारी खात्याद्वारे होईल की नाही शंकाच आहे. झालेच तर कधी होईल याची काही शाश्वती नाही परंतू कुण्या कर्तबगार अधिकारी किंवा लोकप्रतिनिधीच्या वाचनात जर हा लेख आला तर या प्रशिक्षण ऊहापोहावर काही विचार होईल अशी भाबडी आशा व त्यासाठीच हे विचार व हा लेखन प्रपंच.

२७/११/२०१७

Article on the MP of Samajwadi Party, Azam Khan's statement on Padmavati

...देखी तेरी दिलदारी
 परवा पद्मावती चित्रपटाबाबत बोलतांना समाजवादी पक्षाचे खासदार आजमखान बरळले की ,”मुस्लिम समाज दिलदार अर्थात मोठ्या मनाचा आहे त्यांनी कधीकाळी आलेल्या व हिंदी चित्रपटसृष्टीतील माईलस्टोन चित्रपट असलेल्या ‘मुगल-ए-आजम’ या चित्रपटात दाखवलेल्या युवराज सलीमची प्रेयसी अनारकली या नार्तिकेबाबत विरोध केला नाही”. आजमखान यांचे असे म्हणणे की अनारकली आणि सलिम यांची प्रेमकथा हे दंतकथा होती.तरीही त्याकाळी चित्रपट बनला, प्रदर्शित झाला व सलीम अनारकली यांची प्रेमकथा दर्शकांनी पाहिली. हे सर्व मुस्लिम समाज हा दिलदार असल्यामुळे झाले.असा त्यांचा युक्तीवाद. या चित्रपटाबाबतचे किस्से, घटना तो बहुचर्चित प्रणय प्रसंग या गप्पा आजही चवीने चघळल्या जातात. आजमखान म्हणतात की मोठ्या मनाने मुस्लिम समाजाने सलिम-अनारकली यांच्या काल्पनिक प्रेमकथेवर आधारीत सिनेमा स्विकारला. त्यास विरोध केला नाही. आता विरोध न होण्यास महत्वाची बाब म्हणजे या चित्रपटाचा नायक ‘निशान-ए-पाकिस्तान’ युसुफखान अर्थात दिलीपकुमार,नायिका मुमताज देहलवी अर्थात रूपमती मधुबाला तसेच,दिग्दर्शक के आसिफ.व इतर अनेक कलावंत याच दिलदार मनाच्या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे होते. मग प्रखर विरोध कसा होणार? पद्मावतीचे सिनेमाचे तसे नाही एका हिंदू महाराणीचे मोगल आक्रमकासोबत स्वप्न्दृश्याचा आधार घेऊन चित्रित केलेले प्रेमप्रसंग हे जे की कधी घडलेच नाही नेमके त्याच्या अगदी विरोधात भंसालीने चित्रपटात दाखवले त्यामुळे हा प्रखर विरोध होत आहे आणि तो योग्यच आहे. अनारकली काय ती तर नर्तकीच ती ही काल्पनिक आणि अशा कित्येक नर्तिका मोगल शासक नाचवीतच असत हा इतिहास सर्वाना ठाऊकच आहे. आजमखान यांच्याप्रमाणे खरेच समाज दिलदार असेल आणि त्यांनी त्याकाळी ‘मुगल-ए-आजम’ ला विरोध केला नसेल तर त्यांची ती दिलदार वृत्ती आजही कायम असावयास हवी ना ! आणि त्यांच्या दिलदारी या स्वभाव वैशिष्ट्यास जागून मग ते आजही अनेक बाबतीत त्यांची दिलदारी दाखवू शकतात. या समाजाचे मन खरेच मोठे असेल तर मग पाकव्याप्त काश्मीर वरचा दावा दिलदार मनाच्या असलेल्या मुस्लीम समाजाच्या पाकिस्तानने सोडून द्यावा. काश्मीर फुटीरतावाद्यांनी सुद्धा दिलदारी दाखवून वेगळ्या काश्मीरचा हट्ट सोडावा. दिलदार मनाने काश्मिरी पंडीतांना पुनश्च काश्मीरमध्ये येण्यास सहकार्य करावे. राम मंदिराबाबत मोठेपणा दाखवावा. समान नागरी कायद्यास मोठ्या मनाने स्वीकारावे. दिलदार मन असलेल्या समाजाच्या फारुख अब्दुल्ला यांना म्हणावे तुमची सैल सुटलेली जिव्हा ताब्यात घ्यावी. या वरील सर्व बाबी दिलदार मनाने स्वीकारा असे म्हटले तर मग आजमखान त्यास मंजूरी देतील काय ? याचे उत्तर नकारार्थीच असेल हे मिसरूड न फुटलेला मुलगाही सांगू शकेल. आजमखान हे वायफळ आणि वादग्रस्त विधाने करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी वृथा वल्गना करू नये. खिलजी हा परकीय आक्रमक होता. त्याला येन केन प्रकारेण पद्मावती हवी होती. परंतू असे होऊ नये म्हणून गोरा, बादल हे काका पुतणे जीवाच्या शर्थीने लढले. पद्मावतीने अल्लाउद्दिनच्या तावडीत सापडू नये म्हणून अनेक स्त्रियांसह ‘जोहार’ केला. हा इतिहास असल्याने पद्मावतीला विरोध होत आहे. आजमखान महोदय पद्मावती राणी होती आणि अनारकली ही काल्पनिक नर्तिका. दिलदार तर होता राणा रतनसिंह की ज्याने अल्लाउद्दीनला प्रथम पाहुण्याची वागणूक दिली परंतू अल्लाउद्दीनने त्याला दगा दिला. आपण केवळ दिलदार असल्याचे सांगू नका खरेच सर्वच बाबतीत दिलदार बनून दाखवा आणि आपला आदर्श प्रस्थापित करा.

२३/११/२०१७

Article describes about current Bollywood Cinema

सिनेमावाल्यांची नौटंकी        
     दरवर्षी चित्रपटावरून वाद उपस्थित होत आहेत. काय चाललंय काय आपल्या देशात? ज्या देशात पूर्वी समाज प्रबोधन, कौटुंबिक, देशभक्तीने ओतप्रोत असे चित्रपट निर्माण होत. त्या देशात आता स्वत:च्या तुमडया भरण्यासाठी जाणून काहीतरी काल्पनिक मसाला भरून, वाद निर्माण करून स्वत:चा चित्रपट जास्त चालेल अशा हेतूने चित्रपट निर्मिती होत आहे. समाजात ऐक्य भावना प्रज्वलीत करणारे चित्रपट निर्माण करण्याऐवजी विविधतेत एकता असणा-या या देशात, विविध कार्यप्रसंगी जातीभेद विसरून एकत्र येणा-या लोकांमध्ये तेढ निर्माण होतील असे चित्रपट हे कसेच काय निर्मितात? यांच्या मागे कोण आहे ? यांना असले चित्रपट काढण्यासाठी कोण फंडिंग करते? मागे “राम तेरी गंगा मैली” या सिनेमातील नटी मंदाकिनी हिला म्हणे दाउदने नटी म्हणून घेण्यास सांगितले होते. त्यानंतरही आपला लोकांनी डोक्यावर घेतलेला संजय दत्त उर्फ संजूबाबा याचे व “अंडरवर्ल्ड” चे संबंध उघड झाले होते. मागे अनिल कपूरचा दाउद सोबतचा फोटो प्रसिद्ध झाला होता. तसेच उठसुठ एकाच धर्माला किंवा त्या धर्मातील प्रथांना “टारगेट” करणारे चित्रपट का निर्माण होतात? ज्या धर्माची किंवा जातीची Nusance Value कमी असते अशा जाती आणि धर्मावर आधारीतच हे चित्रपट निर्मित होतांना दिसत आहेत.आपण कुठे जात आहोत? एकीकडे आपल्या देशातून दुस-या देशांचे उपग्रह सोडले जातात. परग्रहावर जाण्यासाठी आपले भारतीय मोठ्या संख्येने तिकीटे आरक्षित करतात. काल आपण ब्राम्होस क्षेपणास्त्राची हवेतून चाचणी घेतली. मोठ मोठ्या विदेशी कंपन्यांचे CEO हे भारतीय आहेत. तर दुसरीकडे जातीय वाद, सोशल मिडीया वरुन एकमेकांची जातीवाचक निर्भत्सना हे सतत सुरूच असते शिवाय त्यात भरीस भर म्हणून हे धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करणारे चित्रपट. चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम होते त्यामुळे पूर्वी त्यातून सामजिक संदेश मिळत असे, लोक घरी जातांना डोक्यात काही तरी विचार घेऊन जात. आता हे माध्यम म्हणजे निव्वळ पैसे कमावण्याचे व त्यासाठी कुठल्याही थराला जाण्याचे साधन झाले आहे. ना कोणता अभ्यास , ना कोणते वाचन , ऐतहासिक चित्रपट काढतांना इतिहासकारांचा सल्ला न घेणे व असा काही तरी मसाला बनवायचा की चित्रपटाने करोडोचा व्यवसाय केला पाहिजे. याला आजही काही अपवाद आहेत परंतू अगदीच कमी. पूर्वी काही बॅनर असे होते की त्यांचा चित्रपट म्हटला की तो काही तरी ‘हटके’ असणार म्हणून लोक उत्सुक असायचे आर. के., नवकेतन,  बी आर फिल्म्स, बासू चॅटर्जी,श्याम बेनेगल,ऋषिकेश मुखर्जी यांचे चित्रपट किती सामाजिक जाणीवेचे, किती कौटुंबिक ,किती हलक्या फुलक्या विनोदाचे असत.परंतू आता हे सर्व कालबाह्य झाले.काहीही दाखवा आणि आपला गल्ला भरा.यांना कोण ‘फायनांस’ करते?यांच्या कथा,पटकथा लेखकांनी काही अभ्यास केला आहे की नाही? कशावर काही नियंत्रण नाही. म्हणायला एक ‘सेन्सॉर बोर्ड’ आहे त्याच्याही कात्रीला आता काही धार राहिली नाही. तसेच ‘सेन्सॉर बोर्ड’ काय कात्री लावेल अशी दृश्ये घरच्या घरीच जाहिराती,चित्रपट व मालिकांच्या माध्यमातून टीव्हीवर दिसत आहेत.सरकारने या टीव्ही जाहिराती आणि चित्रपट यांवर कठोर नियमावली करून काही निर्बंध घालणे जरुरी आहे.चित्रपट निर्मिती व त्यासाठी पैसा कुठून येतो यासाठी विशेष “ऑडिट” खाते सुरु करावे.ऐतिहासिक चित्रपट असेल तर त्यासाठी कथालेखक व संवाद लेखन करतांना पाच सदस्यीय इतिहासकारांचे मंडळ असणे जरुरी आहे. यांची नौटंकी जर अशीच सुरु राहील तर पुढील पिढ्या ज्या आताच वाचानापासून दुरावल्या आहेत त्यांच्या डोक्यात चुकीचा इतिहास जाईल.

१५/११/२०१७

Article on "Sadaphuli" , a flourished plant in all season

सदाफुली
काल सकाळच्या वेळी घरच्या बागेत सदाफुली कडे लक्ष गेले. तशी तर ती रोजच दिसते. पण आज सदाफुलीकडे पाहिल्यावर सदाफुलीचे साधे सुधे छोटेसे  फुलांनी लदबदलेले झाड सुद्धा मानवास काही ना काही शिकवणारे आहे असा विचार मनात आला. रवींद्रनाथ टागोर “निसर्गाकडे चला” असे म्हणत कारण निसर्ग मानवाला खूप काही शिकवतो. “शांतीनिकेतन” ही निसर्गाच्या सान्निध्यातील शाळा सुरु करण्यामागे त्यांचे निसर्गप्रेम हेच कारण आहे. सदाफुली हे  म्हणायला एक साधे सुधे झुडपी प्रकारात मोडणारे झाड. परंतू सदाहरित. ऋतू कोणता का असोन या झाडाला सदा न कदा पांढरी आणि जांभळी फुले फुललेली. म्हणूनच याचे नांव सदाफुली पडले असावे.गुलाब, कमळ , मदनमस्त, कृष्णकमळ, मधुमालती, रातराणी ,मोगरा , केतकी , चमेली इ. प्रकारच्या सुंदर फुलांच्या मानाने सदाफुली म्हणजे एकदमच सामान्य. सर्वांग सुंदर सुवासिक फुलांमध्ये सदाफुली म्हणजे जणू विविध दागिने व उंची वस्त्र ल्यालेल्या स्त्रियांमध्ये सुती साडी परिधान केलेली व काळी पोत घातलेली परंतू सुहास्यवदना असलेली सामान्य स्त्रीच भासते. समारंभात नटून थटून आलेल्या स्त्रियांमध्ये एखादी रूपवती स्त्री तिच्या साध्या राहणीने चित्तवेधक दिसते तशीच विविध फुलांनी फुललेल्या बागेत ही सदाफुली दिसते. ज्ञानेश्वर माऊलींनी “मोगरा फुलला....” असे म्हटले आणि तद्नंतर अनेकांनी अनेक फुलांवर काव्ये केली. साधी सुधी सदाफुली मात्र उपेक्षितच राहिली. जरी ही सदाफुली साधी सुधी असली तरी ही मानवाला अनेक गोष्टी शिकवणारी अशी आहे. सदाफुली कुठेही लावा ती जगते अगदी अत्यल्प पाणी असले तरी. तिला ना खत ना इतर झाडांना लागतात तसे आणखी  काही सोपस्कार. सदाफुली ऋतू कोणताही असो सतत फुले फुलवून हसतच राहणार .माणूस या झाडाकडून जगण्याचे हेच तंत्र शिकू शकतो. परिस्थिती कशीही असली तरी जीवन जगावे. कुणी सुखाचे पाणी देवो अथवा न देवो ओठी सदाफुली प्रमाणे
हास्य फुलेलेले असावे. अंगावर उन पडो वा पाऊस, थंडी असो वा  इतर कोणतीही परिस्थिती सदाफुलीप्रमाणे जगता येण्याची कला आत्मसात केली पाहिजे. कुणी प्रेमरुपी, विचाररुपी खत टाको अथवा न टाको सदाफुलीच्या मुळांप्रमाणे आपणच आपले हात पाय पसरून आपली क्षमता वाढवून मानसिक, वैचारिक, बौद्धिक वाढ करीतच राहिली पाहिजे. सदाफुलीच्या विविध औषधी गुणांप्रमाणे आपण सुद्धा कुणासाठी उपयुक्त ठरू शकतो. या बाबी सदाफुली कडून मानव निश्चितच शिकू शकतो. आजकालच्या जगतातील चमक-धमक पाहून, इतरांच्या भौतिक सुख सुविधा पाहून त्या आपल्याजवळ सुद्धा असाव्यात अशा मानसिकतेत वाढ होतांना दिसत आहे म्हणूनच मोबाईल चो-या,मोबाईलसाठी खून, एटीएम मशीनच पळवणे अशी कृत्ये घडतांना दिसतात तसेच अधिकारी व लोकप्रतिनिधी भ्रष्टाचार करून नाना प्रकारच्या भौतिक वस्तूंचा साठा करतांना दिसून येतात. सदाफुली प्रमाणे आहे त्या परिस्थितीमध्ये जगावे असे आता कुणाला वाटत नाही. “ठेविले अनंते तैसेचि राहावे...” तुकोबांच्या या उक्तीप्रमाणे सदाफुली जगते. असे जगणे  कठीण जरी असले तरी माणूस तसा प्रयत्न मात्र हमखास करू शकतो आणि सदाफुली प्रमाणे सर्व परिस्थितीत सदाबहार राहू शकतो.

०९/११/२०१७

Article on the occasion of 1 year completion to demonetization declared by Mr Narendra Modi PM India on 08/11/2016

सत्तेसाठी रोष टाळला.....देशासाठी रोष पत्करला 
     गतवर्षी म्हणजेच 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री आठ वाजता “आज रात 12 बजे के बाद 500 और 1000 के नोट लीगल टेंडर नही रहेंगे” या पंतप्रधानांच्या नोटबंदीच्या घोषणेला काल एक वर्ष पूर्ण झाले. खरे तर नोटबंदी ऐवजी नोट बदली म्हणायला पाहिजे. तसा हा विषय मोठा गहन आहे. विविध अर्थशास्त्रीनी यावर भिन्न भिन्न मते प्रकट केली आहेत. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग या निर्णयाचे वर्णन “संघटीत लूट” करतात. तर या निर्णयाचे समर्थक या निर्णयास देश बदलविणारा, काळ्या पैस्यास अवरोध करणारा निर्णय मानतात. नोटबंदीमुळे काय साध्य झाले काय नाही याचा उहापोह करायचा म्हटले तर या विषयावर एक वर्षापासून विविध मते प्रकट होत आलेली आहेतच. “नोटबंदी फसली” असे सुद्धा म्हटले गेले. ती फसो अथवा ना फसो हा निर्णय घेण्यात मा. पंतप्रधानांचा हेतू मात्र देशहित, दहशतवादास पायबंद, नकली नोटांचा सुळसुळाट रोखणे ,काळ्या पैस्यास अटकाव करणे हाच होता. जनता उतावळी असते. जनतेला ताबडतोब बदल अपेक्षित असतो. एखादा निर्णय घेतला की त्याचे चांगले परिणाम लगेच हवे असतात. नोटबंदी नंतर झालेला चलन तुटवडा , एटीएम वरील रांगा , दिवसागणिक बदलणारे निर्णय, बँकांनी केलेली हेरफेर यामुळे सामान्य जनता भरडली गेली, त्रस्त झाली आणि विरोधकांच्या हाती कोलीत मिळाले. तसे आर्थिक  व्यवहार  पूर्वपदावर येऊनही आता बरेच दिवस झाले आहेत. या निर्णयात काहीच त्रुटी नव्हत्याच असेही नाही परंतू देशाच्या हितासाठी घेतलेला हा निर्णयच चुकीचा कसा होता हे पटवणे अजूनही सुरुच आहे. काल हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला गेला. नोटबंदीमुळे काहीही साध्य झाले नाही असे म्हणणा-यांना विविध खात्यात पैसा आला हे दिसत नाही, करबुडवण्याची सवय लागलेल्या चांगल्या चांगल्या बेगडी देशप्रेमी धनवानांना कर भरावा लागला. कोट्यवधी रुपयांच्या रकमा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विक्रमी स्वरूपात कर रूपाने सरकारी तिजोरीत जमा झाल्या. ज्या देशातील नागरिक “कॅशलेस व्यवहार” करण्यास कचरत होते ते “टेक्नोसॅव्ही” प्रमाणे “कॅशलेस व्यवहार” करू लागले. “कॅशलेस व्यवहार” करणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. विविध व्यापारी प्रतिष्ठानांमधून “पीओएस” मशीन वापरण्यामध्ये सुद्धा लक्षणीय अशी वाढ झाली. अजूनही चांगले परिणाम आगामी काळात दृष्टीक्षेपात येतीलच परंतू त्यासाठी धीर धरावा लागणार आहे. काही ठिकाणी “कॅशलेस व्यवहार” कमी सुद्धा झालेले दिसतात परंतू त्यास चलन उपलब्धी हे कारण आहे. असे असतांना उगीच “कॅशलेस व्यवहार” कमी झाल्याचा देखावा निर्माण केल्या जात आहे. “कॅशलेस व्यवहार” वाढल्याचा दावा खुद्द “कॅशलेस व्यवहार” सुविधा पुरवणा-या कंपन्यानी केला आहे व तसे जाहीर केले आहे. चाणक्य म्हणतात देशाच्या कर उत्पन्नात जर वाढ होत असेल तर तो देश प्रगती पथावर आहे असे समजावे. नोटबंदी नंतर कर उत्पन्न वाढले आहे. आगामी काळात ते असेच वाढलेले असेल असे सरकारने घेतलेल्या काही आर्थिक निर्णयांमुळे वाटत आहे. आपल्या देशात स्वत:चा काही व्यक्तीगत फायदा होत असेल तर ते सरकार चांगले. देशाचे काही चांगले होत असेल त्यासाठी स्वत:ला काही त्रास होत असल्यास सरकार वाईट. असा समज चांगलाच रुढ झाला आहे. असा समज ठेवणे हे देशासाठी निश्चितच चांगले नाही. नोटाबंदीमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला परंतू तो निर्णय देशाच्या हितासाठीच घेतला गेला होता. इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना त्यांना यशवंतराव चव्हाण व एका समितीने नोटा बंदी करण्याचा सल्ला दिला होता परंतू सत्ता टिकवण्यासाठी, अंतर्गत विरोध होऊ नये म्हणून देशहित बाजूला सारले व इंदिरा गांधींनी जनरोष टाळला तर मोदी यांनी देशहितासाठी जनरोष पत्करला.

०२/११/२०१७

Article on Raseela Vadher, the forest officer of Gujarat’s Forests and Environment Department, who has rescued many wild animals

रसिला....एक ‘शेरदिल’ महिला
शीर्षक वाचून थोडे Confuse झाल्यासारखे वाटेल. तसे वाटणे स्वाभाविकच आहे. कारण शीर्षकातील हिंदी शब्द. “रसिला” या शब्दाचा अर्थ म्हणाल तर एखादा चविष्ट पदार्थ. त्यानंतर शेरदिल आणि महिला असे शब्द सुद्धा आहे आता रसिला आणि शेरदिल महिला अर्थात धाडसी स्त्री यांचे काय Combinition, काय संयोग असेल असा प्रश्न कुणालाही पडेलच. त्या दिवशी घरी एकटाच होतो , टी. व्ही. लावला Animal Planet वाहिनी लावली त्यावर उजव्या बाजूस Geer Forest Gujrath असे शीर्षक दिसले तसे आता एकाच वहिनीवर विसावणे कुणालाही सहसा जमत नाही परंतू मी त्याच वाहिनीवर विसावलो. रिमोट वरचा कंट्रोल काढून टाकला आणि गुजराथ मधील सिंहांच्या राष्ट्रीय उद्यानातील “रसिला वाधेर” नामक सिंहीणी सारख्या महिलेची माहिती पाहू लागलो. आपल्या देशात अनेक महिलांनी अलौकिक अशी कामगिरी बजावलेली आहे. गार्गी, मैत्रेयी यांच्या पासून ही परंपरा आहे. आता गार्गी मैत्रेयी यांची नांवे घेतली तर कुणी “राहू द्या ती पुराणातील वानगी पुराणातच” असेही म्हणेल पण ते जाऊ द्या. आजच्या भारतीय स्त्रिया पायलट, ट्रक चालक. रिक्षा चालक, बस वाहक, प्रशासन सर्वच क्षेत्रात गरुड झेप घेत आहे. त्याच यादीत आता रसिला सुद्धा समविष्ट झालेली आहे. 2007 मध्ये गीर जंगलात वनरक्षक म्हणून रुजू झाली. भारतातील कदाचित पहिल्याच अशा वनरक्षक महिलांच्या पथकात तिचा समावेश झाला होता. तिला कार्यालयीन किंवा वनरक्षक म्हणून कार्य करण्यापेक्षा वन विभागातच परंतू काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती आणि त्यातही त्यासाठी तिने बचाव पथकात समावेश होण्यासाठी तयारी सुरु केली. आणि तिची इच्छा पूर्ण झाली. सिंहांच्या बचाव पथकात ती काम काज करू लागली. सिंहांसोबतच बिबट्या, मगर असेही प्राणी ती उपचारासाठी म्हणून सहज हाताळू लागली. प्राण्यांना जेंव्हा जखमा होतात त्यावर उपचार करण्यासाठी त्यांना बेशुद्ध करण्यासाठी बंदुकीद्वारे जी इंजक्शने दिली जातात ती देण्यात सुद्धा ती वाकबगार झाली. हे सर्व करता करता आजरोजी पावेतो तिने 300 पेक्षा जास्त सिंह आणि 515 बिबटे तसेच इतरही प्राण्यांचा बचाव किंवा सुटकेचे कार्य केले आहे. “ही 24 तासांची ड्युटी आहे , यात काहीही Schedule नाही कधीही काही काम पडले तर वेळ जायला नको” असा तिचा दृष्टीकोण आहे. कधी एखादे बचाव कार्य 15 मिनिटात आटोपते तर कधी तासं तास  लागतात. प्रत्येक प्राण्याची
Raseela Vadher
स्वभाव वैशिष्ट्ये वेगळी असतात आणि ती समजून घ्यावी लागतात. सिंह हल्ला करण्याच्या आधी शेपूट हलवून किंवा गर्जना करून इशारा देतो तर बिबट्या मात्र अचानक हल्ला करतो. प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष कार्य यात खुप तफावत असते कारण प्रत्यक्ष बचाव कार्य करतांना बचाव पथकाला त्या वेळची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागतो असे रसिला सांगते. या हिंस्त्र श्वापदांचा गीर मधील गावक-यांना सुद्धा त्रास होतो. त्यांची जनावरे कधी कधी या प्राण्यांची भक्ष्य बनतात. तेंव्हा गावक-यांना सुद्धा विश्वासात घ्याये लागते.आता गावकरी बरेच सरावले आहेत त्यांना वन्यजीवांचे महत्व सुद्धा कळले आहे, त्यांना आता या प्राण्यांसोबत जगण्याची सवय झाली आहे. गावक-यांना ते समजावण्याचे कार्य सुद्धा रसिला पार पाडते. महाराष्ट्रातील अधिका-यांना सुद्धा रसिलाने बचाव कार्याचे ‘प्रेझेन्टेशन’ दिलेले आहे. हे सर्व करण्यास कौटुंबिक आधाराची सुद्धा गरज असते विवाह होऊन जास्त दिवस झालेले नसले तरीही ती गीरच्या जंगलात एकटी राहते. तिचा पती वेरावल  नावाच्या  60 किमी अंतरावरच्या गावात राहतो. एक दिवसाआड तिला भेटतो कधी कधी ते ही शक्य होत नाही. शहरी “बीजी वर्किंग कपल” प्रमाणे त्यांच्या मध्ये चांगली “अंडरस्टँडिंग” आहे. ती सर्व जबाबदारी पार पाडते अगदी शहरी “वर्किंग वूमन” प्रमाणे. तिचे भांदुरी नावाचे गांव 42 किमी अंतरावर आहे परंतू ती वनविभागाच्या निवासस्थानातच राहते. सिंह कळपाने राहतो, त्याच्या कुटुंबाची देखरेख, पालन पोषण सिंहीण करीत असते. त्याचप्रमाणे रसिला ही वनविभागाच्या बचाव पथकाची प्रमुख सुद्धा एखाद्या सिंहिणी प्रमाणे तिच्या दोन कुटुंबाचा सांभाळ करीत आहे. एक 
तिचे खरे कुटुंब आणि दुसरे ज्यांना ती आपले कुटुंब मानते ते वन्यजीवांचे कुटुंब. गीरच्या जंगलातील बचाव पथकात मोठी जबाबदारी पार पाडत असलेल्या रसिला या शेरदिल महिलेची दखल माध्यमांनी मात्र  म्हणावी तशी घेतली नाही. तिची ही “स्टोरी” आपल्या भागातील तरुणींना निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

२५/१०/२०१७

Article on Retired Teacher Mr. M.R.Deshmukh of A.K.National Highschool Khamgaon Dist Buldhana, Maharashtra

आमचे एम.आर. सर 
      अं  हं !...येथे एम.आर. म्हणजे वैद्यकीय प्रतिनिधी नाही. कारण एम आर म्हटले की प्रथम कुणालाही अप टू डेट असा तरुणच आठवेल. परंतू एम.आर.या आद्याक्षरांच्या समोर सर सुद्धा आहे. ही आद्याक्षरे आहेत एका व्यक्तीच्या नावातील. ही व्यक्ती म्हणजे तीस चाळीस वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांमध्ये दरारा , आदरयुक्त भीती असलेले आमचे लाडके एम.आर.देशमुख सर. पूर्ण नांव “मधुकर राधाकृष्ण देशमुख”. परंतू “एम.आर.” या नावाने सर्वपरिचित. परवा संध्याकाळी एम. आर. सर हातात काठी घेऊन फिरतांना दिसले. त्याच त्यांच्या ढगळ पायजमा शर्ट या पेहरावात. 30 वर्षांपासून त्यांना त्याच पोशाखात सर्व पहात आले आहेत. नेहमी पायी फिरणा-या सरांना प्रथमच हातात काठी घेतलेले पहिले. घरी येतांना मन भूतकाळात गेले.पाचवीत नॅशनल हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला होता. आमचा वर्ग म्हणजे “ई क्लास”.कारण आमची तुकडी “ई” होती. सातवीत खूप कडक वर्गशिक्षक आहेत म्हणून कानी येऊ लागले. सातवीतील काही मुले सरांच्या कडकपणाचे किस्से आम्हास सांगू लागले. सहावीचे वर्ष सरले आणि आम्ही एम.आर. देशमुख सर यांच्या वर्गात दाखल झालो. त्यांच्या पहिल्याच तासाला वर्ग एकदम चिडीचूप होता. हजेरी नंतर सरांनी आम्हाला सूचना दिल्या, श्रीमदभंगवद्गीता छोटे पुस्तक विकत आणायला सांगितले.पहिला तास गीतेचा 12 वा अध्याय वाचून होत सुरु होत असे. “एवं सततयुक्ता ये....” असे सुरु निघाले की शाळेशेजारून जाणारे पादचारी थबकत त्यांना आनंद वाटे,शाळा संस्कारी असल्याचे ते गावात बोलत. रामरक्षा पठण स्पर्धेत सर भाग घेण्यास सांगत. “विश्वामित्र” हे पुस्तक मला या स्पर्धेत बक्षीस मिळाले होते. सरांच्या शिक्षा सुद्धा मोठ्या अचाट असत. शिक्षा अशा की मुलांना त्यांनी केलेल्या चुकांचा पश्चाताप वाटावा. “मी चूक केली आहे” अशी पाटी गळ्यात घालून वर्गा बाहेर बसवणे, एक विद्यार्थी दुस-याचे केश कर्तन करीत आहे अशा आविर्भावात दोघांना बसवणे यामुळे शाळेतील सर्व मुलांना ही चुका करणारी मुले दिसत आणि म्हणून मग सरांच्या तासामध्ये नेहमी “Pin Drop Scilence” असे. पुढे सरांचा स्वभाव “वज्रादपि कठोर आणि कुसुमादपि मृदू” असल्याचे समजायला वेळ नाही लागला. क्वचित प्रसंगी सर त्यांच्या कामासाठी बँकेत पाठवत. आपल्या विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान कळावे, त्यांना “Practical Knowledge” सुद्धा असावे असा त्यांच्या दृष्टीकोण होता हे नंतर त्यांच्या बोलण्यातून लक्षात आले. या कामामुळे आमच्या अभ्यासात कुठेही व्यत्यय येणार नाही याकडे सुद्धा त्यांचा कटाक्ष असे. भूतकाळातील या विचारांच्या तंद्रीतच मी माझ्या घरी पोहोचलो. सरांना काठीचा आधार घेत चालतांना पाहिल्याने त्यांना भेटण्याची तीव्र इच्छा जागृत झाली होती. म्हणून दुस-या दिवशी माझा तत्कालीन वर्गबंधू रितेश काळे याला “चल एम आर सरांना भेटायला जाऊ” म्हटले. त्याने लगेच होकार दिला. आम्ही दोघांनी सरांचे घर गाठले.सरांचे घर तीस वर्षांपूर्वी होते तसेच छोटेखानी साधेसुधे सरांसारखेच. सरांच्या शेजारील घरे मात्र टोलेजंग झालेली दिसली. राजा,पंडीत आणि मित्र यांना भेटायला जातांना काहीतरी घेऊन जायचे असते हे आपली संस्कृती सांगते तो नियम पाळला. अंगणातून थोडे समोर गेल्यावर “या या !” म्हणत सरांनी स्वागत केले. सरांनी आम्हाला ओळखले होते. आम्ही सरांना नमस्कार केला. आश्चर्याने सर म्हणाले “आज कसे काय बुवा आगमन?” , “सहजच” असे म्हटल्यावर त्यांचा आनंद डोळ्यातून दिसत होता. “माझे विद्यार्थी भेटले की आनंद होतो आणि माझे आयुष्य अजून वाढते” ते म्हणाले. सरांचे वय वर्षे 87,वयोमानानुसार कमी ऐकू येते परंतू वाचन, फिरणे, आणि नामस्मरण या गोष्टी गेल्या कित्येक वर्षांपासून नित्यनेमाने सुरूच आहेत. माझ्या मनात विचार डोकावला “आपण नेमेके इथेच चुकतो, नेमाने कोणतीच गोष्ट करत नाही.”. फोटो व इतर कौटुंबिक चौकशी झाली. तसे सरांच्या कुटुंबीयांबाबत जास्त माहेती नव्हती परंतू सरांचा मुलगा धनंजय देशमुख (धनु दादा) शालेय व महाविद्यालयीन जीवनात आमचा ‘सिनियर’ होता. फेसबुकमुळे संपर्कात आहे. भेटीअंती सरांचा निरोप घेतला. मागे एक वर्षांपूर्वी सर बाजारात भेटले होते माझ्या सोबत सौ. होती. सरांनी त्यांच्या सवयीप्रमाणे गाल पिळला आणि स्वस्तुती करू नये परंतू सौ.ला उद्देशून सर म्हणाले तुझा नवरा छान आहे माझा आवडता विद्यार्थी आहे. एखादे मोठे पारितोषिक मिळाल्यावर काय आनंद होईल असा आनंद मला वाटला. लहानपणापासून कित्येक शिक्षकांनी शिकवले आम्हा विद्यार्थ्यांचे दैव चांगले की सर्वच शिक्षक एकापेक्षा एक होते, ज्ञानी सुस्वभावी. प्रत्येकात काही तरी वेगळे वैशिष्ट्य होते. परंतू काहीतरी ऋणानुबंध असतील की काय देव जाणे एम. आर देशमुख सरांची सर्वात जास्त वेळा भेट होत गेली. परवा ते दिसले, त्यांना घरी जाऊन भेटलो. उभयता आनंद वाटला. प्रगाढ गुरु-शिष्य परंपरा लाभलेल्या आपल्या देशात आता गुरु-शिष्य नाते म्हणावे तेवढे आत्मीयतेचे राहिले नाही याचा खेद वाटतो. सरांनी विद्यादान केले, सुसंस्काराचे धडे दिले. म्हणून त्यांच्याप्रती कृतज्ञता प्रकट करणारी ही लेखरुपी गुरुदक्षिणा. सर तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि तुमच्या सारखे हाडाचे शिक्षक आगामी पिढ्यांना लाभो हीच सदिच्छा.

Condition of National Highway, State highway, Internal roads in city and town

समृद्धी महामार्ग आणि खड्ड्यांनी समृद्ध मार्ग 
      राज्य सरकारने मुंबई ते नागपूर नवीन समृद्धी महामार्ग तयार करण्याचा चंग बांधला आहे.त्याचे नामकरण “समृद्धी महामार्ग” असे केले आहे.मान्य आहे रस्ते  देशाच्या विकासाची गती वाढवणारे असतात. परंतू केंव्हा? जेंव्हा ते रस्ते खड्ड्यांनी समृद्ध नसतील तेंव्हाच. देशातील हेमामालिनीच्या गालाप्रमाणे असलेल्या एकदम सपाट व मुलायम रस्त्यांवर (इति लालूप्रसाद) तारुण्यपिटिकेप्रमाणे मार्गपिटिका अर्थात मुरूम व खड्डे दिसत आहेतच. हल्ली अत्यंत निकृष्ट पद्धतीने केलेल्या रस्त्यावर एक-दोन वर्षातच खड्डे पडतात,ठिगळ म्हणून त्या खड्ड्यांमध्ये मुरूम आणून टाकतात. जसा गालावरचा मुरूम म्हणजे तारुण्यपिटिका तसा मार्गावरचा मुरूम आणि खड्डे म्हणजे मार्गपिटिकाच.कधी तो स्वखर्चाने टाकल्या जाण्याचे दावे सुद्धा केले जातात,क्वचित प्रसंगी स्वखर्च होतही असेल.तो मुरूम मग सर्वत्र पसरतो गाड्या घसरण्याची शक्यता असते. गावातील मार्ग,राज्य महामार्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग सर्वांची गत सारखीच. नवरात्रीत माहूरला जाण्याचा योग आला होता तेंव्हा या रस्त्याने रोज प्रवास करणा-यांची कीव आली होती. सोमवारी वजनदार केंद्रीय मंत्री मा.ना. नितीनजी गडकरी माहूर ला रस्ते उद्घाटन समारंभासाठी उपस्थित होते. त्यांना बाळापुर-पातूर रस्त्याची गत कळवायला हवी होती.खामगांव ते माहूर बाळापुर-पातूर मार्गे तर एकदा सर्व सन्मानीय लोकप्रतिनिधींची आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कर्मचा-यांची माहूर यात्रा काढावी आणि त्यांना या रस्त्याची अनुभूती द्यावी.बाळापूर–पातूर, माहूर-पुसद मार्ग ब-याच ठिकाणी अत्यंत दुरावस्थेत आहे. तशीच अवस्था अकोला-खामगांव,खामगांव-मलकापूर, मलकापूर-बोदवड या मार्गांची.अनेक ठिकाणी मार्गपिटिका, मुरुमांची ठिगळे आहेतच. जामनेर जि. जळगाव या ठिकाणी रविवारी गेलो होतो जातांना खामगांव–मलकापूर-मुक्ताईनगर-बोदवड-जामनेर असा गेलो आणि येतांना जामनेर-बोदवड–मलकापूर-खामगांव असा आलो. काय ते खड्डे समुद्ध रस्ते ! या रस्तावरून लोकप्रतिनिधी जात नाहीत काय? जर जात असतील तर ते संबंधीत खात्याच्या मंत्री महोदयांना या रस्त्यांच्या अवस्थे बाबत पत्र पाठवतात की नाही देव जाणे.प्रचंड खड्ड्यांमधून गेल्याने गाड्या तर खराब होतातच शिवाय मणक्याचे त्रास, प्रसंगी अपघातामुळे जीवितहानी अशी संकटे असल्याने ड्रायव्हरच्या मुठीत स्टेअरिंग असते आणि प्रवाश्यांच्या मुठीत त्यांचा जीव. कशाचा रोड टॅक्स घेतात हे ? कोणत्या तोंडानी रोड टॅक्स मागतात ? रस्ते तर निकृष्ट आहेत मग का म्हणून रोड टॅक्स द्यावा ? एस टी चालकांनी सुद्धा चांगल्या रस्त्यांची मागणी पुढे रेटणे आवश्यक आहे. पुलांची अवस्था तीच एकाही पुलाची “लेवल मेंटेन” नसते .प्रत्येक पुलावर प्रवेश करतांना एक गचका बसतो नंतर पुल गाळे पद्धतीने बांधल्यामुळे त्यावर ठराविक अंतराने  गतीरोधकाप्रमाणे गचके बसतात आणि शेवटी पूल संपताना एक गचका बसतो. काही ठिकाणी ब्रिटीशकालीन पुल आजही वापरले जात आहे अभियांत्रिकी तंत्रज्ञान तर प्रगत आहे मग असे पूल कसे काय ?   ब्रिटीशकालीन पुलांची लेवल दाखवा जरा यांना.तुम्ही प्रथम जे आहे ते चांगले करा त्याला मेंटेन करा आणि मग नवीन उपक्रम हाती घ्या. ठेकेदारावरून बुलडोजर फिरवण्याचे बोलले जाते परंतू त्यांच्यावर बुलडोजर फिरवण्याआधी निदान त्यांच्या करवी रस्त्यांवर मुरूम न टाकता व्यवस्थित गिट्टी आणि डांबर टाकून रोडरोलर फिरवून घ्या म्हणजे 70 वर्षाच्या या देशातील रस्ते खरोखर हेमामालिनीच्या गालांप्रमाणे दिसतील, त्यावर निव्वळ मुरूम भरून काम भागवू नका. समृद्धी महामार्ग तर बनवा त्याला ना नाही परंतू प्रथम खड्ड्यांनी समृद्ध शहरातील मार्ग, राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्ग यांना सुद्धा सुधारा.

१८/१०/२०१७

Article elaborates on strike of MSRTC employees in Diwali

“बहुजन अहिताय बहुजन दु:खाय“ 
        राज्य परिवहन महामंडळ  कर्मचा-यांनी सातवा वेतन आयोग लागू व्हावा म्हणून संप पुकारला. “सबको मिले मेहनत के मुताबिक अपना अपना हिस्सा” याप्रमाणे सर्वाना त्यांच्या कामाचा योग्य असा मेहनताना मिळायलाच हवा आणि तो देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. थंडी, पाउस आणि उन्हाळा या तिन्ही ऋतूत आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी प्रवाश्यांना सुरक्षितरित्या परिवहन मंडळाची मोटार हाकणारे चालक आणि वाहक यांची मेहनत खरच वाखाणण्याजोगी आहे. विदर्भ आणि खानदेशातील उन्हाळ्यात भर उन्हात सूर्य आग ओकीत असतांना मंडळाचे वाहक मोटारीच्या गरम संयंत्रा शेजारीच बसून गाडी चालवीत असतात. पिण्यासाठी बारदान्याच्या कपड्याने लपेटलेली बाटली असते शिवाय आगारामध्ये दुरुस्ती पथक सुद्धा राबत असते. अशा कर्मचा-यांची सुद्धा सरकारने इतर कर्मचा-यांप्रमाणे काळजी वाहणे आवश्यकच आहे. परंतू याच कर्मचा-यांच्या संघटनेने नेमका दिवाळीचा मुहूर्त साधून सातव्या वेतन आयोगासाठी संप केला. नेमके जेंव्हा नागरिकांना फिरण्याचे जास्त काम असते तेंव्हाच हा संप केलेला आहे. खेड्यापाड्याच्या जनतेची तर फारच कुचंबणा होईल. दिवाळीच्या दिवसांत खाजगी प्रवाशी वाहतूकदार आपल्या वाहनांचे भाडे अव्वाच्या सव्वा वाढवितात. जनतेला नाहक भुर्दंड सोसावा लागतो शिवाय यांची वागणूक अरेरावीची. संप पुकारून आता 24 तास लोटले आहे. प्रशासनाने निलंबनाचा इशारा दिला आहे. ऐन दिवाळीत कुणाचेही निलंबन न होवो. सरकारने व कर्मचारी संघटनेने सुद्धा जनता, कर्मचारी अशा दोघांचेही हित बघून लवकरात लवकर निर्णय घ्यावा. हा लेख प्रकाशीत होईतो कदाचित संप मिटलेलाही असू शकतो. महामंडळाकडे पैसाच नाही असे स्पष्टीकरण मा. परिवहन मंत्री यांनी दिले. पैसेच नाही तर मग मंडळ नफ्यात येईल अशा काही उपाययोजना करा ना ! एकीकडे शासन फुकट पैसे वाटते, धान्य वाटते अनेक योजनांमधून जनतेला ऐदी बनवते तर दुसरीकडे मेहनत करणा-यांना मेहनतीचा योग्य तो परतावा देत नाही त्यामुळेच ऐन सणासुदीच्या काळात कर्मचा-यांना असा मार्ग निवडावा लागला. परंतू त्यांनी जर काळ्या फिती लावून काम केले असते तर जनतेच्या मनात त्यांच्या विषयी आदर वाढला असता. संप दिवाळी नंतर करण्यास हरकत नव्हती महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ ही तळागाळातील जनतेसाठी उपयुक्त अशी सुवधा आहे. त्यांना परिवहन मंडळाच्या मोटारीचा किती आधार असतो. ग्रामीण भागातील गरोदर महिला दवाखान्यात जाण्यासाठी याच मोटारीला प्राधान्य देतात .कित्येक वेळा तर महिलांची प्रसूती सुद्धा परिवहन मंडळाच्या मोटारीतच झालेली आहे. असे हे परिवहन मंडळ जनतेच्या सुविधेसाठी आहे. म्हणून “बहुजन हिताय बहुजन सुखाय” असे ब्रीदवाक्य मिरवणा-या महामंडळाने ऐन दिवाळीत संप करणे अपेक्षित नव्हते. त्यांच्या संपामुळे सामान्य जनांची मात्र “बहुजन अहिताय बहुजन दु:खाय“ अशीच गत झाली आहे. शेवटी ही दिवाळी सर्वाना “जो जे वांछील तो ते लाहो” अशी असावी हीच प्रार्थना.                                       विनय विजय वरणगांवकर , 9403256736
कृपया टायपिंग मिस्टेक टाळाव्या
धन्यवाद


१२/१०/२०१७

Article on Legendary Amitabh Bacchhan on his 75th Birthday

अमिताभायण
वाल्मिकीचे रामायण, गदिमांचे गीत रामायण आणि भविष्यात “अमिताभायण” सुद्धा लिहिले जाऊ शकते. का नाही लिहिली जाऊ शकणार? कारण त्याचे गारुड, त्याची मोहिनी अबाल वृद्धांमध्ये गेल्या 47 वर्षांपासून कायम आहे.  “ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नही”  म्हणत
जंजीर मध्ये आपला राग प्रकट करणारा     #AmitabhBachchan अमिताभ ते “देवी और सज्जनो” असे आजही “केबीसी” मध्ये म्हणत सतत कार्यशील असणा-या अमिताभ आपला कारेश्मा राखून आहे. काल त्याचा 73 वा वाढदिवस साजरा झाला. माध्यमांवर संदेशांची देवान घेवाण मोठ्या प्रमाणात झाली झाली. वाहिन्यांवर त्याचेच सिनेमे व कार्यक्रमांची रेलचेल होती जणू काही राष्ट्रीय उत्सवच. माझे मित्र संजय जाधव यांचा संदेश आला म्हणे यार अमिताभवर काही लिही. माझा दुस-या विषयावरचा लेख तयार होता परंतू त्याने म्हटल्यावर मला सुद्धा अमिताभ या विषयावर लिहिण्याची खुमखुमी आली. अमिताभायण या शीर्षकानुसार म्हटले तर त्यासाठी ग्रंथच लिहावा लागेल. म्हटले नाही अमिताभायण ग्रंथ निदान एक लेख तर लिहावाच. “कामयाबी की सिडी” पटापट चढत लोकप्रियतेचे सर्व उच्चांक अमिताभने मोडले. त्याच्याशी तुलना करू पाहणारे सर्व “किंग” ,”बादशाह” आजही त्याच्या मागेच आहेत कारण “हम जहॉं खडे होते है लाईन वहीं से शुरू होती है” अशी संवादफेक त्याने कित्येक वर्ष आधी केली आहे. आणि खरच आजही लाईनमध्ये प्रथमस्थानी तोच आहे, सुपरस्टार आहे . सुरुवातीला अपयश मग सलीम-जावेद, प्रकाश मेहरा, मनमोहन देसाई, यश चोप्रा इ सहका-या समवेत अनेक हिट सिनेमे अमिताभने दिले. त्याच्यासाठी गायलेली किशोर कुमारच्या आवाजातील गाणी आजही लोक तितक्याच आवडीने ऐकतात.डॉन सिनेमा आजही तितकाच ताजा वाटतो. नेहमी म्हटले जाते की सर्वात मुख्य काम असते दिग्दर्शनाचे परंतू डॉन चा दिग्दर्शक चंद्रा बारोट होता किती जणांना माहीत आहे? चंद्रा बारोट ने पुढे किती हिट सिनेमे देले त्या साठी शोध मोहीम हाती घ्यावी लागेल. “सबकुछ अमिताभ” अशी स्थिती होती. उंच आहे म्हणून आमच्या कॅमेरात बसणार नाही , आवाज चांगला नाही असे म्हणून प्रथम हिणवल्या गेल्यावरही त्याने त्याच्या त्याच बाजू जमेच्या म्हणून सिद्ध केल्या,”पीटर तुम मुझे बाहर ढूंड रहे थे और मै तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा था” हा संवाद कुणा इतर अभिनेत्याच्या आवाजात ऐकण्याची कल्पनाच करवत नाही. “केबीसी” मध्ये सहभागी लोकांशी अत्यंत आपुलकी व आदराने वागणा-या अमिताभने त्याचे नांव रेखा सोबत जोडल्या गेल्यावर आजतायागत या बाबतीत किती संयमाने वर्तणूक केली आहे. हिंदी भाषेवर त्याचे प्रभुत्व वाखाणण्याजोगे व प्रशंसनीय आहे. नाहीतर आजकाल किती इंग्रजाळलेले हिंदी व मराठी बोलतात. तो सलग एकच भाषा वापरून किती अस्खलीत बोलतो. पुढे राजकारणातील अपयश  आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक असे त्याचे सिनेमे आपटले. “ए बी सी एल” चे दिवाळे निघाले. असे अपयशाचे हलाहल पचवून त्याने पुन्हा उभारी घेतली. “अंग्री यंग मॅन” या त्याच्या काळात आमचा जन्म झाला होता परंतू त्याची जादू आजही कायम असल्याने त्याचे सिनेमे, गाणी यांची कितीतरी पारायणे आमच्या पिढीतील अनेकांनी केली आहे. तो जेंव्हा मुकादम मै तुम्हारे इन भाईयों तट्टूओंको एक हाथ से मसलकर फेंक सकता हुं” असे म्हणायचा तेंव्हा पिटातील प्रेक्षकाला आपणच अन्याया विरुद्ध पेटून उठलो आहे असे वाटायचे. “मेरे पास ना बाप दादा की दौलत है ना फुटी कवडी लेकीन मै तुमको पांच दिन के अंदर पाच लाख रुपये दुंगा” असे तो संजीव कुमारला त्रिशूल मध्ये म्हणाला तेंव्हा त्याच्यातील आत्मविश्वास तरुणांना प्रेरित करून गेला.याच सिनेमात तो गुंडांना मारतांना गुंडांचा पराजय होईलच या आत्मविश्वासाने  तो रुग्णवाहिका घेऊन जातो. या सिनेमात त्याने प्रथम गरीब आणि नंतर एकदम “कॉन्फीडंट” व प्रोफेशनल युवा बिल्डरची भूमिका किती सुरेख वठवली आहे. त्याच्या प्रेमापोटी एक नजर, आलाप, बन्सी बिरजू , गंगा की सौगंध, रस्ते का पत्थर असे त्याचे अपयशी चित्रपट सुद्धा पहिले आहेत. त्याच्या भरवश्यावर कितीतरी मिमिक्री कलाकारांनी आपली उपजीविका साधली आहे . राजू श्रीवास्तव त्याची कबुली देतो. परंतू अशा या “जादूगर” अमिताभच्या जेंव्हा अनिवासी भारतीय असल्याच्या बातम्या आल्या, बोफोर्स घोटाळ्यात नांव जोडल्या गेले , नुकतेच पनामा पेपर्स मध्ये नांव असल्याचा संशय व्यक्त केल्या गेला तेंव्हा त्याच्या चाहत्यांना दु:ख झाले परंतू त्याची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही. व.पु.काळे यांनी एका कथेत लेखकाची पत्नी व मुलगी कशा अमिताभसाठी  वेड्या  असतात आणि त्याचा लेखकाला कसा वीट येतो यावर फार सुंदर कथा लिहिली आहे.अमिताभवर लिहायचे म्हणजे ते “अमिताभायण”च होईल आणि त्यासाठी एक लेख पुरेसा ठरणार नाही.
http://srbachchan.tumblr.com/

०४/१०/२०१७

Many farmers affected due to very poisonous insecticides in Yeotmal District of Maharashtra

शेतक-याची दैना 
          काय असेल ते असो परंतू आपल्या देशात सर्वाधिक संकटांची भुते कुणाभोवती नाचत असतील तर ती शेतक-याभोवतीच असे कुणीही सांगेल. कधी उशीरा पाऊसामुळे दुबार पेरणीचे संकट, तर कधी कमी पाऊसामुळे पिके करपण्याची भीती, कधी अती पाऊसामुळे पिके खराब , तर कधी चांगली पिके झाली तर हरीण , रान डुकरांचा त्रास, कधी वन्यप्राणी शेतात कोणत्याही कारणाने का होईना मेला तर वन विभागाकडून त्रास , कधी बाजार भाव गडगडतात तर कधी सरकार रास्त भाव देत नाही , कधी बोगस बियाणे , कधी कर्जमाफी साठी आंदोलन, कर्ज माफच कधी झाले तर अर्ज भरण्यासाठी रांगा, एखादे सरकार गोळ्याच मारते तर एखादे जगूही देत नाही आणि मरूही देत नाही. संघटना आप-आपसात भांडतात सत्तेसाठी दुस-या संघटना निर्माण करतात. अशी नानाविध संकटांची भुते या देशातील गरीब शेतक-याला त्रस्त करून सोडतात. अशातच सणासुदीच्या दिवसांत यवतमाळ जिल्ह्यातील शेतक-याभोवती एक नवीन संकट उदभवले. हे संकट म्हणजे अतिविषारी किटकनाशकाचे. यवतमाळ जिल्ह्यात अतिविषारी किटकनाशकामुळे अनेक शेतक-यांना त्रास सहन करावा लागत आहे. कंपन्यांनी अतिविषारी किटकनाशक विकल्याने कुणा शेतक-याला डोळ्यांचा , तर कुणाला इतर शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. इंदल नावाच्या एका शेतक-याच्या मेंदूवर परिणाम झाला. विषाचा त्याच्या मेंदूवर इतका विपरीत परिणाम झाला की तो हात-पाय झाडू लागला , निरर्थक बडबड करू लागला त्यामुळे त्याला झोपेचे इंजक्शन देऊन रुग्णालयातील खाटेला अक्षरश: बांधून ठेवावे लागले. काय ही दैना, काय हे आपल्या देशाचे दुर्भाग्य ! राज्यात म्हणा की देशात शेतक-याची ही काय अवस्था झाली आहे. राज्यातील शेतक-याच्या मागे काय ही संकटे. ज्या यवतमाळ जिल्यात राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या झाली होती. जिथे राहुल गांधी एका आत्महत्याग्रस्त शेतकरी महीलेस भेटले होते त्याच जिल्ह्यात पुन्हा आता हे विषारी किटकनाशक प्रकरण. काय करते सरकार ? कर्मचारी अधिका-यांचे लक्ष नेमके असते तरी कुठे? किटकनाशक आणि बियाणे यांची काही तपासणी होते की नाही ? जनतेच्या अन्नात भेसळ, दुधात भेसळ,मिठाईत भेसळ आणि शेतक-याचे बी-बियाणे आणि किटकनाशक सुद्धा बोगस. कुणी मेले त्याला आर्थिक मदत दिली की लोक विसरतात. कित्येक दिवसांपासून हेच सुरु आहे. समस्येच्या मुळाशी कुणीही जायला तयार नाही. कंपन्या-कंपन्यातील स्पर्धांमुळे अनेक प्रलोभने विक्रेत्यांना दिली जातात त्यात मालाच्या दर्जाला अंतिम महत्व दिले जाते.आपला माल कसा का असेना प्रलोभनामुळे विक्रेते गरीब शेतक-याला विकतात आणि मग ही अशी संकटे ओढवतात.दर पाच वर्षानी सरकार येते आणि जाते परंतू समस्या “जैसे थे”. सत्ता बदल होत राहतो. जुने जातात नवीन येतात जुन्यांप्रमाणे नवीनही हळू-हळू मस्त होतात.मग जनता रेल्वे पुलांवर मरो की रेल्वे खाली,आत्महत्या करो की भेसळ युक्त खाण्याने मरो, बोगस बियाण्यामुळे नापिकी झाल्याने आत्महत्या करो वा अतिविषारी किटकनाशकाने अत्यावस्थ होवो. लाख दोन लाखाची मदत दिली की यांचे कर्तव्य झाले. 70 वर्षात या देशात कर्मचारी, विद्यार्थी , कामगार ,पोलीस इ कित्येकांनी आत्महत्या केल्या कधी कुण्या राजकारण्याने आत्महत्या केल्याचे ऐकिवात नाही. कुणी केलीही असेल तर ज्ञात नाही. (अर्थात आत्महत्या करणे हे वाईटच, कुणीही आत्महत्या करावी असे मुळीच म्हणणे नाही) परंतू राजकारण्यांना कोणतीच झळ नाही. सर्व यातना,दु:ख, त्रास सोसायला भोळी -भाबडी जनता व शेतकरी आहेतच.“जय जवान जय किसान” ना-याचे नेहमी उच्चारण करणा-या देशात जवानही मरत आहेत आणि किसानही शेतकरी सतत त्रस्त आणि राजकारणी आपल्याच धुंदीत मस्त आहेत व समस्येचे समूळ उच्चाटन करण्याच्या बाबतीत तेवढेच सुस्त सुद्धा आहेत.

२७/०९/२०१७

Article describes veteran actor Dev Anand , his style, Movie,Songs on the occasion of his birth anniversary 26 September

आनंद’दायी देव


...त्याची “एनर्जी”, त्याची ती सतत कार्यमग्न राहण्याची वृत्ती, यश-अपयश याचा विचार न करता आपल्या कार्यात मग्न राहण्याची शैली, नावातील “आनंद” जीवनात सुद्धा मानण्याची “....फिक्र को धुंएमे उडाता चला गया”
अशी चिंता, तणावापासून मुक्त जीवन जगण्याची आवड, अशी जगण्याची त-हा कुठेतरी प्रेरणादायी ठरेल असे वाटले आणि लेखासाठी “देव आनंद” हाच विषय नक्की केला..


सा तर तो सांप्रत पिढीच्या आधीच्या पिढीचाही जन्म झाला नव्हता त्या काळातील नायक. परंतू त्याची जादू अगदी काल-परवा पर्यंत कायम होती. त्याच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्याच्यावर प्रचंड लिखाण अनेकांनी केले आहे. आता अजून काय लिहिणार? परंतू 26 ता. चे दिनविशेष वाचतांना 26 सप्टेंबर या दिवशी त्याचा जन्म झाला होता हे निदर्शनास आले. त्याचे अनेक चित्रपट दूरदर्शनवर पाहण्यात आले होते कारण त्यावेळी दुस-या वाहिन्यांचा पर्याय नव्हता. माझ्या लहानपणी टॉकिज मध्ये जुने चित्रपट पुन्हा झळकत असत त्यामुळे काही चित्रपट टॉकिज मध्ये सुद्धा पाहिले होते. त्याचे चित्रपट, गाणी पाहिल्याने तो आवडता नट कधी झाला कळले नाही. नातेवाईक मित्रमंडळी यांच्यात सुद्धा अनेकजण त्याचे चाहते आहेतच. 26 सप्टे हा त्याचा जन्म दिवस होता हे वाचनात आल्याने त्याचे काही चित्रपट आणि गाणी स्मरणात आली आणि मग त्याच्याविषयी काहीतरी लिहिण्यास बोटे सळसळ करू लागली. सदाबहार देव विषयी लिहिले तर आपल्याला आणि वाचकांना सुद्धा त्याची “एनर्जी”, त्याची ती सतत कार्यमग्न राहण्याची वृत्ती, यश-अपयश याचा विचार न करता आपल्या कार्यात मग्न राहण्याची शैली, नावातील “आनंद” जीवनात सुद्धा मानण्याची “....फिक्र को धुंएमे उडाता चला गया”
अशी चिंता, तणावापासून मुक्त जीवन जगण्याची आवड, अशी जगण्याची त-हा कुठेतरी प्रेरणादायी ठरेल असे वाटले आणि लेखासाठी “देव आनंद” हाच विषय नक्की केला. संगणकाच्या पडद्यावर अक्षरे त्वरीत उमटू लागली. कीबोर्ड ची बटने “टक टक टक”,” टिक टिक टिक” करायला लागली आणि पडद्यावरील वर्डप्रोसेसरच्या ओळी एका पाठोपाठ एक वाढू लागल्या. देव हा विषय मांडायला एक पान पुरेसे आहे काय? 1946 पासून तर 2011 पर्यंतची कृष्ण-धवल पासून तर रंगीत पर्यंत अशी प्रदीर्घ कारकीर्द, अनेक चित्रपट, अनेक तारका ,सुरैय्या, पत्नी कल्पना कार्तिक, समव्यवसायिक बंधूव्दय चेतन आणि विजय, शैलेन्द्र, संगीतकार बर्मन पिता पुत्र आणि कितीतरी सहकारी ज्यांना देवविषयी लिहितांना विसरून कसे चालेल? देवची गाणी म्हणजे तर स्वतंत्र लेखच नव्हे तर पुस्तकाचा विषय आहे. देव विषयी बोलतांना त्याचा “गाईड” हा सिनेमा हमखास आठवतोच पाऊस पडावा म्हणून गावक-यांसाठी उपवास धरून आपले प्राण पणाला लावणारा “बाबा“ पूर्वाश्रमीचा राजू गाईड दर्शकांच्या डोळ्यात पाणी आणतो. देवचे जवळपास 90 टक्के चित्रपट हे “सस्पेन्स थ्रिलर” या पठडीतले परंतू तरीही सर्वांत काही ना काही वेगळेपण. मग ते 1950 च्या दशकातील जाल, बाजी 60 च्या दशकातील “ज्वेलथीफ” , 70 च्या दशकातील “जॉनी मेरा नाम” असो की 1990 च्या दशकातील “रिटर्न ऑफ ज्वेलथीफ” असो सर्वानी रसिकांचे भरभरून मनोरंजन केले. त्याच्यावर क्वचितच भावूक प्रसंग किंवा प्रसंगातील गीते चित्रित झाली. “देव आनंद म्हणजे केवळ चॉकलेट हिरो अभिनय मात्र काही नाही” असे समिक्षक म्हणत परंतू “चल री सजनी अब क्या सोचे” या गीतात देवसाबनी दु:खी भाव किती छान प्रकट केले आहेत. गाईड, हम दोनो आणि इतरही अनेक चित्रपटातून देवने त्याच्या अभिनयाच्या छटा सिद्ध केल्या आहेत. देव आणि किशोर कुमार हे समीकरण जुळायच्या आधी रफी आणि देव यांची श्रवणीय व एका पेक्षा एक सरस अशी गाणी येऊन गेली की जी आजही आवडीने ऐकली जातात. कुतुबमिनार मध्ये “दिल का भंवर करे पुकार” असे रफीच्या आवाजात तो आपल्या हृदयाची साद घालतो, तेरे घर के सामने मधील इंजिनियर देव आपल्या प्रेमिकेच्या शोधात रफीच्या आवाजात “तू कहॉं ये बता” म्हणतो तेंव्हा ते पहाणे आणि ऐकणे दर्शकांना आजही सुखद वाटते, गाईड मधील “दिन ढल जाये” मध्ये रफी आणि देव आपल्या गायनाने व अभिनयाने मंत्रमुग्ध करतात. “देखनेमे भोला है दिल का सलोना” अशा आनंददायी देवला जाऊन 6 वर्षे झाली. फेसबुकवर हजारोची संख्या असलेले त्याच्या चाहत्यांचे गृप आजही त्याची मोहिनी कायम असल्याचे प्रतीत करतात.

२१/०९/२०१७

Less interest of people in Literature and speeches on culture and literature

बौद्धिक भुक भागवा

     खामगांव शहरात दि 15 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या कालावधीत कै.श्रीपाद कृष्ण कोल्हटकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन विदर्भ साहित्य संघ खामगांव यांनी केले होते.हे आयोजन प्रतिवर्षी होत असते.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुद्धा कार्यक्रमाला वृत्तपत्रातून चांगली प्रसिद्धी देण्यात आली होती. जाहीरात, तसेच “व्हॉटस अॅप” वर सुद्धा संदेश पाठविण्यात आले होते. शहरात मात्र कुठे जाहीरात केलेली दिसली नाही. न.प. ने कदाचित “फ़्लेक्स होर्डींग” बंद केलेले असल्याने ते लावले नसतील.असो ! अनेक लोक वृत्तपत्रे हमखास वाचतच असतात.त्यांनी या व्याख्यानमालेची बातमी वाचली असेलच परंतू अत्यल्प श्रोत्यांची पाऊले कोल्हटकर स्मारकाकडे वळली. पहील्या पुष्पात् हरहुन्नरी व्यक्तीमत्व शिवराय कुळकर्णी यांचे विवेकानंद दिग्विजय विषयावर व्याख्यान झाले.दुस-या दिवशी “गीता सर्वांसाठी” या विनयजी पत्राळे यांच्या व्याख्यानास श्रोत्यांची चांगली दाद मिळाली. तर शेवटच्या दिवशी “गजल, विद्रोह आणि जीवन” यातील डॉ. गणेश गायकवाड यांच्या गजल आणि शेरो-शायरीला श्रोत्यांनी “वाह वा !” म्हणत प्रतिसाद दिला. तिन्ही दिवस श्रोत्यांना चांगले बौद्धिक खाद्य मिळाले. व्याख्यानमाला सर्वांगसुंदर  झाली  परंतू  मनाला एक बाब खटकली ती  म्हणजे  श्रोत्यांची  अत्यल्प  उपस्थिती. पहील्या दिवशी तर फारच कमी उपस्थिती होती. अशा चांगल्या कार्यक्रमांना श्रोत्यांची घटणारी संख्या आणि गल्लाभरु नाच गाण्यांच्या कार्यक्रमाला होणारी गर्दी पाहून सुज्ञांना खंत वाटते.प्रश्न हा आहे की, व्याख्यानमालेसारख्या वैचारीक,बौद्धिक कार्यक्रमास श्रोत्यांची इतकी कमी उपस्थिती का असते? आता कुणाला काही चांगले ऐकावेसे वाटत नाही का? तसे म्हणाल तर घरोघरी वाहीन्यांवरील तद्द्न भिकारचोट कार्यक्रम, नाच-गाण्यांचा धांगडधिंगा हे मोठ्या आवडीने पाहीले जाते.त्या कार्यकर्मातील स्पर्धक नाच करीत आहे की “जिम्नॅस्टीक” कला प्रदर्शन करीत आहे हेच समजत नाही. सुज्ञ जन दिवसातील एक तास सुद्धा व्याख्यानमालेसारख्या बौद्धिक कार्यक्रमांना देऊ शकत नाही? मराठी किंवा इतर कोणत्याही साहित्याचा अभ्यास करणारे युवक-युवती त्यांचे प्राध्यापक यांना सुद्धा या व्याख्यानमालेस यावेसे का नाही वाटले? त्यांना साहित्यात अभिरुची आहे म्हणूनच त्यांनी साहित्य विषय निवडला असेल ना ? पत्रकारांनी चांगले लिहण्यासाठी, आपल्या वृत्तपत्राची भाषा चांगली व्हावी,लेखन चांगले व्हावे यासाठी अशा कार्यक्रमात थोडी “श्रवण”भक्ती केली तर त्यांच्या कार्यात त्यांना ते उपयुक्त नाही का होणार? शिक्षक वृंदाना सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावावीशी नाही वाटली.त्यांना तर शिकवीतांना विविध दाखले,उदाहरणे द्यावी लागतात मग ती मिळणार कुठून? त्यासाठी वाचन आणि असे कार्यक्रमच उपयुक्त असतात ना ! प्रख्यात कवी, गीतकार गुलजार यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला आहे. विपुल साहित्य वाचन आणि व्याख्यानमालांतून विविध व्याख्यानांचे श्रवण यांमुळे त्यांची भाषा समृध्द झाली, त्यामुळे चांगले शब्द असलेली गीते ते रचू शकले व म्हणून त्यांची गीते आजही ऐकली जातात.पटकथा लेखक, गीतकार जावेद अख्तर म्हणतात की आज-कालची गीते खराब आहेत कारण नवीन गीतकारांचे साहित्य वाचनच मुळी नाही, मग त्यांना लेखनासाठी काव्यासाठी चांगले शब्द कुठून सुचतील? बरेच लोक म्हणतात की काय करणार भाषा समृध्द करून? आता ग्लोबल लँग्वेज इंग्रजीचा जमाना आहे, म्हणून काय मराठी आपली मातृभाषा सोडून द्यायची? चीनी-जपानी लोक त्यांच्या भाषेबाबत किती जागरुक आहेत. चांगले ऐकल्याने व वाचल्याने आपणास आपल्या इतर दु:ख आणि इतर तणावांचे काही काळ का होईना विस्मरण होते. आपण पुन्हा ताजेतवाने होतो. मान्य आहे आताची जीवनशैली व्यस्त आहे परंतू तरीही नियोजन केल्यास थोडा वेळ तरी अवश्य मिळू शकतो.आता आपल्या विविध गरजा निर्माण झाल्या आहेत.तशीच बौद्धिक भुक ही सुद्धा आपली एक गरजच आहे आणि ती आपण भागवायला नको का?