दे जितनी गाली देनी है...
विरोधकांनी केलेल्या कितीही शिवीगाळीमुळे त्यांचा विकासाचा वारू अडलेला नाही. विरोधकांच्या शिवीगाळीचा त्यांच्यावर काहीही परिणाम झालेला दिसत नाही.
काल देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस झाला. देशभरात नागरिकांनी देशाला एक नवीन वाट दाखवणाऱ्या पंतप्रधानाचा वाढदिवस आपापल्या परीने व मोठ्या उत्साहाने साजरा केला. 2014 मध्ये नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. संसदेच्या पायरीवर डोके ठेवून संसदेला नमन करून मग प्रवेश करणा-या मोदींना पाहून देश अवाक झाला. लोकशाहीला एवढा सन्मान देणारा पंतप्रधान जनता प्रथमच पाहत होती. पुढे मोदींनी त्यांच्या वेगळ्या शैलीची, नेतृत्वाची प्रचिती देशवासीयांना अनेकदा आणून दिली आहे. मग ते सफाई कामगारांचे पाय धुणे असो, संसदेत संविधानाचा सन्मान करणे असो, अंदमानात जाऊन सावरकरांच्या कोठडीत जाऊन ध्यानावस्थेत बसणे असो, साफसफाई करणे असो, खाली पडलेला कागद उचलून खिशात ठेवणे असो अशी कित्येक उदाहरणे आहेत. सर्व उदाहरणे कधी लिहिली तर लेखाच्या ऐवजी उदाहरणांची यादी होऊन जाईल एवढे वेगळेपण मोदींनी आपल्या कारकिर्दीत जनतेला दाखवले. मोदींच्या कार्याच्या धडाक्यामुळे आणि भारत देशाला एक प्रबळ सक्षम लोकशाही देश म्हणून उभे करण्यामुळे जगभरात मोदींची प्रतिमा खुप मोठी झाली. जगभरातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीमध्ये मोदी प्रथम क्रमांकावर आलेले आहे. कित्येक देशात मोदी गेल्यावर तेथील भारतवासीयांनी केलेले उत्स्फूर्त स्वागत समारोह पाहिल्यावर देशातील जनतेला मोठे कौतुक वाटले. आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा विदेशी नागरिक व NRI एवढा सन्मान करत आहे हे जनता प्रथमच पाहत होती. मुस्लिम राष्ट्रात सुद्धा मोदींचा मोठा सन्मान झाल्याचे आपण बघितले. मोदींनी दहशतवाद्यांमध्ये सुद्धा आपल्या भारतीय सैन्याची दहशत बसवली. मोदी सत्तेत येण्यापुर्वी आतंकवादी देशातील विविध शहरात घुसून बॉम्बस्फोट किंवा गोळीबार करत असत परंतु मोदींच्या कारकिर्दीत अशी एकही घटना घडली नाही. पुलवामा हल्ल्यानंतर केलेले सर्जिकल स्ट्राइक, पहेलगाम नंतर राबवलेले ऑपरेशन सिंदूर यामुळे दहशतवाद्यांचे धाबे दणाणलेले आहे. त्यापूर्वीही मोदींनी म्हटलेले "घर मे घुसकर मारेंगे" या वाक्याने तर मोदींची लोकप्रियता खूपच वाढवली.
नुकत्याच झालेल्या भारत पाकिस्तान वरून मोदींवर टीका होत आहे हे साहजिकच आहे कारण फाळणीनंतर देशाचा एक नंबरचा शत्रू म्हणून पाकिस्तान ओळखला जातो, जनता आजही फाळणीचे आणि फाळणी नंतर झालेल्या अत्याचाराचे दुःख आजही विसरलेली नाही, त्याचे शल्य भारताला कायम राहणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर झालेली भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच अनेकांना पटली नाही परंतु टीका करणाऱ्यांनी हेही ध्यानात घ्यावे ही मोदींच्या पूर्वी अतिरेकी हल्लेही होत होते आणि भारत-पाक क्रिकेट सामने सुद्धा होत होते, अतिरेकी हल्ल्यांना प्रतिउत्तर सुद्धा दिले जात नव्हते आणि पाकिस्तान सोबत शांततेच्या हवेतील गप्पा आणि लांगुलचालन हे पण सुरू होते. मोदींच्या कारकिर्दीत मॅच जरी झाली असली तरी पाकिस्तानला जबरदस्त उत्तर पण दिले जात आहे हे जनता पाहतच आहे. भारताने दिलेल्या या प्रत्युत्तरामुळे आधीच कोलमडलेला पाकिस्तान आणखीनच थंडागार झाला आहे. एवढेच काय तर पाकिस्तानच्या मीडियामध्ये सुद्धा नरेंद्र मोदींचे झालेले कौतुक जनतेने पाहिले आहे. नुकतेच नेपाळमध्ये gen z ने केलेल्या आंदोलनाच्या वेळी सुद्धा नेपाळी जनतेने मोदींसारखा पंतप्रधान व्हावा अशी मागणी केलेली जगाने पाहिली.
मोदींना मिळालेल्या लोकप्रियतेमुळे आणि त्यांनी देशाला दाखवलेल्या नवीन वाटेमुळे विरोधकांचा प्रचंड जळफळाट झालेला गतकाळात आपण बघितला आहे. या जळफळाटातून त्यांनी मोदींना वाटेल त्या शिव्या कित्येकदा दिल्या आहेत. मोदींना मौत का सौदागर म्हणणे, त्यांचा बाप काढणे, चहाच्या व्यवसायावरून कमी लेखणे, पत्नी सोबत राहत नाही म्हणून टीका करणे, आणि नुकतेच त्यांच्या आई बाबतचा AI व्हिडिओ काढणे अशी मोदींना शिव्या शाप देण्याची अजूनही कित्येक उदाहरणे घडली आहेत. मोदींनी त्याबाबत कधीही ब्र सुद्धा काढला नाही. नुकतेच आसाम मध्ये त्यांनी विधान केले की मी शिवभक्त आहे सगळे विष पचवून टाकले. त्यामुळे तर विरोधकांचा जास्तच जळफळाट झाला आहे, होतो आहे.
यंदा अनेक व्यक्ती तसेच संघटना यांचे महोत्सवी वर्ष आहे. अहिल्याबाई होळकर 300 वी जयंती वर्ष, उमाजी नाईक यांची 234 वी जयंती, देश साजरे करीत आहे. तसेच ज्या संघाच्या मुशीतून मोदी सारखे नेतृत्व तयार झाले तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या स्थापनेची 100 वर्षे पूर्ण करीत आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षासोबतच मोदींनी सुद्धा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या सर्वांसोबतच भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहासात मैलाचा दगड ठरलेला, लोकप्रियतेचे अनेक उच्चांक मोडणारा, अनेक नेत्यांना सुद्धा आवडणारा शोले या चित्रपटाने सुद्धा पन्नास वर्षे पूर्ण केली आहे.
शोले चित्रपटात गब्बर सिंग जेंव्हा ठाकूरला पकडतो तेंव्हा ठाकूर त्याला अनेक शिव्या देतो. तेव्हा गब्बरच्या तोंडी एक वाक्य आहे, "दे जितनी गाली देता है". या सिनेमात गब्बर सिंग खलनायक होता परंतु मोदी तर देशाचे खरे नायक आहे. विरोधकांनी केलेल्या कितीही शिवीगाळीमुळे त्यांचा विकासाचा वारू अडलेला नाही. विरोधकांच्या शिवीगाळीचा त्यांच्यावर काहीही परिणाम झालेला दिसत नाही. त्यामुळे "दे जितनी गाली देता है, मै हर जहर निगल डालूंगा" असाच संदेश ते विरोधकांना देत आहे.