Click "Follow" Button below To Follow this Blog

१८/०६/२०२६

Article about less rain fall in India.

आँखें फाडे दुनिया देखे आज ये तमाशा...


सर्वत्र जरी अल निनोचे कारण असले तरी आमच्या खामगांवात मात्र पाऊस उशिरा दाखल होण्याबाबतचा एक अजब समज आहे. तो म्हणजे आनंद मेला गावांत आला की पाऊस पडत नाही. अशी अंधश्रद्धा अनेक गावांमध्ये आहे. 

तसे पाहिले तर या गुरुवारी लिहिण्यासाठी म्हणून अनेक विषय होते. कारण शीर्षकात दिल्याप्रमाणे गेल्या काही दिवसांत जनतेने प्रणित मोरे या स्टॅन्डअप  कॉमेडियनचे ; स्टॅन्ड अप कॉमेडियन म्हणण्यापेक्षा अश्लील कॉमेडियनचे, वाढत्या झुरळांचे, दलबदलू राजकारण्यांचे, पुरोगामी म्हणवणाऱ्या साहित्यिक असून जातिवाचक द्वेष भावना पसरविणाऱ्या महिलेचे व शिवाय इतरही अनेक असे तमाशे पाहिले आणि पाहतही आहे. परंतु "कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच" या म्हणीप्रमाणे उपरोक्त विषयांबाबत कितीही लिहा किंवा बोला वरील बाबींसारख्या गोष्टी या समाजात घडतच राहणार. मग अजून हा असा कोणता तमाशा आहे की जो लोक डोळे फाडून पाहत आहे ? तर हा तमाशा आहे पावसाचा. जूनचा पंधरवडा उलटून गेला तरी अजूनही वरूण राजाचे आगमन नाही. "नेमेची येतो मग पावसाळा" ही म्हण सुद्धा आता पावसाळा पाळत नाही, आता पावसाचा काही नेमच राहिला नाही. सर्वांना हवाहवासा वाटणाऱ्या पावसाबाबत अनेकांनी कविता लिहिल्या आहे, लेख लिहिले आहेत तसेच हिंदी सिनेसृष्टीत सुद्धा अनेक पाऊस गीते आहेत. यातील बहुतांश गीते ही प्रेमगीते आहेत. जुन्या जमान्यातील सिनेमात कथानकाच्या गरजेप्रमाणे ही गीते सिनेमात असत. 1980 च्या दशकापासून मात्र हिंदी सिनेमात पाऊस गीते ही घुसाडली जाऊ लागली हीरो,  हीरोईनला विशेषत: हीरोईनला लाल किंवा पांढऱ्या साडी मध्ये भिजवून , अंग प्रदर्शन, चुंबन दृश्ये दाखवून चित्रपट यशस्वी करण्यासाठी व गल्ला कमवण्यासाठी दिग्दर्शक पाऊस गीतांचा वापर  करू लागले. रोमँटिक पाऊस गीते जरी प्रचंड असली तरी दुष्काळाची किंवा पाऊस न पडल्यामुळे असलेल्या  गीतांची संख्या मात्र अत्यंत तुरळक आहे. पाऊस न पडण्याच्या सिच्युएशनवर एक गीत देवानंदच्या गाजलेल्या गाईड या सिनेमात आहे. गाईड असलेला राजूच्या जीवनात अचानक अनेक स्थित्यंतरे येतात आणि आकस्मिकपणे तो साधू बनतो व एका गावातील मंदिरामध्ये राहू लागतो. गावातील लोकांना तो पाऊस पडण्यासाठी उपवास करणाऱ्या एका महान व्यक्तीची गोष्ट सांगतो. नेमका त्या गावात सुद्धा दुष्काळ पडतो आणि लोक आता साधू बनलेल्या पूर्वाश्रमीच्या त्या राजू गाईडला पाऊस पडावा म्हणून उपवास धरण्यास सांगतात. आर. के. नारायण यांच्या कथेवर आधारित हा सिनेमा प्रचंड गाजला होता. राजूचे उपवास सुरू असतांना संगीतकार एस. डी. बर्मन यांच्या आवाजातील हे गीत सुरू होते, 

रामा मेघ दे, पानी दे, छाया दे रे तू शामा मेघ दे |

आँखें फाडे दुनिया देखे आज ये तमाशा

हाय रे विश्वास मेरी हाय मेरी आशा ||

गीत ऐकताना आणि पडद्यावर ते दुष्काळाचे चित्र पाहताना दर्शकाला सुद्धा पाऊस पडावा असे वाटू लागते. 

     यंदा  भारतामध्ये सुद्धा पावसाने दडी मारली आहे. शेतकरीच नव्हे तर पांढरपेशा शहरी वर्ग सुद्धा पावसाची प्रतिक्षा करतो आहे. प्रचंड उन्हाने तापणारा विदर्भ तर पावसाची चातकासारखी  प्रतीक्षा करत असतो. मानवाने कितीही मोठी प्रगती केली चंद्रापर्यंत झेप घेतली तरी मनुष्य हा निसर्गावर निर्भर आहे आणि राहणारच. त्यामुळेच तमाम भारतीयांना सध्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी ऑगस्ट 2027 पर्यंत  धरणातील पाणी व पाणीपुरवठ्याचे नियोजन तयार करण्याचे आदेश दिले आहे. सुपर अल निनोमुळे यंदाचा मान्सून लांबला आहे. नुकत्याच झालेल्या काही युद्धामुळे सुद्धा वातावरणावर  नक्कीच परिणाम झाला असेल. मान्सून सगळीकडेच उशिरा दाखल होत आहे. सर्वत्र जरी अल निनोचे कारण असले तरी आमच्या खामगांवात मात्र पाऊस उशिरा दाखल होण्या बाबतचा एक अजब समज आहे. नेमका याच वर्षी आमच्या खामगांवात तमाशा आला आहे. तमाशा अर्थात आनंद मेला. बऱ्याच इतर राज्यात आनंद मेला ला तमाशा, नुमाईश असे शब्द आहे. तर यंदा खामगांवात सुद्धा आनंद मेला दाखल झाला आहे. आनंद मेला गावांत आला की पाऊस पडत नाही अशी एक अंधश्रद्धा अनेक गावांमध्ये आहे. काही वर्षांपूर्वी तर खामगांवात आनंद मेला लोकांनी परतवून लावला होता. 

     आज अबालबुद्ध सर्वत्र पावसाची प्रतीक्षा करत आहे, परिस्थिती बिकट आहे, पेरण्या केव्हा होतील शेतकऱ्यांची परिस्थिती काय असेल काही कल्पना करवत नाही. उकाड्याने सर्व त्रस्त झाले आहे, प्रदूषण एसी, सिमेंटचे रस्ते, जागोजागी लावल्या जात असलेले गट्टू यामुळे सर्वच शहरात तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेले असते. 

पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण जास्त आहे, मानवी शरीराला सुद्धा पाण्याची जास्त गरज असते, पाणी हे सर्वांना प्रिय असते, हिंदू संस्कृतीमध्ये सुद्धा जलाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे त्याला रत्न म्हटलेले आहे. 21 जून पासून पाऊस सुरू होणार असे वृत्त आज झाले आहे ते वृत्त खरे होवो म्हणजे 

आँखें फाडे दुनिया देखे आज ये तमाशा

असा पाऊस न पडण्याचा तमाशा जनतेला पहावा लागणार नाही. तसेच 

हाय रे विश्वास मेरी हाय मेरी आशा || 

या गीतातील पुढील ओळी प्रमाणे सर्वच जाती धर्माच्या लोकांना ईश्वरावर भरोसा असतो, आशा असते. ईश्वर पावसाची वाट पहाणाऱ्या लोकांचा विश्वास खरा करो व त्यांची उशिराच खरा पण पाऊस येईल ही आशा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

११/०६/२०२६

Article on Tukaram Mundhe and his working style

 तुका झालासे कळस


कोणत्याही सरकारने आपल्या देशातील जनतेला सकस अन्न मिळते आहे की निकृष्ट अन्न मिळते आहे याकडे संपूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. देशाच्या भावी नागरिकांना जर चांगले सकस अन्न मिळाले नाही तर देशाचे आधारस्तंभ कसे काय तयार होतील ?  आज आपण पाहतो भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने अल्पायुष्यात तरुणांचे मृत्यू होत आहे.

अन्न व औषधी प्रशासन या विभागाच्या आयुक्त पदाचा कार्यभार भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी तुकाराम मुंडे यांनी स्वीकारला आणि अन्न व औषधी प्रशासन हा सुद्धा एक विभाग असतो आणि हा विभाग अन्न आणि औषध यातील भेसळ, हॉटेलमधील पदार्थ तसेच हवाबंद पाकिटा मधील पदार्थ यांवर लक्ष ठेवून असतो हे अनेकांना प्रथमच ठाऊक झाले. तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत कर्तव्यनिष्ठ, कठोर शिस्तीचे आणि पारदर्शक कारभारासाठी ओळखले जाणारे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहे. २००५ च्या बॅचचे आय.ए.एस. अधिकारी असलेले मुंढे हे त्यांच्या रोखठोक कार्यपद्धतीमुळे आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या धडक कारवायांसाठी महाराष्ट्रात 'युथ आयकॉन' आणि 'पीपल्स ऑफिसर' म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांची कार्यशैली ही प्रामाणिक आणि शिस्तबद्ध आहे. ते कोणत्याही पदावर गेले तरी तेथील व्यवस्थेत सुधारणा घडवून आणतात. या प्रक्रियेत राजकीय नेते आणि भ्रष्ट घटकांचे हितसंबंध दुखावल्यामुळे "कुछ ही दिनो मे उनकी बदली हो जाती है, लेकीन इतनी बदलियो के बाद भी उनकी कार्यशैली नहीं बदली" त्यांच्या कारकीर्दीत म्हणजे २१ वर्षात  झालेली ही त्यांची पंचवीसावी बदली आहे. आजरोजी पावेतो त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. यांमध्ये  विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी, नवी मुंबई आणि नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त, पीएमपीएमएल (PMPML) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक,  दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव या पदांचा समावेश आहे आणि सद्यस्थितीत वर उल्लेखल्या प्रमाणे ते आयुक्त, अन्न व औषध प्रशासन (FDA) या पदावर नियुक्त आहे.

     अन्न व औषधी प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच  तुकाराम मुंढे यांनी धाडींचे सत्र  सुरू केले. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात अन्न भेसळी बाबत,  अनैसर्गिक रित्या फळे पिकवण्याबाबत बराच ऊहापोह होत आला आहे जनतेला कोणत्या पदार्थात कोणती भेसळ केली जाते,  कोणती फळे पिकवण्यासाठी कोणत्या रसायनांचा वापर होतो हे सर्व ठाऊक आहे परंतु भेसळ करणाऱ्यांवर फक्त दिवाळी व सणासुदीच्या वेळेसच धाडी टाकल्या जातात इतर वेळेस मात्र काहीही कारवाई होत नाही. वास्तविक पाहता अन्न व औषध प्रशासन हा अतिशय महत्त्वपूर्ण असा विभाग आहे. सरकारला जनतेच्या जीविताची, आरोग्याची काळजी असते किंवा त्यांनी ती करणे अपेक्षितच असते, त्यांची ती जबाबदारीच आहे.  कोणत्याही सरकारने आपल्या देशातील जनतेला सकस अन्न मिळते आहे की निकृष्ट अन्न मिळते आहे याकडे संपूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. देशाच्या भावी नागरिकांना जर चांगले, सकस, भेसळ रहित अन्न मिळाले नाही तर देशाचे आधारस्तंभ कसे काय तयार होतील ?  आज आपण पाहतो भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने अल्पायुष्यात तरुणांचे मृत्यू होत आहे,  अनेकदा अन्नातून विषबाधा झाल्याची उदाहरणे ऐकायला येतात, विकतच्या पदार्थांमध्ये झुरळ, पाल, उंदीर आढळून येतात. मागे एकदा एका हॉटेलमध्ये अन्नात पाल दिसून आल्याचे वृत्त देशभर गाजले होते. परवाच ठाण्याला केक मध्ये सुया आढळून आल्या. अशा प्रकारची उदाहरणे हल्ली मोठ्या प्रमाणावर ऐकू येतात. तुकाराम मुंढे अन्न व औषधी प्रशासनाचे आयुक्त होता बरोबरच त्यांनी धडक मोहीम हाती घेऊन अनेक ठिकाणी धाडी घातल्या. पदभार स्वीकारताच "मी जनतेच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही" असे म्हणत काही दिवसातच त्यांनी शेकडो ठिकाणी धाडी टाकून शंभर पेक्षा अधिक जणांना अटक केली. ८६ अस्थापना सील केल्या तर १ कोटी 58 लाख 26 हजाराचा भेसळयुक्त माल जप्त केला. या धाडींमध्ये गुटखा व्यवसायिक, दूध व्यवसायिक, फळ विक्रेते, हॉटेल चालक इत्यादींचा समावेश आहे. तसेच पतंजली ला सुद्धा दणका बसला आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच असे धाडसत्र राबवले गेले असावे. त्यांच्या या धडक कारवाई मुळे गुटखा तस्कर , भेसळ करणारे, रासायनिक द्रव्याद्वारे फळे पिकवणारे यांचे धाबे दणाणले आहे.      

      तुकाराम मुंढे यांनी यापूर्वीही त्यांच्या आधीच्या विभागांमध्ये त्यांची कर्तव्यदक्षता व प्रामाणिकपणा तसेच जनतेसाठीचे कार्य या गोष्टी सिद्ध केल्या आहेत आणि आता अन्न व औषध प्रशासन विभागात त्यांची सुरू असलेली धडाकेबाज मोहीम या सर्व गोष्टींमुळे इतर भारतीय प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांपेक्षा ते वेगळे दिसत आहे शिवाय त्यांनी स्वतःला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. महाराष्ट्रातल्या संतांच्या मांदियाळी बाबत अभंग लिहितांना संत बहिणाबाई यांनी तुकाराम महाराजां बाबत "तुका झालासे कळस" असे वर्णन केले आहे त्याचप्रमाणे इतर भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तुलनेत व त्यांच्या मांदियाळीत जनहितार्थ कार्य, कर्तव्यदक्षता, प्रामाणिकता, याबाबतीत मुंढे यांनी जणू उत्तुंग शिखर सर केले आहे. म्हणूनच त्यांच्या बाबतीत सुद्धा तुका झालासे कळस असे म्हणावेसे वाटते. तुकाराम मुंढे यांची कारवाई स्तुत्य आहे, अभिनंदनीय आहे. तुकाराम मुंढे यांचा सारखा कित्ता जर किमान पन्नास टक्के प्रशासकीय सनदी अधिकाऱ्यांनी गिरवला तरी या भारतात मोठा बदल झालेला आपल्याला दिसेल.

ता. क. - नेपाळ सारख्या छोट्या व आपल्या लगतच्या देशाने सुद्धा रासायनिक प्रक्रियेद्वारे आंबे पिकवले जात असल्यामुळे भारतीय आंब्यांवर बंदी घातली आहे. त्यांनी भारतातून  त्यांच्या देशात होणाऱ्या आंबे आयातीवर रोक लावली आहे. ही आपल्या देशाची नामुष्की नाही का ? 

०४/०६/२०२६

Article about Maharashtra government scheme ladki bahin scheme

 सौ मे से अस्सी बेईमान....

अर्ज करणाऱ्या ८० लाख लाडक्या बहिणी ह्या त्या योजनेसाठी पात्रच नव्हत्या तरीही त्यांनी अर्ज दाखल केले. अर्ज पडताळणी नंतर  या अपात्र धनदांडग्या अर्जदारांच्या  इतक्या धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत की त्या अर्जदारांना अर्ज सादर करतांना काही लाज सुद्धा वाटली नाही का? हा प्रश्न पडतो.  

         खूप वर्षांपूर्वी प्रवासात असतांना एका ट्रकच्या मागे लिहिलेले "सौ मे से अस्सी बेईमान फिर भी मेरा भारत महान" असे एक वाक्य वाचले होते. ते वाक्य मनाला खूप भिडले होते. म्हणूनच ते लक्षात राहिले. आज ते वाक्य आठवले याचे कारण म्हणजे ८० हा आकडा आणि ८० आकडा आठवण्यास निमित्त ठरले ते लाडकी बहीण योजनेचे ८० लाख अर्ज अपात्र झाल्याचे वृत्त वाचण्याचे. निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र राज्यात लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली याचा पुरेपूर फायदा सत्ताधाऱ्यांना झाला. योजना सुरू झाली योजनेवर बहिणींनी आणि काही प्रत्यक्षात भाऊ असलेल्या परंतु लिंग न बदलता बहीण झालेल्या अशा डुप्लिकेट बहिणींनी फुकट पैसे मिळतात म्हणून उड्या मारल्या. फुकटचे काहीही मिळत असले की भारतीयांच्या उड्या पडतातच हे अनेकदा सिद्ध झाले आहे. सरकारकडून काही मिळत असले की ते लाटण्यासाठी ज्या लोकांना त्याची काहीही आवश्यकता नसते अशा सुखवस्तू कुटुंबातील लोक सुद्धा काहीही विचार न करता त्या योजनांसाठी अर्ज दाखल करतात. ज्यांच्या घरी  खायप्यायची काही कमी नाही तेही लोक अशा फुकटछाप शासकीय योजनांवर उड्या मारतात. तसेच लाडकी बहीण योजनेतही झाले. ते होणारच होते याचा अंदाज होताच. योजना सुरू होताच करोडो अर्ज दाखल झाले परंतु जेव्हा सरकारी तिजोरीवर त्याचा बोजा वाढू लागला तेव्हा अर्जाची छाननी सुरू झाली आणि त्यामध्ये ८० लाख अर्ज विविध कारणांमुळे अपात्र ठरवण्यात आले. राज्यास २४ हजार ३०० रुपयांचा फटका बोगस बहिणींनी दिला. ८० लाख अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणी ह्या त्या योजनेसाठी पात्रच नव्हत्या तरीही त्यांनी निर्लज्जपणे येन केन प्रकारेण या योजनेत अर्ज दाखल केले. ही योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी म्हणून सुरुवातीला सेल्फ सर्टिफिकेशनच्या आधारावर अर्ज स्वीकारले होते परंतु पडताळणी नंतर अनेक धक्कादायक अशा बाबी समोर आल्या. यातील काही धनदांडग्या अर्जदारांच्या तर इतक्या धक्कादायक बाबी आहेत की त्या लाडकी बहीण अर्जदारांना अर्ज सादर करतांना काही लाज सुद्धा वाटली नाही का? हा प्रश्न पडतो.  त्यांच्या योजनेचा लाभ मिळावा म्हणून सादर केलेल्या असत्य बाबी ऐकणाऱ्याला आणि वाचणाऱ्यालाच लाजवतात अशा आहे. 

     या अपात्र केलेल्या लाडकी बहीण अर्जदारांमध्ये  १४ हजार अर्ज तर पुरुषांचे आहेत. म्हणजे महिला असल्याचे भासवून त्यांनी या योजनेचा लाभ घेतला आणि सरकारची फसवणूक केली. याहीपेक्षा पुढची उदाहरणे तर तोंडात बोट घालायला लावतील अशी आहे. 

     80 लाख अपात्र अर्जांपैकी दहा लाख अर्जदार प्राप्तिकर भरणारे आहे. आता बोला ! पाच लाख अर्जदार हे सरकारी कर्मचारी कुटुंबातील आहे. म्हणजे कामचुकारी करायची, सरकारी पगारही घ्यायचा, वरकमाई सुद्धा करायची आणि फुकट छाप शासकीय योजनांचाही लाभ घ्यायचा (काही सन्माननीय अपवाद वगळून). अशा पद्धतीने आपल्याच पात्रात तूप ओढून घ्यायचे, देशाचे ओरबाडून ओरबाडून खायचे देशाला मात्र द्यायचे काही नाही. 

     या पाच लाख सरकारी कर्मचारी कुटुंबीयांपैकी काहीं जवळ तर चारचाकी वाहने सुद्धा आहेत. म्हणजे बघा सर्व बाजूंनी देशाला कसे ओरबाडणे सुरू आहे, देशाचा पैसा असा लुटणे सुरू आहे. 

    लोकांना असे खोटे अर्ज सादर का करावेसे वाटतात त्याचीही अनेक कारणे आहेत. सर्वच लोक तर फायदा करून घेत आहेत तर मग मी का नाही करू ? नेते तर गब्बर होत आहे तर मग मी का नाही घेऊ ? पैसा तर सरकारीच आहे अशी मानसिकता नागरिकांची हळूहळू होऊ लागते आणि त्यातून मग अशा प्रकारे खोटे अर्ज सादर होत असतात

     या सरकारी फुकटच्या योजनांचा लाभ जे खरे लाभार्थी असतात त्यांना न होता जे बोगस लाभार्थी आहे तेच जास्त करून घेतात असे कित्येक वेळा समोर आलेले आहे. तरीही आपल्या देशातील नेते सत्ता प्राप्त करून घेण्यासाठी अनेक प्रकारची आमिषे जनतेला देत आले आहे आणि सत्तेचा मार्ग मोकळा करून घेत आले आहे हेच स्वातंत्र्यापासून सुरू आहे. तसे पाहता कोणतेही सरकार हे सर्वसामान्यांसाठी जनहिताच्या योजना राबवत असते परंतु त्या योजनांचा कोणी गैरफायदा घेणार नाही याचासुद्धा विचार सरकारने करायचा असतो. गैरफायदा घेतलाच तर त्याला अटकाव व कठोर कारवाई सुद्धा असायला हवी. फुकटछाप योजना ह्या दूरगामी विचार करता देशाच्या हिताच्या नसतात. परंतु देशाचे हित कोण पाहते? म्हणूनच तर लाडकी बहीण योजनेमध्ये 80 लाख अर्ज अपात्र ठरले आहे. जनता सुद्धा भ्रष्ट मार्ग अवलंबून योजनांचा गैरफायदा करत आहे, अनुदान लाटत आहे. लाडकी बहीण योजना बोगस लाभार्थींच्या अर्जांची आता पुन्हा छाननी, चौकशी होईल. या  कार्यात सरकारी पैसे आणि सरकारी श्रम, वेळ यांचा व्यय होईल म्हणजे योजना लागू करूनही नुकसान मात्र सरकारचेच असे होणार आहे. बोगस लाभार्थीं कडून पैसे वसूल केले जातील असे म्हटले जात आहे. पैसे तर वसूल केलेच पाहिजे कारण ते जनतेचे आहे. शिवाय कायद्यात सुद्धा तरतूद केली पाहिजे. सरकारी कर्मचारी, प्राप्तिकर दाते, चार चाकी वाहन असणारे अशा लोकांनी जर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी बोगस अर्ज दाखल केलेच तर त्यांच्यावर कठोर आणि दंडात्मक कारवाईचा असा एक कायदा निर्माण केला जावा जेणेकरून जनतेच्या पैशाचा अपव्यय होणार नाही, जनतेचे पैसे असे उधळले जाणार नाही, जनतेचा पैसा बोगस लाभार्थी लुटून घेणार नाही. दिवसेंदिवस बोगस लाभार्थी, भ्रष्ट लोक वाढत चालले आहे लाडकी बहीण योजनेचे 80 लाख बोगस लाभार्थी आढळल्याने पुनश्च हेच सुतोवाच करावेसे वाटते की,

सौ मे से अस्सी बेईमान फिर भी मेरा भारत महान

टीप - अनेक प्रमाणिक, देशीहितैशी, श्रमिक असे नागरिक, सरकारी कर्मचारी, नेते आजही थोडे का होईना परंतु आहेत मात्र नक्की. अशा लोकांमुळेच हा देश टिकून आहे. अशा सन्माननीय लोकांनी या लेखातून स्वतःला वगळावे.

✍️ विनय वि. वरणगांवकर©

खामगांव 

 







२८/०५/२०२६

Article about Savarkar

खामगावकरांना प्रेरणादायी ठरेल सावरकर स्मारक 


स्वातंत्र्यवीर सावरकर खामगांवला  येऊन गेले आहे. खामगांवच्या राष्ट्रीय शाळेत ते एकदा आले होते तसेच संत पाचलेगावकर महाराज यांनी जेव्हा हिंदू संघटन यज्ञ केला होता त्यावेळी सुद्धा सावरकर खामगांवला आले होते. खामगांवच्या भडंग परिवाराकडे सुद्धा सावरकर गेले होते. या घटनांची आठवण म्हणून तसेच युवकांना प्रेरणा म्हणून
खामगावला सावरकरांचे एक स्मारक असावे ही मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.

आज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती. सावरकरांबद्दल आज रोजी पावतो अनेक लेख लिहून झाले परंतु वीर सावरकर म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे की, 

सब धरती कागज करू,  लेखणी सब वनराय,  

सात समुद्र की मसी करू, गुरू गुण लिखा न जाय|

या कबीराच्या दोह्याप्रमाणे सावरकरांचे गुण वर्णनास सुद्धा समस्त पृथ्वीचा कागद केला आणि सर्व वृक्षांपासून लेखण्या बनवल्या, सातही समुद्राची शाई जरी बनवली तरी सावरकरांचे गुणवर्णन करणे शक्य होणार नाही इतके विविध पैलू असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकमेव होते. जाज्वल्य राष्ट्रभक्ती, कवी, लेखक, क्रांतिकारक, समाज सुधारक असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे असंख्य पैलू आहे. आज सावरकरांच्या जयंतीनिमित्त खामगावच्या रायगड कॉलनी परिसरातील सावरकर उद्यानाजवळ जाणे झाले. या ठिकाणी सावरकरांना अभिवादन करण्यात आले. या ठिकाणी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. याच ठिकाणी सावरकरांचा भव्य पुतळा व स्मारक व्हावे अशी मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे केली असल्याचे कळले. ही मागणी तिथे बहुसंख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांना रास्तच वाटली कारण तिथे उत्स्फूर्तपणे तशा घोषणा देण्यात आल्या. 

      ज्या मनुष्याने बालपणापासून मारीता मारीता मरेतो झुंजेन असे म्हणून राष्ट्रभक्तीच्या धगधगत्या यज्ञकुंडात उडी घेतली, स्वतःचा परिवार देशोधडीला लावला. काळ्यापाण्याची शिक्षा भोगली समाज सुधारण्याचे इतके  मोठे कार्य केले की, सावरकर स्वतःच म्हणाले होते की,  "एक वेळेस माझी समुद्रात मारलेली उडी लक्षात नाही ठेवली तरी चालेल परंतु माझे समाज सुधारण्याचे कार्य मात्र लक्षात ठेवावे". स्वातंत्र्यवीर सावरकर खामगांवला सुद्धा येऊन गेले आहे. खामगांवच्या राष्ट्रीय शाळेत ते एकदा आले होते तसेच संत पाचलेगावकर महाराज यांनी जेव्हा हिंदू संघटन यज्ञ केला होता त्यावेळी सुद्धा सावरकर खामगांवला आले होते. खामगांवच्या भडंग परिवाराकडे सुद्धा सावरकर गेले होते. सावरकरांच्या या खामगाव नगरीला भेट देण्याच्या आठवणीसाठी म्हणून खामगावला निश्चितच सावरकरांचे एक स्मारक असावे ही जी मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे झाली आहे त्या मागणीला समस्त खामगावकरांनी दुजोरा द्यावा असे वाटते. तसे खामगावला सावरकरांच्या नावाने रायगड कॉलनी परिसरात सावरकर उद्यान निर्मिती झालेलीच आहे  सुंदर असे हे उद्यान आहे. याच उद्यानाच्या जवळ रायगड कॉलनी परिसरात जर सावरकरांचे स्मारक झाले तर ते  सावरकरांच्या आत्म्याला प्रसन्न करणारे ठरेल कारण या परिसराचे नाव रायगड कॉलनी आहे. रायगड अर्थात शिवाजी महाराजांची राजधानी. त्या राजधानीचे नाव या परिसराला दिले आहे.  स्वातंत्र्यवीर सावरकर हे थोर शिवाजी महाराजांचे निस्सिम भक्त होते त्यांनी शिवाजी महाराजांची आरती सुद्धा लिहिली आहे. शिवाजी महाराज आणि त्यांच्या जीवनामध्ये बरेचसे साम्य सुद्धा आहेत. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी रायरेश्वर मंदिरात स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली होती त्याचप्रमाणे सावरकरांनी स्वातंत्र्यलक्ष्मी समोर स्वातंत्र्याची प्रतिज्ञा घेतली होती. शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे आग्र्याहून सुटका करून घेतली होती त्याचप्रमाणे सावरकरांनी जहाजातून उडी मारून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला होता. दोघांनीही  शत्रूला भूलवण्यासाठी पत्रे लिहिली होती असे बरेचसे साम्य दोघांच्या जीवनात आपल्याला आढळते. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती असल्यामुळे अनेकांशी बोलणे झाले. काही खामगांव सोडून गेलेल्या मित्रांशी सोबत मित्रांशी सुद्धा बोलणे झाले त्यात अनेकांनी सावरकरांचे असे स्मारक झाले तर ती खूपच आनंदाची गोष्ट आहे असे म्हटले तसेच काहींनी स्मारका सोबतच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ग्रंथसंपदेचे एक ग्रंथालय सुद्धा असावे असे मत व्यक्त केले तर काहींनी याच ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील विविध रोमहर्षक प्रसंगांच्या चित्रांचे सुद्धा एक दालन असावे असेही मत व्यक्त केले. खामगांव शहरात अनेक सावरकरप्रेमी आहेत या सर्वांचे मत सुद्धा या निमित्ताने घेण्यात यावे. सावरकरांच्या स्मारकाला सनदशीर मार्गाने परवानगी मिळाल्यावर पुतळा बांधकाम हे सुद्धा भव्य व उत्कृष्ट असावे, पुतळ्यावर एक छत्री सुद्धा असावी. सावरकरांचे काम भव्य दिव्य होते त्यांचा पुतळा पाहिल्यावर पाहणाऱ्याचे रोम रोम फुलले पाहिजे, त्याच्या डोळ्यांचे पारणे फिटले पाहिजे, सावरकरांचा जीवनपट त्याच्या डोळ्यासमोर आला पाहिजे या प्रकारचे ते स्मारक असावे.

 विश्व हिंदू परिषदेने केलेल्या सावरकरांच्या स्मारकाच्या मागणीच्या अनुषंगाने खामगांवला व त्यातही रायगड कॉलनी परिसरात सावरकरांचे स्मारक कधी झाले तर ते खामगांवकर व युवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

२१/०५/२०२६

Article about NEET paper leak and old movie Tere Mere Sapne

  नीट परीक्षा घोटाळा आणि  तेरे मेरे सपने 




 नीट परीक्षा घोटाळा, पेपरफुट प्रकरणाने  तेरे मेरे सपने या वैद्यकीय पेशास समर्पित चित्रपटाचे स्मरण झाले. भारतातील गरीब रुग्णांना सहाय्य करणारे या चित्रपटातील डॉ आनंद सारखे अनेक डॉक्टर या देशात तयार व्हावेत , त्यांना शासनाचे,जनतेचे सहकार्य मिळावे,पुरेशा वैद्यकीय सुविधा मिळाव्यात,त्या अभावी कुणी तडफडून मरू नये हेच या देशातील जनतेचे अर्थात तुमचे आमचे तेरे मेरे सपने नाहीत का ?

     नीट परीक्षा 2026 पेपर फूट आणि घोटाळा  प्रकरण सध्या सर्वत्र गाजत आहे. काही नामांकित अशा क्लासेसचे संचालक तसेच मोठ्या नामांकित अशा महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच अनेक मध्यस्थी लोकांवर कारवाई सुरू झाली आहे. यापूर्वीही नीट परीक्षा घोटाळा हा बोगस विद्यार्थी परीक्षेला बसवण्याच्या संदर्भात उघडकीस आला होता परंतु ते प्रकरण दाबले गेले. लाखो रुपये फी घेऊन आणि पेपर मिळवून देणाऱ्या पुन्हा लाखो रुपये घेऊन डॉक्टर बनवून देणाऱ्या गब्बर क्लासेसवाल्यांच्या माध्यमातून डॉक्टर बनणारे विद्यार्थी पेशंटचे काय भले करणार ? पेशंटला काय बरे करणार ? लाखो रुपये खर्च केल्यावर पहिले तर ते लाखो रुपये कसे काय वसूल होतील ? यामागे हे डॉक्टर लोक धावतील किंबहुना धावतही आहे हे कोणीही कोणीही सांगेल (काही सन्माननीय अपवाद अवश्य आहेत.) आजकाल सर्व विद्यार्थी केवळ डॉक्टर आणि इंजिनियर याच क्षेत्राकडे धाव घेत आहे. पालकांनाही कसेही करून मारून - मुटकून आपल्या पाल्याला डॉक्टरच करायचे आहे मग त्याची इच्छा बौद्धिक पातळी असो वा नसो. यासाठी प्रसंगी त्याला विदेशात सुद्धा पाठवले जाते. डॉक्टर बना इंजिनियर बना, जरूर बना परंतु जी शपथ तुम्ही डॉक्टर बनवण्याच्या वेळी घेता ती शपथ ध्यानात ठेवा, चांगल्या मार्गाने आणि सेवेसाठी डॉक्टर बना अशा वाम मार्गाने बनत असाल तर त्यापेक्षा न बनलेले बरे.

नीट परीक्षा पेपर फुटी घोटाळा या विचारात असतांनाच जुन्या एका चित्रपटाची बातमी वाचनात आली. 13 मे रोजी या चित्रपटाच्या प्रदर्शनास 55 वर्षे झाली. हा चित्रपट म्हणजे नवकेतनचा “तेरे मेरे सपने”. हा चित्रपट म्हणजे एका डॉक्टरचीच कहाणी आहे. म्हणून याच विषयावर लिहिण्याचे नक्की केले शिवाय नुकताच जागतिक रुग्ण सेविका दिन सुद्धा झाला म्हणून मग लिहू लागलो. तेरे मेरे सपने माझ्या जन्माच्याही आधी प्रदर्शित झालेला सिनेमा आहे परंतू जुन्या चित्रपटांची, गाण्यांची, सुमधुर संगीताची आवड असल्याने मी लिहिता झालो. खुप वर्षांपूर्वी एका कडक उन्हाळ्यातील दुपारी मी हा चित्रपट दुरदर्शनवर पाहिला होता. यातील कर्णसुखद अशा संगीताने व गीतांनी विदर्भातील रणरणत्या उन्हाळ्यातील त्या दुपारी मला सुखद गारवा मिळाला होता. एस.डी. बर्मन यांनी स्वरबद्ध केलीली एकापेक्षा एक अशी नीरज यांची अवीट मधुर गीते आज 2026 मध्येही तितकीच ताजी आहेत जितकी 1971 मध्ये होती. एका तरुण कन्येस अनुरूप असा जोडीदार मिळाल्यावर, अनुरागामुळे तीच्यात तिलाच जाणवलेला बदल व्यक्त करणारे “जैसे राधाने माला जपी श्यामकी”, नवीन जोडप्याच्या आजीवन सोबत राहण्याची भावना व्यक्त करणारे “हे मैने कसम ली”, नवपरिणीत जोडप्याच्या जीवनवेलीवर जेंव्हा एक फुल उमलणार असते तेंव्हा त्यांच्या मनातील विचार मांडणारे “जीवन की बगीयाँ महकेगी” अशा कवी गोपालदास नीरज या देव आनंदचेच “फाईंड” असलेल्या सुमधुर रचना रसिकांना कर्णतृप्तीचा आनंद देतात. पण सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्वांबरोबर चित्रपटात वैद्यकीय व्यवसाय कशासाठी करावा ? हा संदेश हा चित्रपट देतो. 

 डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रास समर्पित असा हा विजय आनंद या प्रथितयश दिग्दर्शकाचा सिनेमा आहे. डॉक्टर झाल्यावर ग्रामीण भागात जाऊन तेथील गरीब रुग्णांना सेवा देण्याचे आदर्शवादी डॉ आनंद कुमार (देव आनंद) ठरवतो ( असे ध्येय प्रत्यक्ष जीवनात लाखोतून एखादा वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थी ठरवत असावा.) त्याच्या या निर्णयावर समाजाची प्रतिक्रिया , टोमणे हे अगदी मार्मिकपणे दाखवणारा हा सिनेमा आहे. एका कोळशाच्या खाणीलगतच्या गावात हा डॉक्टर सेवा देण्यास जातो. याच गावात डॉ प्रसाद हे 35 वर्षांपूर्वीच आलेले असतात त्यांच्याकडे डॉ. आनंद रुजू होतो. डॉ आ


नंदच्याही 
35 वर्षे आधी या गावात आलेल्या डॉक्टरला परिस्थितीत काही विशेष बदल झालेला आहे असे वाटत नसल्याचे ते व्यक्त करतात. पुढे निशा (मुमताज) ही आनंदच्या जीवनात येते , अनेक रुग्ण, अपु-या वैद्यकीय व्यवस्था हे सर्व चित्र पाहून तो व्यथीत होतो, खेडेगावात रुग्णसेवेसाठी आलेल्या या डॉक्टरला त्याच्या पत्नीच्या अपघातास जबाबदार असलेला आरोपी जेंव्हा लाच देऊन सुटतो त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे  पुन्हा शहराकडे जावे लागते. या कथेत इतरही अनेक वळणे आहेत. पण सेवा म्हणून वैद्यकीय व्यवसायाकडे पाहण्याचा मुख्य संदेश देणारा हा सिनेमा आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनास काल 55 वर्षे पुर्ण झाली. हा चित्रपट ए. जे. क्रॉनीन यांच्या “सिटाडेल” या कथेवर आधारीत आहे. 

55 वर्षापुर्वीच्या अपु-या वैद्यकीय सुविधा , ग्रामीण रुग्णांचे होणारे हाल यावर भाष्य करणारा हा चित्रपट होता. चित्रपटात वैद्यकीय सुविधांची परिस्थिती 35 वर्षांपासून बदलेली नाही असा संवाद आहे. म्हणजे ती 35 व चित्रपट प्रदर्शित होऊन झालेली 55 अशा 90 वर्षांपासून आपण तिथेच आहोत का ? पैशांसाठी रुग्णांची अडवणूक, पिळवणूक करणाऱ्या डॉक्टरांच्या आणि रुग्णालयांच्या कित्येक बातम्या रोज येत असतात .

म्हणूनच तेरे मेरे सपने या वैद्यकीय पेशास समर्पित चित्रपटाचे स्मरण झाले. भारतातील गरीब रुग्णांना सहाय्य करणा-या या चित्रपटातील डॉ आनंद सारखे अनेक डॉक्टर या देशात तयार व्हावेत.  सुमार्गाने व्हावे घोटाळे करून नव्हे,  पेपर फोडून नव्हे. डॉक्टर बनले पाहिजे तर ते सेवेसाठी, आपल्या देशाला वैद्यकीय क्षेत्रात पुढे नेण्यासाठी, ग्रामीण आदिवासी भागात जाऊन तेथील रुग्णांना तपासण्यासाठी. घोटाळे, फुटलेले पेपर देऊन मग पास होऊन  डॉक्टर बनणारे लोक काय कामाचे ? 

या देशात बुद्धिमान, सुमार्गाने पास होणारे  सेवाभावी असे डॉक्टर बनावे त्यांना शासनाचे व जनतेचे सहकार्य मिळावे, पुरेशा वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, त्या अभावी कुणी तडफडून मरू नये हेच या देशातील जनतेचे अर्थात तुमचे आमचे म्हणजेच तेरे मेरे सपने नाहीत का ?

(2021 मध्ये प्रकाशित झालेल्या लेखाची दुसरी आवृत्ती)

✍️ विनय वि. वरणगांवकर©

खामगाव




१३/०५/२०२६

Article series about renowned ayurved doctor Late D. R. Varangaonkar Part 2

आठवणी नानाशास्त्रींच्या 

"हरीमामा" - भाग २

नानाशास्त्री वरणगांवकर खामगांवच्या पंचक्रोशीत एक नावाजलेले वैद्य, परवानाधारक शिकारी, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते.  त्यांच्या व त्यांच्या काही मित्रांच्या तसेच किस्स्यांच्या काही आठवणी या लघु मालिकेतून देण्याचा प्रयत्न.

या मालिकेचा पहिला एक भाग प्रकाशित होऊन एक महिना उलटून गेला. दुसरा भाग तयार होता खरा पण            कार्यबाहुल्ल्यामुळे त्याला finishing touch देणे काही होत नव्हते. शेवटी आज हे कार्य पुर्णत्वास नेण्याचे ठरवूनच टाकले. त्यामुळे आता आज हा लेख प्रकाशित होईलच.

     ही आठवण तशी या मालिकेच्या पहिल्या लेखाच्या आधीची पण जलंबला प्रत्यक्ष गेल्याने प्रथम तेथील आठवणी लिहिल्या गेल्या आणि ते योग्यही झाले. वास्तविक पाहता आजचा हा दुसरा लेख मला नानाशास्त्री, त्यांचे मित्र, त्यांनी भेटी दिलेली छोटी-छोटी गावे यांची आठवण करून देणारा पहिला लेख होता, आज तो या मालिकेच्या दुसऱ्या क्रमांकावर सादर करीत आहे. शिवाय नानाशास्त्रींनी जेव्हा देह ठेवला तेव्हा मी इयत्ता सहावीत होतो त्यामुळे मला स्मरण होतील तेवढ्या त्यांच्या आणि त्यांचे मित्र आदींच्या आठवणी या मालिकेत सादर करण्याचा प्रयत्न मी करीत आहे.

      फेब्रुवारी 26 ची ती संध्याकाळ, निश्चित तारीख काही लक्षात नाही. माझ्या सासूबाईंना भेटण्यासाठी म्हणून सिल्वरसिटी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. आयसीयू मध्ये जाता येईल या अनुषंगाने आयसीयू मधील पेशंटला भेटण्याच्या रुग्णालयाच्या निर्धारित वेळेवर मी गेलो होतो. मोठमोठ्या रुग्णालयाचे कर्मचारी, स्वागत कक्षातील कर्मचारी रुग्णाच्या नातेवाईकांशी अशा पद्धतीने वागतात, बोलतात त्यावरून सौजन्यपूर्वक वागणूक कशी नसते हे कळते. आयसीयू मध्ये गेल्यावर आणि सासूबाईंना भेटल्यानंतर तिथे एक 96 वर्षाचे गृहस्थ सुद्धा दाखल असल्याचे मला दिसले. त्यांच्यासाठी म्हणून त्यांचा साठीच्या घरात असलेला त्यांचा पुत्र सुद्धा होता. दुसऱ्या दिवशी माझ्या मित्राच्या आईला त्याच हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी म्हणून पुन्हा गेलो तर तो साठीतला गृहस्थ त्याच्या भावंडासमवेत आयसीयूच्या बाहेर खुर्चीवर बसलेला दिसला. इस्पितळात गेल्यावर लोकांचे उदास, केविलवाणे, चिंताग्रस्त, भयग्रस्त असे चेहरे पाहून मला सुद्धा बेचैन वाटत असते म्हणून मी कित्येकदा रुग्णालयात दाखल असलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांशी संवाद साधत असतो. त्यामुळे कालच्या त्या आयसीयू मधील वृद्ध गृहस्थाच्या मुलाशी मी सहज तब्येतीची चौकशी केली तेव्हा त्याने ठीक आहे म्हणून म्हटले. त्यानंतर कोण, कुठले म्हणून विचारपूस झाली. त्यांना त्यांचे गाव विचारले असता लांजूड असे ते उत्तरले. लांजूड येथे राहणारे ते धुमाळे बंधू होतें. 

धुमाळे बंधू, लांजूड 

लांजूड हे नाव ऐकताच कळ दाबल्याबरोबर गोळीला बंदुकीतून  सुटण्यास जसा एक क्षणही लागत नाही तसा मी क्षणात गतकाळात गेलो मला माझे आजोबा नानाशास्त्री, त्यांचे मित्र, त्यांनी भेटी दिलेली छोटी-छोटी खेडी, परवानाधारक शिकारी असल्याने त्यांनी केलेल्या शिकारींचे किस्से आठवू लागले. खामगांव-नांदुरा रोडवर खामगांव पासून आठ किमी अंतरावर लांजूड फाटा आहे. लांजूड मला लहानपणापासून ठाऊक होते पण लांजूडचे हे दहा-बारा किमीचे अंतर गाठण्यास मात्र मला चाळीशी पार करावी लागली. दहा-बारा वर्षांपूर्वी जेव्हा लांजूडला गेलो होतो तेंव्हा फाट्यापासून लांजूडपर्यंत जाणारा  सपाट जमिनीचा, दोन्ही बाजूस काळीशार जमीन,  चांगली शेती असलेला असा तो रस्ता आणि लांजूड गांव माझ्या मनात बसले होते. त्यावेळी मी माझ्या कामाने लांजूडला गेलो होतो. हरी मामांच्या घरी सुद्धा गेलो होतो.

      "काय साहेब कोणत्या विचारात पडले ?" त्या माणसाच्या या प्रश्नावरून मी पुन्हा भानावर आलो आणि त्यांना म्हटले हरी मामा कोळी ना ओळखता का ? "हाव" ते गृहस्थ उत्तरले. "तुम्ही कसं काय वळखता त्याइले?" मला उद्देशून त्यांनी प्रश्न केला. "ते शिकारी होते न ?" असा प्रश्न मी त्यांना करताच त्यांनी दोन क्षण मला न्याहाळले आणि म्हणाले "तुम्ही नानाशास्त्रीचे कोन?" त्यांनी एकदम माझ्या आजोबांचे नाव काढल्यामुळे मला आनंद झाला, आश्चर्यही वाटले. दवाखान्यात भरती असलेल्या त्यांच्या 96 वर्षीय  वडिलांच्या तोंडून त्यांनी माझे आजोबा नानाशास्त्री यांचे वर्णन, नाव आणि किस्से ऐकले होते. मग हरी मामा, त्यांचा मुलगा लक्ष्मण काका यांच्या आठवणी निघाल्या. 

        माझ्या डोळ्यासमोर हरी मामा उभे राहिले. काळाशार वर्ण, डोक्याला फेटा, मजबूत बांधा, करारी चेहरा, धोतर त्यावर कुर्ता, पायात जोडा, असे हरी मामा मला स्पष्ट आठवले. त्यांना माझ्या आजीने भाऊ मानले होते म्हणून आम्ही सर्व त्यांना हरी मामा म्हणत असू. ते आमच्याकडे आले की अंगणात खुर्ची असूनही जमिनीवरच बसत. आजोबा पूजादी कार्यात व्यस्त असले की ते त्यांच्या सदऱ्याच्या खिशातून कागदी वेष्टण असलेले बिडीचे पाकीट काढत आणि बीडीचे झुरके मारत बसत. मग आई किंवा काकू त्यांचा चहा ठेवत असे. थरथरत्या हातानी चहा पितांना हरी मामांची भरदार मिशी चहात बुडत असे. त्यांचा हात इतका थरथर कापत असे की आम्हा लहान मुलांना बशी पडते की काय असे वाटत असे. मग ते आम्हाला शिकारीच्या गोष्टी सांगत आम्ही त्यांच्याशी काही बोललो की ते ''होजी"  किंवा "जीहो" असे म्हणून प्रतिसाद देत असत. हरी मामा भालाफेकी मध्ये खूप निष्णात होते. अचूक नेम धरून त्यांनी भाला फेकला की रानडुक्कर पडलेच म्हणून समजा. असे माझे आजोबा सांगत असत. हरी मामांच्या आठवणीमुळे मी काही काळ स्तब्ध होतो.  

हरी मामा AI इमेज 

        "भाऊ आजकाल कोणी कोणाशी बोलत नाही तुम्ही बोलले म्हणून वळख निघाली" या धुमाळे यांच्या वाक्याने मी पुन्हा भानावर आलो. त्यांच्या वडिलांची प्रकृती बरी व्हावी म्हणून त्यांना शुभेच्छा दिल्या. "लांजुड ले ये जा"  ते म्हणाले. धुमाळे यांच्याशी दवाखान्यात चार आपुलकीचे शब्द बोलल्यावर असा परिचय निघाला. नानाशास्त्रींनी सुद्धा अशीच आपुलकीची माणसे जोडली होती. आमचे आजोबा नानाशास्त्री, हरी मामा, लांजूड या आठवणी घेऊन मी रुग्णालयातून बाहेर पडलो. शेजारच्या चहाच्या दुकानातल्या रेडिओवर गीताच्या ओळी वाजत होत्या 

आते है लोग, जाते है लोग 

पानी  पे जैसे रेले 

जाने के बाद आते है याद 

गुजरे हुए वो मेले.....

... पुढील भाग वाचण्यासाठी ब्लॉग वाचत राहा, इतरांना शेअर करा, टिप्पणी देण्यास विसरू नका.

✍️विनय वि. वरणगांवकर©

खामगांव


२६/०४/२०२६

Demanding Adhaar Card everywhere is really essential ?

 आधार कार्डचा अनावश्यक अट्टाहास

वर्ग सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बऱ्याच ठिकाणी ऐन वेळेवर आधार कार्ड घेऊन जाण्यास सांगितले ते खरोखर आवश्यक आहे का ? आधार कार्डच्या बाबतीत फारच दुराग्रह धरला जातो. आता तर असे वाटू लागले आहे की आपल्या हातावर अथवा कपाळावरच आधार कार्ड नंबरचा टॅटू गोंदवून घ्यावा म्हणजे प्रश्नच उरणार नाही. 

आज वर्ग सातवीची महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती परीक्षा आहे. खामगावच्या विविध केंद्रांवर शेकडो विद्यार्थी या परीक्षेला बसले आहे. परीक्षेस आवेदन करतांना विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड वरची माहिती अपलोड केली जाते शिवाय आधार कार्डची झेरॉक्स सुद्धा घेतली जाते. शासनाने निर्धारित केलेले प्रवेश शुल्क भरल्यावर विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र वितरित केले जाते.  हे प्रवेश पत्र परीक्षेच्या केंद्रावर प्रवेश करण्यास आवश्यक तो पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. शिष्यवृत्ती परीक्षेला एखादा विद्यार्थी बसला म्हणजेच तो त्याच्या शाळेचा अधिकृत विद्यार्थी आहे, त्याने त्या शाळेत अधिकृतरित्या प्रवेश घेतला आहे,  त्या शाळेमध्ये प्रवेश घेताना त्याला जी जी कागदपत्रे सांगितली आहे ती त्याने त्या शाळेत सादर केलेली आहे हे स्पष्ट आहे. तरीही ऐन शिष्यवृत्ती परीक्षेच्या दिवशी काही विद्यार्थ्यांना असे सूचित करण्यात आले की परीक्षा केंद्रावर आधार कार्ड घेऊन जावे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या प्रवेशपत्रावर मात्र परीक्षेसाठी आधार कार्ड घेऊन जाणे अनिवार्य आहे अशी कोणत्याही स्वरूपाची सूचना दिलेली नाही. तरीही काही शिक्षकांनी परीक्षा केंद्रावर आधार कार्ड घेऊन जावे असे ऐनवेळी विद्यार्थ्यांना सूचित केले. ही सूचना मिळेपावेतो अनेक पालकांनी त्यांच्या पाल्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचवून सुद्धा दिले होते. ऐनवेळी सूचना प्राप्त झाल्यावर आपल्या पाल्य परीक्षेपासून वंचित न राहावा या काळजीने काही पालक घरी येऊन पुन्हा आधार कार्ड आधार कार्डची  झेरॉक्स घेऊन खामगावच्या रणरणत्या उन्हात, 42 डिग्री च्या तापमानात पुन्हा परीक्षा केंद्रावर गेले तेथे उपस्थित शिक्षकांना आधार कार्ड झेरॉक्स दिली असता,  "दिले तर चालेल" असे त्यांचे विधान होते म्हणजे निश्चित असे काही नाही तुम्ही आधार कार्ड आणले तर चालेल नाही आणले तर नाही तरी चालेल असाच त्यांचा अर्थ होता. म्हणजे एक स्पष्ट अशी सूचना दिली जात नाही आणि त्याने विद्यार्थी व पालकांची harrashment होते. 

    आज-काल जिथे नाही तिथे आधार कार्ड मागितले जाते. काही ठिकाणी स्पष्ट समजत असते की तो व्यक्ती अधिकृत ग्राहक आहे विद्यार्थी आहे. शिवाय तो व्यक्ती अधिकृततेचे  स्पष्ट होणारे सबळ पुरावे सुद्धा त्याच्याजवळ असतात पण तरीही आधार कार्डचा आग्रह धरला जातो. हे योग्य नाही. सर्वच क्षेत्रातल्या संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत विचार करावा आणि आवश्यक तेथेच आणि खरोखर जरुरी असल्यास आधार कार्डची मागणी करावी. या देशात घुसखोर येऊन राहतात, नोकऱ्या मिळवतात त्यांना काही होत नाही आणि अधिकृत नागरिकांना मात्र नाहक त्रास दिला जातो हा किती मोठा विरोधाभास आहे. आधार कार्डच्या बाबतीत तर फारच दुराग्रह धरला जातो. आता तर असे वाटू लागले आहे की आपल्या हातावरच नाहीतर कपाळावर आधार कार्ड नंबर चा टॅटू गोंदवून घ्यावा म्हणजे प्रश्नच उरणार नाही. 

या लेखाद्वारे हेच सांगणे अभिप्रेत आहे की सर्व कागदपत्रांची शहानिशा झालेली असल्यावर विनाकारण आधार कार्डचा अट्टाहास करू नये. आधार कार्ड संबंधित समस्त प्रणाली व अधिकाऱ्यांनी याबाबतीत विचार करावा व तसे निर्देश सर्व खात्यांना देण्यात यावे. 

विनय वि. वरणगांवकर©

खामगांव


०२/०४/२०२६

Article about memories of Hanuman janmotsav and bhandara

आठवणी हनुमान  जन्मोत्सवाच्या


गल्लीतील नागरिकांकडूनच शिधा-आटा गोळा करून भंडारा आयोजित केला जात असे, हनुमान जन्माच्या आदल्या दिवशी आम्ही सर्व मंदिराजवळ एकत्र जमून रोडगे, भाजी आदी तयारी करीत असू. 

 आज हनुमान जन्मोत्सव.  1990 च्या सुमारास आमच्या रहिवासी भागात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असे. गल्लीतील नागरिकांच्या घरी, गल्लीतील नागरिकांकडूनच शिधा-आटा गोळा करून भंडारा आयोजित केला जात असे, हनुमान जन्माच्या आदल्या दिवशी आम्ही सर्व मंदिराजवळ एकत्र जमून रोडगे, भाजी आदी तयारी करीत असू. रोडग्यांसाठी तयार केलेल्या केल्या जाणाऱ्या आहारासाठी गौऱ्या गोळा करून आणण्याची एक गंमत होती. त्यासाठी एक पथक रवाना होत असे. वाचकांपैकी या पथकात जे लोक गेलेले आहेत त्यांना त्या गोष्टीचे स्मरण होऊन नक्कीच हसू आले असेल. दुसऱ्या दिवशी भंडारा झाल्यानंतर भांडी घासण्याचा एक मोठा कंटाळवाणा कार्यक्रम होत असे. जेवण झाल्यानंतर भांडे घासण्याचा मला तरी अतिशय कंटाळा येत असे परंतु तरी सर्वजण मिळून भांडी घासत असत. एक माणूस उभे राहणे तर दूर कसाबसा बसू शकेल असे ते मंदिर होते एकदम साधे. "सबके लिए खुला है मंदिर ये हमारा" या तुकडोजी महाराजांच्या गीताप्रमाणे त्या मंदिराचे होते कुणीही या, केंव्हाही या आणि दर्शन घ्या, आपापल्या परीने बजरंगाची पूजा करा अन् जा. त्या हनुमान मंदिरामध्ये कुणाला कठीण वाटतील असे विशेष काही नियम, बंधन, नियमावली नव्हती परंतु हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी मात्र सर्वजण एकत्र येत असत. रोडगे बनवण्यासाठी प्रमोद पाटील, स्व. मुकुंदा, पंचायत समिती निवासस्थानात राहणारे महादेव भाऊ हे लोक तज्ञ होते. मी त्यांना फक्त गोळे तयार करून देत असे. एक सुनील नामक मुलगा दरवर्षी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आमच्या गल्लीत दिसत असे इतर वेळी मात्र तो कुठेच दिसत नसे. तो कुठे राहायचा , कोणाचा मित्र होता, आमच्या गल्लीत का यायचा हे मला खूप वर्षे कळलेच नव्हते. रात्रभर जागल्यानंतर सुद्धा पुन्हा सकाळी सहा वाजता सर्वजण जन्मोत्सवासाठी हजर असत. पण हळूहळू सर्व मंडळी आपापल्या व्यापात मग्न होतील. सर्वांची लग्न झाली, मुले झाली आपापल्या संसारात सर्व मग्न झाले आणि हनुमान जन्मोत्सवाचा तो साध्यासुध्या पद्धतीचा भंडारा होणे बंद झाले. जन्मोत्सवाच्या दिवशी फक्त बरेच जण हनुमंताची पूजा आदी करीत असे, मंदिर साफसफाई करीत असे. माझे वडील तर मंदिराचा परिसर रोज झाडत होते. भंडारा होणे बंद झाल्यावर  हनुमान मंदिर दुर्लक्षित झाले. आज आमच्या वेटाळात लोकसहभागातून नवीन शिवमंदिर उभारले आहे. प्रदीप मिश्रा यांच्या व्यापक आवाहनानंतर सध्या भोळे शंकर हे टॉपवर आलेले देव आहे. 'एक लोटा जल' या आवाहनाने शंकराच्या मंदिरामध्ये गर्दी वाढली आहे. देव तर सर्व सारखेच आहे. सर्व देव त्यांच्या भक्तांचे भलेच करणार. असो ! आपल्या देशातील लोक भोळे आहेत देवभोळे आहेत कुणी काही आवाहन केले की ते लगेच स्विकारतात परंतु स्वतः भगवंतांनी दिलेला संदेश मात्र विसरतात.  स्वतः भगवंतांनी गीतेत म्हटले आहे

 आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् | 

सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति ||

अर्थात ज्याप्रमाणे आकाशातून पडणारे जल समुद्राला जाऊन मिळते त्याप्रमाणे कोणत्याही देवाला नमस्कार केला तरी तो विष्णूलाच जाऊन मिळतो. 

या अर्थाने तुम्ही कोणत्याही देवाची आराधना केली तरी ती शेवटी विष्णूलाच अर्पण होत असते.

    आमच्या भागात हनुमान जन्मोत्सवाच्या काळात थोडा 'सुकून' होता, प्रत्येकाकडे वेळ असे, ट्युशन क्लासेस यांचे एवढे प्रस्थ नव्हते त्यामुळे सर्व एकत्र येत असत आणि सर्वांनुमते सर्व सहमतीने कार्यक्रम पार पडत असत. अमुक एक गोष्ट अशीच झाली पाहिजे आणि तशीच झाली पाहिजे असे काही बंधन नव्हते. "मनी शुद्ध माझ्या असे भाव भोळा" या ओळीनुसार आपापल्या भावानुसार सर्वजण हनुमंताचे दर्शन घेत असे. 

    आज हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने या बाबी स्मरण झाल्या. तशा त्या प्रत्येकच हनुमान जन्मोत्सवाच्या वेळी स्मरण होत असतात म्हणा ! पण आज त्यावर लिहावेसे वाटले. लोकांकडे बऱ्यापैकी पैसा आल्यावर आपापल्या परीने लोक दानधर्म करतात, काही लोक मंदिर उभारणीच्या बांधकामादी कार्यामध्ये सक्रिय सहभाग देतात. स्वतःचे घर तर सर्वजण बांधतात परंतु ईश्वराचे घर बांधणे, त्यासाठी निधी देणे पुण्यवंताच्याच भाग्यात असते. अशातून सुंदर, भव्य मंदिर निर्माण होते. याच प्रकारे आपल्या वेटाळात सुद्धा उभे राहिले आहे. शोले सिनेमात एक संवाद आहे "समाज और बिरादरी तो इंसान को अकेलेपन से छुडाने के लिए बनाई गई है, उसे अकेला रखने के लिए नही |" त्याचप्रमाणे मंदिरेही आपल्या बांधवांना एकत्र आणण्याचे एक ठिकाण आहे.

   आमच्या वेटाळात झालेले नवीन शिव मंदिर सुद्धा जुन्या हनुमान मंदिरप्रमाणे सर्वांना कायम एकत्रित ठेवेल, जिथे सर्व सहमतीने, सर्व सहभागाने आपापल्या भक्तिभावाने सर्वजण एकत्र येत राहतील, पुन्हा तसे हनुमान जन्मोत्सवाच्या वेळी होणारे साधेसुधे भंडारे आयोजित होतील हिच आशा व  ईश्वरचरणी प्रार्थना.

०१/०४/२०२६

Article series about renowned ayurved doctor Late D. R. Varangaonkar

आठवणी नानाशास्त्रींच्या 

जलंब - भाग १ 

नानाशास्त्री वरणगांवकर खामगांवच्या पंचक्रोशीत एक नावाजलेले वैद्य व परवानाधारक शिकारी, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते.  त्यांच्या काही आठवणी या लघु मालिकेतून देण्याचा प्रयत्न.


नानाशास्त्री वरणगांवकर यांचा वाडा या ठिकाणी होता.

सुवर्ण व्यवसायी वर्मा यांचे जलंब मधील 1922 मध्ये सुरू केलेले दुकान.

नानाशास्त्री वरणगांवकर यांच्या जागेचे सध्याचे मालक
श्री घोपे काका 

काही जुनी, काही नवीन झालेली घरे बघत मार्गक्रमण करत  असतांना, आजोबा, आजी माझ्या वडिलांचे, चुलत्यांचे, आत्याचे, बालपण इथे कसे व्यतीत झाले असेल असे विचार  माझ्या डोक्यात येत होते. "ही होती तुमची जागा" या अनिलभाऊ वानखेडे यांच्या वाक्याने मी भानावर आलो.

"जलंब ग्रामाबद्दल मला बालपणापासून जिव्हाळा, आकर्षण आहे." जलंबला हिंदू संमेलनात प्रमुख वक्ता म्हणून गेलो असता व्याख्यानाच्या सुरुवातीलाच वरील वाक्य आपसूकच माझ्या मुखातून निघाले. त्याचे कारण माझे आजोबा वैद्य दत्तात्रय रामचंद्र वरणगांवकर हे सुमारे 1940-50 च्या दशकात जलंबला वास्तव्यास होते, वैद्य असल्याने जलंब, खामगांव परिसरात ते नानाशास्त्री म्हणून प्रसिद्ध होते. व्याख्यानापुर्वी हनुमान मंदिराच्या जवळच राहणाऱ्या वानखेडे यांच्याकडे आम्हाला चहापाण्यास आमंत्रित केले होते. पु. ल. देशपांडे यांचे एक वाक्य आहे की एखादे जुने गांव, जुनी वास्तू दिसली की एखादा जुना मित्र भेटला की जसा आनंद होतो तसा आनंद वाटत असतो. जलंबला आलो असल्याने माझ्या मनात सुद्धा मला माझे वाडवडील राहत असलेली जुनी वास्तू बघण्याची तीव्र इच्छा जागृत झाली असल्याने मी अनिल भाऊ यांचे जवळ माझे आजोबा इथे राहिलेले आहे, इथे आमचे घर होते, ते मला पाहायचे आहे असे सांगताच त्यांनी त्यांच्या वृद्ध वडीलांना विचारल्यावर त्यांचे वडिलांनी नानाशास्त्री वरणगांवकर कुठे राहत होते आणि आता तिथे कोण राहते ते सांगितले. तरी खात्रीसाठी म्हणून अनिल वानखेडे मला म्हणाले चला आता आमच्या गावाची इत्यंभूत माहिती असलेल्या "सायंटिस्ट"कडे घेऊन जातो. सायंटिस्ट म्हणजे खूप माहिती असलेले असे त्यांचे म्हणणे होते हे कळायला मला वेळ नाही लागला. त्यांच्या काकांकडे ते घेऊन गेले. माझे आजोबा जलंबला राहत होते हे म्हटल्यावर काही वेळातच त्यांना मी आपलासा वाटू लागलो. ते माझ्या सोबत अनवाणीच निघाले, मी त्यांना चप्पल घाला असे म्हटल्यावरही त्यांना मला माझ्या पूर्वजांचा वाडा दाखवण्याची घाई झाली होती, जलंबशी माझे नाते असल्याचे पाहून मी त्यांचा ग्राम बंधू वाटल्याने त्यांच्या अंगी सुद्धा उत्साह संचारलेला दिसला. वानखेडे यांच्या काकांना नानाशास्त्री म्हटल्याबरोबर "नानाशास्त्री काय भारदस्त माणूस होता. मी त्यांना पाहिलेले आहे. मोठ्या मिशा, चहे-यावर तेज, टोपी, गोरापान वर्ण, उंचेपुरे. जलंब गावात असा रुबाबदार माणूस एकच होता. त्यांच्याकडे बंदूक होती, नेमबाज. होते, परवाना धारक शिकारी तर होतेच, शिवाय वैद्य होते" एका दमात काकांनी माझ्या आजोबांचे वर्णन केले. ते तसेच होते. मी नानाशास्त्रींचा नातू आहे असे म्हटल्यावर त्यांना आनंद झाला त्यांनी कौतुक सुद्धा केले, चहापाण्याचा खूप आग्रह केला परंतु वेळ कमी असल्याने फक्त त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही वाड्याच्या दिशेने जाऊ लागलो. काही जुनी तर काही नवीन झालेली घरे बघत मार्गक्रमण करत  असतांना, आजोबा, आजी माझ्या वडिलांचे,  चुलत्यांचे, आत्याचे बालपण इथे कसे व्यतीत झाले असेल असे विचार माझ्या डोक्यात येत होते. माझी आत्या सांगत असे की आजोबा त्यांना खामगांवला खेळ (सिनेमा) पाहण्यासाठी बैलगाडीत घेऊन येत असत आणि अंजुमन शाळेच्या चारमिनार जवळ ते शिदोरी खात असत. हे मला आठवले. "ही होती तुमची जागा" या अनिलभाऊ वानखेडे यांच्या वाक्याने मी भानावर आलो. खुप वर्षांपूर्वी मी माझ्या मित्रासोबत जलंबला गेलो होतो. त्याचे वडील सुद्धा जलंबला राहत असत. ते माझ्या वडिलांचे बालमित्र होते. म्हणून आम्ही दोघे त्यावेळी जलंबला गेले होतो. त्यावेळी ते घर आजोबांच्या वेळी जसे होते तसेच होते पण आता मात्र ज्यांच्या मालकीचे ते घर आहे त्यांनी बरेच बदल केले आहे. मी नानाशास्त्रींचा नातू आहे हे ऐकल्यावर आमच्या घराचे आताचे मालक घोपे काका यांनी आमचे खूप आदराने स्वागत केले. घोपे काकांनी तर मला पुन्हा एकदा आमंत्रित केले आणि नानाशास्त्री यांचा मळा सुद्धा दाखवण्याचे आश्वासन दिले. तो मळा अजूनही तसाच आहे हे सुद्धा त्यांनी सांगितले. माझा जलंब गावाशी अगदी जुजबी संबंध, कधीकाळी आजोबांनी वास्तव्य केलेले पण आजही त्या गावात एवढे  प्रेम, माया, आपुलकी, आदर कसे काय मिळत होते ? तर जे पेराल ते उगवते या उक्ती नुसार माझ्या आजोबांनी येथे लोकांना चांगली वैद्यकीय सेवा दिली होती, आपुलकीने आयुर्वेदिक औषधे दिली होती, वन्यप्राण्यांच्या संकटातून त्यांना वाचवले होते त्यामुळे आजही त्यांचे नांव अनेक ज्येष्ठ जलंब ग्रामवासी जाणून आहे. तीन वेळ संध्या,  नित्यपूजा आणि गणपतीवर नितांत भक्ती असणा-या  माझ्या आजोबांनी काय कमवून ठेवले ते मला कळले. 

     माझे व्याख्यान चांगले झाले, परतीच्या प्रवासात माझ्या मनात जलंब भेटीमुळे आजोबांच्या अनेक स्मृती तरळत होत्या.  त्यात मला आजोबांचे मित्र त्यांनी भेटी दिलेली छोटी छोटी गांवे आठवली त्यातले एक लांजूड गांव आठवले. पण तूर्तास एवढेच लांजूडचा  किस्सा व इतर आठवणी या लेख मालिकेत  लवकरच वाचायला मिळतील.

  रामदास स्वामींनी सांगितले आहे की, पूर्वजांची कीर्ती सांगत बसण्यापेक्षा स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करणे महत्त्वाचे आहे. पण संत वचन माहित असूनही  वडीलांची अर्थात पूर्वजांची किर्ती, स्मरण या व आगामी काही लेखातून वाचकांना काही प्रेरणा मिळेल या हेतूने लिहित आहे.

...ब्लॉग वाचत राहा, इतरांना शेअर करा, टिप्पणी देण्यास विसरू नका.

✍️विनय वि. वरणगांवकर©

खामगांव



२६/०३/२०२६

Article about Ashok Kharat , Nashik

बुवा तिथे मूर्ख बाया 

'शंभर मूर्ख असले तर एका शहाण्याचे पोट भरते' अशी एक म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय खरात प्रकरणात आपल्याला आलेला दिसला. आपल्या देशात अनेक थोर संत, अध्यात्मिक गुरु होऊन गेले आहेत. स्वामी विवेकानंद, संत कबीर, संत ज्ञानेश्वर, रामदास स्वामी, एकनाथ महाराज, संत तुकाराम, नामदेव महाराज. किती नावे घेऊ? मग तरीही अशा भोंदू बाबांच्या नादी लोक का लागतात?

    खरे तर बुवा तिथे बाया हे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे गाजलेले विनोदी नाटक. वास्तविक पाहता केवळ आचार्य अत्रे लिहिले तरी चालले असते पण 'जेन झी' पिढीतील युवकांना गुगल, किंवा 'chat gpt' वर आचार्य अत्रे कोण ? असा  शोध घेण्याचे काम न पडावे म्हणून मी आधीच पुर्ण नांव लिहून टाकले. 'जेन झी' पिढी ही वाचनापासून दूर झालेली पिढी असल्याने या पिढीतील तरुण ब्लॉग वा वृत्तपत्रातील लेख वाचत असावेत की नाही ही सुद्धा एक शंकाच आहे. "लेकीन अपना तो काम है लिखना" असा विचार करून लिहायला सुरुवात केली. अत्रेंनी जरी बुवा तिथे बाया असे म्हटले असले तरी मी त्यात अत्रेंचा सन्मान राखून बुवा तिथे मूर्ख बाया असा बदल केला आहे. 

    बुवा तिथे बाया हे नाटक आठवण्याचे निमित्त ठरले ते नाशिकच्या अशोक खरात या भोंदू बाबाचे प्रकरण उघडकीस आल्यावर. खरातला अटक केल्यावर या नाटकाचे प्रकर्षाने स्मरण झाले. हे नाटक मी काही पाहिलेले नाही. परंतू सुविख्यात लेखक, नाटककार असलेल्या अत्रे यांनी लिहिलेले असल्याने ते माहित होते. इतक्या वर्षांपुर्वी अत्रेंनी हा विषय मांडला हे तेंव्हा धाडसाचे काम होते. कारण त्या काळी अंधश्रद्धा ही आजच्या पेक्षा जास्तच होती. पण अत्रे इंग्लंड मधून शिकून आले होते, विद्वान होते, वक्ता दशसहस्त्रेशू होते. त्यांचा बुवाबाजीवर मुळीच विश्वास नव्हता म्हणून त्यांनी लोकांच्या देवभोळेपणाचा काही लोक कसा फायदा घेतात हे या नाटकात मांडले आहे. असाच फायदा  चतुर, लबाड खरातने घेतला. आता खरात चतुर म्हणा किंवा लोक, बायका हे भोळे किंवा अंधश्रद्धाळू म्हणा. खरातचे अनेक किस्से अनेक चित्रफिती मग समोर यायला लागल्या. त्याचे ते कवडीमोल असलेले चिंचोके लोकांना लाखात विकणे, नाग बोलावणे, बायकांना अपत्य होण्यासाठी मंतरलेले त्याचे मुत्र मिश्रीत पाणी देणे, पुरुषांना आणखी कोणतेतरी पाणी देणे असे त्याचे एक ना अनेक किस्से अजूनही पुढे येतच आहे. खरातने बायकांचे शोषण केले असे म्हटले जात आहे पण काही चित्रफितीत महिलांचा त्याला काही विरोध होताना दिसत नाही. 

    या महिला अशा बाबा लोकांच्या आहारी कशाच काय जातात ?  या बुवांमध्ये बायकांना असे काय दिसते ? त्या त्यांच्याकडे इतक्या आकृष्ट का होतात ? ते म्हणतील तसे या बायका कशा काय करतात ? हा खरे तर संशोधनाचा विषयच आहे. सगळ्याच बायका बुवांच्या आहारी जातात असे मी म्हणत नाही किंवा अत्रेंनाही तसे अभिप्रेत नसेल पण बुवांच्या मागे बायका जास्त जातांना दिसतात हे कोणी नाकारू शकत नाही. ब-याच वर्षांपूर्वी मी वाचलेल्या एका लेखात याच प्रकारचा उहापोह केला होता. तेंव्हा त्या लेखकाने ज्या बायका एकाकी झालेल्या असतात. विवाह उपरांत काही कालावाधी नंतर पती कडून दुर्लक्षिल्या गेल्या असतात त्या बायका अशा भोंदू बाबांकडे आकर्षिल्या जातात आणि मग फसवल्या जातात त्यानंतर पश्चातापाने दग्ध होऊन अश्रू ढाळतात. असे मत त्या लेखकाने मांडले होते.

    नैराश्यग्रस्त लोक सुद्धा अशा भोंदू बाबांच्या नादी लागतात. आपल्याला काही तरी मानसिक बळ मिळेल, बाबा आपली सगळी संकटे दूर करतील असे त्यांना वाटत असते. परंतू एकदा का अशा बाबाचे बिंग फुटले की मग ते भानावर येतात. आपल्या देशात अशा अनेक भोंदू बाबा, महाराज यांच्यावर कारवाया होऊन, काहींना तर अटक झालेली पाहुनही आपले भारतीय लोक , इतकेच काय तर राजकारणी, मंत्री, एवढेच काय तर महिलांसाठी कार्य करणा-या महिला आयोगाच्या अध्यक्षा असे लोक या भोंदू लोकांच्या आहारी जातात हे पाहून खंत वाटते. 'शंभर मूर्ख असले तर एका शहाण्याचे पोट भरते' अशी एक म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय खरात प्रकरणात आपल्याला आलेला दिसला.

     आपल्या देशात महाराज, भोंदू बाबा व राजकीय लोकांचे संबंध असल्याची खरातसारखी अनेक उदाहरणे यापुर्वीही घडली आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचेवेळी धीरेंद्र ब्रह्मचारी या तांत्रिकाची मोठी वट होती, चाळीसगाव परिसरात जिल्हा परिषदेत भ्रष्टाचार करणारा धर्मभास्कर वाघ याचेही प्रकरण खुप गाजले होते. राजकारणात त्यानेही दबदबा निर्माण केला होता. राम रहीम, आसाराम बापू ही उदाहरणे तर ताजीच आहे. बरेच वेळा हे भोंदू बाबा अंधश्रद्धाळू राजकीय लोकांना हेरून मग त्यांनाच हाताशी धरून आपले बस्तान बसवत असतात. 

   अत्रेंनी जरी बुवा तिथे बाया असे म्हटले असले तरी आज भारतीय नारी सुज्ञ, सुशिक्षित झालेली आहे. अनेक चांगल्या महिला चांगले कार्य करीत आहे त्यांना खऱ्या-खोट्याची चांगली जाण आलेली आहे त्यामुळे अशा बुवा लोकांच्या नादी काही मूर्ख महिला लागतात म्हणून बुवा तिथे बाया म्हणण्याऐवजी बुवा तिथे मूर्ख बाया असा म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल.

     आपल्या देशात अनेक थोर संत, अध्यात्मिक गुरु लोक होऊन गेले आहेत. स्वामी विवेकानंद, संत कबीर, संत ज्ञानेश्वर, रामदास स्वामी, एकनाथ महाराज, संत तुकाराम, नामदेव महाराज किती नावे घेऊ? एवढे सारे संत आजही आपल्या सोबत ग्रंथरूपाने अस्तित्वात आहे. 

माझी काया आणि वाणी।गेली म्हणाल अंतः करणी।

परी मी आहे जगजीवनी।निरंतर। 

आत्माराम दासबोध।माझे स्वरूप स्वतःसिद्ध। 

असता न करावा हो खेद।भक्तजनी ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

असे रामदास स्वामींनी तर म्हटले आहे. मग आपल्याला वैफल्यग्रस्त , नैराश्यग्रस्त असे वाटत असल्यास आपण या अशा थोर संतांच्या वचनांचा त्यांच्या ग्रंथांचा आधार का घेऊ नये ? त्यांच्या ग्रंथांचा आधार घेतल्यास, त्यांना शरण गेल्यास आपल्याला या खरात सारख्या भोंदू बाबांचे खरे रूप समजण्यास जराही वेळ लागणार नाही.   


०५/०३/२०२६

Article about iran , some memories and agitation in India

 इराण, इराणी आणि इराणी चहा .

इराण मधून पारशी लोक आले ते इथलेच झाले, इथल्या संस्कृतीत मिसळून गेले, इथल्या मोठा विकासास हातभार लावला त्याप्रमाणे या देशात झालेल्या इतरांनीही त्याचे अनुकरण करायला नको का ?

इराणवर अमेरिका आणि इजरायलने हल्ले केल्यानंतर इराण बाबत त्वरीत उहापोह सुरु झाला. आजकाल मिडीया सोशल मिडीयावर इतकी भाऊगर्दी झाली आहे की विचारता सोय नाही. सर्वच विषयांवर एका पाठोपाठ एक असे लिखाण, मथळे येतं राहतात. इराणवरील आक्रमणाबाबत सुद्धा तसेच झाले. इराण, पर्शिया, तेलसाठे वेगवेगळ्या प्रकारचे मिसाईल, युद्धात सामील देशांकडे असलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, इराणनी लपवून ठेवलेली युद्ध सामग्री सगळे-सगळे मिडीया व सोशल मिडीयावर धडाधड येऊन धडकले. म्हटले आता या अशा इराणी भाऊगर्दीत आपण काय लिहावे ? आणि बस इराणी शब्द डोक्यात आला आणि देवा शपथ खरे सांगतो खोटे सांगणार नाही या उक्ती प्रमाणे सर्वात पहिले आठवली ती अरुणा इराणी आता तुम्ही म्हणालं अरुणा इराणी मध्ये असे काय आठवण्यासारखे ? तर अगदी बरोबर आहे, पण बऱ्याच सिनेमात ती दिसली आणि इराण विषयावरून आठवली. तशी ती काही एकदमच वाईटही होती असेही नाही. सहनायिकेच्या भूमिका चांगली करायची बिचारी. आता मनुष्याला कोणत्या वेळी नेमकी कोणती गोष्ट आठवेल याच्यावर काही नियंत्रण नसते त्यामुळे इराण विषयाने इराण, इराणी असे शब्द आठवल्यावर पहिले अरुणा इराणी, 

मग त्यानंतर आठवला तो बोमन इराणी. बोमन इराणीचा चित्रपटात प्रवेश तसा त्याच्या वयाच्या उशिरानेच झाला परंतु त्याने अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवला. त्याही पूर्वी हिंदी सिनेमांमध्ये हनी इराणी आणि डेझी इराणी अशा दोन बालकलाकार होत्या. हनी आणि डेझी या दोघी एकच होत्या की वेगवेगळ्या ? हा आणखी अधिकचा शोध लावण्याच्या भानगडीत मी काही पडलो नाही परंतु कुठेतरी हनी इराणी ही सुप्रसिद्ध चित्रपट कथा लेखक जावेद अख्तर यांची पत्नी असल्याचे वाचले होते तसेच तिने काही चित्रपटांच्या कथा सुद्धा लिहिल्या होत्या हेही आठवले. आणि हो एवढेच काय तर मानेक इराणी सुद्धा आठवला. 

याचे नांव मानेक होते की माणिक हे सुद्धा हाडाचे सिने अभ्यासकच सांगू शकतील. पण इराणी म्हटल्यावर मानेक हेच त्याचे नांव असावे कारण माणिक हा मराठी शब्द. तर हा मानेक इराणी म्हणजे कोण ? हा अनेकांना प्रश्न पडला असेल पण बऱ्याच वाचकांना बिल्ला म्हटल्यावर नक्कीच तो नक्कीच आठवेल याची मला खात्री वाटते. गाजलेल्या हिरो सिनेमात व्हिलनचा असिस्टंट दाखवलेला बिल्ला याचे खरे नाव मानेक इराणी होते पण हिरो सिनेमामुळे सर्व लोक त्याला बिल्ला म्हणूनच ओळखू लागले. तर असे हे इराण वरून पडलेल्या इराणी नावा संबंधीचे पुराण.

     दुसरी आठवलेली गोष्ट म्हणजे भारतीयांचे आवडते पेय अर्थात चहाची. इराणी आणि चहा या योगाची. आपला भारत देश म्हणजे इतर अनेक देशातील नागरिकांचा आश्रयदाता. इतका आश्रयदाता की पिढ्यांपिढ्या पासून येथे राहत असलेल्या मूळ भारतीय नागरिकांना आता त्याचा त्रास व्हायला लागला. तसेच पूर्वाश्रमीच्या पर्शिया मधून म्हणजेच आताच्या इराण मधून इराणचे मूळ रहिवासी असलेले जे पारशी लोक होते त्यांना मुस्लिमांनी निष्कासित केल्यावर या लोकांनी आवो जावो घर तुम्हारा असे असलेल्या आपल्या भारतात आश्रय घेतला. पण हे पारशी लोक इतर घुसखोरांसारखे नव्हते हे इथे राहिले आणि यांनी या देशाच्या विकासात सुद्धा हातभार लावला. भारतात त्यांना इराणी म्हणून ओळखले जाऊ लागले. या इराणी लोकांनी मग भारतातील काही शहरांमध्ये निरनिराळे  व्यवसाय सुरू केले त्यातच एक व्यवसाय होता चहाचा, इराणी चहा. विशेषतः मुंबईत स्थायिक झालेल्या इराण्यांनी त्यांच्याकडच्या  पद्धतीचा चहा त्यांच्या हॉटेल मधून ग्राहकांना देणे सुरू केले. हा इराणी चहा खूप लोकप्रिय झाला. आजही काही इराणी चहाची दुकाने मोठ्या शहरांमध्ये टिकून आहेत. हा चहा लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे. चहाची पत्ती "दम' अर्थात मंद आचेवर पाण्यामध्ये बराच वेळ उकळून नंतर त्यात आटवलेले दूध, साखर मिसळायचे आणि मग तो चहा प्यायचा. या पद्धतीचा चहा लोकांना आवडला. या चहा सोबत इराणी चहावाले बन मस्का सुद्धा देत असत. यांची चहाची दुकाने सुद्धा त्यांची संस्कृती दाखवत असत.

   इराण वरील हल्ल्यामुळे तत्संबंधीत अनेक बाबी आठवल्या असल्या तरी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अयातुल्ला खामनेई या इराणच्या अध्यक्षाला अमेरिका व इजरायलने ठार केल्यावर आणि विशेष म्हणजे काही मुस्लिम देश अमेरिकेच्या बाजूने असल्यावरही खामनेई प्रति उफाळून आलेले भारतातील  मुस्लिमांचे प्रेम. हजारो किलोमीटर दूर असलेला माणूस आपल्या भारतातील लोकांचा रहबर कसा असू शकतो ? इथले अनुदान, इथल्या सुविधा, इथल्या योजना यांचा लाभ घ्यायचा आणि रहबर मात्र अन्य कुणी ! आमचा बाप मेला असे ते कसे म्हणू शकतात ? त्याच्याविषयी प्रेम दाखवणाऱ्या त्या छाती पिटून विलाप करणा-या महिलांना त्या देशात पाठवले तर त्यांच्या लक्षात येईल की तिथे महिलांची काय स्थिती आहे. आपल्या देशाप्रमाणे तेथील महिलांना मोकळीक किंवा हक्क आहेत का ?

     या इराण पुराणा वरून शेवटी हेच म्हणावेसे वाटते की ज्याप्रमाणे अनेक वर्षांपूर्वी येथे इराण मधून पारशी लोक आले ते इथलेच झाले, इथल्या संस्कृतीत मिसळून गेले, इथल्या मोठा विकासास हातभार लावला त्याप्रमाणे या देशात आलेल्या इतरांनीही त्याचे अनुकरण करायला नको का ? त्यांच्यापासून काही बोध घ्यायला नको का ?

विनय वि. वरणगांवकर©

खामगांव

9403256736

१२/०२/२०२६

Tribute to Durdarshan News Anchor Sarala Maheshvari

 उन्होने कहा....

तसे पाहिले तर आपल्या घरी कितीतरी अंतरावरून दिसणारे हे सेलिब्रेटी, हे वृत्त निवेदक आपले कुणीही नसतात. पण त्यातील काही लोक त्यांच्या वेगळ्या, अनोख्या अशा शैलीने आपल्या कायम स्मरणात राहतात. सरला माहेश्वरी यांची सुद्धा अशी काही वैशिष्ट्ये होती.

गेल्या बारा वर्षापासून दर गुरुवारी लेख लिहिण्याचा माझा शिरस्ता आहे. या शिरस्त्यानुसार प्रत्येक गुरुवारी निदान एक लेख लिहिला जातो. तो लिहिण्यासाठी सुद्धा एक दोन दिवस आधीपासून तयारी करावी लागते. क्वचित प्रसंगी एकदम वेळेवर सुद्धा लिखाण होते. परंतु आजचा हा  गुरुवार असा उजाडला की आजच्या दिवशी प्रथमच दुसरा लेख सुद्धा लिहिला. हा लेख लिहायला भाग पडण्याचे कारण सुद्धा तसेच होते. किमान माझ्या दृष्टीने तरी. आजच्या गुरुवारी हा दुसरा लेख लिहिण्याचे कारण असे की, फेसबुक वर दूरदर्शनवरील जुन्या हिंदी वृत्त निवेदिका सरला माहेश्वरी यांच्या निधनाची फोटोसह असलेली बातमी वाचनात आली. धक्का बसला. सरला माहेश्वरी यांच्या ज्या काही असतील त्या आठवणी ताज्या झाल्या. किशोर वयात असताना  टीव्हीवरील अर्थातच  दूरदर्शनवरील एक वृत्त निवेदिका हाच काय तो त्यांच्याशी असलेला संबंध. त्या काळात दूरदर्शन ही एकमेव वाहिनी असल्यामुळे जो कार्यक्रम दूरदर्शन दाखवत असे तो पाहणे क्रमप्राप्त असे. मग त्यात बातम्या सुद्धा आल्या आणि त्यामुळे बातम्याही पाहिल्या जात असाव्यात. आम्ही शाळेत असताना माझ्या काकांनी टीव्ही विकत घेतला होता. हे मोठा अँन्टेना घरावर लावला होता. आम्ही सर्व एकत्र बसून टीव्ही बघत असू. बातम्या सुद्धा. दुरदर्शनवर इंग्रजी आणि हिंदी बातम्या देणारे अनेक वृत्त निवेदक होते. रोडका सुमित टंडन,  मिनू,  शुभेंदू अमिताभ, गीतांजली अय्यर,  अविनाश कौर सरीन, मक्ख चेहऱ्याने बातम्या सांगणारी सलमा सुलतान अशी काही नावे आठवतात. यातच सर्वांना आवडणारी आणि या सर्वांमध्ये सौंदर्यात  सरस असणारी, सौंदर्यातच नव्हे तर बातम्या सादर करण्यात सुद्धा सरस असणारी सरला माहेश्वरी. साधी राहणी, सोज्वळ चेह-याची, नेहमी साडी परिधान केलेली, बहुधा तेंव्हा निवेदिकेस साडी अनिवार्यच असावी अशी ही सरला माहेश्वरी बातम्या देण्यास आली की दर्शक खुश होत असत. सरला माहेश्वरी यांची बातम्या सांगण्याची एक विशिष्ट अशी लकब होती. अस्खलित हिंदीत त्या बातम्या देत असत. सरला माहेश्वरी यांच्या निधनाचे वृत्त वाचून धक्का बसला. तशी त्यांच्या बाबत विशेष अशी काही माहिती नव्हती. परंतू निधनाच्या बातमीच्या खात्रीसाठी म्हणून  काही बातम्या आणखी पाहिल्यावर पत्रकार असलेल्या सरला माहेश्वरी ह्या 1990 ते 2005 या कालावधीत त्या राज्यसभा सदस्य होत्या , कम्युनिस्ट होत्या असे समजले. त्यांचा जन्म बिकानेर येथे 1954 मध्ये झाला होता. 

        तसे पाहिले तर आपल्या घरी कितीतरी अंतरावरून दिसणारे हे सेलिब्रेटी, हे वृत्त निवेदक आपले कुणीही नसतात. पण त्यातील काही लोक त्यांच्या वेगळ्या, अनोख्या अशा शैलीने आपल्या कायम स्मरणात राहतात. सरला माहेश्वरी यांची सुद्धा अशी काही वैशिष्ट्ये होती. शब्दांचे स्पष्ट उच्चारण, योग्य ठिकाणी विराम घेणे , अस्खलित हिंदी बोलणे अशी सरला माहेश्वरी यांची वैशिष्ट्ये होती. त्यातही त्यांचे माझ्या स्मरणात राहिलेले आणखी एक वैशिष्ट्ये आहे मात्र हे  वैशिष्ट्य हेरले होते माझ्या वडीलांनी. माझे वडील काका दोघानांही सरला माहेश्वरी यांची बातम्या सांगण्याची शैली आवडत असे. कुणी नेते काही म्हणाले अशा आशयाची बातमी असेल तर तेंव्हा त्या "उन्होने कहा" खूपच विशिष्ट प्रकारे म्हणत असत. माझ्या वडीलांनी आम्हा सर्वांच्या हे लक्षात आणून दिले होते आणि आम्हाला सुद्धा त्यांची ती  "उन्होने कहा" म्हणण्याची पद्धत भावली होती. त्यांची ती विशिष्ट प्रकारे "उन्होने कहा" असे म्हणण्याची शैली त्याकाळी गाजली सुद्धा होती. तेंव्हाच्या बातम्या सांगण्याची पद्धत खूपच साधी आणि संयमित , स्पष्ट , गंभीर अशी होती. आज मात्र बातम्यांच्या विविध वाहिन्यांवर निव्वळ गोंधळ , आक्रस्ताळेपणा चाललेला असतो. 

      सरला माहेश्वरी यांच्या निधनावर अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. दूरदर्शन ने सुद्धा त्यांना एक्स  या समाज माध्यमाव्दारे श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

        विविध व्यक्तींच्या किती नाना प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, त-हा  असतात साहेबाच्या भाषेत स्टाईल असते. आणि त्या व्यक्तीच्या त्या विशिष्ट शैलीमुळे, स्टाईलमुळे ते व्यक्ती कायम स्मरणात राहतात. सरला माहेश्वरी यांची साधी राहणी , स्पष्ट उच्चारण , हिंदीवर प्रभुत्व अशी शैली होती आणि आणखी म्हणजे लक्षात राहिलेली  अशी त्यांची "उन्होने कहा" म्हणण्याची पद्धत. म्हणूनच त्यांचे ते गाजलेले  "उन्होने कहा" असे म्हणणे हेच शीर्षक या लेखास द्यावेसे वाटले. 

 आते है लोग , जाते है लोग 

पानी के जैसे रेले , जाने के बाद , 

आते है याद ,गुजरे हुये वो मेले 

सरला माहेश्वरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली 

Article on the occasion of Valentine Day 2026

प्यार को प्यार ही रहने दो....

  व्हॅलेंटाईन डे  बाबत अनभिज्ञता होती. शिवाय 1960 च्या दशकातील "जो दिलमें है ओठोपे लाना भी मुश्कील" ते 90 च्या दशकातील "छुपाना भी नाही आता जताना भी नही आता" अशी हिंदी गीते सुद्धा प्रेमाची एक उदात्त अशी भावना तरुणांना शिकवत होते. आताच्या पिढीचे प्रेम म्हणजे आज प्रेम आणि उद्या ब्रेक अप असे प्रेम पुर्वी नव्हते.

हमने देखी है उन आंखो की महकती खुशबू

हात से छू के इन्हे रिश्तोका इल्जाम ना दो |

व्हॅलेंटाईन डे समीप आला, प्रेमाची कबुली करण्याचा, प्रेम व्यक्त करण्यासाठी असलेल्या तरुणाईच्या या दिवसाने पश्चिमी देशातून आपल्या देशात हळूच शिरकाव केला. शिरकाव होऊनही बरीच वर्षे झाली. आम्ही हायस्कूल मध्ये असतांना व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर एक छोटीसी जाहिरात येत असे. त्यात व्हॅलेंटाईन डे बाबत काहीबाही लिहिलेले असे, असे मला पुसटसे स्मरते. मग दुस-या दिवशी शाळेत काय असते बे हे व्हॅलेंटाईन डे ? असा प्रश्न कुणी विचारत असे. त्यावर "अबे शहरात असते ते काही तरी कॉलेजातल्या पोरा पोरींचा प्रेमाचा दिवस असते बुवा"  असे म्हणत दुसरा आपले ज्ञान पाजळत असे.  त्या काळात अनेकांच्या घरी वृत्तपत्रे येत आणि मुले सुद्धा पेपर वाचत असत. आता मात्र लहान वयातच मुलांना बरेच वाजवी व अवाजवी ज्ञान प्राप्त झालेले असते. व्हॅलेंटाईन डे हा दिवस म्हणजे नक्की असतो तरी काय? हे समजण्यासाठी आम्हाला पार हायस्कुलपासून तर पदव्युत्तर शिक्षणापर्यंत यावे लागले होते. आमच्या या अज्ञानामुळे आमचे नुकसान झाले की फायदा हे निश्चित सांगता येणार नाही. पण आताच्या पिढी प्रमाणे मात्र तेंव्हा आणि आमच्याही आधीच्या पिढ्यांना प्रेम व्यक्त करणे काही जमत नव्हते आणि या दिवसाबाबत अनभिज्ञता पण होती. शिवाय 1960 च्या दशकातील "जो दिलमें है ओठोपे लाना भी मुश्कील" ते 90 च्या दशकातील "छुपाना भी नाही आता जताना भी नही आता" अशी हिंदी गीते सुद्धा प्रेमाची एक उदात्त अशी भावना तरुणांना शिकवत होते. प्रेम व्यक्तच नाही झाले किंवा व्यक्त करता नाही आले तर "वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन उसे एक खुबसुरत मोड देकर छोडना अच्छा" अशीही शिकवण देणारी गीते होतीच. आताच्या पिढीचे प्रेम म्हणजे आज प्रेम आणि उद्या ब्रेक अप असे प्रेम पुर्वी नव्हते. प्रेमाचा अव्हेर केला म्हणून कुणाला जीवेच मारून टाकणे असेही नव्हते किंवा पतीला मारून मग त्याचा मृतदेह ड्रम मध्ये टाकून त्यात सिमेंट भरून टाकणे असेही नव्हते. जगाला प्रेमाची शिकवण देणा-या भारतात आता मात्र प्रेम, प्रेमाची व्याख्या सर्वच बदलून गेले आहे. "ढाई आखर प्रेम का पढे सो पंडीत होय" असे सांगणा-या संत कबीरांपासून अनेक संत मंडळी ते कवी गीतकारांनी  त्यांच्या त्यांच्या शब्द सामर्थ्याने आपल्याला  प्रेम काय असते याची शिकवण दिली आहे.

      परवा येणा-या  व्हॅलेंटाईन डे च्या अनुषंगाने अशीच गीते , दोहे, भारताने जगाला दिलेले अनेक उदात्त प्रेमाचे दाखले हे विचार लेखासाठी म्हणून मनात येत होते, त्यातच आठवण झाली ती स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेल्या, हेमंतकुमार या धीर गंभीर आवाजाच्या गायकाने स्वरबद्ध केलेल्या आणि कवी कल्पनेच्या उत्तुंग भराऱ्या घेणाऱ्या संपूर्णसिंह कालरा यांनी लिहिलेल्या नितांत सुंदर अशा प्रेमगीताची. संपूर्णसिंह कालरा म्हणजे आपले गुलजार बर का ! 

    1969 या वर्षी झळकलेल्या खामोशी या चित्रपटात एक नितांत सुंदर, श्रवणीय, हृदयस्पर्शी असे गीत आहे. लेखाच्या शीर्षकात आणि सुरुवातीला याच गीताच्या ओळींचा उपयोग केला आहे. हे गीत म्हणजे        

हमने देखी है उन आंखो की महकती खुशबू 

हातसे छू के इसे रिश्तो का इल्जाम न दो,    

 एक अहसास है ये रूह से महसूस करो

प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो | 

अध्यात्मिक टच असलेल्या या गीतात कवी सुरुवातीलाच म्हणतो की आंखो की खुशबू .... आता डोळ्यातून खुशबू  या कवी कल्पनेतच आपणास गुलजारची प्रतिभा दिसते. डोळ्यातून प्रेम स्पष्टपणे दिसते याच अर्थाने कवीने आंखो की खुशबू असे म्हटले आहे.  या अशा डोळ्यातून व्यक्त होणा-या निस्सीम, निस्वार्थ प्रेमाला स्पर्श किंवा कोणत्याही नात्यात अडकवू नये असे कवी म्हणतो. प्रेम म्हणजे फक्त एक जाणीव आहे, अहसास आहे त्याला रूह अर्थात आत्म्यापासून आपण जाणले पाहिजे, समजले पाहिजे. आणि प्रेमाला कोणतेही नांव न द्यावे (आजच्या भाषेत BF, GF) असेही कवी सांगतो.

     याच गीतात पुढील दोन कडव्यात कवी यावर प्रकाश टाकतो की, खऱ्या आत्मिक प्रेमात आवाज नसतो, काही बोलणे नसते तर एक शांतता, अव्यक्तता,  एक खामोशी असते ही अव्यक्तताच सर्व काही सांगून जात असते, ऐकत असते. ही अव्यक्तता म्हणजे जणू काही युगानुयुगांपासून, परमात्म्या पासून आलेला नूर की बुंद अर्थात दिव्य प्रकाशाचा एक थेंबच आहे जो कधीच थांबलेला नाही, डोळ्यांवर एक विशिष्ट चमक येते, डोळ्यात हास्याची लकेर उठते. ओठ बंदच असतात, व्यक्त होऊ शकत नाही परंतू थरथरणा-या ओठांत मात्र कितीतरी अव्यक्त अशा भावना, कथा थांबून राहिलेल्या असतात.

     प्रेमाला हाथ से छू के इसे रिश्तो का इल्जाम ना दो अर्थात प्रेमाला स्पर्शरहीत, पवित्र कोणत्याही नात्यात न अडकवणारी अशी उपमा गुलजार यांनी दिली आहे. आजची भौतिक सुखाकडे आकृष्ट होणारी, महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्या  म्हणजेच प्रेम आहे असे समजणा-या या पिढीला गुलजार यांनी वरील गीतात प्रकट केलेले हे प्रेम कितपत पचनी पडेल देव जाणे ? 

गीत👇

हम ने देखी है इन आँखों की महकती खुशबू
हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो
सिर्फ़ एहसास है ये रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो
हम ने देखी है ...

प्यार कोई बोल नहीं, प्यार आवाज़ नहीं
एक खामोशी है सुनती है कहा करती है
ना ये बुझती है ना रुकती है ना ठहरी है कहीं
नूर की बूँद है सदियों से बहा करती है
सिर्फ़ एहसास है ये, रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम ना दो
हम ने देखी है ...

मुस्कराहट सी खिली रहती है आँखों में कहीं
और पलकों पे उजाले से छुपे रहते हैं
होंठ कुछ कहते नहीं, काँपते होंठों पे मगर
कितने खामोश से अफ़साने रुके रहते हैं
सिर्फ़ एहसास है ये, रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम ना दो
हम ने देखी है ..