उन्होने कहा....
गेल्या बारा वर्षापासून दर गुरुवारी लेख लिहिण्याचा माझा शिरस्ता आहे. या शिरस्त्यानुसार प्रत्येक गुरुवारी निदान एक लेख लिहिला जातो. तो लिहिण्यासाठी सुद्धा एक दोन दिवस आधीपासून तयारी करावी लागते. क्वचित प्रसंगी एकदम वेळेवर सुद्धा लिखाण होते. परंतु आजचा हा गुरुवार असा उजाडला की आजच्या दिवशी प्रथमच दुसरा लेख सुद्धा लिहिला. हा लेख लिहायला भाग पडण्याचे कारण सुद्धा तसेच होते. किमान माझ्या दृष्टीने तरी. आजच्या गुरुवारी हा दुसरा लेख लिहिण्याचे कारण असे की, फेसबुक वर दूरदर्शनवरील जुन्या हिंदी वृत्त निवेदिका सरला माहेश्वरी यांच्या निधनाची फोटोसह असलेली बातमी वाचनात आली. धक्का बसला. सरला माहेश्वरी यांच्या ज्या काही असतील त्या आठवणी ताज्या झाल्या. किशोर वयात असताना टीव्हीवरील अर्थातच दूरदर्शनवरील एक वृत्त निवेदिका हाच काय तो त्यांच्याशी असलेला संबंध. त्या काळात दूरदर्शन ही एकमेव वाहिनी असल्यामुळे जो कार्यक्रम दूरदर्शन दाखवत असे तो पाहणे क्रमप्राप्त असे. मग त्यात बातम्या सुद्धा आल्या आणि त्यामुळे बातम्याही पाहिल्या जात असाव्यात. आम्ही शाळेत असताना माझ्या काकांनी टीव्ही विकत घेतला होता. हे मोठा अँन्टेना घरावर लावला होता. आम्ही सर्व एकत्र बसून टीव्ही बघत असू. बातम्या सुद्धा. दुरदर्शनवर इंग्रजी आणि हिंदी बातम्या देणारे अनेक वृत्त निवेदक होते. रोडका सुमित टंडन, मिनू, शुभेंदू अमिताभ, गीतांजली अय्यर, अविनाश कौर सरीन, मक्ख चेहऱ्याने बातम्या सांगणारी सलमा सुलतान अशी काही नावे आठवतात. यातच सर्वांना आवडणारी आणि या सर्वांमध्ये सौंदर्यात सरस असणारी, सौंदर्यातच नव्हे तर बातम्या सादर करण्यात सुद्धा सरस असणारी सरला माहेश्वरी. साधी राहणी, सोज्वळ चेह-याची, नेहमी साडी परिधान केलेली, बहुधा तेंव्हा निवेदिकेस साडी अनिवार्यच असावी अशी ही सरला माहेश्वरी बातम्या देण्यास आली की दर्शक खुश होत असत. सरला माहेश्वरी यांची बातम्या सांगण्याची एक विशिष्ट अशी लकब होती. अस्खलित हिंदीत त्या बातम्या देत असत. सरला माहेश्वरी यांच्या निधनाचे वृत्त वाचून धक्का बसला. तशी त्यांच्या बाबत विशेष अशी काही माहिती नव्हती. परंतू निधनाच्या बातमीच्या खात्रीसाठी म्हणून काही बातम्या आणखी पाहिल्यावर पत्रकार असलेल्या सरला माहेश्वरी ह्या 1990 ते 2005 या कालावधीत त्या राज्यसभा सदस्य होत्या , कम्युनिस्ट होत्या असे समजले. त्यांचा जन्म बिकानेर येथे 1954 मध्ये झाला होता.
तसे पाहिले तर आपल्या घरी कितीतरी अंतरावरून दिसणारे हे सेलिब्रेटी, हे वृत्त निवेदक आपले कुणीही नसतात. पण त्यातील काही लोक त्यांच्या वेगळ्या, अनोख्या अशा शैलीने आपल्या कायम स्मरणात राहतात. सरला माहेश्वरी यांची सुद्धा अशी काही वैशिष्ट्ये होती. शब्दांचे स्पष्ट उच्चारण, योग्य ठिकाणी विराम घेणे , अस्खलित हिंदी बोलणे अशी सरला माहेश्वरी यांची वैशिष्ट्ये होती. त्यातही त्यांचे माझ्या स्मरणात राहिलेले आणखी एक वैशिष्ट्ये आहे मात्र हे वैशिष्ट्य हेरले होते माझ्या वडीलांनी. माझे वडील काका दोघानांही सरला माहेश्वरी यांची बातम्या सांगण्याची शैली आवडत असे. कुणी नेते काही म्हणाले अशा आशयाची बातमी असेल तर तेंव्हा त्या "उन्होने कहा" खूपच विशिष्ट प्रकारे म्हणत असत. माझ्या वडीलांनी आम्हा सर्वांच्या हे लक्षात आणून दिले होते आणि आम्हाला सुद्धा त्यांची ती "उन्होने कहा" म्हणण्याची पद्धत भावली होती. त्यांची ती विशिष्ट प्रकारे "उन्होने कहा" असे म्हणण्याची शैली त्याकाळी गाजली सुद्धा होती. तेंव्हाच्या बातम्या सांगण्याची पद्धत खूपच साधी आणि संयमित , स्पष्ट , गंभीर अशी होती. आज मात्र बातम्यांच्या विविध वाहिन्यांवर निव्वळ गोंधळ , आक्रस्ताळेपणा चाललेला असतो.
सरला माहेश्वरी यांच्या निधनावर अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. दूरदर्शन ने सुद्धा त्यांना एक्स या समाज माध्यमाव्दारे श्रद्धांजली अर्पण केली आहे.
विविध व्यक्तींच्या किती नाना प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, त-हा असतात साहेबाच्या भाषेत स्टाईल असते. आणि त्या व्यक्तीच्या त्या विशिष्ट शैलीमुळे, स्टाईलमुळे ते व्यक्ती कायम स्मरणात राहतात. सरला माहेश्वरी यांची साधी राहणी , स्पष्ट उच्चारण , हिंदीवर प्रभुत्व अशी शैली होती आणि आणखी म्हणजे लक्षात राहिलेली अशी त्यांची "उन्होने कहा" म्हणण्याची पद्धत. म्हणूनच त्यांचे ते गाजलेले "उन्होने कहा" असे म्हणणे हेच शीर्षक या लेखास द्यावेसे वाटले.
आते है लोग , जाते है लोग
पानी के जैसे रेले , जाने के बाद ,
आते है याद ,गुजरे हुये वो मेले
सरला माहेश्वरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली

लेख खूप चांगला आहे तुमच्या या लेखामुळे विस्मरणात गेलेल्या सरला माहेश्वरी जशाच्या तशा डोळ्यासमोर आल्या
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाMala pan khup aavadayachya bhavpurn shraddhanjali jivan bhi ek khayal hay jaise ki maut
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवा👌👍
उत्तर द्याहटवाखुप छान आहे...
उत्तर द्याहटवा