बिन डोर खिचा जाता हुं....
तसे पाहिले तर आज शाळेत पोहोचण्यास थोडा उशीर होत होता. परंतु गेल्या दोन-तीन दिवसापासून एका ठिकाणी जाण्याची सतत इच्छा मनात येत होती. म्हटले आज या ठिकाणी जाण्याची इच्छा पूर्ण करूनच घ्यावी. टेलिपॅथी म्हणून एक प्रकार असतो तसे झाले की काय कोण जाणे कदाचित ते ठिकाण सुद्धा मला खुणवत होते. म्हणून मी त्या ठिकाणी पोहचलो आणि त्या ठिकाणाचे बदललेले स्वरूप पाहून मला अत्यानंद झाला. ते ठिकाण म्हणजे खामगावचे लाकडी गणपती देवस्थान. बुद्धीची देवता गणपतीबद्दल बालपणापासून जसे सर्वांना असते तसेच प्रेम, भक्ती, आकर्षण मला सुद्धा आहे. त्यामुळेच लाकडी गणपतीबद्दल सुद्धा तशाच भावना आहे. कदाचित त्याचे कारण माझे आजोबा आणि वडील हे असावेत. माझे आजोबा वैद्य दत्तात्रय उपाख्य नानासाहेब वरणगांवकर गणपतीचे निस्सिम भक्त होते तसेच लाकडी गणपतीच्या प्रथम संचालक मंडळात सुद्धा ते होते आणि माझे वडील या मंडळाचे कार्यकर्ते होते. गणपतीच्या मिरवणुकीमध्ये लाकडी गणपतीच्या समोर पुर्वी मोठा नगारा असे तो नगारा माझे वडील आणि त्यांचे मित्र वाजवत असत. आजच्या डीजेच्या बेसूर आणि कर्णकर्कश्श आवाजाच्या ऐवजी तत्कालीन नगाऱ्याचा आणि लेझीमचा आवाज भक्तांना किती कर्णप्रिय आणि भक्तीभाव पुर्ण वाटत असेल नाही का ? आजोबांचे आणि वडिलांचे लाकडी गणपती मंदिर, मिरणूक यांत असलेल्या योगदानामुळेच कदाचित लाकडी गणपतीबद्दल मला वरील भावना असाव्यात असेही असू शकते कारण गणपती तर सर्वत्र सारखाच किंवा एकच असतो. लाकडी गणपतीच्या मंदिराचा जिर्णोद्धार होतो आहे हे काही महिन्यांपूर्वीच कळले होते त्यामुळे अरुंद गल्ल्यांमध्ये असलेल्या लाकडी गणपतीच्या अरुंद आणि जीव घुसमटणाऱ्या मंदिराचे नवीन स्वरूप कसे असेल हे बघण्यासाठी माझी बऱ्याच दिवसापासूनची उत्कंठा होती. आज ती उत्कंठा पूर्णत्वास गेली आणि मला ते नवीन मंदिर बघून खूप आनंद झाला लाकडी गणपती मंदिराचा सभामंडप आता चांगलाच रुंद झाला आहे शिवाय इतरही अनेक गोष्टी जसे दरवाजा कोरीव काम, गाभारा लाकडी गणपतीचे संपूर्ण मंदिरच अतिशय सुंदर झाले आहे. माझ्याच प्रमाणे खामगांवकरांचे श्रद्धास्थान असलेल्या मानाच्या गणपतीबद्दल खामगांवचे नागरिक तसेच खामगांव सोडून गेलेले नागरिक यांनासुद्धा अतिशय आकर्षण भक्ती आणि प्रेम आहे. कारण आजही जेव्हा समाज माध्यमांवर खामगांवचे नागरिक लाकडी गणपतीचे फोटो, व्हिडिओ, रील टाकतात तेव्हा त्यांना प्रचंड प्रतिसाद येतांना आपल्याला दिसतो. लाकडी गणपतीची स्थापना शंभरहून अधिक वर्षांपूर्वी झालेली आहे असे ज्येष्ठ मंडळींकडून ऐकलेले आहे. याबाबत मागेही एका लेखात मी लिहिले आहे की, हा लाकडी गणपती तत्कालीन बोर्डी नदीच्या पुरामध्ये वाहून आला आणि भुसाऱ्याजवळच्या पुलामध्ये अडकला तेव्हा अय्याची कोठी या वेटाळातील गंगाधरराव पिवळटकर, नानासाहेब वरणगांवकर, गिरजापुरे, त्र्यंबकलाल पुरवार, एकनाथ जयराम, भिकाजी निंबाजी यांनी मिळून या गणपतीला अय्याच्या कोटीतील सद्य ठिकाणी स्थापित केले. असे काहींचे म्हणणे आहे. तर काही लोक असेही म्हणतात की, अय्याची कोठी या भागामध्ये अय्या लोक म्हणजेच आचारी लोक राहत असत आणि स्वयंपाक करण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर लाकडे लागत असत. याच लाकडांमध्ये काही विशिष्ट आकारांची लाकडे बघून तत्कालीन काही कलाप्रेमींना त्यातून गणपती बनू शकतो असे वाटले आणि त्यांनी त्या लाकडांचा गणपती बनवला असेही काही जुने नागरिक म्हणतात. कथा कोणतीही असो परंतु या लाकडी गणपतीवर खामगावकरांची श्रद्धा मात्र अगाध आहे. 1956 च्या एका कटू प्रसंगात या लाकडी गणपतीला समाजकंटकांकडून दुखापत सुद्धा झाली होती असेही काही नागरिक सांगतात. त्यावेळी खामगांवकर दुखावले होते. तत्कालीन काळा प्रमाणे "मंदिर लयी साधंसुध" असं हे लाकडी गणपती मंदिर होत व हा गणपती होता.
पुढे मात्र हा काष्ठ रूपातील गणरायास खामगांव शहर हे चांदीची मोठी बाजारपेठ असल्यामुळे काही धनाढ्य लोकांनी चांदीच्या दागिन्यांनी सजवले. त्या साजानंतर हा लंबोदर अधिकच आकर्षित दिसू लागला. पुर्वी अनंत चतुर्दशीच्या दिवशी बैलगाडीवर या गणपतीची मिरवणूक निघत असे. परंतु आता काही अंतरापर्यंतच बैल असतात आणि नंतर मात्र ट्रॅक्टरवर या गणपतीला नेले जाते. असा बदल गत दोन वर्षापासून झाला आहे. सुरज अग्रवाल, भेरडे, चंद्रशेखर पुरोहित तसेच इतर सर्व संचालक मंडळ सुद्धा या मंदिराची चांगली देखरेख व कारभार करीत आहे असे दिसून येते. मी काही कधी देवाला नवस करत नाही परंतु अनेकांच्या नवसाची पूर्ती या लाकडी गणपतीने केली आहे असे अनेक नागरिक सांगतात. खामगांवातून बाहेर गेलेले नागरिक खामगांवला आले की हमखास लाकडी गणपतीच्या दर्शनाला जातात. लाकडी गणपती म्हणजे खामगावचे असे दैवत आहे की सर्वांनाच त्याच्या दर्शनासाठी जावेसे वाटते. सर्वानाच त्याची ओढ असते आणि म्हणूनच "बिन डोर खिंचा जाता हुं..." अशी भक्तांची अवस्था होऊन श्रद्धेमुळे अनेकदा अनेकांची पावले न कळत या मंदिराकडे खेचली जातात.