पचास साल का 'वक़्त'
बघता बघता 2015 हे वर्ष सुद्धा सरले.तोंडातून निघालेला
शब्द,धनुष्यातून सुटलेला बाण,ओसरलेले तारुण्य आणि निघून गेलेली वेळ अर्थात 'वक़्त' या
गोष्टी एकदा निघून गेल्या की पुन्हा वापस येत नाहीत.यंदाच्या दिवाळीत एक घरपोच पुस्तकांची
लायब्ररी चालवणारे एक गृहस्थ घरी आले होते.त्यांनी सर्व माहिती दिली स्वतःची रामकथा
सुद्धा सांगितली त्यांच्यावर आलेल्या परिस्थिती बाबत बोलताना ते हताशपणे उद्गारले "काय
करता बुवा? बी आर चोप्राचा 'वक़्त' आहे. 1960 च्या दशकात शिक्षण घेणाऱ्या या माणसाला
त्याच्यावरील परिस्थितीने त्याच्याच तरुणपणी म्हणजे 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या
'वक़्त' या सिनेमाची बरोबर आठवण झाली.हा सिनेमा आहेच तसा कोणावर कशीही वेळ येवू शकते
हे सांगणारा.वडिलांनी या चित्रपटाची अनेकदा तारीफ केली होती त्यामुळे मी सुद्धा हा
चित्रपट पहिला.काहीतरी चांगला 'मेसेज' देऊन जाणारे चित्रपट पाहणे म्हणजे एखादे चांगले
पुस्तकच वाचण्यासारखे असते.असे चित्रपट यश चोप्रा व तत्सम प्रतिभावान दिग्दर्शकांनी
दिग्दर्शित केलेले असत.या चित्रपटाचे निर्माते बी.आर.चोप्रा सुद्धा विचारवंत,पत्रकार
होते.त्या घरपोच लायब्ररीवाल्या माणसाने या चित्रपटाच्या स्मृती पुनश्च करून दिल्या
अन लक्षात आले की या चित्रपटाला प्रदर्शित होउन तर "पचास साल का 'वक़्त' हो गया".परंतु
अजूनही हा चित्रपट त्याच्या कथानकामुळे, संवादामुळे,अभिनयामुळे अनेकांच्या स्मरणात
आहे.हल्ली असे सामाजिक जाणीव किंवा प्रेक्षकांना काहीतरी चांगला संदेश देणारे चित्रपट
कमी निघतात.रसिक प्रेक्षक असे चित्रपट पाहून जेंव्हा चित्रपटगृहाच्या बाहेर पडतात तेंव्हा
त्यांना त्या चित्रपटाच्या कथानकातून खूप काहीतरी मिळालेले असते.'वक़्त' सुद्धा याच
प्रकारातला सिनेमा.लाला केदारनाथ(बलराज सहानी) याला तीन मुलगे(राजकुमार,सुनील दत्त,
शशी कपूर) असतात. लाला म्हणजे सहकुटुंब मोठ्या हवेलीत राहणारी शहरातील एक बडी असामी
त्यामुळे अंगी थोडा अभिमान असतोच.सदाबहार गीत 'ऐ मेरी जोहाराजबी' झाल्यावर लाला आपल्या
पत्नीला म्हणतो की, "लक्ष्मी मै तुम्हारे लिये एक शानदार बंगला बनाउंगा,
एक
गाडी खरीदुंगा उसमे तुम मै और हमारे शाह्जादे जाएंगे तो लोग कहेंगे वो देखो, वोssssss
जा राहा ही लाला केदारनाथ" असे म्हणण्याचा अवकाश की भूकंप होतो.एका क्षणात सर्व
होत्याचे नव्हते होते.लालाच्या सगळ्या इच्छा, अभिमान, संपत्ती सर्व एका क्षणात नाहीसे
होते.कुटुंबाची ताटातूट होते, लाला केदारनाथ रस्त्यारच येतो. इकडे प्रेक्षकांना सुद्धा
एकदम धक्का बसतो.पत्नी, तिन्ही मुले एकमेकांपासून दुरावतात.'लोंस्ट एन्ड फाउंड' फार्म्युल्याचा
आणि मल्टिस्टार असा कदाचित हा पहिलाच सिनेमा असावा.मदनपुरीचा चाकू परत त्याच्या हातात
देवून "ये कोई बच्चोके खेलनेकी चीज नही"तसेच रहमान या खलनायकाला "चिनाय
सेठ जिनके अपने घर शिशेके हो वो दुसरोपर पत्थर नही फेंका करते"सारखे राजकुमारचे
संवाद रसिकांना आवडले.सुनील दत्त,शशी कपूर व इतर सर्वानीच चांगला अभिनय केला आहे.शशी
कपूरने तर गरीब,बेरोजगार, 'मजबूर' सुशिक्षित तरुणाची भूमिका अगदी हुबेहूब वठवली आहे."आगे
भी जाने ना तू", नुकत्याच निवर्तलेल्या रूपसंपन्न साधनाचे "कौन आया की निगाहोमे"
तसेच "दिन है बहारके" अशा संगीतकार रवीने संगीतबद्ध केलेल्या श्रवणीय
"ऑल टाइम हिट" गाण्यांसोबत अनेक
वळणे घेत चित्रपटाचा शेवट सुखावह होतो. लाला केदारनाथ व त्याचे सर्व दुरावलेले कुटुंबीय
सुनांसह परत एकमेकांना भेटतात.मोठा मुलगा लाला केदारनाथला म्हणतो,"आगे देखिये
अब क्या होता है.. सारे शहरपे हमारा राज होगा"लाला त्याला अडवतो व म्हणतो
"नही बेटे एकबार मैने भी ऐसाही कुछ कहा था वक़्त ने ऐसा तमाचा मारा मेरे मुंह पर
सब तिनका-तिनका करके बिखर दिया, क्यू? , ये बतानेके लिये की वक़्तही सबकुछ है, वक़्त
हि बनाता है और वक़्तही बिगाड्ता है".आज वर्ष अखेर आहे.आपल्या जीवनातील सुद्धा
एक वर्षाचा "वक़्त" निघून गेला आहे. "न्यू इयर रीजोलुशन" करताना
वेळेचे महत्व आपण सर्व जाणून घेऊया.२०१६ पासून कोणाचा 'वक़्त" कसा होता व आता कसा
आहे हा विचार मनात ठेवूया.वृथा अभिमान, तोरा, गर्व, मग्रुरी सोडून देण्याचा संकल्प
करूया.बरेच लोक टीवीचे चनल "सर्फ" करता-करता एखादा जुना सिनेमा दिसला की
चटकन चनल बदलतात.'जुने जाउद्या मरणा लागुनी' असे जरी एका कवीने म्हटले असले तरी सर्वच
जुने काही अगदी टाकाऊ नसते.'वक़्त' या सिनेमाला 50 वर्षे झाली.तो सिनेमा म्हणजे आता
नवीन "स्मार्ट" पिढी साठी जुनाट झाला असेल परंतु या सिनेमाने दिलेला"वक़्तही
सबकुछ है,वक़्त हि बनाता है और वक़्तही बिगाड्ता है"हा संदेश मात्र कालातीत आहे.नवीन
वर्षाची सुरुवात करताना आपण सुद्धा वेळेचे महत्व जाणून घेऊया.वेळच सर्व काही आहे हे
समजून घेऊन आपली वर्तणूक ठेवूया.
विनय विजय वरणगावकर