रमा-माधवाचे जिथे चित्त लागे
यंदाच्या गणेश उत्सावावर अनेक प्रकारची बंदी,पोलिसांचे लक्ष तसेच दुष्काळाचे सावट आहे. परंतू महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील गणेशभक्ती आणि गणेशोत्सवाचा उत्साह याची सर्वदूर ख्याती आहे. गणेशोत्सवात अबालवृद्धाना आनंदाचे उधाण असते. महाराष्ट्राच्या या गणेशभक्तीला फार मोठा इतिहास सुद्धा आहे. अनादी अनंत काळापासून महाराष्ट्रातील प्राचीन गणपती मंदिरे तसेच अनेक किल्ल्यांवरील मुख्य दरवाजावर विराजमान गणेश मूर्ती याची साक्ष देतात. अनेक गणपती मंदिरांना राजाश्रय प्राप्त झालेला होता. अनेक मंदिरांना राजे महाराजांची सनद/रसद मिळत होती. या मंदिरांपैकीच एक मंदिर म्हणजे थेऊरचे चिंतामणी गणपती मंदिर. हे स्थान अष्टविनायाकांपैकी एक गणेश स्थान.गणपतीच्या साडे तीन पीठापैकी एक असलेले चिंचवड व या चिंचवडच्या मोरया गोसावीचे वंशज चिंतामणी गोसावी यांनी थेउरचे हे मंदिर बांधले.मंदिराचे महाद्वार उत्तराभिमुख आहे. गणपतीचे मंदी घातलेले आसन असून मूर्ती पूर्वाभिमुख व अतिशय रेखीव आहे."काय सांगू डाव्या सोंडेचे नवाल केले सार्या साऱ्यानी".चिमाजी आप्पा या पहिल्या बाजीरावाच्या नात्याने भाऊ असणाऱ्या निष्ठावानाने वसई किल्ला पोर्तीगीजांपासून जिंकल्यावर जप्त केलेली एक भव्य युरोपियन घंटा आजही या मंदिरात आहे. या मंदिराची कहाणी "लय लय जुनी ". मंदिरा बाबत दोन आख्यायिका प्रसिद्ध आहेत. एक म्हणजे गणेशाच्या भक्तीने येथे इंद्राचे पापक्षालन झाले तर दुसरी म्हणजे ब्रम्हदेवाने येथे चिंता हरणाऱ्या चिंतामणी गणेशाची आराधना केली व ब्रम्हदेवाचे चित्त येथेच शांत झाले. या दुसऱ्या अख्यायीकेमुळे "जो चिंता हरतो मनाची त्यो चिंतामणी" अशी भक्तांच्या मनातील चिंता हरण करणारा आणि मोह्मायाचे निराकरण करणारा चिंतामणी गणेश म्हणून या गणपतीची ख्याती सर्वदूर पसरली. चिंतामणी गोसाव्याने मंदिर स्थापन केल्यानंतर सुमारे शंभर वर्षांनी "विस्तार याचा केला थोरल्या पेशव्यांनी". थोरल्या श्रीमंत माधवराव पेशव्यांनी येथे सभामंडपाचे बांधकाम केले. पेशवे गणपतीला आपले कुलदैवत मानत. माधवराव व त्यांची पत्नी रमाबाई या रमा-माधवाचे या देवालयात नेहमी चित्त लागे. थोरले माधवराव जरी थोरले होते तरी वयानी फार काही मोठे नव्हतेे. या तरुण पेशव्याला चिंता मात्र खूप होत्या.धाकटा भाऊ नारायणराव, थोरले असूनही पेशवे पदापासून वंचित राहिल्यामुळे नाराज काकू-काका आनंदीबाई व रघुनाथराव. शिवाय राजकारणातील इतर अनेक चिंता म्हणून ते दोघे बऱ्याचवेळा येथे येत असत. मुळा-मुठा नद्यांनी वेढलेल्या या निरव शांतता असलेल्या मंदिरातील चिंतामणी गणेश पेशव्यांना सुद्धा त्यांच्या राज्यकारभारातील व अंतर्गत राजकारणाच्या चिंता हरून घेईल असे कदाचित वाटत असावे. देवालयाच्या जवळच पेशव्यांनी वाडा बांधला होता. आता हा वाडा नसून त्याचे अवशेष मात्र भव्य वाडा असल्याची साक्ष देतात. नदी ते वाड्यापर्यंतची पेशव्यांनी बांधलेली फरसबंदी वाट मात्र आजही रमा-माधवाचे प्रेम व चिंतामणीवरील परम भक्ती यांची साक्ष देते. रमाबाई व माधवरावांच्या वास्तव्यामुळे या स्थानास ऐतिहासिक महत्व सुद्धा आहे. राज्यकारभारातून उसंत घेऊन ते येथील वाड्यावर येत. पराक्रमी व धडाडीचा पेशवा म्हणून माधवराव ख्यात होते. परंतू दुर्दैव हे कि त्यांना राजक्षय रोग झाला होता. इतिहासाचे हेच मोठे दुर्दैव आहे कि जे जे काही महाशूर राजे होऊन गेले तेच नेमके अल्पायुषी ठरले. माधवराव सुद्धा दुर्दैवानी अल्पायुशीच ठरले. थेऊरच्या वाड्यावरच शूर माधवरावांनी आपले प्राण सोडले, रमाबाई सती गेल्या व चिंतामणीने "रमाबाईला अमर केले वृंदावनी". मुळा-मुठा नदीच्या तीरावर सतीचे वृंदावन आहे. देवालयात माधवरावांचे तैलचित्र लावलेले असून दरवर्षी कार्तिक वदय ८ रोजी येथे रमा-माधवाची पुण्यतिथी साजरी करतात. भाद्रपदातील चतुर्थीला दरवर्षी चिंतामणी उत्सव साजरा करतात. मुंबईहून खंडाळ्याकडे निघाल्यास जसा भोर घाट संपतो तसे थेऊर गाव लागते.पुण्याहून जायचे म्हटल्यास पुणे-सोलापूर रोडवर साधारणपणे २०-२२ कि मी वर थेऊर फाटा आहे. सारसबाग अथवा पुलगेट बस थांब्याहून पुणे-थेऊर बसेस सुद्धा मिळतात. "रमा-माधवाचे जिथे चित्त लागे" अशा "थेउराला चला जाऊया गणेशाप्रती आरती गाऊया" कारण "भक्तांच्या मनी त्याचा अजुनी ठसा" आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा