मोबाईल निकाह
विवाह
अनेक प्रकारचे सांगितले जातात.हिंदू संस्कृतीत विवाहांचे आठ प्रकार सांगितले आहेत.
ब्राह्म, प्रजापत्य, दैव, आर्ष, असुर,राक्षस,गांधर्व आणि पिशाच्च विवाह असे ते
प्रकार आहेत.यापैकी सध्या गांधर्व विवाह मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहेत.गांधर्व म्हणजे
आताचे लव्ह मॅरेज.जरी लव्ह मॅरेज असले तरी लव्ह मॅरेज असूनही अशा विवाह करणा-यांमध्ये
विभक्त होण्याचे प्रमाण सुद्धा जास्त आहे.पूर्वीच्या या विवाह पद्धती नंतर
काळाच्या ओघात प्रत्येक धर्मात अनेक चाली-रिती बदलत गेल्या.आदर्श विवाह होऊ लागले,काही
महाभागांनी तर समुद्राच्या खाली तर काहींनी बलून मध्ये,काहींनी विमानात तर काहींनी
अवकाशात लग्न केले.हे सगळे विवाह हौसेखातीर झाले.विवाहांबद्दल इतके सारे आठवण्यास
निमित्त घडले ते म्हणजे परवा बुलडाणा जिल्ह्यात जामोद येथील नुकत्याच झालेल्या
दंगलीच्या पार्श्वभूमीवर संपन्न झालेला एक विवाह. हा विवाह चक्क मोबाईल वर संपन्न
झाला.आजच्या काळातील महत्वाचे ‘गॅजेट’ असलेल्या मोबाईल वर हा विवाह काही हौसेखातीर
संपन्न झाला नाही तर मोबाईलव्दारे विवाह होण्यास दुर्दैवाने कारण होते ‘कर्फ्यु’.परवा
जामोद मध्ये काही कारणास्तव दोन गटात दंगल झाली आणि संचारबंदी जाहीर झाली.याच काळात
संग्रामपुरचे रहिवाशी शेख रहीम यांची कन्या शबिना परवीन यांचा विवाह जामोद येथील
शेख हारून यांचे पुत्र शेख वसीम यांचे सोबत निश्चित झाला होता. आपल्या होणाऱ्या
दुल्हे राजाची वाट पाहत शबिना आणि सर्व नातेवाईक बसले होते.मात्र नेमके तेंव्हाच दुल्ह्याच्या
गावात जामोदमध्ये दंगल भडकल्याची बातमी येऊन धडकली.जामोदमध्ये दोन गटात वाद
उफाळला.परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की पोलिसांनी कर्फ्यू लावला.शबिनाचा होणारा
पती जामोदचा असल्यामुळं तो निकाहच्या मुहुर्तावर संग्रामपूरमध्ये पोहोचणं अशक्य
होतं.वर पक्षाशिवाय लग्न कसं उरकायचं? असा यक्षप्रश्न निर्माण झाला.निकाह
लावण्यासाठी आलेले काझी व दोन्ही बाजूंच्या मंडळींनी एक ‘आयडिया‘ शोधून काढली. ती
म्हणजे लग्नासाठी मोबाईल फोनचा वापर करण्याची.आणि मग काय मोबाईल फोनवरच खुत्बा
वाचला गेला.वधू-वरांचा कबुलीनामा देखील फोनवरच झाला.संध्याकाळी कर्फ्यू हटवण्यात
आल्यावर वर पक्षाची मंडळी जामोदवरून संग्रामपूरमध्ये आली आणि बाकीचा विधी उरकण्यात
आला. लॅन्डलाईन फोनवर ओळख आणि मग विवाह असा ‘मेरे पिया गये रंगून वहॉं से किया है
टेलीफुन” एक काळ होता.नंतर फेसबुक वर ओळख आणि मग विवाह असा “प्यार के लिये है इंटरनेट”
वाला काळ आला.यात विवाह मात्र ‘लाइव्ह’ झाले होते.शबिना आणि वसीम यांचा निकाह मात्र
थेट ‘ऑनलाईन’ झाला.तंत्रज्ञानामुळे जग किती जवळ आणलं त्यामुळे लोक जवळ आलीत.याच
मोबाईल मुळे दंगली सुद्धा घडल्या.जामोद्च्या दंगलीच्या दु:खद घटनेनंतर हि घटना
वाचनात आली वर-वधु दोन्ही पक्षांचे कौतुक वाटले.दंगल हि दोन्ही गटांसाठी दु:खद्च असते.नुकसान
दोन्ही गटांचे असते.शबिना आणि वसीमच्या घरच्या मंडळीनी दु:ख विसरून आलेल्या अडचणीवर
मात करीत तंत्रज्ञानाचा आधार घेत विवाह पार पडला. भविष्यात मात्र दंगलीच्या
कारणास्तव असे होऊ नये म्हणजे झाले. दोन्ही गटांनी सर्वात प्रथम संयम पाळणे आवश्यक
आहे. आपले कुणी काही करू शकत नाही असे समजून दंगलीत सहभागी होऊ नका तुमचे दादा, भाऊ
यांना कुणालाही दंगलीची झळ पोहचत नाही.ते आरामातच राहतात.त्यामुळे दोन्ही गटांनी
संयमाने एकोप्याने राहावे आणि मा.पंतप्रधानांनी सांगीतल्याप्रमाणे प्रथम ‘गरिबीशी’
लढावे.शेख हारून आणि शेख रहीम यांना नाइलाजास्तव का होईना स्वत:च्या मुला-मुलीचा
‘मोबाईल निकाह’ लावावा लागला तसा दंगलीच्या कारणामुळे इतर कुणाला लावावा लागू नये
हिच ईश्वर चरणी प्रार्थना.