तुका म्हणे ऐशा नरा.......
विविधतेत एकता असलेल्या
आपल्या देशात विचित्र,समाज कंटक. नियमांना धाब्यावर बसवून कायद्याचे उल्लंघन करणा-या
लोकांची सुद्धा कमी नाही आहे.आपल्या देशात एका पाठोपाठ एक अशा कायदा मोडणा-या, काहीही
बरळण्याच्या, दुष्कृत्ये करण्याच्या,कायदा मोडून सही सलामत सुटण्याच्या अनेक घटना अशा
लोकांकडून घडत असतात.सर्वसामान्यांना याचे अप्रूप वाटत असते.आता परवाच १९९८ मधील काळवीट
शिकार प्रकरणी आरोपी असलेल्या महान अभिनेता,जनतेच्या लाडका,दिखावा म्हणा किंवा शिक्षा
कमी व्हावी म्हणून मानलेल्या बहिणीचा लाडका भाऊ,तसेच शिक्षा सौम्य व्हावी म्हणून “बिइंग
ह्युमन” सामाजिक संस्था सुरु करणारा सलमान ह्यास काळवीट प्रकरणातून निर्दोष मुक्त केले.काय
तर म्हणे ज्या गोळ्या काळविटास लागल्या त्या महान सलमान महोदय यांच्या बंदुकीतून सूटलेल्या
नव्हत्या. मग गोळ्या कुठून सुटल्या? याचा अर्थ जंगलात इतर शिकारी सुद्धा होते, म्हणजेच
शिकारी होत आहेत, आता वन विभागाने मग त्या अज्ञात शिका-यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा.कारण
न्यायालयाच्या निर्णयाने हे निश्चित झाले आहे की शिकार झाली आहे मग आता ज्याच्या बंदुकीतून
गोळ्या सूटल्या त्याला पकडा कारण वाघ,बिबट्या किंवा इतर हिंस्त्र श्वापद काळविटास बंदुकीने
तर नाही मारणार.सलमान भाऊ आपले अतिशय लाडके त्यांनी मद्यधुंद होऊन बेदरकारपणे गाडी
खाली लोकांना चिरडून टाकावे,वन्य प्राण्यांना मारावे,बलात्काराचा दाखला देऊन स्वत:च्या चित्रपटाचे “प्रमोशन” करण्याच्या प्रयत्न
करावा त्यांना कुणी काहीही नाही म्हणणार. उलट त्यांचे चित्रपट आम्ही डोक्यावर घेऊन
त्यांनाच करोडो रुपये मिळवून देवू.
काहीही बरळण्या-या लोकांचे सुद्धा असेच. दयाशंकर यांनी मायावती संबंधी अनुद्गार
काढून कुणाचीही नसती आफत ओढवून घेतली. काय गरज काहीही बरळण्याची? सत्तेच्या धुंदीत
तोल सुटतो आणि मग नंतर कारकिर्दीवर गंडांतर. हे असे काहीही वक्तव्ये करणारे नेते यांना
सुबुद्धी कधी प्राप्त होणार?
विविध दुष्कृत्ये करणा-यांचे सुद्धा तेच. काही एक विचार न करता केवळ “सोशल मिडीयावर”
प्रसिद्धी मिळविण्याच्या नादात हे तरुण आज-काल काय करतील याचा नेम नाही. कुत्रीला गच्ची
वरून काय फेकले, चार- पाच मुलांनी कुत्र्याच्या पिलांना जिवंत काय जाळले,वरून त्याचे
चित्रीकरण सुद्धा केली काय ही विकृतता.कुत्रा पोळी घेऊन पळाला तर संत नामदेव कुत्र्याच्या
घशाला कोरड पडेल म्हणून त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन निघाले होते. संत एकनाथानंनी
गंगेचे पाणी गाढवाला पाजले होते. अशा संतांच्या देशात प्राण्यांशी असे वागले जाते.
विविध देवी देवतांची वाहने विविध प्रकारचे प्राणी आहेत. हे यासाठीच की आपण प्राणीमात्रांवर
प्रेम करावे. परंतू आता संत त्यांची शिकवण याचा कोण विचार करते? आता फक्त हवी सवंग
प्रसिद्धी म्हणूनच सलमान स्त्रियांबद्दल अनुद्गार काढतो ,हरणाला मारतो,उच्चशिक्षित
तरुण कुत्रीला तीस-या माळ्यावरून खाली फेकतात,शाळकरी मुले कुत्र्याच्या पिलांना जिवंत
जाळतात.अशाच नराधमांना उद्देशून संत शिरोमणी तुकाराम महाराज म्हणाले होते "तुका म्हणे ऐशा नरा, मोजूनि माराव्या
पैजारा' आता तर पैजारा ऐवजी “...माराव्या गोळ्या”
असेच म्हणावेसे वाटते कारण गोळ्या दुस-या कोणत्या तरी बन्दुकीतून सुटल्या हे सिद्ध
करता येवू शकते.